Home व्यक्ती आदरांजली सोलापूरचे मार्शल रामकृष्ण गणेशराम जाजू (Ramkrishna Jaju- Solapur’s martial in Freedom Struggle)

सोलापूरचे मार्शल रामकृष्ण गणेशराम जाजू (Ramkrishna Jaju- Solapur’s martial in Freedom Struggle)

 

 

मार्शल हे खरे तर लष्करी संबोधन, परंतु तेच संबोधन महात्माजींना दैवत मानून ज्याने अहिंसेची व अनात्याचाराची शपथ घेतलेली आहे अशा जाजू नावाच्या सोलापूरातील गांधीवादी समाजसेवकाच्या नावापुढे पाहून मोठा विरोधाभास वाटतो. रामकृष्ण गणेशराम जाजू ! व्यवसायाने व्यापारी. जाजू हे नागपूरच्या झेंडा सत्याग्रहापासून राजकीय पटलावर प्रकाशात आले. त्यांच्याकडे सोलापूर तालुका काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. लाहोर काँग्रेसच्या समारोपप्रसंगी, 26 जानेवारी 1930 हा दिवस भारतीय स्वातंत्र्य दिवस म्हणून जाहीर करण्यात आला ! तेव्हापासून जाजूंच्या विविध पैलूंचे सोलापूरकरांना दर्शन झाले. 26 जानेवारी 1930 हा भारतीय स्वातंत्र्य दिवस सोलापुरात फारच उत्साहाने साजरा झाला. राष्ट्रीय निशाणाची मोठी मिरवणूक निघाली. सायंकाळी पाच वाजता टिळक चौकात जाजू यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली, रात्री स्वातंत्र्यदिना निमित्ताने शहरात दीपोत्सव करण्यात आला. जाजू यांनी त्यासाठी अविश्रांत श्रम घेतले.

जाजू सोलापूर गिरणीमध्ये झालेल्या संपात आघाडीवर होते. तो फेब्रुवारी महिन्यात झाला. संपातील मजुरांसाठी सभा झाल्या. त्यात मौलवी आझाद सोभानी, लालजी पेंडसे असे वक्ते असत. त्यांचे अध्यक्षस्थान जाजूंकडे असे. तशातच महात्माजींचा दांडी मार्च सुरू झाला. काँग्रेस कार्यकारिणीच्या सूचना गांधीजी दांडीस पोचून मिठाचा कायदा मोडेपर्यंत देशात अन्यत्र कोठेही कायदेभंग सुरू करू नये अशा होत्या. देशातील वातावरण तप्त झाले होते. सोलापूरची जबाबदारी जाजू यांच्यावर होती. होलिकोत्सव त्याच काळात आला. काँग्रेस समिती व युवक संघ यांनी अभिनव प्रकारचा शिमगा करण्याचे ठरवले. जाजू यांनी स्वदेशी’ या विषयावर भाषणे टिळक चौक, नवीपेठ, श्रद्धानंद चौक येथील होळींपुढे दिली. काँग्रेस समितीने राष्ट्रीय निशाणाची मिरवणूक धूलिवंदनाच्या दिवशी काढली. त्या पाठोपाठ शिवजयंती आली. ती त्रिशतकसंवत्सरी जयंती होती. पुन्हा जाजू यांची भाषणे रिपन हॉल, भुसारगल्ली तरुण मंडळ व श्रद्धानंद समाज या ठिकाणी झाली. मीठाच्या सत्याग्रहासाठी युद्धमंडळाची स्थापना सोलापूरमध्येदेखील झाली. परशराम राठी हे युद्ध मंडळाचे नेते होते. त्यांनी सोलापूर तालुक्यातील सत्याग्रही सैनिकांची पहिली यादी 23 मार्च 1930 रोजी प्रसिद्ध केली. त्यात पहिले नाव होते ते रामकृष्ण गणेशराम जाजू यांचे ! दांडी मार्चचा 6 एप्रिलचा मुहूर्त साधत सोलापूर म्युनिसिपालटीवर राष्ट्रीय निशाण फडकावले गेले. त्यानंतर कायदेभंगाची चळवळ अधिकच उग्र झाली. गैरकायदा मीठविक्रीने उच्चांक गाठला. सोलापूरात जाजू यांच्या अध्यक्षतेखाली सभा अक्षरशः रोज होत होत्या. त्यामध्ये कामगारांच्या, महिलांच्या सभा होत असत. मद्यपान निषेध, स्वदेशी हा विषय बहुतेक सभांचा असे. जाजू महात्माजींचे विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोचवत होते. देशभर व्यापक निदर्शने प्रेस अॅक्टच्या नव्या तरतुदीच्या विरोधात झाली. जगन्नाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली प्रेस ऑर्डिनन्सचा निषेध करणारी सभा सोलापूरात झाली, त्यात प्रमुख भाषण जाजू यांचेच झाले.

