रामाचे अजानबाहू रूप आणि गजाननाची लंबोदर मूर्ती ही भारतीय संस्कृतीमधील सर्वश्रेष्ठ व कालातीत कलात्मक सौंदर्यलक्षणे मानली जातात. गजाननाचा आकार हे तर माणसाला पडलेले स्वप्नच होय! ते कसेही रेखाटा, कोरा! त्यामधून सुंदरता व्यक्त होते. त्यावर धार्मिक पावित्र्याचा संस्कार केला गेल्यामुळे त्याचे शिल्प वा रेखाटन वा चित्रकृती अजरामर व चिरस्मरणीय बनून गेले आहेत.
जग ग्लोबल झाले तेव्हापासूनमहाराष्ट्राचे हे आद्यदैवत देशोदेशी पोचू लागले आहे. लंडनला सुरुवात झाली. आता पन्नास-शंभर देशांत गणपती उत्सव जाऊन पोचला आहे. यंदा एकट्या पेणमधून तीन लाख गणपती निर्यात झाल्याची बातमी होती. गेल्या पंधरा-वीस वर्षांत जेव्हा मराठी शंभर-दीडशे कुटुंबे चीनमध्ये राहू लागली तेव्हा चार वर्षांपूर्वी तेथेही सार्वजनिक गणपती बसू लागला आहे.
गणपतीच्या सार्वजनिक आवाहनाचे आगळे दर्शन गेल्या आठ-दहा वर्षांत अमेरिकेत दिसून येत आहे. त्यामधून भारतीय संस्कृतिचिन्हांचे व त्यांना जोडलेल्या धार्मिक पावित्र्याचे आकर्षण किती दूरगामी आणि सखोल असू शकते ते लक्षात येते.
लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव महाराष्ट्रात एकशेदहा वर्षांपूर्वी सुरू करून दिला. त्यामधून प्रथम राष्ट्रीय व नंतर सांस्कृतिक कार्य साधले गेले. विद्यमान ज्येष्ठ पिढीच्या लक्षात आहे तो स्वातंत्र्योत्तर काळात गावागावात, पेठापेठात, आळीआळीत साजरा झालेला सार्वजनिक गणेशोत्सव. त्याचे स्वरूप मुख्यत: सांस्कृतिक असे. गणपतीची पूजा होई, परंतु तेथे होणारी थोरामोठ्यांची भाषणे आणि तशाच तोलामोलाच्या गायकांची गाणी हे समाजातील प्रभावशाली मानल्या गेलेल्या पांढरपेशा, मध्यमवर्गीय जनांचे मोठे आकर्षण असे. दत्तो वामन पोतदार, ना.सी. फडके… अशांची भाषणे तेथे होत आणि भीमसेन, सुधीर फडके, माणिक वर्मा आणि गजानन वाटवे यांची गाणी. जी.एन. जोशी यांनी आरंभ करून दिलेला भावगीत गायन हा सुगम संगीताचा प्रकार घराघरांत पोचला तो आकाशवाणीवरून आणि गावोगावच्या सार्वजनिक गणेशोत्सवांमधून.
हिंदू धर्माचे विधी गणेशपुजनाने सुरू होतात, भारत देशात सर्व प्रांतांत ती पद्धत आहे व म्हणून श्रीगजाननाला महत्त्व सर्वत्र असले तरी गणपती ही देवता महाराष्ट्र संस्कृतीचे अविभाज्य चिन्ह गेल्या शंभर वर्षांत बनून गेले–विठोबाइतके किंवा सध्याच्या साईबाबांइतके. गणपती कोठेही नव्या ठिकाणी, नव्या स्वरूपात दिसला, की मराठी माणसाला अभिमान वाटतो, की जणू मराठी माणूसच तेथे जाऊन पोचला आहे, रुजला आहे.
अमेरिकेतील फिलाडेल्फियाच्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या भेटीत माझ्या बाबतीत असेच घडून आले. पाहतो तर तेथील मराठी माणसांमध्ये गणेशोत्सवाची लगबग तेव्हाच सुरू झालेली. अमेरिकेत व इतर अनेक देशांत मराठी माणसे गणेशोत्सव, दिवाळी व इतर भारतीय सण मोठ्या प्रमाणावर साजरे करतात हे आपण गेली काही दशके पाहात-ऐकत आलो आहोत. पण त्यांचे स्वरूप नोकरीधंदा सांभाळून थोडा विरंगुळा, थोडी पूजा, थोडे एकत्र येणे असे. पण फिलाडेल्फियातील मराठी जनांनी, बहुधा नकळत धर्म, भाषा भेद पार करून जाऊ शकणारे गणपतीचे व्यापक आवाहन जाणले आणि मराठी पद्धतीचा सार्वजनिक गणेशोत्सव, स्थानिक मंदिराच्या सहकार्याने सुरू केला. ही गोष्ट नऊ वर्षांपूर्वीची. त्यापूर्वी अमेरिकेतील गणेशोत्सव स्थानिक मराठी मंडळांतर्फे गणेशचतुर्थीच्या आगेमागे येणा-या ‘वीकेण्ड’ला साजरे होत असत. अजूनही होतात. फिलाडेल्फियातही तसा तो एक दिवसात उरकला जाई. न्यू जर्सीत सर्वांत जास्त मराठी वस्ती आहे. तेथे गेली अनेक वर्षे डॉ. घाणेकर यांच्याकडे पाच दिवसांचा जंगी उत्सव होई व त्यासाठी दूरदूरवरून माणसे येत, परंतु न्यू जर्सीचा उत्सव मराठी मंडळातर्फे एका दिवसाचाच असे.
