इतिहास हा विषय वर्गाच्या चार भिंतींमध्ये शिकताना अनेकांना रुक्ष वाटतो; इतिहासातील सनावळ्या, पिढ्यांची जंत्री, घटनाक्रम यांची भीतीही वाटू लागते. आपलाच इतिहास रुक्ष वाटत असेल तर तो वाचणार्यात, अभ्यासणार्या; लोकांमध्ये देशप्रेम, जिद्द, त्यागवृत्ती निर्माण कशी होणार या अस्वस्थतेतून जन्म झाला तो पुण्यातील ‘इतिहासप्रेमी मंडळ’ या गटाचा. (स्थापना १९९८) पुण्यातील रमणबाग प्रशालेत इतिहास शिकवणारे मोहन शेटेसर त्या मंडळाचे प्रवर्तक आहेत.
शेटेसरांनी स्वत: केलेली किल्ल्यांची भ्रमंती आणि त्यांनी ऐकलेली बाबासाहेब पुरंदरे यांची व्याख्याने यांमधून त्यांच्यावर झालेले संस्कार… यामुळे त्यांनी ऐतिहासिक घटनांची भव्यता, त्या घटना कोठे आणि कशा घडल्या हे लोकांना दाखवून इतिहास जिवंत करावा असे ठरवले. त्यासाठी त्यांनी विविध कला आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची मदत घ्यावी हेही ठरवले. शेटेसरांनी ज्या वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केला, त्यातील सर्वात परिणामकारक माध्यम म्हणजे ‘महानाट्य’. तसे प्रयोग त्यांनी केले.
स्वातंत्र्ययोद्धे चाफेकर बंधूंनी जुलमी ब्रिटिश अधिकारी रँडचा वध पुण्याच्या गणेश खिंडीत १८९६ मध्ये केला. ती भारताच्या इतिहासातील महत्त्वाची घटना ठरली. तीन चाफेकर बंधू आणि महादेव रानडे यांना त्याबद्दल फाशी झाली. चाफेकर बंधूंनी रँडचा वध केल्याच्या घटनेला २२ जून १९९७ या दिवशी शंभर वर्षें पूर्ण झाली. त्यानिमित्ताने गणेशखिंडीतील त्या जागेवर, तो प्रसंग मुळात रात्री नऊच्या सुमारास जसा घडला तसा सादर करण्यात आला. पुणे विद्यापीठातून निघालेली रँडची बग्गी, ‘गोंदया आला रे…’ ही खुणेची हाक आणि चाफेकरांनी बग्गीवर उडी मारून केलेली रँडची हत्या… तो नाट्यमय घटनाक्रम जसा घडला होता तसा पंधरा हजारांपेक्षा जास्त लोकांनी अनुभवला!
नरवीर तानाजी मालुसरे यांचा तीनशेपस्तिसावा स्मृतिदिनसुद्धा तशाच अद्भुत प्रकारे साकारण्यात आला. तानाजी मालुसरे आणि त्यांचे मावळे दोर लावून ज्या कड्यावरून गडावर चढले त्याच कड्यावरून तीनशेपस्तीस युवक-युवती त्या दिवशी सिंहगडावर चढले व त्यांनी तानाजी यांना अभिवादन केले.
‘इतिहासप्रेमी मंडळा’तर्फे प्रसिद्ध साहित्यिक आणि दुर्गप्रेमी गो.नी.दांडेकर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी १ जून हा दिवस ‘दुर्गदिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यासाठी दरवर्षी एक गड किंवा किल्ला निवडला जातो. शेटेसर पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना घेऊन त्या गडावर जातात. तेथे सगळेजण श्रमदान करतात. किल्ल्याच्या तटबंदीवर, बुरुजावर उगवलेली रोपे काढून टाकणे, किरकोळ दुरुस्ती करणे, प्लॅस्टिक आणि इतर कचरा गोळा करून त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे, गडावर ध्वजस्तंभ उभारणे अशी कामे केली जातात. त्याचबरोबर जवळच्या गावातून शिवरायांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली जाते. त्या मिरवणुकीत वेत्रचर्म, खड्ग, दांडपट्टा अशा चित्तथरारक प्रात्यक्षिकांचा समावेश असतो.
