अनेक गरीब-गरजू रुग्णांना वैद्यकीय सोयीसुविधा, त्यांना आजारपणात लागणारी साधनसामग्री उपलब्ध होत नाही; देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातही तसेच चित्र दिसते, ती बाब सुहास कबरे यांना खटकली आणि त्यांनी ‘राजहंस प्रतिष्ठान ट्रस्ट’ संस्थेच्या माध्यमातून अनोखा उपक्रम सुरू केला. तो म्हणजे रुग्णांना आवश्यक असलेली वैद्यकीय उपकरणे विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा. त्यांना रुग्णाच्या नातेवाईकांनी साधा फोन किंवा इमेल केला असता ते मुंबई परिसरात डोंबिवलीपासून विरारपर्यंत कुठेही उपकरणे पुरवतात. वैद्यकीय उपकरणे घेऊन जाताना तयार करण्यात आलेल्या कागदपत्रांवर ती उपकरणे एका महिन्यात परत करण्याची अट असते. मात्र कबरे यांनी आजपर्यंत तसा तगादा कुणाकडे लावलेला नाही. रुग्ण आजारातून बरा होत नाही, तोपर्यंत त्यांना ती उपकरणे वापरता येतात.
‘राजहंस प्रतिष्ठान ट्रस्ट’ची नोंदणी २००३ मध्ये झाली, तेव्हापासून कबरे यांचे समाजकार्य सुरू आहे. त्यांच्या वडिलांचे मामा (माधवराव जाधव) आणि मामी (मीराताई जाधव) हे दोघे ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोचरा गावी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. माधवराव ‘टाइम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्रात पत्रकार होते, तर मीरा सावंतवाडीतील ‘सत्यप्रकाश’ साप्ताहिकाचे मालक बाप्पा धारणकर यांच्या कन्या. त्या दोघांच्याही कार्यकर्तृत्वाचा प्रभाव कळत नकळत माझ्यावर पडत गेला असे सुहास कबरे सांगतात. त्यांचे वडील प्रेमचंद कबरे स्टेट बँकेत नोकरी करत होते. त्याच वेळी मुंबईतील गोरेगावच्या ग्रामपंचायतीत सरपंचपदही सांभाळत होते. तो महानगरपालिकेच्या स्थापनेपूर्वीचा काळ. सुहास यांच्या आई भारती यांना रुग्णसेवेची आवड आणि गरजूंना मदत करण्याची तळमळ. सुहास यांचे नववीपर्यंत शिक्षण गावी झाले. ते मुंबईला आले. त्यांचे मॅट्रिकनंतर पार्ले (साठे कॉलेज) कॉलेजमध्ये इंटरपर्यंतचे शिक्षण झाले.
कबरे यांना, रुग्णांना उपकरणे देऊन आगळ्यावेगळ्या पद्धतीची रुग्णसेवा करण्याचा विचार सुचायला काही खास कारण घडले नाही. समाजसेवा करायची असा विचार करत असताना त्यांना ते सुचले. त्यांनी स्वत:चे पंचवीस हजार रुपये खर्चून फाऊलर म्हणजे हॉस्पिटल बेड, व्हीलचेअर, वॉकर, कुबड्या अशी वैद्यकीय उपकरणे जमा केली. त्यांनी जवळच्या, ओळखीच्या मंडळींना, स्थानिक डॉक्टरांना आणि काही ज्येष्ठ नागरिकांच्या संस्थांना भेटी देऊन संस्थेतर्फे वैद्यकीय उपकरणे विनामूल्य उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाची माहिती दिली. ओळखी वाढत गेल्या. उपकरणांना मागणी येऊ लागली. त्यानंतर ती वाढतच राहिली आहे. कबरे म्हणाले, की ‘समाजात, आपल्या अवतीभवती अशा गरजूंची संख्या खूप आहे, याचं एकीकडे वाईट वाटतं. दुसरीकडे आपण त्यांची सेवा करतो ही भावना समाधान देते. पुढे, जशी उपकरणांची गरज वाढत गेली, तेव्हा देणग्या देऊ इच्छिणाऱ्यांकडून वा या सेवेचा लाभ घेणाऱ्यांकडून देणग्यांच्या रूपात निधी उपलब्ध होत गेला. त्यातून उपकरणांची संख्या वाढत गेली आणि वर्षभरातच एका बेडचे दहा बेड झाले.’