फिलाडेल्फियामधील लोकांनी मात्र गणेशचतुर्थीला कोणताही वार असो, त्याच दिवशी उत्सव आरंभला व दहा दिवसांनी चतुर्दशीला गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक काढली. दहा दिवस सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल ठेवली, रोज कार्यकर्त्यांना, भाविकांना ‘महाप्रसाद’ योजला. बघता बघता, अमेरिकेतील माणूस कामाच्या दिवशी संध्याकाळी उपलब्ध होत नाही हे ‘मिथ’ गळून पडले. उत्सवाच्या दहाही दिवशी हजार-दीड हजार माणसे कार्यक्रमांना जमू लागली. आगमन-विसर्जन मिरवणुका दहा-दहा हजार लोकांच्या असतात- अगदी पुणेरी पद्धतीने साजऱ्या होतात. यंदा अमजद अलीखानचे सतारवादन योजले आहे. कार्यक्रमांचा दर्जा असा असतो.
चार जणांच्या उत्सव समितीत दोन मराठी, एक गुजराथी व एक दक्षिणी माणूस असतो. यंदा मंदार जोगळेकर समितीचे अध्यक्ष आहेत. कुटे हा माणूसच ध्येयप्रेरित आहे. त्याने उत्सवाचे संयोजन नेटके बांधून दिले आहे तरी स्वत: त्या कामासाठी दिवसच्या दिवस व्यतीत करत असतो. काय विलक्षण कार्य आणि किती सखोल विचारांची त्यामागील प्रेरणा…
फिलाडेल्फियामधील सार्वजनिक गणेशोत्सवाचे हे, सांस्कृतिकता व पावित्र्य जपलेले रूप जाणून घेत असताना मला गेल्या पन्नास वर्षांत प्रथम महाराष्ट्रात व आता भारतभर पसरत चाललेला उत्सव आठवला. संयोजनाच्या दृष्टीने, त्यास एका बाजूला ठेकेदारीचे स्वरूप येत असले आणि त्यामधील सांस्कृतिक कार्यक्रमांची महता पूर्ण लोपली असली व त्यास देखाव्याचे बाजारी रूप आले असले तरी गणपतीला काळाप्रमाणे कॉस्मॉपॉलिटन रूप प्राप्त झाले आहे हे देखील विसरता येणार नाही. तो महाराष्ट्राचा अग्रदेव आख्ख्या भारताचा केव्हा होऊन जाईल ते कळणारदेखील नाही. तीच प्रक्रिया अमेरिकेतील भारतीयांमध्ये देखील घडत आहे. त्यांना एकत्र येण्यासाठी, संघटित होण्यासाठी गणपती हे उत्तम निमित्त ठरू शकते असे कुटे यांच्या ध्यानी आले आहे. त्यामुळे भारतीय प्रांत-भाषा यांची बंधने गळून पडतातच, पण तो भाव ‘अमेरिकन नागरिकत्वा’च्या पलीकडेही जाऊ शकतो.
परदेशस्थ भारतीयांना एकत्र करणारे, एकमेकांशी बोलायला लावणारे हिंदी सिनेमा व क्रिकेट हे दोन विषय होते. गणेशोत्सव हा तिसरा विषय अधिक सखोल ठरेल का? फिलाडेल्फियातील नऊ वर्षांचा अनुभव सांगतो, की त्याकडे भारतीय लोकच नव्हे तर अमेरिकन नागरिकही आकृष्ट होऊ लागले आहेत.
फिलाडेल्फियापाठोपाठ कानावर आली ती नॉर्थ कॅरोलिना राज्यातील रॅलेच्या गणेशोत्सवाची हकिगत. ती विजया बापट यांनी वर्णन करून लिहिली आहे. तो तसाच, यंदा चौथे वर्षे साजरा करत आहे. अमेरिकेच्या प्रांताप्रांतातील मराठी माणूस या नव्या मोहिमेत एकवटेल?
दिनकर गांगल,
मोबाइल – ९८६७११८५१७
इमेल – thinkm2010@gmail.com
नमस्कार सर भारतातील सर्वात…
नमस्कार सर भारतातील सर्वात तळागाळातील ऊच्छव म्हणून गणेशोत्सव मानतात आमेरिकेत पण हा उच्छव साजरी करतात हे वाचुन फार आनंद होतोय मि ही गणेश ऊच्छऊच्छऊच1199 पासुन दर वरशी खुप आनंदात साजरा करतोय सर ही आम्हदनगर जिल्ह्य़ातील नगापुर भोल्हेगाव फाटा गणेश चौक या ठिकाणी साजरा करतोय काही सुधारणा करायच्या आहेत परन्तु फड कमि पडतोय आपनाकडु काही मदत मिळेल का माझा नंबर 918329747017 919822978771 माझ्या मंडळात नाव श्री गणेश तरून मंडळ राम राम सर
May Email sunilkalap7777…
May Email sunilkalap7777@gmail.com and sairajkalap777@gmail.com
Comments are closed.