शेटेसरांनी इतिहासात घडलेल्या घटनांचा क्रम मुलांच्या लक्षात राहवा म्हणून ऐंशी फूट लांबीची कालरेषा रमणबाग प्रशालेत तयार केली आहे. त्या कालरेषेवर इसवी सनपूर्व ५००० ते थेट इसवी सन २००९ पर्यंतच्या महत्त्वाच्या घटना दाखवल्या गेल्या आहेत. दोन घटनांमधील काळाचे अंतर समजण्यासाठी कालरेषेवरसुद्धा त्या प्रमाणात अंतर सोडण्यात आले आहे. त्या घटना प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक अशा तीन भागांत विभागल्या गेल्या आणि ठळक घटना चित्ररूपात रेखाटल्या गेल्या. त्या रेखाटनांमध्ये राम, मध्ययुगीन राजे यांच्यापासून ते लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांच्यापर्यंत अशा सर्वांचा समावेश आहे.
शेटेसर विद्यार्थ्यांसाठी पुण्यातील ऐतिहासिक तेरा स्मृतिस्थळांच्या भेटीचा उपक्रम राबवतात. ते त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन तेथे घडलेल्या इतिहासाची माहिती विद्यार्थ्यांना करून देतात. त्याशिवाय, शेटेसर युवकांसाठी किल्ले गाईड प्रशिक्षण शिबिर घेणे, ठिकठिकाणी व्याख्याने आणि कथाकथनाच्या माध्यमातून इतिहास सांगणे, ऐतिहासिक नाटकांसाठी संहिता लिहिणे, नाटकांचे दिग्दर्शन करणे असे अनेक उपक्रम सातत्याने राबवत असतात. इतिहास शिकवण्यासाठी वेगळ्या वाटेने जाणारा असा हा शिक्षक!
शेटेसरांकडून त्यांच्या प्रदर्शनांच्या व इव्हेंट्सच्या गोष्टी ऐकताना अंगावर रोमांच उमटतात तर त्यांनी योजलेले प्रत्यक्ष प्रसंग किती प्रभावी असतील! उदाहरणार्थ, त्यांनी २०१७ सालच्या दिवाळीत किल्ला प्रदर्शन भरवले ते ‘रायगड पूर्वी होता तसा -’ हा विषय घेऊन. बाजारपेठ, नगारखाना… सार्याव वास्तू ट्रिक सीन रचून सजीव केल्या होत्या. प्रेक्षक त्या इतिहासात रमून जात होते. शेटेसरांना त्यांच्या अशा कार्यक्रमांतून कार्यकर्ते मिळतात. पण त्यांची स्वयंसेवकांची खरी फौज येते ती विद्यार्थ्यांमधून. शाळेतील इतिहासप्रेमी विद्यार्थी कॉलेजात गेले तरी शेटेसरांशी व इतिहासातील गोष्टींशी बांधील राहतात. शेटेसर त्यांच्या मदतीने त्यांचे इव्हेंट्स उभे करतात. त्यांना भारत इतिहास संकलन समितीच्या पुणे शाखेचा पाठिंबा असतो. शेटेसर त्या समितीचे सदस्य आहेत. शेटेसरांचा ते व पत्नी असा दोघांचा संसार आहे. शेटेसर म्हणाले, की पूर्वी ज्या गोष्टी हौसेने व सेवाभावाने होत त्यात आता व्यापारी वा व्यवसायवृत्ती आली आहे. तरीसुद्धा जुन्या, ऐतिहासिक गोष्टींची ओढ माणसांमध्ये कायम आहे. मी ऐतिहासिक वास्तू दाखवण्यासाठी लोकांना नेत असे. आता तोच उपक्रम ‘हेरिटेज वॉक’ या नावाने होतो.
मोहन शेटे यांनी, त्यांनी घडवलेल्या प्रदर्शनांचे व इव्हेंट्सचे फोटो व तत्संबंधीची वर्तमानपत्रांतील कात्रणे जपून ठेवली आहेत. तेच त्यांचे डॉक्युमेंटेशन!
– राजू दीक्षित
Siran baddalcha lekh vachun…
Siran baddalcha lekh vachun Abhimaan vatla
Shantanu Sahasrabudhe (itihaas Premi mandal)
सरांबद्दलचा लेख वाचून खूप…
सरांबद्दलचा लेख वाचून खूप छान वाटले
सरांना प्रत्यक्ष समोर कथन…
सरांना प्रत्यक्ष समोर कथन करताना यैकले आहे,खूपच भारावून जातो आपण.सर आपले कार्य असेच चालू ठेवा.आम्हाला आपला अभिमान आहे.
Comments are closed.