Home वैभव इतिहास लसूण (Garlic)

लसूण (Garlic)

0
_lasun

कांदा आणि लसूण हे मराठी माणसाच्या जेवणातील दोन अविभाज्य घटक आहेत. लसणाचा ठेचा हा तर बहात्तर रोगांवर इलाज आहे. पुलंनी वर्णन केले आहे, ‘लसणाचा ठेचा ठेवलेल्या भांड्यावरचे झाकण निघाले, की ओसरीवर वासाची वर्दी गेली पाहिजे, की धुवा हातपाय.’ लसूण ही चवीलाच छान लागते असे नव्हे तर ती औषधी वनस्पतीही आहे. तिचा प्रभावी उपयोग हृदयरोगासाठी होऊ शकतो.

लसणामध्ये मधूर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय या सहा रसांपकी फक्त लवण रस नसतो. खरे म्हणजे लवण रस कोठल्याच वनस्पतीत नसतो. मीठ म्हणजे लवण.  सर्व प्राण्यांना मीठ आवश्यक असते- अगदी जंगलातील प्राण्यांनाही. शाकाहारी प्राणी रानातील ज्या जमिनीत क्षाराचे प्रमाण जास्त असते अशा ठिकाणची माती चाटतात आणि लवण रस मिळवतात. अशा क्षारपड भागाला चाटण किंवा सॉल्ट लिक असे म्हणतात. हत्ती, गवा, हरीण, सांबर अशा शाकाहारी प्राण्यांच्या चाटणाच्या जागा ठरलेल्या असतात. वन विभागातर्फे काही अभयारण्यांत ठिकठिकाणी मिठाचे ढीग रचलेले असतात, ते त्याचसाठी. मांसाहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांना मारून खातात, तेव्हा त्यांना त्या प्राण्यांच्या शरीरातील क्षारही मिळतात. तर सहा रसांपकी एक रस कमी म्हणजे उणा म्हणून लसणाला संस्कृतमध्ये रसोन असे म्हणतात (जसे एक उणा वीस म्हणजे एकोणवीस, तसेच). मराठीत येताना या ‘र’चा ‘ल’ झाला. ते स्वाभाविकही असते. पाहा, लहान मुले ‘राम राम’च्या ऐवजी ‘लाम लाम’ असे बोबडे बोलतात. अर्थात त्याचा अर्थ मराठी माणसे बोबडे बोलतात असा नाही, तर ‘र’ आणि ‘ल’ हे सवर्ण आहेत.  पाणिनीच्या लघुसिद्धांत कौमुदीच्या टीकेमध्ये ऋ ल्रृयोर्मिथा सावर्ण्य वाच्यम् असे सूत्र आहे. म्हणजेच ऋ आणि ल्रृ हे सवर्ण आहेत. व्यवहारात ऋ आणि ल्रृचे शब्द फारसे आढळत नाहीत, म्हणून र आणि ल हे सवर्ण मानले आहेत. संस्कृतमध्येदेखील रोम आणि लोम, रोहित आणि लोहित असे समानार्थी शब्द आहेत. अशा तऱ्हेने रसोनचा लसूण झाला.

– उमेश करंबेळकर 9822390810
umeshkarambelkar@yahoo.co.in

About Post Author

Previous articleव्हीकेराजवाडे.कॉम (vkrajwade.com)
Next articleभाषांतर मासिक (Bhashantar Masik)
डॉ. उमेश करंबेळकर हे साता-याचे आहेत. ते तेथील मोतीचौकात असलेल्‍या त्‍यांच्‍या दवाखान्यात वैद्यकी करतात. त्‍यांच्‍याकडे 'राजहंस' प्रकाशनाच्‍या सातारा शाखेची जबाबदारी आहे. ते स्‍वतः लेखक आहेत. त्‍यांनी 'ओळख पक्षीशास्‍त्रा'ची हे पुस्‍तक लिहिले आहे. त्‍यांना झाडे लावण्‍याची आवड आहे. ते वैयक्तिक पातळीवर वृक्षरोपणाचे काम करतात. त्‍यांनी काही काळ बर्ड फोटोग्राफीही केली. त्‍यांनी काढलेले काही फोटो कविता महाजन यांच्‍या 'कुहू' या पहिल्‍या मल्टिमिडीया पुस्‍तकामध्‍ये आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9822390810

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version