वर्षावास असा एक संस्कार बौद्ध धम्मात, भगवान बुद्धाच्या धम्मशासनात आहे. तो करण्यामागे प्रयोजन आहे ते समानतेचे जीवन जगण्याचे. बुद्धांचे जीवन चारिकाप्रधान होते. गौतम बुद्ध एका गावाहून दुसऱ्या गावास प्रवास करत. तो प्रवास पायी असे. त्या प्रवासात त्यांना सरपटणारे प्राणी साप, विंचू; कधी रानटी श्वापदे तर पावसाळ्यात नद्यांना येणारे पूर अशा विविध अडचणींना तोंड द्यावे लागत असे. म्हणून भगवान बुद्धांनी बौद्ध भिक्खूंनी पावसाळ्यातील चार महिन्यांकरता प्रवास टाळून एका जागी स्थिर राहवे यासाठी नियम केले. विहार बांधण्याची कल्पना त्यातून निर्माण झाली. त्यासाठी पावसाळ्याचे चार महिने म्हणजे आषाढ महिन्याच्या पौर्णिमेपासून ते कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत विहारात राहणे, तेथे धार्मिक दैनंदिनी – धम्मलाभ, साधना, विपश्यना, धम्मदेसना (बुद्धांचे तत्वज्ञान) पार पाडणे अपेक्षिले. अशा प्रकारे त्या काळात (म्हणजेच पावसाळ्याच्या दिवसांत) विहारात राहण्याच्या कारणामुळे त्या संस्काराचे नाव ‘वर्षावास’ असे पडले.
भारतात एक वेळ अशी होती, की वर्षावासाचे आयोजन सर्वत्र करण्यात येत असे. त्यावेळी भिख्खू संघ विहारात थांबायचे तर गृहस्थ लोक वर्षावास करणाऱ्या भिक्खू संघाची सेवा-शुश्रूषा आणि त्यांना लागणाऱ्या चीजवस्तू यांची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्नशील असत. उपासक भिक्खूंपासून श्रृतज्ञान अर्जित करण्यासाठी विहाराकडे धाव घेत. तशा वेळी, ते बौद्ध उपासक भिक्खूंकरता भोजनाची व्यवस्था आनंदाने करत. ती प्रथा भारतवर्षामध्ये सर्वत्र आढळून येई.
वर्षावास |
बौद्ध देशांमध्ये वर्षावासाच्या वेळी उत्सवपूर्ण वातावरण पाहण्यास मिळते. उपासक-उपासिका त्यांच्या परिवारासह साजशृंगार करून ढोल-नगाऱ्यांसहित भिक्खूंना दान देण्याच्या वस्तूंसोबत हर्षोल्हासात विहारात जाताना दिसतात. त्याचे कारण असे, की तेथील अधिकाधिक भिक्खू विद्वान शीलवान आणि लोककल्याणात पारंगत असत. भगवान बुद्धाच्या धम्म शासनात भिक्खूंसाठी वर्षावास करणे अनिवार्य ठरवले आहे. त्याच्या पूर्ततेसाठी भिक्खूंना कोणाही व्यक्तीच्या आमंत्रणावरून दुसऱ्या विहारात जाऊन अथवा त्यांच्या त्यांच्या विहारात राहून वर्षावास करणे आवश्यक आहे. त्या दरम्यान, भिक्खूंसाठी तीन महिन्यांपर्यंत भोजन, औषधी इत्यादींची व्यवस्था विहारातील उपासक आणि उपासिका यांच्याद्वारे केली जाते. वर्षावासाचे अधिष्ठान करण्याची मुख्य कारणे –
1. वर्षा ऋतूत नदी, नाले पाण्याने भरतातच. त्यामुळे भिक्खूंना प्रवास करण्यात विविध समस्यांचा सामना करावा लागतो. त्या ऋतूत प्रवास करताना घातक अशा जीवजंतूंचा त्रास उद्भवतो. त्यामुळे वर्षा ऋतूच्या चार महिन्यांच्या काळात भिक्खूंनी विहारात वास्तव्य करणे अनिवार्य आहे.
2. वर्षा ऋतूत वातावरण शांत असते. त्या दिवसांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीची अथवा मजुरीची कामे करणे शक्य नसते. त्यामुळे उपासकांजवळही फावला वेळ भरपूर असतो. त्या दिवसांत भिक्खूंना सुत पठन करणे, नवीन सुत कंठस्थ करणे आणि सोबत उपासकालाही त्यांचा अभ्यास करण्यास लावणे या गोष्टी घडतात. त्या काळी लोक ऐकूनच (श्रवण) ज्ञान प्राप्त करत. तशा ज्ञानप्राप्तीला ‘श्रृतज्ञान’ म्हणतात. भिक्खूंनी कंठस्थ केलेले ज्ञान काही वर्षांनी, पुढे लिपीबद्ध केले आणि त्यातून ‘त्रिपिटक’ साहित्याची निर्मिती झाली.
ज्या भिक्खूंना त्रिपिटक कंठस्थ असायचा त्यांना कंठी म्हणून ओळखले जाई. ते कंठी घालत म्हणजे रुद्राक्ष त्यांच्या कंठावर स्थित असे. त्यात अंधविश्वास नव्हता. तो कालांतराने ‘रुद्राक्ष’ माळेवरून निर्माण झाला.
