Home लक्षणीय मातीत रुजलेल्या शिक्षणाची सुरुवात

मातीत रुजलेल्या शिक्षणाची सुरुवात

1

‘मित्र’ या ‘बायफ’च्या महाराष्ट्रातील सह-संस्थेने पन्नास हजार अल्पभूधारक आदिवासी कुटुंबांसाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प 2003 साली सुरू केला होता. शेती छोट्या जमिनीत, कमी भांडवलात फायद्याची कशी करावी याचे वेगवेगळे तंत्रज्ञान हा त्यातील मुख्य भाग; पण त्याबरोबरच कुटुंबाचे आरोग्यशिक्षण, महिला सक्षमीकरण असा बहुआयामी कार्यक्रम होता तो. त्यात प्रथमच ‘बायफ’ने त्या कार्यक्रमाच्या कार्यक्षेत्रातील पन्नास आश्रमशाळांबरोबर काम सुरू केले. एका आश्रमशाळेत तीनशे ते चारशे मुले असतात. तेथे शेतीविषयक तंत्रज्ञानाचे तसेच आरोग्यविषयक गोष्टींचे प्रात्यक्षिक केले तर ते त्या मुलांच्या आई-वडिलांपर्यंत म्हणजे सहाशे ते आठशे पालकांपर्यंत सहज पोचेल असा विचार त्यामागे होता.

‘बायफ’ला गांधी विचारांचा वारसा आहे. त्या संस्थेचे उपाध्यक्ष सोहनी यांना आश्रमशाळांमधील काम ‘नयी तालिम’ शिक्षणपद्धतीशी जोडता येईल असा विश्वास वाटत होता. त्या कार्यक्रमाची मोठी ताकद, त्यांना जाणवत होती. मी त्याचवेळी त्यांना भेटले. मी माझ्या सहकाऱ्यांबरोबर पडसऱ्यामध्ये शेतीचे प्रकल्प करून त्याला गणित, विज्ञान जोडण्याचा प्रयोग केलेला होता. आमची भेट झाल्यावर मला जाणवले, की माझ्या मनातील काम मला तेथे करण्यास मिळणार आहे. सोहनी यांनी माझ्यावर आश्रमशाळांमधील कार्यक्रमाचे प्रारूप तयार करण्याची जबाबदारी सोपवली.

कार्यक्रमाची रचना तीन महिन्यांनंतर तयार झाली. कार्यक्रमाचे नाव निश्चित झाले –‘शिक्षण-मित्र’. आधीच्या आखणीप्रमाणे, आम्ही शेतीचे प्रकल्प करणार होतोच आणि आरोग्यप्रकल्पही राबवणार होतो, पण त्या जोडीला आरोग्यशिक्षण, जन्म-मृत्यू दाखला यांसारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांची ओळख, नागरी संस्थांची ओळख असे उपक्रम होते. त्यातून सजग, सुजाण व जबाबदार नागरिक होतील ही अपेक्षा. अशा विविध उपक्रमांतून मुलांचे शिक्षण होईल या पद्धतीने कार्यक्रमाची रचना जाणीवपूर्वक केलेली होती.

कार्यक्रमाची उभारणी शाळा व्यवस्थापनाला विश्वासात घेणे आणि मुलांच्या सक्रिय सहभागातून उपक्रमांची उभारणी करणे अशा दोन मुख्य सूत्रांवर केली.

