हरळी बुद्रुक हे गाव कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यापासून सहा किलोमीटर अंतरावर आहे. ते गडहिंग्लज-चंदगड मार्गावर हिरण्यकेशी नदीच्या काठी वसलेले आहे. नदी असल्यामुळे गावाभोवती बाराही महिने हिरवळ असते. त्यामुळे गाव अतिशय सुंदर दिसते. गावातील कुटुंबांची संख्या चारशेपंच्याऐशी असून गावाची लोकसंख्या दोन हजार चारशेपाच इतकी आहे. एकूण घरांची संख्या पाचशेअठ्ठेचाळीस. ती तीन वॅार्डांमध्ये विभागली गेली आहेत. गावालगत आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना आहे. त्यामुळे गावातील लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
गावाचा प्रमुख व्यवसाय हा कृषी, कृषीपूरक जोडधंदे व इतर लहानमोठे घरगुती व्यवसाय यांच्याशी निगडित आहे. प्रमुख पिके म्हणून ऊस, भात, भुईमुग, सोयाबीन यांचे उत्पादन घेतले जाते. नदी, विहीर यांचा जलसिंचनासाठी गावाला आधार आहे.
त्यामुळे गावातील लोक ऊस उत्पादनावर भर देतात. लोकांना पिण्यासाठी व शेतीसाठी नदीच्या पाण्याचा उपयोग होतो.
गावचे ग्रामदैवत भैरवनाथ. त्याची यात्रा दरवर्षी भरते. तसेच, तेथे महालक्ष्मी, भावेश्वरी, गणपती, मारुती, विठठल- रुक्माई, दत्त, महादेव, वाकोबा, पंत बाळेकुंद्री महाराज या देवांची व संतपुरुषांची मंदिरे आहेत. महालक्ष्मी मंदिरात भव्य सांस्कृतिक हॉल आहे. महालक्ष्मी यात्रा दर पाच वर्षांनी भरते. यात्रेच्या वेळी सर्व लोक एकत्र येतात.
हरळी बुद्रुक ग्रामपंचायत 1958 सालापासून कार्यरत आहे.सदस्यसंख्या नऊ. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. ग्रामपंचायतीच्या वृक्षारोपण योजनेमध्ये एकशेपन्नास रोपांची लागवड केली गेली.
गावास 2013 मध्ये तंटामुक्त गाव पुरस्कार मिळालेला आहे. त्याचप्रकारे, हागणदारी मुक्त गाव आणि आदर्श ग्राम हे पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. गावविकासाला चालना देणारी व्यक्ती म्हणजे सिंबॉयसिस स्कूलचे संस्थापक डॉ.का.ब.मुजुमदार हे होय.
गावामध्ये कृषिपूरक जोडधंद्यामध्ये दुग्धउत्पादन हा व्यवसाय असून गावामध्ये दोन दूध संस्था आहेत त्या दूध संस्थांची नावे भैरवनाथ सहकारी दूध संस्था व महालक्ष्मी सहकारी दूध संस्था. ग्रामीण अर्थकारणाला चालना देण्यासाठी गावामध्ये विकास सेवा सोसायटी संस्था व महिला नागरी पतसंस्था यांची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थांमार्फत गरजू सभासदांना कर्ज पुरवठा केला जातो.
गावात आरोग्य सुविधा चांगल्या आहेत. गावातील लोकांना प्राथमिक उपचार घेण्यासाठी बाहेरगावी जावे लागत नाही. गावात दोन खाजगी दवाखाने आहेत. जवळच महागाव येथे सरकारी दवाखाना आहे. गावातील तरुण मुलांना एकत्र करुन त्यांच्या नव-नवीन कल्पना गावात राबवल्या जातात. गावातील तरुण गावात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करतात. गावात सर्व सण, उत्सव मोठ्याने साजरे करतात. शिवजयंतीला गावात मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
गावात ‘अर्जुन मारुती होडगे सार्वजनिक वाचनालय’ चालू करण्यात आले आहे. गावामध्ये व्यायामशाळादेखील आहे.
गावाच्या आसपास इंचनाळ, हरळी खुर्द, नौकुड, हगीणहाळ, चियेवाडी ही गावे आहेत. पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या इंचनाळच्या गणपतीला जाण्यासाठी हिरण्यकेशी नदीवर कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला आहे.
माहिती स्रोत: दीपाली लोहार (02327) 250150.
रामचंद्र बामणे 9820693502 आणि इंटरनेटवरून.
– नितेश शिंदे
आमच्या महापालिकेचमहापालिकेत…
आमच्या महापालिकेचमहापालिकेत आमचे सहकारी हरळीकर होते ते सांगायचे आमचे वडील की आजोबा प्रसिध्द वकील होते
एक आठ
krupaya jaast photo va…
krupaya jaast photo va gawatil prasidha vakthichi mahiti dyaavi
हरळी गावात आजून एक गोष्ट…
हरळी गावात आजून एक गोष्ट म्हणजे गावा शेजारी कुकुडपालन ही आहे, तसेच गावची वाढती लोकसंख्येसोबत गावाची वस्ती ही वाढत आहे. गावामध्ये मुबलक पाण्याची सोय आहे.