3. वर्षावासाचे नियम बुद्धकालीन आहेत. भिक्खूद्वारे वर्षावासाच्या संस्काराचे पालन करणे श्रमण संस्कृतीमध्ये पवित्र मानले जाते. त्यांच्या समापनाप्रीत्यर्थ त्याला वर्षावास समापन उत्सव या नावाने ओळखले जाते.
भिक्खूंद्वारे वर्षावासाचे आयोजन तीन महिने उत्सवाप्रमाणे करण्यात येते.
बुद्धांनी त्यांच्या ऐशी वर्षांच्या आयुष्यात बुद्धत्वप्राप्तीनंतर सेहेचाळीस वर्षावास पूर्ण केले. वर्षावास करणे हे श्रमण संस्कृतीचे अभिन्न अंग आहे. बौद्ध भिक्खू त्याचे पालन करतात. ‘विनयपिटका’नुसार कोणत्याही व्यक्तीला भिक्खुपद प्राप्त होण्यासाठी दोन अवस्थांमधून जावे लागते. प्रथम अवस्था ‘प्रवज्या’ म्हणजे गृहत्याग केल्यानंतर भिक्खू बनण्याचा संस्कार आणि दुसरी अवस्था ‘उपसंपदा’. उपसंपन्न झाल्यावरच एखादा भिक्खू भिक्खुपदाला पक्का प्राप्त होतो. वर्षावासात उपासकांना विहारात आल्यावर धम्माची शिकवण दिली जाते व धम्म पुढे नेण्याची शिकवण दिली जाते. त्यांची मने चांगले संस्कार करून निकोप घडवली जातात.
भगवान बुद्धांच्या आयुष्यात विविध वृक्षांचे जसे महत्त्व आहे. तसेच ते वर्षातील बारा पौर्णिमांनाही आहे. त्यातही वर्षावासातील चार पवित्र पौर्णिमांना अधिक महत्त्व आहे. वर्षावासातील त्या चार पौर्णिमा म्हणजे 1. आषाढ पौर्णिमा, 2. श्रावण पौर्णिमा, 3. भाद्रपद पौर्णिमा आणि 4. अश्विन पौर्णिमा.
1. आषाढ पौर्णिमा : या पौर्णिमेचे विशेष महत्त्व म्हणजे त्या पौर्णिमेला महामायेला गर्भधारणा झाली होती. त्याच पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमांनी गृहत्याग केला होता. त्या पौर्णिमेलाच भगवान बुद्धांनी ‘धम्मचक्क पवतनं’ सुत्ताचा प्रथम उपदेश केला. त्याच पौर्णिमेला बुद्धांनी वर्षावासाचे अधिष्ठान करून वर्षावासाचा शुभारंभ केला होता.
2. श्रावण पौर्णिमा: या दिवशी भगवान बुद्धांनी अंगुलीमालाला प्रव्रज्या दिली. पाचशे भिक्खूंची प्रथम संगीती राजगृहाच्या सप्तपर्णी गुहेमध्ये संपन्न झाली.
3. भाद्रपद पौर्णिमा: या दिवशी राजगीरमध्ये राजा अजातशत्रूच्या देखरेखीखाली संगीती संपन्न झाली. त्यामध्ये पाचशे अर्हत भिक्खूंचा सहभाग होता. त्यामुळे त्याला पंचशतिका नावाने ओळखले जाते.
4. अश्विन पौर्णिमा: बुद्धत्वप्राप्तीच्या सोळा वर्षांनंतर बुद्धांनी महामायेच्या पावन स्मृतीमध्ये धम्मसेनापती सारीपुत्र याला अभिधम्माचा उपदेश केला होता. तो दिवस तीन महिन्यांच्या वर्षावासाचा समापन दिवस होय.
त्याच दिवशी उपासक व उपासिका त्यांच्या त्यांच्या विहारात धम्मदेसना प्राप्त करतात. वर्षावासातील पौर्णिमेमध्ये मानवी मनावर चांगले संस्कार घडवले जातात.
टीप – सुत पठन म्हणजे गौतम बुद्धांनी जी सुत्र (उपदेश) सांगितली त्यांचे वाचन, मनन करणे.
– सुनीता घोडगे 7841039206
(रमाई, ऑक्टोबर 2019 वरुन उद्धृत, संपादित-संस्कारित)
टेलिग्राम |
व्हॉट्सअॅप |
फेसबुक |
ट्विटर |
———————————————————————————————-——————————————————–
लेख माहितीपर आहे.मुंबई विद्यापीठ,कालिना येथील तत्वज्ञान विभागातर्फे बुद्ध विपश्यना व बुद्ध जीवन आणि तत्वज्ञान ह्यावर आधारित week end course चालू आहे.त्याचा अभ्यासकांनी जरूर फायदा घ्यावा.
नर्मदा परिक्रमा करणारे देखील वर्षा काळात ४ महिने एकच ठिकाणी राहतात.चातुर्मास संपला की परिक्रमा परत सुरू करतात.त्याची आठवण आली.