हळूहळू, शाळा-शाळांमध्ये परसबागा उभ्या राहिल्या. मुले कोणत्या हंगामात कोणत्या भाज्या लावाव्या, त्यासाठी वाफे कसे तयार करावे, जमिनीची मशागत कशी करावी, चांगल्या बियाण्याची पारख कशी करावी, त्याची रुजवण चांगली होण्यासाठी त्यावर कोणत्या सेंद्रिय प्रक्रिया कराव्या, सेंद्रिय खत व कीटक नियंत्रके स्वतःच तयार करून त्यांचा वापर रोपांच्या वाढीसाठी कसा करावा अशा विविध गोष्टी शिकली. त्याच पद्धतीने ती तंत्रशुद्ध फुलशेती आणि फळशेतीदेखील शिकली. पण त्यांना त्यात आणखी गंमत गवसली. त्यांना पुस्तकात परकेपणाने भेटणारा व भिववणारा अभ्यास शेती प्रकल्पांच्या अंगणात सोपा आणि गंमतीदार होऊन भेटू लागला. परसबाग आखताना क्षेत्रफळाचा अभ्यास, कुंपणाचे नियोजन करताना परिमितीचा अभ्यास होऊ लागला. त्यांनी कामे करताना जमिनीची लांबी-रूंदी मीटरमध्ये मोजली, कीटकनाशक तयार करण्यासाठी अनेक द्रवपदार्थ लीटरमध्ये मोजले, स्वतः तयार केलेले गांडूळ खत आणि पिकवलेल्या भाज्या-फुले ग्रॅम व किलोमध्ये मोजल्या, भाज्या तयार होण्यासाठीच्या कालावधीची नोंद ठेवली. गणितातील परिमाणे या विषयाचा अभ्यास असा नकळत होत गेला. काही जणांना त्याच्या शेतात आलेल्या भाज्या, मोगऱ्याची-गुलाबाची फुले, तयार केलेले गांडूळखत यांची विक्री करायची संधीही मिळाली. मुले अशी विक्री कौशल्ये शिकली, पण त्यांनी त्याच वेळी खर्च व उत्पन्न यांचा ताळमेळ लावावा यासाठी आम्ही आग्रह धरला. त्यांची जमा-खर्च, नफा-तोटा अशा गणिती मंडळींशी त्यांतून भेट घालून देण्याचा प्रयत्न केला. मुलांनी दर आठवड्याच्या/महिन्याच्या भाजी, फुले किंवा गांडूळखत उत्पादनाचे आलेख काढले.

आम्ही मुलांना प्रकल्पांच्या निमित्ताने विविध प्रकारच्या नोंदी व लेखन करण्यास प्रोत्साहन दिले. स्वतःच्या कामाचे चित्र स्वतःला दिसण्यासाठी नोंदी करायच्या, दुसऱ्या कोणाला दाखवण्यासाठी नाही हा विचार पुन्हा-पुन्हा शिक्षकांसमोर मांडला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक नोंदपत्रक हे मुलांच्या शिक्षणाचे माध्यम होते. काटेकोर मोजणी, निरीक्षण-निरीक्षणाची त्यांच्या स्वतःच्या शब्दात मांडणी यासाठी त्या नोंदींची मदत होणार होती. शास्त्रीय पद्धतीने त्यांच्या कृतीच्या परिणामांचे अनुमान आणि निष्कर्ष काढण्यासाठीचा जमा-खर्च, नफा-तोटा शिकण्यासाठीचा डेटा त्या तांत्रिक नोंदींमधून मिळणार होता. मुले त्यांच्या स्वतःच्या शब्दांत पण काटेकोरपणे नोंदी व लेखन करतील याकडे लक्ष पुरवले जाऊ लागले. मुलांनी किती व्यवस्थित नोंदी ठेवल्या त्याची एक झलक खाली दिसते आहे:

भाताची पारंपारिक व सदन लागवड पद्धत

आम्ही आमच्या शाळेवर दि. 10 ऑगस्ट 2012 रोजी 10 x 20 चा प्लॉट तयार केला. त्यात पालापाचोळा टाकून पाण्याने पूर्ण माती व पाणी डकवून भात पेरणीसाठी प्लॉट तयार केला व त्यात दोन प्रकारचा भात लागवड केला व आम्हाला श्री. एखंडे सर यांनी पेरणीसाठी रोप आणून दिले. आम्ही 10 x 20 चा प्लॉट तयार केला होता त्याचे आम्ही दोन भाग पाडले व एक प्लॉटमध्ये पारंपारिक पद्धतचा भात लागवड केला व दुसरा प्लॉट मध्ये सदन पद्धतीने लावले. आम्ही भात लावत होतो तेव्हा भाताची उंची सारखी होती. नंतर पारंपारिक पद्धतीने लावलेल्या भाताची उंची जमिनीपासून मोजली तर 60 इंच भरली व सदन पद्धतीने लावलेल्या भाताची उंची 45 भरली. कारण पारंपारिक पद्धतीने लावलेला भात दाट आला. सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी रोपाला उंची वाढवावी लागली आणि जास्त शक्ती त्यात खर्च झाली. ओंबीमध्ये सुद्धा फरक होता. सदन भाताची ओंबी मोठी दिसून आली. पाण्याच्या प्रमाणातसुद्धा फरक आहे व पाणी देतानासुद्धा पारंपारिकला जास्त पाणी लागत होता व सदन भात लागवडीला कमी पाणी लागत होता.