कबरे यांच्याकडे चौदाशे रुपयांच्या वॉकरपासून ते अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांपैकी ‘सीपॅप’, ‘बायपॅप’ मशीन (श्वसनाचा त्रास वाढून फुप्फुसं निकामी झाल्यावर त्यामध्ये हवेचा पुरवठा करून शरीरातील कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर काढून श्वासोच्छवास सुरू ठेवणारे यंत्र) यांसारखी लाखापर्यंत किंमतीची उपकरणे आहेत. रुग्णाच्या गरजेनुसार त्याला त्या उपकरणांपैकी कोणतेही उपकरण, डिपॉझिट किंवा भाडे न आकारता विनामूल्य उपलब्ध करून दिले जाते. रुग्णाचे नातेवाईक येऊन उपकरणे घेऊन जातात, तसे शक्य नसेल तर रुग्णाच्या पत्त्यावर उपकरणे संस्थेच्या माणसामार्फत पोचवली जातात.
‘रुग्ण हा फक्त रुग्ण असतो. त्यात गरीब, श्रीमंत असा भेदभाव मी कधीच मानत नाही. तरीही रुग्ण दोन प्रकारचे असतात. एक हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार घेतल्यावर उरलेली ट्रीटमेंट घरी करणारे रुग्ण आणि दुसरे, ज्यांची स्थिती हाताबाहेर गेलेली असते आणि ज्या रुग्णांना घरी घेऊन जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे असे रुग्ण. दोन्ही प्रकारच्या रुग्णांना घरच्या घरी उपचार सुरू ठेवता येण्यासाठी अनेक प्रकारच्या वैद्यकीय उपकरणांची गरज लागते. त्यांना ती उपकरणे गरज असेपर्यंत आम्ही वापरायला देतो.’ असे सुहास कबरे सांगतात.
कबरे यांच्या रुग्णसेवेच्या व्रताने दशकपूर्तीचा टप्पा गाठला आहे. त्यांच्याकडे वीस लाख रुपये किंमतीची वैद्यकीय उपकरणे आहेत. सेवेचा लाभ पंचवीस हजारांहून जास्त रुग्णांना झाला आहे. उपकरणे सतत बाहेर (कोणत्या ना कोणत्या गरजूंकडे) असतात. त्यांचा वापर होत नाही असे क्वचितच घडते.
कबरे स्वत: आरंभी रुग्णाच्या घरी जाऊन उपकरण बसवून देत असत. त्यांनी ज्या कंपन्यांकडून उपकरणे विकत घेतली, त्या कंपन्यांची माणसे उपकरणे जोडण्याचे आणि वापरण्याचे प्रशिक्षण त्यांना देत. बायपॅपसारख्या उपकरणाचे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननुसार सेटिंग करावे लागते. कारण डॉक्टर बायपॅपद्वारे किती प्रेशर द्यायचे, ते रुग्णाच्या गरजेनुसार ठरवतात.
कबरे समाजसेवेमुळे समाजातील सर्व स्तरांतील लोकांच्या संपर्कात आले. त्यातून त्यांना चांगले-वाईट असे बरेच अनुभव मिळाले. कबरे यांनी सांगितले, की एकदा धुणीभांडी करणाऱ्या बाईच्या पतीला फाऊलर बेडची गरज होती. तिच्या घरची परिस्थिती बेताची होती, पण तिला गरज असल्याने आम्ही तिला बेड दिला. तो परत करताना कृतज्ञता म्हणून ती मोठी रक्कम संस्थेला देणगी म्हणून देण्यासाठी आली होती. आम्हाला तिच्या घरची परिस्थिती माहीत असल्यामुळे आम्हाला तिच्याकडून तितकी मोठी रक्कम घेणे उचित वाटेना. पण तिच्या आग्रहाखातर त्यातील काही रक्कम आम्ही देणगी म्हणून स्वीकारली. पण अनेकदा, त्याच्या उलट अनुभव येतो. उपकरण घेऊन जाणारे श्रीमंत लोक ते परत देताना संस्थेला छदामही देत नाहीत. परंतु ‘सर्वव्यापी निरपेक्ष रुग्णसेवा’ या तत्त्वानुसार आम्ही कधीही, कोणाही रुग्णाच्या नातेवाईकांकडे देणगी मागत नाही.’
