पण संगमनेरला झालेल्या ‘छात्रभारती’च्या अधिवेशनात मात्र गटचर्चा, प्रश्नोत्तरं, गीतं, घोषणा अन् पथनाट्यांतून कृतिशील समाजवादाचे धडे गिरवताना मनातल्या कित्येक प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळत गेली.
अधिवेशनाचं उदघाटन केलं ते डॉ. बाबा आढावांनी. ‘एक गाव एक पाणवठा’, ‘हमाल पंचायत’ यांसारख्या पथदर्शी चळवळींतून समाजवाद जगलेलं हे व्यक्तिमत्त्व. त्यांनी चळवळीतले अनुभव सांगत अधिवेशनाची सार्थ सुरुवात केली. ‘लोकशाहीचं मूल्य कळालं तर कुठल्याच गोष्टीची भीती बाळगायची गरज उरत नाही’ हे त्यांचं वाक्य अनेकार्थांनी लक्षात राहिलं. त्यांनी ते हॉवर्ड विद्यापीठात गेले असताना एका अमेरिकन मुलीनं त्यांना विचारलेला प्रश्न आम्हाला विचारून अंतर्मुख केलं: त्या मुलीनं विचारलं होतं, की ‘अमेरिकनं स्वत:ची जडघडण व विकास अवघ्या पाचशे वर्षांत केला, मग भारत पाच हजार वर्षांहूनही जास्त इतिहास असताना मागे का?’
नंतरच्या सत्रात सुभाष वारे अन् पन्नालाल सुराणा यांनी साध्यासोप्या शब्दांत संविधान व लोकशाही यांची माहिती सांगितली.
पुढचे दोन दिवस अतुल पेठे व त्यांच्या माहितीपटांनी सार्यांवर अक्षरश: गारूड केलं. आंतरराष्ट्रीय कीर्तीचा हा रंगकर्मी, पण इतक्या सहजसाधेपणानं आमच्यात राहिला! त्यांनी ‘कचराकोंडी’ या माहितीपटातनं मांडलेलं ‘कागद-काच-पत्रा’ कामगारांचं जगणं-भोगणं अंगावर येणारं आहे. सगळंच भयानक होतं, वास्तव होतं अन् म्हणूनच विचार करायला लावणारं होतं. बहिणाबाईंवरच्या सहजसुंदर फिल्ममधून तर बहिणाई अन् त्यांच्या कविता, दोन्हींची जणू गळाभेटच घडून आली. सोपानदेव चौधरींची ओघवती वाणी, आशा जोंधळेंचा जवारीदार गळा अन् खानदेशातल्या खेड्यापाड्यांची, शेतमळ्यांची चित्रमय कहाणी…. सारंच लाजवाब.
महाराष्ट्र राज्य ज्ञान महामंडळाच्या माध्यमातून चालवलेल्या संगणक-प्रशिक्षणातून साठ लाखांहून जास्त जण संगणकसाक्षर झाले. गडचिरोलीतल्या दुर्गम आदिवासी पाड्यावरचा त्यांचा अनुभव तर जणू झगमगत्या ‘इंडिया’तल्या काळ्यासावळ्या पण हुशार अन् चुणचुणीत भारताच्या बुध्दिप्रतिभेची दिपवून टाकणारी साक्ष देतो.
विवेक सावंत सांगतात, ‘एकदा गडचिरोली तल्या आदिवासी पाड्यावर भेट द्यायला गेलो. सोबत दोघंचौघं सहकारी होते. सगळे लहान-मोठे भोवती गोळा झाले. त्यांना कुणीतरी मोठा ‘सायबा’ आलाय एवढंच कळत होतं. तिथं अन्नपाण्याचीच गरज भागणं अवघड. सगळं अभावाचं जगणं. मग शाळा-शिकणं-संगणक यांची बातच सोडा. मला प्रश्न पडला- मी कोण आहे म्हणून सांगू यांना? माझ्या असण्याशी यांचं नातं काय? मी अस्वस्थ झालो. तितक्यात माझा एक मित्र बोलला. ‘हे विवेक सावंत MS-CIT चा कोर्स यांनीच चालू केलाय.’ एक तरूण पोरगा उठला अन् बोलला- मी केलंय, सर, MS-CIT. मी अविश्वासानं त्याच्याकडे पाहिलं. तसा तो उठला अन् त्यानं आत जाऊन आणलेलं प्रमाणप्रत्र माझ्या हातात दिलं. तालुक्याच्या गावी त्यानं MS-CIT केलं होतं. त्याच्या टपोर्या हसर्या अन् काळ्याभोर डोळ्यांत तेव्हा मला माझी हरवलेली ‘ओळख’ सापडली’.