सरकारने महात्माजींना अटक करताच कायदेभंगाचा वणवा देशभर भडकला. तो प्रकार सुरत जिल्ह्यात 4 मे रोजी घडला. जाजू यांच्या अध्यक्षतेखाली टिळक चौकात नित्याप्रमाणे सभा 5 मे रोजी भरली. गांधीजींच्या अटकेची वार्ता त्याच रात्री साडेअकरा वाजता सोलापूरात आली. जाजू यांनी ताबडतोब मिरवणूक काढून लोकांना त्याची खबर दिली. 6 मे ला कडकडीत हरताळ पडला. दिवसभर निषेध मिरवणुका निघत होत्या. सायंकाळी टिळक चौकात जाजू यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. तापलेले वातावरण पाहून जाजू यांनी काँग्रेस समितीचे सर्व कार्यक्रम रद्द केले. गिरण्या 7 मे रोजी बंद पडल्या. दारूगुत्यावर होणारे नित्याचे पिकेटिंग; पण त्या दिवशी त्याला वेगळे स्वरूप आले. लोक दारूगुत्ते उद्ध्वस्त करू लागले. जाजू यांनी लोकांनी संयमाने वागावे, असे रात्री नेहरू चौकात झालेल्या सभेत सांगितले. पोलिसांनी निदर्शकांवर गोळीबार दुसऱ्या दिवशी 8 मे रोजी केला. प्रक्षुब्ध जमावाने दगडफेक, जाळपोळ केली आणि दुपारी सरकारी हत्याकांड घडले. पंचविसाहून अधिक जणांचे प्राण घेऊन प्रशासन अक्षरशः पळाले आणि ध्यानीमनी नसताना सोलापूर स्वतंत्र झाले. पोलिस नाही, प्रशासन जागेवर नाही. मग शहराची जबाबदारी सांभाळावी कोणी ? ते काम राष्ट्रीय चळवळीच्या स्वयंसेवकांनी हाती घेतले. पोलिसांनी टाकलेल्या बंदुका उचलून गांधी टोपी आणि खादीचे कपडे घातलेले ते कार्यकर्ते ट्रेझरीचे रक्षण करू लागले, शहरातील वाहतुकीचे नियंत्रण करू लागले. गांधीजींच्या कल्पनेतील स्वराज्य सोलापुरात प्रत्यक्ष अस्तित्वात आले ! राष्ट्रीय सभेने आणि महात्माजी यांनी जे विचार लोकांना दिले होते त्यांची ती फलश्रुती होतीसोलापूरकरांनी देशास स्वातंत्र्य मिळाल्यावर देशवासीय राज्य आम्ही कसे चालवू शकतील याचा वस्तुपाठच घालून दिला. त्या स्वतंत्र सोलापूरचे नेतृत्व व नियंत्रण जाजू करत होते, म्हणून ते मार्शल जाजू’ झाले सोलापुरात 9 ते 12 मे या काळात कोठलाही अनुचित प्रकार घडला नाही. सर्व व्यवहार नित्याप्रमाणे चालू होते. त्याचे श्रेय केवळ मार्शल जाजू आणि त्यांच्या निष्ठावंत स्वयंसेवकांना होते. तुळशीदास जाधव, छन्नुसिंह चंदेले असे आघाडीचे कार्यकर्ते राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जाजू यांच्या काळातच घडले. लष्कर आल्यानंतर 12 मे ला सोलापुरात लष्करी कायदा लागला. जाजू यांना व अन्य बऱ्याच कार्यकर्त्यांना अटक व शिक्षा झाली.

जाजू यांनी स्वतःला आंदोलनात नुसते झोकून दिले नाही, तर त्यापुढे जाऊन कल्पनेतही नसलेली प्रशासकाची जबाबदारी पार पाडली. कपाळावर तिलक लावणारा हा वैष्णव काही काळ असा मार्शल’ बनला !

 अनिरुद्ध बिडवे (02182) 220430, 9423333912 bidweanirudha@gmail.com

अनुप्रभा’, 1873महेन्द्रनगर करमाळा, (सोलापूर) 413203

अनिरुद्ध बिडवे यांनी एम कॉमएम एएलएल बी असे शिक्षण घेतले आहे. ते एलआयसीमध्ये विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तपत्रांत व नियतकालिकांत दोनशेहून अधिक इतिहासविषयक लेखांचे लेखन केले आहे. त्यांची बखर रावरंभाची’, ‘ऐक महाराष्ट्रा’, ‘विमाशास्त्राची ओळख’ ही पुस्तके प्रकाशित आहेत. तसेच, ‘शिवशाहीतील अज्ञाताचा शोध’  ‘सोलापूर मार्शल लॉ – 1930’ ही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.

————————————————————————————————————————————————————————

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version