सकिना बेदी ही स्वत: अंध आहे आणि तिने आळंदीच्या ‘जागृती अंधशाळे’चे आर्थिक पालकत्व घेतले आहे! तिने तिचे संपूर्ण जीवन त्या शाळेसाठी गेली जवळजवळ वीस वर्षें दिले आहे. कोणी अगदी हजार रुपये डोनेशन दिले, तरी ती त्या व्यक्तीच्या घरी जाऊन तो चेक घेते. पावती पुस्तक तिच्याजवळ असतेच, ती लगेच पावती देते, ओळख करून घेते. एकदा ओळख झाली, की तो आवाज कायमचा तिच्या मनात कोरला जातो!
सकिनाची आणि माझी ओळख ‘कृ.ब. तळवलकर ट्रस्ट’च्या ‘सेवाव्रती पुरस्कारा’निमित्ताने झाली. आम्ही ‘ट्रस्टी मंडळीं’नी वेळ ठरवून ‘जागृती शाळे’ला भेट दिली. ती वसतिगृहयुक्त शाळा पहिली ते दहावीसाठी आहे. ती एका जुनाट साध्या जागेत आहे. सत्तर-ऐंशी मुली तेथे पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेतात. सकिना उत्साहाने शाळा दाखवत होती. साधारण पहिलीतील एक लहान मुलगी माझ्या पायाला बिलगली आणि माझ्याशी बोलू लागली. मला माहीत नाही, की सकिनाला ते कसे कळले! तिने ते ताडले. तिने मला लगेच सांगितले, की कुलकर्णी, काळजी करू नका, ती तुमची ओळख करून घेत आहे. स्पर्श ही त्यांची ओळख आहे.
शाळा साधी आहे, पण जे काही आहे ते स्वच्छ आहे. मात्र सकिनाचे त्या शाळेच्या बाबतीत ध्येय मोठे आहे. तिने त्या क्षेत्रातील शाळेला आदर्श शाळा बनवण्याचा वसा घेतला आहे. एखादी अंधशाळा-तीदेखील मुलींची-मोठी करणे हे शिवधनुष्य उचलण्यासारखे आहे. तिने ‘तळवलकर ट्रस्ट’च्या पुरस्कार समारंभात भाषण केले. तिने सांगितले, की “अंध म्हणून आम्हाला दया नको आहे. काम द्यावे, आम्हाला करुणा नको शिक्षण द्यावे. बघा, बघा आम्ही काय करून दाखवतो ते?” सकिनाने तिच्या भाषणात जो दुर्दम्य आत्मविश्वास दाखवला तो सकिना प्रत्यक्ष जगली आहे. त्यामुळे ते भाषण म्हणजे तिचा आतील आवाज होता. त्यामुळे सभा तिने जिंकली होती.
सकिना ही आई जेनी आणि पिताजी वालीद सफाकतभाई सारजान यांचे तिसरे अपत्य. त्या दाम्पत्यास आधीची दोन मुले होती- थोरला शोएब आणि मधला शब्बीर. पण आईवडिलांना मुलगी हवी होती. शब्बीर जन्मतः अंधत्व घेऊन आला होता. एक मूल अंध असल्याने, पुढे काय? असा चान्स घ्यावा का? ती देखील अशीच जन्माला आली तर काय? असे प्रश्न घरातील वडीलधारी मंडळी विचारत. पण आईवडिलांनी तिसऱ्या अपत्याचा विचार केला. दाम्पत्याची इच्छा पुरी झाली खरी, पण ती मुलगीदेखील भावाप्रमाणे दृष्टिहीन जन्मास आली. थोडा विरस झाला, पण काही काळ. आई-वडील सावरले. त्यांनी मुलीचे नाव सकिना ठेवले. सकिना म्हणजे शांती (Peace)! सफाकतभाईंचे पुण्यात बुधवार चौकात ‘शू सेंटर’ नावाचे कोल्हापुरी चपलांचे दुकान आहे. सफाकतभाई हयात नाहीत, मोठा मुलगा शोएब ते दुकान सांभाळतो. त्यांची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण होती. पण सफाकतभाई दोन दिवसांच्या मुलीच्या वेगळ्या भविष्याचा विचार करू लागले होते.
ती ‘नौरोसजी वाडिया कॉलेज’मधून इतिहास हा विषय घेऊन बीएही झाली. पुढील शिक्षणासाठी मुंबईला ‘टाटा समाजशास्त्र संस्थे’त प्रवेश घेण्याचे ठरले. सकिना संस्थेच्या प्रवेश परीक्षांच्या सर्व टप्प्यांत उतीर्ण झाली. तेथे तिला भेटली सुकन्या साठे (आता सुकन्या पटवर्धन). तिने सकिनाच्या पपांना सांगितले, सर, जगात उच्च मानांकित असलेल्या या संस्थेत फक्त एकशेपंचवीस जागा आहेत, त्यात सकिनाला प्रवेश मिळाला आहे. भाग्य तुमच्या पायाशी आहे, ती संधी तुम्ही सोडू नका. मी पुण्याचीच आहे. वाटले, तर माझ्याबरोबर तिला एक महिना राहू द्यात. बघा, ती रुळते का? एक महिन्यांनी तुमचा निर्णय तुम्ही घ्या. अनोळखी सुकन्या साठे मदतीचा हात देत होती. तिने पपांना विचार करण्यास वाव दिला नाही लगेच जबाबदारी स्वीकारली होती. त्यांनी सुकन्याच्या भरवशावर प्रवेश पक्का करण्याचा निर्णय घेतला. सकिना मेडिकल सायकियाट्री हे स्पेशलायझेशन घेऊन 1991 साली MSW (Masters in social work) उत्तम प्राविण्यासह पास झाली. सकिना म्हणते, “मला माझ्या आई-पपांपासून ते समाजापर्यंत सर्वांनी भरभरून दिले. आता परतफेड करायची होती.”
