रावणाच्या पुतळ्याचे दहन दसऱ्याला करावे की नाही याबाबत, रावणचरित्रावर आधारित गाजत असलेली ‘रावण – राजा राक्षसांचा’ ही कादंबरी लिहिणारे शरद तांदळे यांचे म्हणणे असे आहे, की “हजारो वर्षांपूर्वीच्या गोष्टीचा संदर्भ देऊन रावणाचा पुतळा जाळणे हे पर्यावरणाच्या; तसेच, भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने अनुचित आहे. मेलेल्या व्यक्तीचा पुतळा जाळणे ही विकृती आहे. व्यक्तीला कोणी शत्रू असेल तरीही तो मेल्यावर वाईट वाटते. ती शत्रुता राम-रावण यांच्यातील होती आणि रामाने रावणाला शेवटच्या क्षणी माफही केले होते! रावण हा विद्वान पंडित असल्यामुळे, रामाने लक्ष्मणाला रावणाकडे जाऊन काही उपदेश प्राप्त करण्यासदेखील सुचवले होते. रावणदहनाचा मागील काही वर्षांपासून अतिरेक होत आहे. भारत देश बुद्धाच्या, गांधीजींच्या शांततेच्या मार्गाने चालणारा आहे. अशा ठिकाणी या प्रकारची हिंसा घडते हे चुकीचे आहे. तसेच, रावणाची पूजा करणे हेही चुकीचे आहे. रावण हा रामायणातील खलनायक नसून नायक होता.”
आदिवासींचे ‘रावणायन’ नावाचे पुराण आहे. आदिवासींमध्ये दरवर्षी रावण व मेघनाथ यांची मिरवणूक काढून मोठ्या प्रमाणात पूजा केली जाते. त्यालाच ‘रावेन महा गोंगो’ म्हणजेच ‘रावणाची महापूजा’ असे म्हटले आहे. रावण हे भारतातील काही आदिवासी जमातींचे दैवत आहे. देशात रावणाची मंदिरे काही ठिकाणी आहेत. आंध्र प्रदेशमधील काकिनाडा येथे रावणाचे मंदिर असून मंदिराच्या दरवाज्यामध्येच मोठा रावण उभारलेला आहे. उत्तरप्रदेशमधील कानपूर शहरामध्येदेखील रावणाचे मंदिर आहे. त्या मंदिराचा दरवाजा फक्त नवरात्रीमध्ये उघडा असतो; त्यानंतर, पूर्ण वर्षभर तो बंद असतो. रावणभक्त रावणदर्शनासाठी नवरात्रीमध्ये तेथे येतात.
रावणाचे मंदिर हिमाचल प्रदेशमध्येही आहे, ते बैजनाथ मंदिर या नावाने ओळखले जाते. रावणाने त्याला दहा तोंडे मागण्यासाठी महादेवाला प्रसन्न तेथे करून घेतल्याचे मानले जाते. रावण हा महादेवाचा भक्त आहे. त्यामुळे त्या मंदिरात त्याचीही पूजा केली जाते.
मध्य प्रदेशात रावणगाव आहे. तेथेही रावणदेवतेचे मंदिर आहे. रावण कान्यकुब्ज ब्राह्मण असल्याचे मानले जाते. तेथील गावकरी त्यांना रावणाचे वंशज मानतात. रावणाचे मंदिर मध्य प्रदेशातील इंदूर शहरामध्येही आहे. त्या मंदिरामध्ये रावणाची, अन्य देवी-देवतांच्या; तसेच, रामायण काळातील मूर्तीही आहेत. त्याच राज्यात मंदसौर येथे रावणाचे मंदिर असून तेथे रावणाचा बावन्न फूट उंच पुतळा आहे.
लोक रावणाची पूजा का करतात? तर रावण हा एक पराक्रमी राजा होता. त्याने राज्यविस्तारासाठी अनेक राज्यांवर स्वारी केली व इंद्राला अंकित करून अनेक राजांचे राज्य हस्तगत केले, त्याकरता त्यांच्याशी युद्ध केले. भारतात प्राचीन काळी दक्ष आणि रक्ष या दोन संस्कृती अस्तित्वात होत्या. देवांची ती दक्ष आणि राक्षसांची ती रक्ष. दक्षसंस्कृती ही दैवकेंद्रित होती तर रक्षसंस्कृती ही मानवकेंद्रित होती- पुरोगामी विचारांची व स्वतःमध्ये कालानुरूप बदल करवून घेणारी, अशी. त्याच रक्षसंस्कृतीचा पुरस्कर्ता प्रणेता रावण. रावण हा मानवी मूल्याधारित संस्कृतीचा आग्रही होता.
