Home मंथन शिक्षकांचे व्यासपीठ – उद्दिष्ट

शिक्षकांचे व्यासपीठ – उद्दिष्ट

1
_Shikshkanche_Vyasapith_Uddesht_1.jpg

शिक्षक मुलांना चार भिंतींच्या आत घेऊन समोरच्या फळयावर 2+2 = 4 असे शिकवू लागला तेव्हाच मुलांच्या मेंदूंचा विकास होणे थांबले! क्षमस्व! फार मोठे स्टेटमेंट करत आहे मी. अगदी उचलली जीभ आणि लावली टाळयाला, तसे. पण ते बेफिकिरीने उच्चारलेले वाक्य नाही; तो गेल्या काही वर्षांचा अनुभव आहे.

मी लहानपणी शिकत असताना अनेक प्रश्न डोक्यात येत. शिक्षण म्हणजे काय? ते घेऊन काय करायचे? ज्याला डॉक्टर व्हायचे आहे त्याने इतिहास, भूगोल हे विषय का शिकावे? ज्याला चित्रकार व्हायचे आहे त्याने त्याला विज्ञान, गणित विषय आवडत नसले तरी का शिकावे? आणि ज्यांना नव्वद, ऐंशी टक्के मार्क मिळतात तीच मुले हुशार असे का म्हणायचे? असे अनेक प्रश्न मनात असायचे. माझ्या मनात मुलांना शिकवण्याचे स्वप्नही अगदी कॉलेजमध्ये असल्यापासून आहे. निदान दहा मुलांना तरी जीवनात योग्य मार्गदर्शन करावे असे वाटे. आणि म्हणतात ना, Where there is  a will there is a way त्याप्रमाणे अनेक संधी मिळत गेल्या.

मी ‘भाग्यश्री फाऊंडेशन’च्या माध्यमातून मुलांना शिकवण्याचा व त्यांच्याकडून शिकण्याचा आनंद गेली दहा वर्षें घेत असताना, मजकडे बरेच अनुभव जमा झाले आहेत. सुरुवातीला असे वाटायचे, की मुलांचे शिक्षण अडते त्यापाठी आर्थिक अडसर हे मुख्य कारण आहे. आम्ही त्याचे उत्तर शोधण्यासाठी की काय मुलांची शिबिरे घेऊ लागलो. आम्ही पाचवीचे वर्ग निवडले. त्या सर्व मुलांची फी भरणे व महिन्यातून दोन-तीन वेळा त्यांच्यासाठी निरनिराळी शिबिरे घेणे असे सुरू केले. आम्ही एक मात्र अनुभवातून ठरवले, की त्या मुलांना नुसती आर्थिक मदत करायची नाही, तर त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या. त्यासाठी वर्षातून एकदा आम्ही त्यांच्या घरांना भेटी देत असू. त्यामुळे आम्हाला त्यांच्या घरांतील वातावरण कळण्यास मदत होत असे. त्यातून किती शिकण्यास मिळाले ते शब्दांत सांगता येणार नाही. स्वानुभव माणसाला एक निराळे शहाणपण देतो, जगाकडे बघण्याची निराळी दृष्टी देतो, अर्थात त्या अनुभवाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला तर! आम्ही ते सूत्र त्या अनुभवामुळे शिकलो. अन्यथा अनुभव मनामध्ये नुसते गठित होत जातात आणि माणूस त्यातच रमून जाऊ शकतो.

लोकमान्य टिळकांच्या ‘गीता रहस्या’मध्ये एक वाक्य वारंवार येते, की ज्या मनुष्याला कळले, की सर्व जीवांमध्ये एकच परमेश्वर वास करतो, ज्याच्या ठायी ती समत्व बुद्धी आली तो सर्व ज्ञान प्राप्त करतो आणि आत्मज्ञानही प्राप्त करतो. आत्मज्ञान हे जगातील सर्वात उच्च प्रतीचे ज्ञान आहे. त्याच्याउपर जाणण्यासारखे जगात काहीही नाही. ते आत्मज्ञान अनुभवांचे अर्थ मनाशी नीट लावले तर मिळू शकते. ‘शिक्षकांचे व्यासपीठ’चे उद्दिष्ट हे आहे, की या विचारांचा अंतर्भाव शिक्षणपद्धतीत व्हावा. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे, साने गुरुजी, कर्मवीर भाऊराव पाटील या प्रत्येकाने त्याच्या जीवनात शिक्षणाला महत्त्व दिलेले आहे. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, रामदास स्वामी या सर्वांनीदेखील लोकांचे शिक्षण व्हावे, त्यांनी त्यांच्या आजुबाजूच्या परिस्थितीवर विचार करावा याच गोष्टींचा ध्यास त्यांच्या अभंगांतून, श्लोकांतून व्यक्त केला आहे. संत गाडगेबाबादेखील त्यांच्या कीर्तनांतून शिक्षणाचा प्रसार गावोगावी करत.