सकिनाने संदीपच्या कामात काही काळ मदत केली. अनमोल थोडी मोठी झाल्यावर, 1999 साली तिने आळंदीच्या ‘जागृती अंधशाळे’ला भेट दिली. शाळेची अवस्था फार वाईट होती. एका छोट्याशा हॉलमध्ये सत्तर मुली होत्या. फक्त दोन संडास आणि बाथरूम्स होते. शाळेचे संस्थापक रमेश गुलाणी यांनी त्यांची मजबुरी सकिनापुढे मांडली. सकिनाने मनात विचार केला, की कामाची हीच संधी आहे! सकिनाने दुसऱ्यांच्या जीवनात प्रकाश आणावा ही वडिलांची इच्छा होती, ती पूर्ण करण्याची हीच संधी आहे. तिने गुलाणींना जाग्यावर सांगितले, मी संस्थेचे आर्थिक पालकत्व घेते. तुम्ही तयार आहात? त्यांनी संमती दिली. काम सुरू झाले. ती खोपटासमान शाळेपासून लोकांचे डोळे दिपतील अशी मोठी शाळा घडवण्याचे स्वप्न बघू लागली. मनात कामाची रूपरेखा सुरू झाली. त्यात शाळेची अद्ययावत इमारत, कौशल्यशिक्षण, वसतिगृह अशा अनेक गोष्टींचा समावेश होता. त्या सगळ्यासाठी मोठी जागा आणि पैशांचा अव्याहत प्रवाह लागणार होता. तिने कंबर कसली. इन्फोसिस आणि तशा मोठ्या कंपन्यांना आवाहन केले. त्या कंपन्यांचे CSR फंड इकडे वळवण्यासाठी त्यांचे मन वळवणे सुरू झाले. सकिना दात्यांना पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे भेटू लागली. शाळेची अवस्था दाखवली. भविष्यातील योजना मांडल्या. प्रोजेक्ट रिपोर्ट केले. सरकार दरबारी जागा मिळवण्यासाठी धडका मारणे सुरू झाले. दोन एकर जागा मंजूर झाली. पण गावकरी काम करू देईनात. अनेक अडथळ्यांची शर्यत सुरू झाली. जमीन वादात पडली, ती सोडवताना नाकी नऊ आले. प्रत्यक्ष बांधकामाचा खर्च दिवसामागे वाढत होता. मुलींचा दररोजचा जेवणाखाण्याचा, राहण्याचा खर्चदेखील चालूच होता. पण पावले पुढे पुढे पडत होती. अनेक संस्था मदतीस येत होत्या.
लाखो रुपयांचे बजेट असलेला विद्यालय व वसतिगृह अशा ह्या प्रकल्पातील विद्यालयाचे डिझाइन अंध मुली इमारतीत अडथळ्याविना सहज वावरतील असे केले गेले आहे. सर्व सोयींनी युक्त असे ते विद्यालय आणि त्याला जोडून वसतिगृह होणार आहे. सध्या विद्यालय पूर्ण झाले आहे आणि ग्राउंड + 2 मजले. वसतिगृहाच्या एकूण बजेटपैकी साठ टक्के रक्कम दात्यांकडून मिळाली आहे. त्या रकमेतून इमारतीचे RCC वर्क आणि तळमजल्याच्या ब्रिकवर्कचे काम झाले आहे. सकिना दात्यांना इमेल पाठवून, फोनवर बोलून आवाहन करते. लोक मदत करतात. सकिना कोणाही दात्याने मदतीचा चेक देतो असे सांगितले, की स्वत: तिच्या मदतनीसासह चेक घेण्यास येते. सविता गायकवाड हिचा उल्लेख केला नाही तर हा लेख अपुरा होईल. सविता सकिनाची या कार्यात सावलीसारखी पाठराखण गेली अठरा वर्षें करत आहे. जेथे जेथे सकिना ‘जागृती’च्या कामासाठी जाते, सविता तिचे डोळे बनून तिला तेथे घेऊन जाते.
शाळेतून अनेक मुली SSC होऊन, गेल्या वीस वर्षांत बाहेर पडल्या आहेत. त्यातील काही मुली पदवीधर झाल्या व बँकिंग, इन्शुरन्स, शिक्षण या क्षेत्रांत त्यांचा ठसा उमटवत आहेत. अंजना काळे आणि प्रतिभा सानप या विद्यार्थिनी बँकेत नोकरी करतात. जिना नावाची मुलगी एअरपोर्टवर स्वत:चे स्पा चालवते. ही नावे वानगीदाखल आहेत. अशा अनेक मुली विविध क्षेत्रांत त्यांचे भविष्य घडवत आहेत. शाळेचा निकाल शंभर टक्के असतोच, पण यंदा सीमा खरात या विद्यार्थिनीस अठ्ठ्याण्णव टक्के आणि साक्षी अमृतकर हिला त्र्याण्णव टक्के मार्क्स मिळाले. तीर्थक्षेत्र असलेल्या ज्ञानेश्वर माउलींच्या आळंदीत ‘जागृती’ नावाचे शिक्षणक्षेत्र आहे व ते ज्ञानक्षेत्र म्हणून घडत आहे!
सकीना बेदी – 9823061133, 9890952578, sakinaiam@gmail.com
– श्रीकांत कुलकर्णी,
भेटायला आवडेल
भेटायला आवडेल