जिल्हा सोलापूर. त्यात माढा नावाचे आटपाट गाव. विलास शिवलाल शहा हे या युवकाचे नाव. वय अवघे त्र्याऐंशी वर्षांचे! तुम्ही त्यांच्या वयावर जाऊ नका. कसलाही काठीचा आधार नाही, विश्रांती नाही, कोठली व्याधी नाही की कोठला आजार नाही. तरुणपणाचा तोच ठणठणीतपणा आणि तीच उमेद.
गोवत्स बारसेला जन्मदिन (२६ ऑक्टोबर १९३२) असणारा हा देवमाणूस गाई-गुरांच्या आयुष्यात जीवनदाता बनून पुढे यावा हा महाराष्ट्रातील समाजसेवेच्या इतिहासातील किती मोठा योगायोग असावा! त्यांचा जन्म माढ्यात पण त्याच तालुक्यातील लव्हे हे त्यांचे आजोबा रामचंद शहा यांचे मूळ गाव. लव्ह्याच्या शेकडो एकर जमिनी रामचंदभाईंना पूर्वजांच्या सावकारीतून मिळाल्या होत्या. मात्र विलासभाईंचे वडील शिवलाल यांनी सगळ्या जमिनी गरीब शेतक-यांना परत केल्या! पुढे, शिवलाल शहा माढ्याला स्थायिक झाले व तेथे १९२८ सालापासून कापडविक्रीचा व्यापार करू लागले. प्रामाणिकपणा व अल्प नफा आकारून, घासाघीस न करता ‘एकच भाव’ तत्त्वाने व्यवहार सुरू ठेवला. त्यामुळे त्यांना पंचक्रोशीत ‘एकबोले’ या नावाने ओळखले जाऊ लागले. व्यवसायाची तीच प्रामाणिक परंपरा विलासभाई यांचे पुत्र विकास, विशाल व विवेक यांनी पुढे चालू ठेवली आहे.
विलासभाईंचा जन्म चार बहिणींच्या पाठीवरचा. प्रकृती नाजूक. त्यात आई वालुबाई यांचे विलासभाईंच्या वयाच्या चौदाव्या वर्षी निधन झाले. त्यांची मावशी आवलबाई गांधी यांनी आईच्या मायेने त्यांचा सांभाळ केला. त्या काळातच वडील शिवलाल यांचे समाजसेवेचे संस्कार त्यांच्यावर झाले. बालपणात विलास सर्व जातीजमातींच्या मित्रांत मिसळत. काही जैन कुटुंबांना ती बाब खटकत असायची. काही वेळा, त्या लोकांनी शिवलाल यांना विलासच्या वागण्याला आवर घालण्यास सांगितले. मात्र वडिलांनी विलास यांना कधीच बंधने आणली नाहीत. कोणाला लुबाडायाचे नाही. स्वस्ताई असो – महागाई असो, ठरलेला नफा मिळवायचा. विनाकारण गरिबांना नाडायचे नाही… अशा संस्काराच्या कितीतरी गोष्टी घरात शिकायला मिळाल्या.
