– दिनकर गांगल
मान्सूनचा पाऊस हे भारतीय उपखंडाचे वैशिष्ट्य आहे. चार महिन्यांचा पावसाळा हा स्वतंत्र ऋतुकाळ म्हणून जगात अन्यत्र कुठेही मानला जात नाही.
भारतातील समशीतोष्ण हवा येथे बाराही महिने माणसांना सुखाने राहू देते. भारताच्या उत्तर भागात कडाक्याच्या थंडीमुळे राहण्यास एखादा महिना अवघड असतो. एरवी वर्षभर भारतात उघड्या अंगाने जगणे व बिनछपराचे राहणे सहज शक्य होते. (गेल्या काही वर्षांत उन्हाळ्याचा ताप असह्य होतो. त्याची कारणे वेगळी आहेत… ग्लोबल वार्मिंग वगैरे वगैरे). भारतात हजारो वर्षे मानवी संस्कृती नांदली. त्याचे प्रमुख कारण भौगोलिक व वातावरणीय आहे. त्यातील मान्सूनचा प्रभाव फार मोठा आहे.
परंतु या लेखाचा रोख वेगळा आहे. ब-याच वर्षांनंतर, यावर्षी जुलैमध्ये जवळ-जवळ महिनाभर सतत पाऊस आहे. पावसाचे हे स्वरूप पूर्वी जेष्ठ-आषाढात असायचे, परंतु गेल्या दशका-दोन दशकांत सलग महिना-दीड महिना पावसाळी वातावरण असल्याचे स्मरत नाही. पाऊस धुमधडाक्याने पडत जातो. सरासरी गाठून टाकतो. जलाशय कमीजास्त भरतात. वर्ष निभावून जाते. २००५ सालच्या २६ जुलैला एकाच दिवशी मुंबईसह सर्व कोकणपट्टीत अतिवृष्टी झाली. तो मान्सूनच्या वाढत्या अनियमिततेचा कळस म्हणावा लागेल.
योगायोगाने, गेल्या महिन्या-दीड महिन्यांत, नाशिकचा कसारा घाट, पुण्याचा खंडाळा घाट आणि रामदासांच्या घळीनजिकचा भोर घाट या तिन्ही घाटमार्गांनी देशावर जाणे झाले; एवढेच काय, रोपवेने रायगडावरदेखील भरधुक्याढगांतली फेरी झाली. सर्व प्रवास, भटकंती विलक्षण आनंददायी होती. हवेतील आल्हाद उल्हास वाढवणारा होता. परंतु एक गोष्ट सतत खटकत होती. ती म्हणजे रस्त्यात सर्वत्र चिखल, गलिच्छपणा, प्लॅस्टिकच्या छोट्या-मोठया पिशव्यांचे ढीग-त्यामुंळे वाढलेली दलदल… घाणीचे किती वर्णन करायचे? त्यापेक्षा पावसाळी हवेतील सुखद भटकंती, घाटाघाटांत सर्वत्र दिसणारे धबधबे, त्या पांढ-या पाण्याचा, फेसाचा खळाळ अशा चांगल्या स्मृती जागवत राहणे श्रेयस्कर असेही वाटे. पण शेवटी ते घाणजीवन आपले, आपल्या लोकांचे आहे ही वास्तव जाणीव त्रस्त करत होती.
का असे आपण घाणेरडे आहोत? रायगडावर जेव्हा आम्ही गेलो तेव्हा रोपवेचा आरंभ होतो तिथपर्यंत पोचणे म्हणजे दिव्य होते! तीच गोष्ट मुतारीची. तेथे ओकारी यायचीच बाकी राहिली होती. पाच-सात कामकरी मंडळी तिथे होती. त्यांची आदब चांगली होती, पण बोलण्यातले ते अगत्य सोडले तर ते सगळे कॅंटिनच्या खुर्च्यांवर मांड्या ठोकून चकाट्या पिटत होते. जणू गेले महिनाभर त्यांचा हाच उद्योग चालू असावा! वर गडावर गेलो तर तेथे पावसाची झड, वा-याचे झोत विलक्षण जोराचे. त्यामुळे कॅंटिन बंद. तथापि, एका खोपटवजा खोलीतून एक माणूस गरम चहा, झुणकाभाकर (किमान ऑर्डर चौघांची) सर्व्ह करत होता. आजुबाजूचे खेडूतही गरम कांदा-भजी, झुणकाभाकर यांच्या ऑर्डरी घेत होते. त्या वातावरणात, तशा उभ्या-उभ्या खाण्यातही मानली तर गंमत आहेच. परंतु ही सर्व सोय छान नेटकेपणाने बसण्याच्या चांगल्या सुव्यवस्थित जागा करून, त्यासाठी आवश्यक आडोसा उभा करून योजता येणार नाही का? रामदासांच्या घळीतील धबधबा ही तर अपूर्व गोष्ट आहे. त्याची राखण वृध्द सेवेकरी करत असतात. ते स्वयंस्फूर्तीने स्वयंसेवा म्हणून तेथे महिन्या-महिन्याच्या बोलीने आलेले असतात. परंतु त्यांना येणा-या पाहुण्यांविषयी जराही औत्सुक्य जाणवले नाही. धबधब्यापर्यंत पोचण्यासाठी आरंभी घाणीतून आणि नंतर पावसाच्या चिकचिकीतून जावे लागते. नायग-याची आठवण यावी असा धबधबा पाऊसकाळात तेथे असतो. रामदासांनी सज्जनगडावरून येऊन ही जागा कशी शोधली असेल याचा अचंबा वाटतो. रामदासांच्या तत्त्वज्ञानातील ऐहिकता आणि पारमार्थिकता विलक्षण विलोभनीय आहे. परंतु त्यांच्या दासानुदासांनी त्यांचे पारमार्थिक रूप जपले आणि ऐहिकतेकडे पाठ फिरवली. अन्यथा, रामदासांना ज्या त-हेचा पाठिंबा येथील सुस्थित समाजात आहे, तो पाहता ‘रामदासांची घळ’ हे एक आदर्श पर्यटन स्थळ होऊन गेले असते. खुद्द सज्जनगडावरील घाण व गैरसोयी याहून वेगळ्या नाहीत.
