Home अवांतर किस्से... किस्से... सीडींना आशीर्वाद टिळकांचा

सीडींना आशीर्वाद टिळकांचा

एक वाचलेला वेगळा किस्सा आठवतो. नाटककार वसंत कानेटकर व त्यांच्या पत्नी (उषा) सिंधुताई, दोघे एका साहित्यिक कार्यक्रमासाठी हैदराबादला 1971-72 साली गेली होती. तेव्हा ती दोघे चिंतामणराव देशमुख (सीडी) यांच्या निमंत्रणावरून त्यांच्याकडे गेली. वसंतरावांनी गप्पांच्या ओघात सीडींना विचारले: “लोकमान्य टिळक यांनी तुमचे भविष्य तुम्ही कॉलेजात असतानाच सांगितले होते, की तुम्ही स्वतंत्र भारताचे अर्थमंत्री होणार; हा किस्सा खरा आहे का?” ते (सीडी) म्हणाले, “खरा आहे. मला अर्थशास्त्राच्या एका पुस्तकातील काही संदर्भ वाचायचे होते. ते पुस्तक कॉलेजच्या लायब्ररीत नव्हते. ते पुण्यात फक्त टिळक यांच्याकडे होते. तेव्हा प्राध्यापकांनी टिळक यांना चिठ्ठी लिहून, मला त्यांच्याकडे पाठवले. टिळक यांनी, मी कोणकोणती पुस्तके वाचली आहेत- हव्या असलेल्या पुस्तकातून नेमके काय वाचायचे आहे? अशी बारीक चौकशी केली. टिळक यांनी मला ते पुस्तक बहुधा मी अभ्यासू विद्यार्थी वाटल्यामुळे दुसऱ्या दिवशी परत करायचे या बोलीवर  दिले. दुसऱ्या दिवशी फर्ग्युसन विरूद्ध एस.पी. कॉलेज अशी क्रिकेटची फायनल मॅच होती. मी ती निग्रहाने बाजूस सारून, पुस्तक वाचून पुरे केले. तेव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते. मी टिळक यांच्याकडे गेलो. टिळक यांनी माझी परीक्षाच घेतली, त्या पुस्तकासंदर्भात. त्यांचे समाधान झाले. त्यांनी आणखी दोन पुस्तके सुचवली. निरोपाच्या वेळी, मी त्यांना वाकून नमस्कार केला, तेव्हा ते म्हणाले, ‘तू स्वतंत्र भारताचा अर्थमंत्री होशील !’”

(संदर्भ: ‘साथसंगत’ – (उषा) सिंधू वसंत कानेटकर, पान 88 ते 93 : ‘सी.डी. देशमुख-एक अनोखं दर्शन’)

– श्रीधर गांगल shreedhargangal@gmail.com

—————————————————————————————————————————————————-

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version