लाख हे गाव महाराष्ट्राच्या हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ या तालुक्यात आहे. तो मराठवाड्यातील भाग. गाव हिंगोलीपासून अकरा किलोमीटरवर आहे. गावात राम मंदिर, हनुमान मंदिर, गणपती मंदिर, विठ्ठल मंदिर, दत्तात्रय मंदिर अशी मंदिरे आहेत. लाख गावाची लोकसंख्या दोन हजार तीनशेचौतीस आहे. गावात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. त्याचप्रमाणे दुग्धोत्पादन, कुक्कुटपालन असे जोडव्यवसाय केले जातात. गावात येण्यासाठी एसटीची सुविधा आहे. एसटी हिंगोलीहून गावात येते. नावलगोहन आणि धामणी ही रेल्वेस्टेशने गावापासून जवळ आहेत. धामणी हे रेल्वेस्टेशन गावापासून तीन किलोमीटरवर आहे.
लाख गावातून मधुमती ही हंगामी नदी वाहते. ती पावसाळ्यानंतर महिना-दोन महिने असते; नंतर कोरडी पडते. गावात विहिरी व बोअरवेल यांच्यामार्फत पाणीपुरवठा होतो. बोअर साडेतीनशे-चारशे फुटांवर गेले आहेत. गावपरिसरात पाऊस चांगला पडतो. गावात बाजार भरत नाही. मंगळवारी हिंगोली या जिल्ह्याच्या ठिकाणी बाजार भरतो. गावात शिक्षणाची बारावीपर्यंत सोय आहे. तसेच, गावात मुक्त विद्यापीठ आहे. मुक्त विद्यापीठ ही कल्पना दहावी-बारावी नापास मुलांना मदत म्हणून निर्माण झाली, परंतु ती लवकरच बंद पडली, कारण त्या मुलांच्या शिक्षणाची अन्य सोय झाली. लाख या गावाचा पिनकोड 431702 आणि पोस्टाचे मुख्य कार्यालय कालामनुरी येथे आहे. गावात सर्व उत्सव साजरे केले जातात. गावात ‘एम.एस. लोंढे मधुमती विद्यालय’ ही संस्था आहे. या गावाच्या चार-पाच किलोमीटरच्या परिसरात मेठा, माळसगाव, देवाळा, नवखा आणि पांगरा ही गावे आहेत. औंढा नागनाथ हे बारा ज्योतिर्लिगांपैकी तीर्थस्थान गावापासून सतरा किलोमीटरवर आहे. गावाच्या आजूबाजूला पूर्णा, रिसोड, वाशिम, परभणी ही शहरे येतात.
माहिती स्रोत
– संदिप लोंढे 9823693004
– समिता कदम
छान लिहल पण काही माहिती…
छान लिहल पण काही माहिती चुकीची आहे.
Comments are closed.