पावसाळ्यात घाण, गलिच्छपणा, चिकचिक, दलदल हे सारे असणारच आणि त्यामुळे ब-याच गैरसोयी सहन कराव्या लागणे हे स्वाभाविक आहे, हे आपण गृहित धरतो. पाऊस आहे म्हणून काम झाले नाही किंवा प्रवास केला नाही ही सबब तर नित्याचीच. परंतु सध्याच्या विज्ञान-तंत्रज्ञान युगात या गैरसोयींवर मात करणे शक्य झाले पाहिजे; निदान तसा प्रयत्न तर केला गेला पाहिजे? क्रिकेटच्या मैदानावर साचलेले पाणी किती झपाट्याने, आधुनिक साधने वापरून काढून टाकले जाते; ती तत्परता आपल्या दैनंदिन जीवनात का असू नये?
विज्ञान-तंत्रज्ञानाच्या उपयोगाबाबतीत आपण पाश्चात्यांचे अंधानुकरण चालू ठेवले आहे. त्यामुळे येथील परिस्थितीला अनुरूप साधन-सुविधा आपण बनवू शकलो नाही. साधा रोज केर काढण्याचा झाडू जो आपल्याकडे उपयोगी ठरेल असा आपल्याला बनवता आलेला नाही.
पाश्चात्य देशांतला एक मोठा दाखला नमूद करावासा वाटतो. उत्तर अमेरिकेत व युरोपात थंडीच्या काळात जी हिमवादळे होत त्यावेळी विजेच्या हिटिंग यंत्रणा कोलमडून पडत कारण जलविद्युत निर्मितीचे कारखाने थंडीत बर्फ झाल्यामुळे निकामी होत. त्या दोन्ही प्रदेशांत गॅस आधारित विद्युतनिर्मिती व वितरण यंत्रणा सर्वत्र लागू केल्या गेल्या. त्यामुळे कितीही मोठे वादळ झाले तरी घराघरांतील वीजपुरवठा अबाधित राहतो आणि दैनंदिन जीवन नित्याचे होते. ही सुविधा गेल्या वीस-पंचवीस वर्षांत तंत्रज्ञानाच्या परिणामकारक वापरामुळे शक्य झाली. आपल्याकडे, विशेषत: किनारी प्रदेशात पावसाळी दिवसात जीवन निकामी होते व तो निकामीपणाच आपण गोंजारत बसतो. त्याऐवजी प्रतिकुलतेवर मात करणे शक्य आहे, मानवाने ते शक्य केले आहे ही जाणीव महत्त्वाची. त्यासाठी समाजात जिद्द व जिंकण्याची इच्छा असणे महत्त्वाचे. इंदिरा संतांच्या ‘नको नको रे पावसा’ या कवितेतील लडिवाळपणा मनाला मोह घालतो. परंतु त्यातच रमून राहणे आणि जीवन दुष्कर करणे योग्य नव्हे.
जूनमध्ये पाऊस सुरू होतो तेव्हा त्याचा लगेच परिणाम जाणवत नाही. तथापि, जुलैमध्ये विशेषत: मुंबई व कोकण प्रदेशात एक कोंदटसा थर सर्व वस्तुमात्रावर; एवढेच काय, शरीरा-शरीरावर जाणवतो. हवेतील आर्द्रतेने कपडे वाळत नाहीत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी महिना-दोन महिने कुबट वास भरलेला असतो. लोकलमध्ये व बसमध्ये तर हा दर्प अधिकच जाणवतो. पूर्वीच्या भारतीय जीवनशैलीत गणपतीपूर्वी, श्रावणात घराच्या भिंती सारवल्या जात. त्यापाठीमागे पावसाची घाण नष्ट करण्याचा हेतू असावा. नव्या अंधानुकरण असलेल्या जीवनशैलीत आपल्या देशासाठी, येथील परिस्थितीला अनुरूप असे कोणते उपाय करावे हे वैज्ञानिकांकडून सुचवले जात नाही. आयुर्वेदतज्ज्ञ वेगवेगळ्या प्रकारचे उपचार व जुन्या जीवनशैलीचे महात्म्य परत परत वर्णन करत असतात. त्यांनीही आजच्या काळाला अनुरूप अशा त-हेची मांडणी करायला हवी. नियमित पावसामुळे दैनंदिन जीवन चार महिने विस्कळीत होऊ देणे हे मानवी बुद्धीला शोभणारे नाही.
– दिनकर गांगल
dinkarhgangal@yahoo.co.in