अनुदानित आश्रमशाळा, केवडीपाडा, नंदूरबार
गांडूळखत समिती
10 जून 2012 ते 25 जुलै 2012
खड्ड्याची लांबी 9 फूट आणि रुंदी 3 फूट व उंची 1 फूट

गांडूळाची जात – इटानीया फोटेडा
सुरुवातीला आम्ही पालापाचोळा, वाळलेले गवत, इकडून-तिकडून आणलेले शेण खड्ड्यात टाकले. तो कुजून झाल्यावर त्याच्यामध्ये दीड किलो गांडूळ सोडले. 10 जूनला खड्ड्यात पालापाचोळा टाकला आणि ते खत 25 जुलैला तयार झाले. 55 किलो खत निघाले. ते खत आम्ही परसबाग, फळबाग, फुलबाग या समित्यांना दिले. 15 किलो खत परसबागवाल्यांना दिले. 15 किलो खत फळबागवाल्यांना दिले व बाकी फुलबागवाल्यांना दिले. गांडूळ दीड किलो सोडले होते त्यांचे तीन किलो झाले.

15 सप्टेंबर 2012 ते 30 ऑक्टोबर 2012
किती किलो निघाले?   43 किलो निघाले.
10 किलो फुलबागवाल्यांना दिले. परसबागवाल्यांना 13 किलो दिले. उरले खत वांगी, मेथी लावण्यासाठी माती भुसभुस व्हायला पाहिजे म्हणून मातीमध्ये टाकले. कुंपण केले होते. परंतु मुलांनी सगळे कुंपणमधले काडी जाळून टाकले. म्हणून 3 सप्टेंबरला कुंपण केले. आम्हाला कुंपण करायला खूप अडचण झाली म्हणून आम्ही मुलांची मदत घेतली आणि नदीकाठच्यासुद्धा काठ्या तोडून आणल्या.

3 नोव्हेंबर 2012 ते 10 जानेवारी 2013
किती किलो निघाले?   80 किलो निघाले.
10 किलो फळबागवाल्यांना दिले. 13 किलो फुलबागवाल्यांना दिले. 17 किलो परसबागवाल्यांना दिले. 40 किलो आमच्याजवळ आहे. अजून सर्व मुलांनी काठ्या सर्व काढून जाळून टाकले होते. आम्ही परत कुंपण केले. 5 जानेवारीला कुंपण केले. नंतर सरांना सूचना करायला सांगितले की कुंपण केलेल्या काठ्या कृपया मुलांनी जाळू नये. जो जाळेल त्याला शिक्षा करण्यात येईल.

अनुदानित आश्रमशाळा, उमज, नंदूरबार

आमरी शाळांमा
फुलबाग लगाड्यो रे लगाड्यो
बायहो आमरी समजमां नी आव्यो

जास्वंद बी लगाड्यो बायहो
गुलाब बी लगाड्यो
ओ आमरी शाळांमा
मोगरा लगाड्यो रे लगाड्यो
बायहो आमरी समजमां नी आव्यो
पालक बी लगाड्य बायहो
कथंबीर बी लगाडी
ओ आमरी शाळांमा
मेथी आवी रे आवी
बायहो आमरी समजमां नी आव्यो
वांगा बी लगाड्या बायहो
धुडको बी लगाड्या
ओ आमरी शाळांमा
भेंडी आवी रे आवी
बायहो आमरी समजमां नी आव्यो

