साने गुरुजींचे साहित्य कॉपीराईट फ्री झाल्यानंतर ते वाचकांना वेबसाइटवर ‘युनिकोड’मध्ये मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय ‘थिंक महाराष्ट्र’कडून घेण्यात आला. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या www.saneguruji.net या वेबसाइटचे सोमवार, 29 मे 2011 रोजी माजी खासदार डॉ. शांती पटेल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात झाले. या वेळी राज्य कर्मचारी संघटनेचे संस्थापक र.ग.कर्णिक आणि साने गुरुजी स्मारक संस्थेचे प्रमुख गजानन खातू हेदेखील उपस्थित होते.
या वेळी बोलत असताना शांती पटेल यांनी साने गुरुजींच्या काही आठवणी जागवल्या. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या श्रोतृवर्गात साने गुरूजींना प्रत्यक्ष भेटलेली काही मंडळी उपस्थित होती. या आणि अशा व्यक्तींच्या साने गुरुजींबद्दल असलेल्या आठवणी www.saneguruji.net या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्याचा ‘थिंक महाराष्ट्र‘चा प्रयत्न असेल.
बंगालच्या सांस्कृतिक जीवनात जे स्थान रविंद्रनाथ टागोरांना आहे, तेच स्थान महाराष्ट्रात साने गुरुजींना आहे. मात्र समाजाला या गोष्टीची जाणीव तशा प्रकारे नाही. आचार्य अत्रे यांनी हा भाव यथार्थ शब्दांत व्यक्त्त केला, परंतु तोही दुर्लक्षित राहिला. आपल्याकडे मोठी व्यक्ती ही एकेका गटाची मालमत्ता बनते. त्यामुळे त्या व्यक्तीच्या कामाकडे व थोरवीकडे दुर्लक्ष होते. ती व्यक्त्ती ‘इतिहासात थोर’ राहते आणि वर्तमानात संदर्भहीन व ऐतिहासिक महात्म्यापुरती उरते. साने गुरुजींच्या साहित्याची ही वेबसाइट प्रायोगिक काळात मोजक्या दिवसांसाठी खुली करण्यात आली, तेव्हा अल्पावधीत सात हजार व्यक्तींनी या वेबसाइटला भेट दिली. हे चित्र आशादायी वाटते आणि हे चित्र अधिक गडदरंगी करण्याच्या दृष्टीने ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ने उचललेले एक पाउल म्हणजेच www.saneguruji.net ही वेबसाइट होय. त्यामुळे साइटच्या उदघाटनानंतर लगेच बँक कर्मचार्यांचे नेते विश्वास उटगी उत्स्फूर्तपणे म्हणाले, The idea of ‘thinkmaharashtra.com’ is very relevant today. Sane Guruji site has proved it! या वेबसाइटवर साने गुरुजींची एकूण 82 पुस्तके वाचनासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत.
दिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्यांनी पुण्यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्यांनी आकारलेली ‘म.टा.’ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्यांना ‘फीचर रायटिंग’ या संबंधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय (थॉम्सन फाउंडेशन) पाठ्यवृत्ती मिळाली आहे. त्याआधारे त्यांनी देश विदेशात प्रवास केला.
गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्यासारख्या व्यक्तींच्या साथीने ‘ग्रंथाली’ची स्थापना केली. ती पुढे महाराष्ट्रातील वाचक चळवळ म्हणून फोफावली. त्यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी ‘ग्रंथाली’च्या ‘रुची’ मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत ‘ग्रंथाली’ची चारशे पुस्तके त्यांनी संपादित केली. त्यांनी संपादित केलेल्या मासिके-साप्ताहिके यांमध्ये ‘एस.टी. समाचार’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. गांगल ‘ग्रंथाली’प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा’चे संस्थापक सदस्य आहेत.
साहित्य, संस्कृती, समाज आणि माध्यमे हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. त्यांनी त्यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि ‘स्क्रीन इज द वर्ल्ड’ अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना महाराष्ट्र सरकारचा ‘सर्वोत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती’चा पुरस्कार, ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ व ‘मराठा साहित्य परिषद’ यांचे संपादनाचे पुरस्कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल ‘यशवंतराव चव्हाण’ पुरस्कार लाभले आहेत.