‘राजहंस’तर्फे इतर काही वैद्यकीय आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात. कबरे यांचे मूळ गाव असलेल्या सिंधुदुर्गातील पाट-कोचरा येथील ग्रामस्थांनाही चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ते गेल्या चार वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. त्या छोट्याशा गावात विनामूल्य नेत्रतपासणी आणि तात्काळ चष्म्यांच्या विनामूल्य वाटपाचे शिबिर दरवर्षी घेतले जाते. मुंबईत आणि कोकणात शालेय स्तरावर रक्ततपासणी शिबिराचे आयोजनही संस्थेतर्फे केले जाते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये अॅनिमिया आणि थॅलेसेमिया या आजारांचे प्रमाण सर्वाधिक दिसते. त्यासाठी रक्ताच्या चाचण्या मुंबईतील अद्ययावत पॅथॉलॉजी लॅबमध्ये करणे गरजेचे असते. थॅलेसेमियाच्या चाचणीचे आठ ते दहा प्रकारचे रिपोर्ट्स येतात. ते रिपोर्ट देण्याची यंत्रणा कोकणात उपलब्ध नसल्याने तेथे गोळा केलेले रक्ताचे नमुने काटेकोरपणे, ठरावीक तापमान नियंत्रित ठेवलेल्या बॉक्समधून आणून विलेपार्ले येथील सी.बी. पटेल रिसर्च सेंटरच्या लॅबमधून त्यांची तपासणी केली जाते. लहान मुले आणि स्त्रिया यांच्यासाठी समुपदेशनाची शिबिरेही आयोजित केली जातात. तसेच ब्रेनडेड रुग्णांच्या नातेवाईकांनी त्या व्यक्तीचे अवयवदान करावे यासाठी कबरे त्यांचे समुपदेशन करतात.
कबरे स्वत: कलाकार आहेत. ते तबलावादन करतात. त्यामुळे त्यांची रुग्णसेवेबरोबर कलासेवाही चालते. कबरे यांनी अनेक सांगितिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सात वर्षांपूर्वी त्यांनी गायन आणि वादन यांची आवड असलेल्या लहान मुलांना एकत्रित करून वाद्यवृंद सुरू केला आहे. वर्षभरात जेव्हा-जेव्हा संधी मिळेल, तेव्हा त्या वाद्यवृंदाचा ‘होऊ कसे उतराई’ नावाचा कार्यक्रम ते सादर करतात. गेल्या चार वर्षांपासून समाजातील प्रथितयश मान्यवरांना ‘राजहंस’तर्फे पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.
वैद्यकीय उपकरणे ठेवण्यासाठी संस्थेकडे हक्काची जागा उपलब्ध नाही. गोरेगाव पूर्व येथील ‘जयप्रकाशनगर बालतरुण मित्र मंडळा’तर्फे देण्यात आलेल्या पडिक जागेमध्ये तात्पुरती व्यवस्था करून उपकरणे ठेवली जातात. देणग्यांमधून जो निधी गोळा होतो, तो नवीन उपकरणे खरेदी करण्यासाठी आणि त्यांच्या देखभालीसाठी खर्च होत राहतो.
सुहास कबरे यांच्या घरात प्रवेश करताच नजरेस पडतात त्या तबल्याच्या दोन-तीन जोड्या आणि राजहंसच्या कागदपत्रांचे मोठाले ढिग. दरवाजाजवळच्या बैठकीवर ते किंवा त्यांची पत्नी काम करत असतात. सुहास कबरे स्वत: भाड्याच्या घरात राहत आहेत. तरीही त्यांची नि:स्वार्थीपणे रुग्णसेवा करण्याची तळमळ अचंबित करते. ते दहिसर येथे एका शिपींग कंपनीत नोकरी करतात. त्यांच्या पत्नी शारदाताई रुग्णांच्या उपकरणांसाठी आलेल्या मागण्या, त्यानुसार उपकरणांची उपलब्धता पडताळणे, ती घरपोच पोचवण्यासाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध करणे, त्यांच्याशी सतत संपर्कात राहणे, उपकरण व्यवस्थितपणे-ठरलेल्या स्थळी पोचेपर्यंतचा सगळा आढावा वेळोवेळी घेणे या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सहजतेने दररोज पार पाडतात. भक्ती-भैरवी या दोन्ही मुलींवरही बालपणापासून समाजसेवेचे संस्कार रुजल्यामुळे, त्या दोघींनीही समाजसेवा या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. नोकरी सांभाळत, त्या वडिलांना त्यांच्या कार्यात मदत करतात. रुग्णसेवेचे कार्य करताना सुहास कबरे यांना श्रीकांत आपटे, सुरेश प्रभू, सुहास फाटक, दत्ता मेजारी असे काही साथीदार लाभले आहेत.
कबरे कुटुंबीयांनी भव्य वैद्यकीय मदत केंद्र उभारण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. त्यात रक्ततपासणी केंद्र, नेत्रचिकित्सा, सोनोग्राफी आणि रेडिओलॉजी विभाग, अतिदक्षता विभाग, व्हेंटिलेटर (जीवनरक्षक प्रणालीसहित) असलेले बेड या सुविधांसह मोफत वैद्यकीय सल्ला केंद्र असेल. त्यांचे हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्यांना समाजाकडून मदत मिळायला हवी.
AWESOME
AWESOME
Know him very well and proud
Know him very well and proud of him
Comments are closed.