‘मुलांच्या डोळ्यांत असलेलं अपार कुतूहल हेच भारताचं भवितव्य आहे’ असं म्हणणारा हा सृजनशील, विज्ञानशील महामंडळाच्या माध्यमातून सौदी अरेबियातल्या विद्यापीठांशी करार करून, आपल्या भारतीय मुलींना तिथं पाठवून इस्लामी स्त्रियांना संगणकसाक्षर करण्याचा भन्नाट उपक्रम राबवतोय.
‘स्टील फ्रेम’ सारख्या पुस्तकाव्दारे कित्येक मराठी तरूणांमध्ये स्पर्धा परीक्षा द्यायची अन त्यात यशस्वी व्हायचा जज्बा जागवणारे फारूक नाइकवाडे यांचं सेशन अन् प्रश्नोत्तरं रंगली. “वैचारिक प्रदूषण न झालेल्या संघटनांपैकी ‘छात्रभारती’ ही एक आहे” असं ते बोलले. पुरोगामी विचारांची मुलं व्यवस्थेत येणं जास्त गरजेचं आहे असं त्यांना वाटतं.
‘छात्रभारती’चे माजी अध्यक्ष अजित शिंदे यांनी आमच्याच भाषेत काही प्रश्न आम्हाला विचारले. ‘फेसबुक’, ‘ऑर्कूट’वर कमेंट करणं. स्टेटस अपडेट करणं अन् ‘लाइक’चं बटन दाबणं यापलीकडे त्या ‘सो कॉल्ड’ सोशल नेटवर्किंग’चा आम्ही कुठचा उपयोग करणार आहोत? हा तो प्रश्न. त्या माध्यमातून जोवर आम्ही आमच्या रोजच्या जगण्याचे-भोगण्याचे प्रश्न मांडत नाही, शेतमालाचे भाव अन् शैक्षणिक फीवाढीसारख्या समस्या चव्हाट्यावर आणत नाही तोवर त्यांची उपयोगिता शून्य आहे असं वास्तव मत त्यांनी माडलं.
‘श्रीकृष्ण अन् सुदामा एका शाळेत शिकले. समतेच्या बाबतीत ही गोष्ट अर्धी खरी आहे. श्रीकृष्ण, सुदामा अन् एकलव्य जेव्हा एकाच शाळेत शिकतील तेव्हा ती खरी समानता’ असा सूचक वास्तववाद मांडत शरद जावडेकरांनी शिक्षणव्यवस्थेवर प्रखर भाष्य केलं. स्वत:ला International Schools चं लेबल लावणा-या खाजगी शाळा अन् प्राथमिक दर्जाच्या सुविधाही न मिळणा-या आश्रमशाळा, साखरशाळा, पाषाणशाळा यांच्यांतील दरी स्पष्ट करत ‘शिक्षणातलं नवं चातुर्वर्ण्य’ त्यांनी मांडलं.
विद्रोही कवी दिनकर साळवी यांच्या कवितांतला उपरोध अन संतोष पवार यांच्या पहाडी आवाजातून ऐकलेली माय-बहिणीच्या जिंदगानीची गाणी, कविसंमेलन झाल्यावरही रात्रभर मनात घुमत राहिली. एक शायर खूप सुंदर लिहून गेलाय…
मंजील तो मुझे मिलही जाएगी यारों
चाहे भटक कर ही सही
गुमराह तो वो लोग है
जो घर से निकलते ही नही
प्रस्थापित व्यवस्थेच्या कोषातून बाहेर पडून त्या व्यवस्थेला सवाल करण्याचा जज्बा ‘छात्रभारती’ नावाच्या बिनभिंतींच्या शाळेत दिला जातो.
‘हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही….’ असा आशावाद मनात जागवणारी, ओठांवर समतेची, संघर्षाची अन् क्रांतीची गाणी खेळवणारी ‘ही वाट वेगळी आहे. यायचं की नाही ते तुम्हीच ठरवा’ असं म्हणताना आम्हाला जगण्याच्या वाटा दाखवणारी अन् आमच्या प्रश्नांची उत्तरं आमच्याच भाषेत देणारी ‘छात्रभारती’ म्हणूनच आमच्या जगण्याचा एक भाग आहे.
– शर्मिष्ठा भोसले,
9822232952, 7276255123,
sharmishtha.2011@gmail.com