भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, वैद्यकशास्त्र अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत गेल्या दीड हजार वर्षांत अनेक शोध लागले. त्यांवर आधारित नवे तंत्रज्ञान निर्माण झाले. त्यामुळे माणसाचे जीवन सुविधापूर्ण, सुखकर आणि सुरक्षित झाले. निसर्गनियमासंबंधीच्या ज्ञानात लक्षणीय भर पडली. मानवी ज्ञानभांडार समृद्ध झाले. त्या ज्ञानावर आधारित नवे तंत्रज्ञान निर्माण झाले. त्यामुळे समाजाची प्रगती झाली. माणसाचे जीवनमान उंचावले.
भारतीय नाव या विज्ञानसंशोधकांत अभावानेच दिसते. पाच हजार वर्षांपूर्वीची वैदिक संस्कृती त्यावेळच्या अन्य संस्कृतींच्या तुलनेत अधिक प्रगत होती. असे असताना, गेल्या दीड हजार वर्षांत भारतीयांची एवढी पीछेहाट का व्हावी? भारतात बुद्धिमत्तेची उणीव होती का? मला तसे वाटत नाही. ‘हे सर्व शोध आमच्या त्रिकालज्ञ ऋषींनी लावले आहेत. ते वेदांत आहेत. पाश्चात्यांनी ते पळवले’ असे मानणे ही घोर आत्मवंचना, म्हणजे भारतीयांनी स्वत:चीच करून घेतलेली फसवणूक आहे.
बहुसंख्य भारतीयांनी ऐहिकाकडे साधारणत: इसवी सन 500 पासून पाठ फिरवलेली दिसते. त्यांना परलोकाचा ध्यास लागला. इहलोक म्हणजे हे जग अशाश्वत, क्षणभंगुर किंबहुना भासमय आहे. जे काही खरे, चिरंतन, शाश्वत, आनंदमय आहे ते तिकडे वर, परलोकी असा समज सर्वत्र पसरला. तो कथा, कीर्तने, निरूपणे यांद्वारे समाजमानसात दृढ केला गेला. त्यामुळे बुद्धिमंतांचे डोळे परलोकी लागलेले! कारण इहलोक भ्रामक. ‘ब्रह्म सत्यं, जगन्मिथ्या’। खरे ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान. बाकी सारे अज्ञान असा समज सार्वत्रिक होता आणि अजूनही तो भ्रम असल्याचे जाणवते.
इहलोकाविषयी अनास्था असली, तर निसर्गाविषयी औत्सुक्य कसे वाटणार? कुतूहल नसले तर निरीक्षणे कसली आणि कशाला करणार? निरीक्षणे नसली तर निष्कर्ष कसे काढणार? शोध कसे लागणार?
वारे का वाहतात? ऋतू का होतात? पाऊस पडण्याचे कारण काय असावे? झाडाचे फळ खाली का पडते? चंद्र खाली का पडत नाही? त्याला कोणी धरून ठेवले आहे का? – त्याच्या कला का दिसतात? पाणी उताराकडे का वाहते? असे प्रश्न पडणार नाहीत. गार्गीला तो प्रश्न उपनिषद्काळी पडला होता. त्याला एका ऋषींनी दिलेले उत्तर असे; ‘गे गार्गी, जो पाण्यात राहून त्याचे नियमन करतो त्या परमात्म्याच्या नियंत्रणामुळे पूर्ववाहिनी तसेच अन्य नद्यांचे पाणी खाली खाली वाहते.’ झाले. परब्रह्म परमात्म्याचे नाव घेतले. संशय फिटला. प्रश्न सुटला. विचार खुंटला.
खरे तर, गार्गीचा प्रश्न आणि ‘सफरचंद खाली का पडते?’ हा न्यूटनला पडलेला प्रश्न हे दोन्ही तत्त्वत: सारखेच. न्यूटनने जर त्याची शंका बिशपला विचारली असती, तर ‘आकाशातील बाप्पा सगळे घडवतो. त्याच्या आज्ञेने सफरचंद खाली पडते’ अशा अर्थाचे उत्तर त्याला मिळाले असते. ते ऐकून न्यूटन आकाशाकडे हात करून ‘हे प्रभो विभो! अगाध किती तव करणी!’ या अर्थाचे इंग्रजीत बोलला असता. मग गुरुत्वाकर्षणाचा नियम दूर राहिला असता, पण न्यूटन स्वत: कष्टत गेला. गार्गीने ऋषींच्या उत्तरावर श्रद्धा ठेवली.
आद्यशंकर, ज्ञानेश्वर, स्वामी विवेकानंद असे अलौकिक बुद्धिमंत तत्वज्ञान आणि अध्यात्माच्या मागे न लागता, त्यांनी भौतिकात लक्ष घातले असते, तर काय झाले असते याची कल्पना करावी! बरे, परब्रह्माच्या मागे लागून उपलब्धी काय? विश्वाचे काही वास्तव ज्ञान झाले का? मानवाची काही प्रगती झाली का? लोकांचे जीवनमान सुधारले का? सुख-सुविधा वाढल्या का? कष्ट कमी झाले का? तर तसे काही घडलेले दिसत नाही. पांडवकालीन स्त्रिया दळणासाठी जे जाते वापरत त्याच प्रकारचे जाते पेशवेकालीन स्त्रिया वापरत होत्या आणि सतरा-अठरा-एकोणीस व विसाव्या शतकारंभापर्यंत तीच गत नांगराचीही होती. सुधारणा नाहीच. कष्ट कमी कसे होणार?
म्हणजे काल्पनिक परमात्म्याच्या नादाने अनेक प्रज्ञावंतांची बुद्धी, वेळ आणि श्रम वाया गेले. त्यामुळे देशाच्या प्रगतीला खीळ बसली. भारतात नाव घेण्याजोगे वैज्ञानिक, संशोधक झाले नाहीत. शेकडो संत आणि कवी निर्माण झाले. त्यांनी हजारो अभंग, चमत्कारांनी भरलेले शेकडो ग्रंथ लिहिले. व्रतकथा, महात्म्यें, स्तोत्रे यांचे उदंड पीक आले. पण ऐहिक प्रगती शून्य. कारण विज्ञानाकडे पूर्ण दुर्लक्ष झाले. विज्ञानक्षेत्रात भारत मागे पडण्याचे प्रमुख कारण म्हणजे अध्यात्माचे, मोक्षप्राप्तीचे, जन्म-मरणाचे काल्पनिक फेरे चुकवण्याचे सार्वत्रिक वेड. अजूनही भारतीय माणसे त्या आध्यात्मिक खुळातून बाहेर पडू पाहत नाहीत.
– यशवंत वालावलकर
ynwala@gmail.com
सुंदर लेखन.
विज्ञानाधिष्ठित…
सुंदर लेखन.
विज्ञानाधिष्ठित जीवनप्रणालीची आवश्यकता आहे.
-अरविंद म्हेत्रे
Comments are closed.