एखादी व्यक्ती जर आश्चर्यकारक रीत्या फार मोठ्या अपघातात किरकोळ दुखापत होऊन वाचली तर त्या वेळी ‘जिवावर बेतलं पण शेपटावर निभावलं’ असे म्हटले जाते. हा वाक्प्रचार शारीरिक संकटाच्या प्रसंगातच दर वेळी वापरला जातो असे नाही.
एखादी व्यक्ती तिची आयुष्यभराची कमाई तिच्या स्थानिक सहकारी बँकेत दीर्घ मुदतीसाठी ठेवण्याच्या विचारात असतानाच ती बँक दिवाळखोरीत निघाली आणि त्यामुळे त्या व्यक्तीचे संभाव्य गुंतवणुकीचे पैसे वाचले; फक्त त्या बँकमधील बचत खात्यातील त्या मानाने छोट्या रकमेचे पैसे तेवढे बुडाले. अशा वेळी, त्या व्यक्तीची ‘जीवावरच बेतलं पण शेपटावर निभावलं’ अशी भावना होते.
थोडक्यात, कोणत्याही प्रकारच्या मोठ्या संकटातून किरकोळ नुकसान होऊन सुटका झाली तर त्यावेळी ‘जीवावर बेतलं पण शेपटावर निभावलं’ असे म्हटले जाते.
गंमत म्हणजे तो वाक्प्रचार रूढ झाला तो घराघरांत आढळणाऱ्या सर्व परिचित अशा पालीच्या अनोख्या शारीरिक वैशिष्ट्यावरून! पालीला फटका मारण्याच्या प्रयत्नात, सहसा व्यक्तीचे लक्ष पालीच्या अचानक तुटून पडलेल्या आणि वळवळणाऱ्या शेपटीकडे जाते आणि दरम्यान पाल पळून गेलेली दिसते! ती शेपूट फटक्यामुळे तुटलेली नसते. ती पालीने स्वतःहून टाकलेली असते. पालीच्या त्या वैशिष्ट्याला ‘ऑटोटॉमी’ असे म्हणतात. ऑटो म्हणजे ‘स्वयम्’ किंवा ‘आपण स्वतः’. टॉमी म्हणजे कापणे. स्वतःच स्वतःचा अवयव कापून टाकणे म्हणजे ऑटोटॉमी. ते वैशिष्टय पालीमध्ये तिचा जीव वाचवण्यासाठी शारीरिक उत्क्रांत झाले. हा वाक्प्रचार त्या वस्तुस्थितीवरून ‘जीवावर बेतलं पण शेपटावर निभावलं’ असा रूढ झाला.
संस्कृतमध्ये ‘सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडितः’ असे सुभाषित आहे. त्याचा अर्थ बुद्धिमान व्यक्ती तिच्या सर्वनाशाची वेळ आली असता छोट्या गोष्टींचा त्याग करून स्वतःची सुटका करून घेते असा आहे. त्यामुळे शेपूट तोडून स्वतःचा जीव वाचवणारी पाल हुशारच समजली पाहिजे!
काही पालींमध्ये ‘पार्थेनोजेनेसिस’ हे एक वैशिष्ट्य आढळते. पार्थेनोजेनेसिस चा अर्थ असंयोगजनन म्हणजेच नराशी संबंध न येता होणारे प्रजनन असा आहे. अशा प्रकारचे असंयोगजनन हे खवलेधारी सरिसृप (सरपटणाऱ्या) पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये (Squamate reptiles) आढळते. पन्नास प्रकारच्या लिझर्ड (त्यांत पाली व सरडे यांचा समावेश असतो) आणि एका प्रजातीचा साप यांच्याध्ये तशा प्रकारचे प्रजनन आढळते. लिझर्ड वर्गातील सहा प्रकारच्या पालींमधे असंयोगजनन दिसून येते. असंयोगजनन आढळणाऱ्या पालींमधे फक्त माद्या असतात, नर नसतात. तशा प्रकारची एक पाल भारतातील सिक्कीम, दार्जिलिंग, आसाम ह्या भागांत आढळते.
पालींच्या इतर प्रजातींमध्ये पार्थेनोजेनेसिस आढळते का, याची खात्रीशीर माहिती उपलब्ध नसली तरी वेळ पडल्यास (म्हणजे नरांची संख्या कमी झाल्यास अथवा नर उपलब्ध न झाल्यास) तशा तऱ्हेने प्रजोत्पादन करण्याची क्षमता त्यांच्यामधे असते असे अलिकडील संशोधनात आढळले आहे. थोडक्यात त्यामुळे ‘पालींचे पुल्लिंग काय?’ असा जो प्रश्न पुलंना पडला होता त्याचे उत्तर त्या वैशिष्ट्यात दडले आहे. पालींमधे सगळे स्त्री राज्य असल्यामुळे भाषेच्या वापरात पुल्लिंगाची गरजच उरत नाही! [(सशाचे सशी याखेरीज अन्य स्त्रीलिंग असल्यास मला ठाऊक नाही ; त्याचप्रमाणे पालीचे पुल्लिंग.) – पाहा ‘मी आणि माझा शत्रुपक्ष. काही ठळक गनीम.(हसवणूक)’]
पाली संदर्भात वापरला जाणारा दुसरा वाक्-प्रचार म्हणजे ‘शंकेची पाल चुकचुकणे’. जेव्हा एखाद्या गृहित धरलेल्या गोष्टीबद्दल ‘बरोबर का चूक’ असा संदेह मनात निर्माण होतो तेव्हा ‘शंकेची पाल चुकचुकली’ असे म्हटले जाते. पाल अनेकदा चुक्, चुक् असा आवाज काढते; किंबहुना ती चुक् चुक् एवढाच आवाज काढू शकते. त्यावरून ‘शंकेची पाल चुकचुकणे’ हा वाक्-प्रचार रूढ झाला असण्याची शक्यता आहे.
– डॉ. उमेश करंबेळकर