Home लक्षणीय उद्धृते सदाशिवपेठी

सदाशिवपेठी

व्यक्तिचित्र लिहिताना त्या व्यक्तीचे गुण-दोष लेखक सांगतो, पण त्या व्यक्तीबद्दल लेखकाच्या मनात जिव्हाळा नसेल तर तो चांगले व्यक्तिचित्र लिहूच शकणार नाही. आंतरिक जिव्हाळा व तटस्थपणा हा चांगल्या व्यक्तिचित्राचा महत्त्वाचा गुण आहे. अन् तो गुण श्री.ज. जोशी, शांता शेळके यांसारख्या लेखकांच्या लेखनात प्रत्ययास येतो…

‘सदाशिवपेठी’ अगर ‘ब्राह्मणी’ ही विशेषणे हल्ली तिरस्कार दर्शवणारी झाली आहेत, पण या संस्कृतीतसुद्धा अनेक मोठी माणसे जन्माला आली, या संस्कृतीनेही काही मूल्ये जपली, त्यांच्यातही काही चांगलेपण होते. संस्कृतीच्या त्या भागाबद्दल अकारण संकोच न बाळगता, त्याकडे तटस्थपणे पाहू शकणारे लेखक होते श्री.ज. जोशी. त्यांनी लिहिलेली ‘सत्यकथे’तील काही महत्त्वाची व्यक्तिचित्रे म्हणजे कथाकार यशवंत गोपाळ ऊर्फ य.गो. जोशी आणि न.वि. ऊर्फ काकासाहेब गाडगीळ यांची. ‘शेवग्याच्या शेंगा’, ‘वहिनीच्या बांगड्या’ अशा कथांनी लोकप्रिय झालेले यशवंत गोपाळ ऊर्फ य.गो. जोशी यांच्या निधनानंतर श्रीजंनी ‘आमच्या पुण्याचे लेखक’ या शीर्षकाखाली आणि दि.बा. मोकाशी यांनी ‘कुटुंबधर्मी जोशीबुवा’ या शीर्षकाखाली त्यांच्याबद्दल लिहिले आहे.

त्याच अंकात शांता शेळके यांचाही एक छोटासा लेख आहे. शांताबाई या खुल्या मनाने, मोकळेपणाने आणि रसिकतेने लिहिणाऱ्या लेखिका. त्यांनी यगोंबद्दल लिहिले – “मी पुण्याची असूनही जोश्यांचे पुणे आणि माझे पुणे वेगवेगळे होते. मी शुक्रवार-मीठगंज-वेताळ पेठांतल्या ‘अब्राह्मणी’ पुण्यातली, तर जोश्यांच्या कथेत प्रामुख्याने आढळणारे पुणे हे शनिवार-नारायण-सदाशिव या ब्राह्मणी पेठांतले. त्या दृष्टीने जोशी यांचे साहित्य माझ्यासारखीला थोडेसे दूरचेच; पण तरीदेखील य.गो. जोशी ही व्यक्ती परत न येण्याच्या वाटेने कायमची निघून गेली हे कळल्यानंतर आपल्याच अगदी जवळचे कोणी तरी जावे, असे मला वाटले. माझ्या दृष्टीने ते एक प्रतीक होते – पंधरा-वीस वर्षांमागच्या पुण्याचे. हे पुणे कनिष्ठ मध्यमवर्गीयांचे होते, संस्कारी होते, कौटुंबिक जिव्हाळ्याच्या धाग्यांनी एकत्र बांधून ठेवलेले होते, संसारातल्या साध्यासुध्या सुखांनी संतोष पावणारे होते… य.गो. जोशी गेल्याचे कळले आणि माझ्या परिचयाचे प्रेमाचे ते पुणे एकदम नाहीसे झाल्यासारखे वाटले.” शांताबार्इंच्या बोलण्यात व लिहिण्यातही एक अकृत्रिम जिव्हाळा असे. व्यक्तिचित्र लिहिताना त्या व्यक्तीचे गुण-दोष तर लेखक सांगतोच, पण त्या व्यक्तीबद्दल लेखकाच्या मनात जिव्हाळा नसेल तर लेखक चांगले व्यक्तिचित्र लिहूच शकणार नाही. आंतरिक जिव्हाळा हा चांगल्या व्यक्तिचित्राचा महत्त्वाचा गुण आहे.

श्री.ज. जोशी यांच्याबद्दल सर्वसामान्य मराठी वाचकाच्या मनातील प्रतिमा बऱ्याच वेळा चुकीची असते. ते समाजाच्या एका भागाबद्दल लिहीत असले तरी त्यांची दृष्टी मात्र उदार होती. त्यांच्या दृष्टीला त्या समाजातील दोषही ताबडतोब दिसत आणि जोशी ते दोष खिल्ली उडवण्याच्या पद्धतीने स्पष्टपणे सांगत. श्रीजंनी लिहिलेले व्यक्तिचित्र व्यक्तिबरोबरच त्या काळाचा आणि समाजजीवनाचा थोडक्या शब्दांत आढावा घेई. अनेकांना माहीत नसेल, पण श्री.ज. जोशी हे हमीद दलवाई यांचे मित्र होते. गप्पा मारण्यासाठी दलवाई यांचे त्यांना निमंत्रण येई आणि जोशी आवर्जून जात. काकासाहेब गाडगीळ यांचे निधन जानेवारी 1966 मध्ये झाले आणि मार्चच्या ‘सत्यकथे’त श्रीजंनी व ग.प्र. प्रधान यांनी त्यांची व्यक्तिचित्रे लिहिली आहेत. त्यात जोशी यांनी गाडगीळ यांची सामर्थ्यस्थाने नेमकी सांगितली आहेत. स्वातंत्र्यापूर्वीचे काँग्रेस नेत्याचे नि:स्पृह जीवनच काकासाहेब स्वातंत्र्यानंतरही जगले. सर्वसामान्य माणसांशी (त्यातही महाराष्ट्रातील) त्यांचे असलेले मोकळेपणाचे नाते हेच कित्येक वेळा काकासाहेबांचे मोठेपण जाणून घेण्यात अडथळा निर्माण करी. सत्ता संपली किंवा त्यांनीच राजीनाम्याने संपवली, की ते पुण्यात अगदी सहजपणे येत आणि त्या शहराच्या जीवनात पुन्हा रमून जात. लोकशाहीमध्ये सत्ता मिळाली, की ती प्रामाणिकपणे कशी वापरावी आणि गेली तर ती सहज कशी विसरून जावी याचा काकासाहेब गाडगीळ हे एक वस्तुपाठच होते.

– नरेंद्र चपळगावकर nanajudgenpc@gmail.com

(महा अनुभव, जानेवारी 2021 वरून)

—————————————————————————————————————————————

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version