रावण हा भगवान शंकराचा विद्वान भक्त होता. रावण वेदांचा जाणकार होता. तो सामवेदामध्ये निपुण होता. रावण वेद आत्मसात करण्याचे ‘पद-पथ’ नावाचे जे तंत्र होते त्यात पारंगत होता. रावणाने ‘शिवतांडव’, ‘युद्धीषा तंत्र’ आणि ‘प्रकुठा कामधेनु’ यांसारख्या ग्रंथांची रचना केली आहे. रावणाने आयुर्वेदावर ‘अर्क प्रकाश’ नावाचा ग्रंथ लिहिला होता. रावणाला शक्तिवर्धकाची मात्रा मोठ्या प्रमाणावर असलेला भात उत्पादित करण्याचे तंत्र अवगत होते. रावण कवीदेखील होता- ‘शिवतांडव’ ही काव्यरचना रावणाच्याच हस्ते निर्माण झाली. शंकर त्यांच्यावर रावणाने रचलेल्या कविता पाहून प्रसन्न झाले आणि त्यांनी रावणाला वर दिले होते. रावणाला संगीताची आवड होती. त्याने शास्त्रोक्त पद्धतीने संगीत शिकून घेऊन संगीतकलेत नावलौकिक मिळवला होता. रावणाला ‘रुद्रवीणा’ वाजवण्यात हरवणे जवळपास अशक्य होते. रावणाने ‘रावणहथा’ हे वाद्य बनवले होते. ते व्हॉयोलिनप्रमाणे होते. ते वाद्य राजस्थानच्या काही भागांत वाजवले जाते. रावणाने त्याची पत्नी मंदोदरी हिच्या सांगण्यावरून स्त्रीरोगविज्ञान आणि बालचिकित्सा यांवर आधारित ग्रंथ लिहिला. त्यामध्ये शंभरपेक्षा जास्त आजारांचे विश्लेषण केले आहे आणि उपाय सांगितले आहेत.
रावण दहा तोंडांचा होता असे मानले जाते. पण रावण जेव्हा लहान होता तेव्हा त्याच्या आईने त्याच्या गळ्यात नऊ मोती असलेला हार घातला होता. त्या प्रत्येक मोत्यामध्ये रावणाची छबी दिसायची. रावण इतका ज्ञानी होता, की त्याच्या मेंदूमध्ये दहा मेंदूंचे ज्ञान आहे असे म्हटले जात असे. म्हणूनच रावणाला पुराणात ‘दशानन’ असे म्हटले गेले.
असे सगळे असताना रावणाने सीतेचे हरण करून अयोध्यावासीयांचा रोष का ओढवून घेतला? तसे बघितले तर रावणावर सीतेच्या अपहरणाशिवाय दुसरा कोठलाही आरोप नाही. अपहरणामागील कहाणीदेखील वेगळी आहे. सीताहरणाचे कारण व कथा ही अशी आहे – राम वनवासात असताना लक्ष्मणावर रोज फळे आणण्याची जबाबदारी होती. तो शुर्पणखा ज्या भागाची लोकपाल होती तेथून फळे आणत असे. शुर्पणखा लक्ष्मणाकडे आकर्षित झाली. तिने लक्ष्मणाला लग्नासाठी मागणी घातली. लक्ष्मण रूपवान अशा शुर्पणखेचा मोह आवरू शकला नाही. परंतु, तो विवाहित असल्याने तो शुर्पणखेला होकारही देऊ शकत नव्हता. त्यावर उत्तर म्हणून त्याने शुर्पणखेला रामाला भेटण्यास सांगितले. रामास त्याच्या विवाहित भावाला विधवा रक्ष राजकन्येने लग्नासाठी मागणी घातली हे रुचले नाही. त्यावरून रामाचा वाद शुर्पणखेशी झाला. वादाअंती, रामाने त्याची परवानगी शुर्पणखेच्या पाठीवर लिहून देऊन तिला लक्ष्मणाकडे पाठवले. तेव्हा लक्ष्मणाने रामाने दिलेल्या आज्ञेप्रमाणे शुर्पणखेचे नाक व कान कापले! ती तशीच रावणाकडे गेली. रावणाला त्याच्या बहिणीचा अपमान सहन झाला नाही. त्याने सीतेचे हरण शुर्पणखेच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी केले. रावणाने सीतेचे हरण करूनही सीतेला राजमहालात न ठेवता अशोक वाटिकेत ठेवले; तिला कसलाही त्रास होऊ नये म्हणून अनेक दासी तिच्या सेवेत तैनात होत्या. तसेच, रावणाने सीतेचे शीलभंग करण्याचाही प्रयत्न केला नाही. अशा या यथार्थवादी रावणाचे दरवर्षी होणारे दहन कितपत योग्य आहे? असा सवाल विचारी जन करतात.
प्रत्येकात चांगले व वाईट, दोन्ही गुण असतात. मग रावणाचा हा एक दोष बघून त्याचे दहन दरवर्षी का करायचे?
– नितेश शिंदे, niteshshinde4u@gmail.com