पण त्यांना अभिप्रेत शिक्षण बाजूला राहिले. मुलांचा कल फक्त पाठांतर करून मार्क मिळवण्याकडे असतो. त्यात त्यांना, पालकांना व शिक्षकांनाही वाईट वाटत नाही. त्यामुळे मुलांचा सर्वागीण विकास होत नाही. मुलांमधील जाणीव, संवेदना या कॉम्प्युटरच्या युगात हरवत आहेत असे दिसून येते. त्याचा अर्थ मुलांनी हळवे व्हावे असा नव्हे. पण बुद्धी व भावना यांचा तोल साधला गेला पाहिजे आणि तो समतोल साधण्यासाठी शिक्षक व पालक महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. मुलांची विचारसरणी बदलत्या काळाप्रमाणे बदलत आहे. प्रसारमाध्यमे, टीव्ही, इंटरनेट, अधिक सुविधा यांमुळे बर्‍याच वेळा असे दिसून येते, की मुले कमकुवत बनत आहेत. त्यामुळे सतत नैराश्य येणे, आत्महत्या, गैरवर्तणूक यांचे प्रमाण वाढत आहे. समाजात काही वर्षें काम करत असताना जाणवले, की मुलांना आर्थिक मदतीपेक्षा शिक्षकांनी समजून घेण्याची, मुलांना मार्गदर्शन करण्याची गरज जास्त आहे. एक जुना दाखला. योगवासिष्ठ वाचताना कळले, रामाचे मन उदासीन होते. त्याला सर्व कर्मे का करावी असे वाटू लागले. तेव्हा वसिष्ठ ॠषी, त्याचे गुरू यांनी त्याला अचूक व समर्पक मार्गदर्शन केले आणि कर्तव्य करण्याविषयी बजावले. शिक्षकाची भूमिका अशी असते. आजच्या शिक्षणक्रमात मुलाचे मन घडवण्याचा विचार होताना दिसत नाही. जिजाऊने लहाणपणी शिवबाच्या मनावर रामायण-महाभारताचे संस्कार केले. सानेगुरुजी सांगत, की  मुलांची मने कोमल असतात. त्यांना योग्य वळण लावणे, मार्ग दाखवणे हे मोठ्यांचे काम आहे. टिळकांनी ‘गीतारहस्या’मध्ये त्यासाठी मनाचे समत्व असा शब्द वापरला आहे. तर हे मनाचे समत्व गमावल्यामुळे आपण जीवनातील तोल गमावत आहोत. आयुष्याची सर्व धडपड ही समाधान, आनंद मिळवण्यासाठी असते. ‘शेवटचा क्षण गोड व्हावा!’ असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याचा ध्यास असतो. पण ते होताना दिसत नाही. माणसे ना समाधानाने जगत, ना मरत. मग शिक्षण, आर्थिक प्रगती वाढली तरी समाधान, आनंद का बरे कमी झाला असा प्रश्न मनात येतो. नुसता विचार करत न बसता त्यावर काही उपाय करणे आवश्यक आहे. किंबहुना, काही उपाय आहे का हे आपण सर्वांनी मिळून शोधणे आवश्यक आहे. म्हणून हे शिक्षकांचे व्यासपीठ!

– शिल्पा खेर

khersj@rediffmail.com

About Post Author

1 COMMENT

  1. विचार करण्यासारखा लेख…
    विचार करण्यासारखा लेख. आजच्या शिक्षणपध्दतीत मुलांचा सर्वांगीण विकास होईल असा बदल अभ्यासक्रमात व्हावा हे खरं.मुलं नुसती शिक्षित होण्यापेक्षा अनुभवाने शहाणी होणे महत्वाचे.

Comments are closed.

Exit mobile version