सुनिल पावरा, इ. 8 वी, अनु. आश्रमशाळा, चिखली, शहादा
प्रक्रिया नोंदींचा दुसरा भाग म्हणजे केलेल्या कामकाजाच्या वर्णनात्मक नोंदी. आमचा आग्रह, मुलांनी स्वतःच्या भाषेत लिहावे असा नेहमी असायचा. त्यांनी आदिवासी भाषा वापरली तरी चालण्यासारखे होते. महत्त्व मुलांना त्यांचे स्वतःचे विचार, स्वतःचे म्हणणे त्यांच्या स्वतःच्या शब्दात, दुसऱ्याचे शब्द उसने न घेता मांडता येण्याला होते. त्या मुद्यावरही शिक्षकांबरोबर बरेच काम करावे लागले. भाषेच्या फुलोऱ्याला शाळांमध्ये अवास्तव महत्त्व दिले जाते; त्यात आशय हरवला तरी हरकत नाही, इतके! त्यामुळे शिक्षक वर्णनात्मक नोंदी अनेकदा डिक्टेट करत. भाषा शिक्षणातील फार मोठा टप्पा मुलाला स्वतःचे विचार आणि त्याची स्वतःची समज त्याच्या स्वतःच्या शब्दांत सुसंगतपणे लिहिता येणे हा आहे हे वारंवार पटवून दिल्यावर मुलांना स्वतंत्रपणे, स्वतःला हव्या तशा नोंदी करण्याची मुभा मिळाली.

आम्ही काही औपचारिक रीतींचा आग्रह मुद्दामहून धरला. पुढे समाजात वावरताना ज्या रीतीभाती पाळाव्या लागणार आहेत त्यांची ओळख त्यातून होई आणि त्याखेरीज भाषेच्या अभ्यासातील औपचारिक पत्रलेखन या विषयाचा सरावही होऊन जाई. मुलांनी शेतकरी दादाला लिहिलेल्या पत्राचा हा नमुना:

दिनांक:25/1/13
प्रती
अरविंद वळवी
देवमोगरा, ता. नवापूर
विषय – आपण केलेल्या सहकार्याबद्दल
महोदय,
वरील विषयान्वये आपणा आम्हाला आमच्या शाळेत परसबाग व फळबाग प्रकल्प राबवत असताना आपणाकडून आम्हाला लागणाऱ्या टिकाव व फावडी या वस्तूंची मदत झाली व त्यामुळे आम्ही आमचे काम अगदी उत्साहात केले. यापुढेही आपण आम्हाला असेच सहकार्य कराल अशी अपेक्षा. यापुढेही आपण केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत.
आपला विश्वासू,
मगन वाहऱ्या पटले
शासकीय आदर्श आश्रमशाळा, देवमोगरा

_Matit_RUjlelya_2.jpgकृती करत-करत शिकलेल्या गोष्टी जास्त चांगल्या कळतात, लक्षात राहतात, शिकण्याची प्रक्रिया ही आनंदाची-मजेची होते. या गोष्टी आमच्या मुलांच्या बाबतीत घडल्याच, पण आम्ही त्या पलीकडे आणखी एक महत्त्वाची गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केला. भारतीय समाजात शेती हे ‘अडाण्याचे काम’ असा समज रूढ आहे. शिकलेल्या आणि अगदी अर्धशिक्षित मुलांनाही शेतीत हात घालण्याची लाज वाटते. मुले बेकार बसतील पण शेती करण्यास नको म्हणतील. शेतीशी संबंधित आर्थिक राजकारण त्याला जबाबदार आहेच, पण शेतीबद्दल समाजात जाणीवपूर्वक जोपासली गेलेली तुच्छ, नकारात्मक भावनाही त्यामागे आहे. ‘शिक्षण-मित्र’च्या कार्यक्रमातून मुलांना हळूहळू ही जाणीव होत गेली, की शेती हे काही ‘अडाण्याचे काम’ नाही, तर शेतीलादेखील विज्ञान, तंत्रज्ञान आणि गणित यांचे ज्ञान लागते. शेतकरी-कास्तकरी असणाऱ्या त्यांच्या आई-वडील, नातेवाईकांबद्दल न्यूनगंड कमी होऊन त्यांच्याबद्दल सन्मानाची भावना कदाचित निर्माण झाली असेल ही ‘शिक्षण-मित्र’ची मोठीच मिळकत म्हणायची.

– भाग्यश्री तिखे

(मिळून साऱ्याजणी, मार्च २०१७ वरून उद्धृत)

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.

Exit mobile version