पत्नी म्हणून विलासिनी त्यांच्या आयुष्यात आल्या. भाभींचे ‘विलासिनी’ हे नाव त्यांच्या आईवडिलांनी ठेवलेले; जणू त्यांची लग्नगाठ विलासभाईंशी बांधलेली होती! ‘ते नाव काही आम्ही मुळीच ठेवलेलं नाही हो. तो निव्वळ योगायोग आहे’ असे विलासभाई गंमतीने सांगतात. विलास- विलासिनी यांच्या लग्नाची बात काही औरच आहे. विलास यांना आणि त्यांच्याकडील मंडळींना लग्न जमलेल्या त्यांच्या पत्नीला टी. बी. आहे हे समजले. ब-याच जणांनी लग्न मोडण्याचा सल्ला दिला, पण भाईंनी त्या गोष्टीला विरोध केला. ते म्हणाले, “मी जर हे लग्न मोडले तर तिच्याशी पुन्हा कोण लग्न करणार?” त्यांचा ते लग्न करण्याचा निर्धार पक्का होता. पुढे, विलासभाईंचे वकील आणि वैद्यकी असा दुहेरी व्याप सांभाळणारे चुलते मोतिचंद रामचंद शहा यांनी आयुर्वेदाच्या उपचारांनी तो रोग पूर्णपणे बरा केला. विलासभाईंना पत्नीची मोठी साथ मिळाली. सोन्याच्या दागिन्यांचा सोस नाही की साड्यांची हौस नाही, भाईंच्या समाजकार्यात भाभींचा सक्रिय सहभाग राहिला. ज्येष्ठ पुत्र विकास यांनी कापड व्यवसाय जबाबदारी अंगावर घेतल्याने विलासभाईंना सामाजिक कार्यासाठी सर्व वेळ देता आला.
बालवयात समाजसेवेचे लागलेले वेड वयाबरोबर वाढत गेले. त्यातच ‘राष्ट्र सेवा दला’चे झालेले संस्कार त्यांना गप्प बसू देत नव्हते. शिकण्याचीही दांडगी हौस. पहिला मुलगा जन्मला तेव्हा ते महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षाची बहि:शाल परीक्षा उत्तीर्ण झाले. तर तिसरा मुलगा विवेक जन्मला तेव्हा इंटर परीक्षा उत्तीर्ण झाले. ते वयाच्या अडुसष्टाव्या वर्षी जर्न्यालिझम पदवीधारक झाले. संबंधित महाविद्यालयाने या ‘युवा’ विद्यार्थ्याचा गौरव केला.
विलास शहा यांच्या सामाजिक कार्याची जंत्री अशी –
* जळगावचे दाते पशुप्रेमी रतनलालजी बाफना यांनी विलासभाईंना मारुती ओम्नी गाडी भेट दिली. त्यांनी तिचा वापर स्वत:साठी न करता त्यामध्ये फिरता पशुदवाखाना सुरू करण्यास ती देऊन टाकली.
* त्या गाडीने शाकाहार व व्यसनमुक्ती अभियानाच्या माध्यमातून एक हजार एकोणचाळीस गावांमध्ये शाळा-महाविद्यालयांत ध्वनिफीत, चित्रफीत, पोस्टरप्रदर्शने, व्याख्याने, कलापथक, पत्रके आणि पुस्तककव्हर अशा विविध माध्यमांतून युवकांना मांसाहार बंद व व्यसनमुक्त होण्याचा मंत्र दिला आहे.
* फिरत्या दवाखान्याने ‘पीपल फॉर अॅनिमल वेल्फेअर’ आणि ‘डोंकीजसांचुरी’ या दोन पशुप्रेमी, करुणाभावी संस्थांच्या सहकार्याने रस्त्यांवरील निराश्रित, जखमी, आजारी, अपघातग्रस्त अशा चार हजार सहाशेशहात्तर गाढवे, कुत्रे, मांजरे आदी प्राण्यांवर उपचार करून त्यांना रोगमुक्त केले.
* विलासभाई यांना राष्ट्र व राज्य पातळीवर सत्त्याहत्तर पुरस्कार मिळाले आहेत. त्यातून मिळालेल्या लाखो रुपयांची रक्कम त्यांनी समाजातील गरजूंना वाटली आहे. त्यातूनच कार्यकर्त्यांनी व मित्रांनी ‘प्राणिमित्र विलास शिवलाल सर्वोदय ट्रस्ट’ची उभारणी केली. ‘व्हाईस फॉर व्हाईसलेस’ हे अत्यंत बोलके व कृतिशील असे त्या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.
* मरणोत्तर देहदान व नेत्रदान यांचा संकल्प सोपस्कार कायदेशीर रीत्या पूर्ण केले आहेत .
