थोरवी – औरंगाबाद
दप्तराच्या ओझ्यापेक्षाही
आयुष्याचं ओझं मोठं असतं!
– कु. विद्या गावंडे
असं म्हणतात, की परिस्थिती स्वीकारण्याची मनापासून तयारी केली, की, माणसाला त्यातून बळ मिळतं, काम करण्याची शक्ती मिळते; आणि त्यातूनच स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रवास सुरू होतो. तशी प्रत्येक व्यक्ती संघर्ष करत जगत असते; पण काहींची धडपड पाहिली, की संघर्ष एकसारखे वाटतात आणि वेगळे वाटणारे संघर्ष जगण्याची नवी दिशा औरंगाबादच्या आशा दर्शवतात. सुकेशनी जाधव यांची संघर्षगाथा याच धाटणीतली. घरच्या प्रतिकूल परिस्थितीत पतीला सहकार्य करण्याचं त्यांनी ठरवलं. पतीचा व्यवसाय पेपर टाकण्याचा. त्यांनी पतीच्या व्यवसायातच मदत करण्याचा निर्णय घेतला आणि मग त्या कामात त्या हळुहळू पारंगत झाल्या.
त्यांचा पेपरचा स्टॉल हडको कॉर्नर बस-स्टॉपजवळ आहे. तिथं थांबणार्या बसमध्येही त्या पेपर विकतात. या कामातून त्या दिवसाकाठी नव्वद ते शंभर रुपये कमावतात. त्यांचं शिक्षण बारावी सायन्सपर्यंत झालेलं आहे. त्यांनी पुढे कृषी अभ्यासक्रमही पूर्ण केला, काही काळ कंपनीत नोकरी केली.
जी मेहनत पेपर छापून येईपर्यंत करावी लागते, तेवढीच मेहनत पुढे पेपर वेळेवर लोकांच्या घऱी पोचवण्यासाठी करावी लागते, असं त्या सांगतात. आपल्या मुलीला रोज पेपर टाकण्याचं काम करावं लागतं हे त्यांच्या आईला कळालं तेव्हा त्यांनी तिला सासरचं घर सोडून माहेरी येण्यास सांगितलं, पण सुकेशनी ह्यांनी ते मानलं नाही. इतर नातेवाईकांचाही या कामाला विरोध होता. त्यांनी त्यांच्याकडेही दुर्लक्ष केलं. कारण सुकेशनी यांचा स्वत:चा पतीबरोबर काम करण्याचा निर्णय होता. गेली दहा वर्षें त्या घरोघरी पेपर टाकण्याचं काम करत आहेत. त्यांना घरी जायला रात्रीचे नऊ होतात. त्यामुळे संसाराची परवड होते. मुलींना पुरेसा वेळ देणं शक्य होत नाही याची बोच त्यांच्या मनात असते.
“स्त्री प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. मात्र पेपरचे गठ्ठे घेताना, घरोघरी सायकलवरून पेपर टाकताना माझी इतर पुरुष पेपर टाकणारे टिंगल उडवतात, शिट्ट्या वाजवून हिणवतात याची खंत वाटते” असे त्या सांगतात. तरी त्यांच्याकडून पेपर विकत घेणार आणि शेजारी यांना त्यांचा अभिमान वाटतो. सुकेशनी यांना दोन मुली आहेत. आपल्या मुलींनी डॉक्टर व्हावं असं त्यांना वाटतं.
या कामात त्यांना माहेरच्यांचा विरोध असला तरी पतीची समर्थ साथ मिळत आहे. स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे. मात्र त्यात त्या समाधानी, सुखी आहेत.
– कु. विद्या गावंडे, औरंगाबाद