शिवाजीदादा कागणीकर महाराष्ट्र, कर्नाटक व दक्षिण भारताचा काही भाग येथे सर्वांना परिचित आहेत. खादीची हाफ पँट, खादीचाच हाफ बाह्यांचा खिसेवाला शर्ट, गांधी टोपी आणि खांद्यावर शबनम अशी त्यांची वेशभूषा. त्यांनी रचनात्मक ग्राम विकासाचे काम बेळगावच्या ग्रामीण भागात उभे केले आहे. मात्र दादांचा ठावठिकाणा कोणाला सांगता येणार नाही, कारण ते आज या गावात, तर उद्या पुढील गावात. त्यांच्याजवळ मोबाईल फोनपण नाही. दादांनी त्यांचे आयुष्य देशसेवेला देण्याची प्रतिज्ञा सानेगुरुजी, गांधीजी व विनोबा यांच्यापासून प्रेरणा घेऊन, 1972 मध्ये केली. त्यांनी बी एससीच्या शेवटच्या वर्षाला असताना कॉलेज सोडून देऊन खेड्यात कामाला सुरुवात केली. त्याच वेळी ते अभ्यासगटात सहभागी झाल्यामुळे विश्लेषण करण्यास शिकले व सामाजिक प्रश्नांकडे डोळसपणे पाहू लागले. ते त्यांच्या घरात एकटेच शाळेचे पायरी चढले होते. त्यांना ते सामाजिक कामात पडले म्हणून गावातून प्रचंड विरोध झाला; माथेफिरू म्हणून हिणवले गेले.
त्यांनी दारिद्र्य, कुपोषण, निरक्षरता, पाण्याचे दुर्भीक्ष्य, आरोग्य सुविधांचा अभाव या मुख्य समस्या आहेत हे जाणले. त्यांनी कामाची खरी गरज मागासलेल्या, बहुजन समाजातील, डोंगरभागातील मुलांसाठी आहे हेही ओळखले. मग त्यांनी त्यांच्याकरता खेड्यातील शाळा पुनरुज्जीवित केल्या, तर काही ठिकाणी त्या नव्याने सुरू केल्या. दादांनी असंघटित क्षेत्रांतील कामगारांना संघटित केले. दिलीप कामत यांनी अभ्यासगट सुरू केले होते. तेथे झालेल्या चर्चांमुळे 1977 साली एक हजार यंत्रमाग कामगारांनी त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत सत्याहत्तर दिवस संप केला. ते त्यांना लाभलेले पहिले मोठे यश होते. दादांना सहकारी मित्रांबरोबर तुरुंगात जावे लागले. त्यांनी फादर जो यांच्याबरोबर 1978 मध्ये सुरू केलेली ‘जनजागरण’ संस्था नावारूपाला आली आहे. त्यांनी संस्थेच्या माध्यमातून रात्रशाळा, बालवाड्या, आरोग्यसेविका, बचत गट, जलसंधारण, दारूबंदी, वृक्षलागवड व संवर्धन, पाणलोटक्षेत्र व्यवस्थापन, गोबर गॅस असे विविध प्रकल्प यशस्वी करून दाखवले आहेत.
सभोवतालचे डोंगर कट्टणभावी व परिसरातील खेडी यांमधील पाणलोटाच्या कामामुळे हिरवेगार झाले आहेत. भूगर्भातील पाणी वाढून गावांना नैसर्गिक रीत्या वर्षभर मिळू लागले आहे. वृक्षारोपणामुळे जंगलक्षेत्र वाढले. गुरांना चारा मिळू लागला. परिणामी, दुग्धव्यवसाय पशुधनात वाढ होऊन बहरला. शेतकऱ्यांनी भाजीपाला घेण्यास सुरुवात केली. कुपोषण घटले. गुरांमागे जाणारी मुले शाळेत शिकू लागली. रात्रशाळांनी खेडोपाडी शिक्षणाची रुजवात घालण्याचे लक्षणीय काम पंधरा वर्षांच्या कालावधीत केले. बैठकांत होणाऱ्या चर्चांद्वारे लोकांचे प्रबोधन होत राहिले. लोकसहभागातून सामूहिक काम केल्यामुळे गावकऱ्यांमध्ये समूहभावना व स्वयंसेवा वृत्ती निर्माण झाली! रूढी-परंपरांचा काच कमी झाला. आंबा व काजू यांच्या लागवडीमुळे लोकांना उत्पन्नाचे साधन मिळाले. महिला त्यांच्यात ‘नरेगा’मुळे आत्मविश्वास निर्माण होऊन जागृत व संघटित झाल्या आहेत.