* देहदान व नेत्रदान यासाठी त्यांनी केलेल्या जागृतीमुळे ब्याण्णव व्यक्तींनी मरणोत्तर नेत्रदान केल्यामुळे एकशेचौ-याहत्तर अंधांना दृष्टीलाभ झाला तर चौ-याहत्तर व्यक्तींच्या मरणोत्तर देहदानाने डॉक्टर वैशंपायन मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मानवी शरीरशास्त्राचा अभ्यास करता आला.
* दोन हजार पाचशेचौदा गरीब रुग्णांना उपचारासाठी व शस्त्रक्रियेसाठी मदत केली आहे.
* पाचशेएकोणीस निराधार, विधवा, दलित व गरीब महिलांना आर्थिक आणि आवश्यक ते सहाय्य केले आहे.
* तीनशेएकवीस गावांत सार्वजनिक वाचनालयांची स्थापना केली आहे.
* तीन हजार चौ-याऐंशी गरीब होतकरू विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, वह्या व शैक्षणिक साहित्याचा लाभ झाला आहे.
* कर्मवीर भाऊराव पाटील प्रणीत ‘कमवा व शिका’ या योजनेद्वारा आर्थिक दुर्बल घटकांतील एकसष्ट हुशार, होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी सर्व प्रकारे सहयोग दिला. त्यांपैकी अनेकजण देशात व परदेशात उच्चपदावर कार्यरत आहेत.
* त्यांनी त्यांच्या एक्याऐंशीव्या वाढदिवशी त्यांच्या तीन मुलांनी प्रत्येकी एक्याऐंशी हजार याप्रमाणे दिलेल्या दोन लाख त्रेचाळीस हजार रुपये देणगीतून मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या कुटुंबीयांना रोख आर्थिक मदत घरपोच दिली.
* माढा येथील शासनमान्य ‘अ’ वर्गातील ‘शिवलाल रामचंद तालुका वाचनालया’ला बाबा आमटे, अण्णा हजारे, ग.प्र.प्रधान, एस.एम.जोशी, काकासाहेब गाडगीळ, मामासाहेब देवगिरीकर, नरेंद्र दाभोळकर अशा प्रतिथयश व्यक्तींनी भेट दिलेली आहे.
* ज्यांच्यामुळे समाजकार्याची प्रेरणा मिळाली आणि सुसंस्कार झाले त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांच्या ऋणातून अंशत: मुक्त होण्यासाठी बाबा आमटे व साधनाताई आमटे, ग.प्र. प्रधान, नरेंद्र दाभोळकर, मातोश्री वालुबाई शिवलाल शहा आणि मावशी श्रीमती अवलबाई वालचंद गांधी यांच्या नावाने दरवर्षी पुरस्कार देण्यासाठी ‘प्राणिमित्र विलास शिवलाल सर्वोदय ट्रस्ट’तर्फे मुदतठेवीच्या व्याजातून दहा हजार एक्याऐंशी रुपये देण्याची तरतूद विलासभाईंच्या एक्याऐंशीव्या वाढदिवसापासून करून ठेवण्यात आलेली आहे.
* विलासभाई यांनी त्यांच्या अडुसष्टाव्या वाढदिवशी केलेले मृत्यपत्र आदर्श व प्रेरणादायी आहे. गीतकार प्रवीण दवणे यांनी त्या पत्रावर ‘सकाळ’मधून लिहिलेल्या लेखाला महाराष्ट्रातून तब्बल तेराशे वाचकांनी प्रतिसाद देऊन, प्रेरणा मिळाल्याचे कळवले आहे.
* पंढरपूर येथील एड्स आधार केंद्र ‘पालवी’ या संस्थेचे संस्थापक – सल्लागार म्हणून योगदान.
विलास शहा- 9423333055
102, रवियेरा अपार्ट्मेंट, रेल्वे लाईन,प्रधान नेत्र हॉसपिटल,
सोलापूर- 413001
– योगेशकुमार भांगे