सर्वांगीण विकासाचे प्रारूपच कडोलीच्या आसपास उभे राहिले आहे! दादांच्या मार्गदर्शनामुळे तयार झालेले दहा कार्यकर्ते आहेत. ते ‘जनजागरण’ संस्थेद्वारे वेगवेगळ्या गावांत कार्यरत आहेत. राम आपटे, दिलीप कामत, अशोक देशपांडे, फादर जोचनकला, जागृत महिला ओक्कुट, जीवन विवेक प्रतिष्ठान हे सर्वजण त्यांचे परिवर्तनाच्या वाटेवरील सहप्रवासी आहेत. भारती भांदुर्गेसारखी कार्यकर्ती हिंमतीने व्यवस्थेशी झगडत लोकांचे प्रबोधन करत आहे. त्यांच्या कामाला वैचारिक अधिष्ठान देण्याचे काम सदाशिवराव भोसले, वसंत पळशीकर व राम आपटे यांनी केले. शिवाजीदादा ‘आपटेदादांकडून मी नीती शिकलो’ असे सांगतात. कर्नाटक राज्याला सर्वोदय चळवळीची परंपरा मोठी आहे. बेळगावच्या इतिहासात गंगाधरराव देशपांडे, पुंडलिक कातगडे, मुरलीधर घाटे गुरुजी व त्यानंतर सदाशिवराव भोसले, श्रीरंग कामत, आपटेदादा व शिवाजीदादा अशी गांधीविचाराची व सर्वोदयाची साखळी आहे.
ते जागृत कुरबर संघटना, परिवर्तन, भ्रष्टाचार निर्मूलन आणि सामाजिक काम, नरेगा संघर्ष मोर्चा, गोविंदधाम शिक्षण साधना ट्रस्ट, जीवन शिक्षण प्रतिष्ठान, Alternative Education Network या संस्थांद्वारे कार्यरत आहेत. दादा हा विलक्षण सर्वोदयी कार्यकर्ता ‘हे विश्वचि माझे घर’ असे समजून रोज वेगवेगळ्या खेड्यांत हिंडत असतो. अफाट लोकसंग्रह हीच त्यांची खरी मालमत्ता आहे. महाराष्ट्र फाउंडेशन व देवराज अर्स यांसारखे मानाचे काही पुरस्कार मिळूनदेखील खेड्यात गेल्यावर एखादा मुलगा त्याच्याच घरी त्यांना जेवण्यास येण्याचा आग्रह धरतो, तेव्हा त्यांना तो त्यांचा सर्वोच्च पुरस्कार वाटतो. ते सरकारकडून पुरस्कार स्वीकारला तरी त्याच वेळी सरकारला चार खडे बोल सुनावण्यास मागेपुढे बघत नाहीत.
ते वयाच्या एकाहत्तरीत प्रवेश करत आहेत. पण त्यांचा मधुमेह बाजूला ठेवून प्रवास, आंदोलने, उपोषणे, मोर्चे, पदयात्रा, सततच्या बैठका हे चालू आहे. ते मी दमलो असे कधीही म्हणत नाहीत. ते
साने गुरुजींची भूतदया व संवेदनशीलता, गांधी व विनोबांची साधी राहणी, लोकांबद्दल प्रेम व तत्त्वनिष्ठ वृत्ती खऱ्या अर्थाने जगत प्रबोधनाचे दान देत अविरत फिरत आहेत.
(‘साधना’वरून उद्धृत, संपादित – संस्कारित)
– अमिता नायगांवकर, बेळगाव,9975190402 amitachk@gmail.com