Home व्यक्ती आदरांजली माणूसपणाच्या वाटेवरील प्रवासी

माणूसपणाच्या वाटेवरील प्रवासी

1

कुमार शिराळकर यांच्या संपर्कात आलेल्या मुख्यत: ‘सीटू’ या कामगार युनियनचे कार्यकर्ते यांनी मिळून ‘माणूसपणाच्या वाटेवरील प्रवासी’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ औरंगाबाद येथे 7 जानेवारी रोजी आयोजित केला होता. कौतुकाची गोष्ट म्हणजे कुमारने त्याच्या विचारव्यूहाची शिदोरी ज्या गटामधून घेतली त्या ‘मागोवा’ गटातील, क्रांतीच्या विचारांनी पेटलेल्या तरुणाईलाही या समारंभासाठी आमंत्रित केले होते आणि त्यांना व्यासपीठावर बोलावून संवाद साधला. कुमारचे ते अस्वस्थ दिवस कसे होते, याच्या आठवणी त्या मंडळींनी सादर केल्या. कुमार ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’मध्ये सामील 1982 साली झाला आणि त्याचा तेथील प्रवास डॉ. ज्ञानेश्वर मोटे यांनी या पुस्तकात मांडला आहे. ‘मागोवा’च्या मित्रमंडळींना कुमार कसा दिसला याची मांडणी या पुस्तकामध्ये पाच लोकांनी केली आहे आणि बाकी दहा लेख हे आदिवासी कार्यकर्ते व युनियनमधील कार्यकर्ते यांनी लिहिलेले आहेत. प्रत्येक लेख हा कुमारबद्दलच्या कृतज्ञतेने गहिवरून लिहिलेला आहे.

कुमारने पक्षाच्या ‘सेण्ट्रल कमिटी’चे काम आरोग्याच्या कारणासाठी व कौटुंबिक अडचणींमुळे 2015 मध्ये सोडले. त्यानंतर त्याने चिंचोरे आणि आसपासच्या तीन-चार गावांमध्ये विकासाचे काम हाती घेतले. त्यातून त्याची ‘360 डिग्री व्हिजन’ आणि त्याचे स्थानिक कार्यकर्त्यांना सर्व प्रकारच्या व्यवस्थापनामध्ये निष्णात करण्याचे स्वप्न दिसून येते. अंबरसिंग महाराज यांनी ‘ज्ञानविज्ञान शिक्षण प्रसारक मंडळा’ची स्थापना करून ते काम चालू ठेवले. डॉ. अभय बंग यांच्याकडून पर्यावरणीय सल्ले घेऊन त्या दृष्टिकोनातून वनसंवर्धन, जलसंधारण, मृद्संधारण, जैवविविधता संरक्षण असे काम चालू आहे. नाना पाटेकर यांच्या नाम फाऊंडेशनबरोबर जल व मृद्संधारण यांच्या कामांना चिंचोरे येथे सुरुवात केली. चिंचोरा गावाचा सामूहिक वनहक्क दावा मान्य करून घेतला व तेथे तीन ‘इकोझोन’ तयार करून वनसंवर्धनाचे काम हाती घेतले. त्याचे रिपोर्टिंग घेणे सातत्याने सुरू केले. समारंभातील भाषणांमधील काही विशेष – 

अजित अभ्यंकर : कुमार म्हणजे शरीर, बुद्धी, भावना आणि इच्छा यांची पूर्ण एकात्मता साधलेला माणूस. ‘इगो’ किंवा आत्मप्रौढी यापासून पूर्णत: मुक्त असणारा निगर्वी माणूस. बौद्धिक कार्य आणि शारीरिक श्रम यांचे तादात्म्य अंगी बाणवलेला, म्हणूनच मार्क्सवादी. म्हणूनच काहींना तो महात्मा गांधी यांच्या रस्त्यावरील प्रवासी वाटला, तर काहींना क्रांतिसज्ज असा क्रांतिकारक !

कृष्णा ठाकरे : हे कुमार शिराळकर यांच्याशी नाते जुळलेले तरुण आदिवासी कार्यकर्ते होते. कुमार विकास कार्यक्रमांसाठी निवडलेल्या चिंचोरे व आजूबाजूच्या गावांत, तेथील रहिवासी सतीश पवार व फोकरीबाई पवार यांच्या घरी राहत. त्यांनी वेगळा संसार मांडलाच नव्हता. कुमार शिराळकर यांना कर्करोगाचा त्रास होऊ लागला तेव्हा आवश्यक असलेली औषधे त्यांच्याकडेच येऊन पडत होती आणि ती मंडळी ती औषधे कुमार यांना आपुलकीने देत असत. पवार यांचे घर हेच इतरही, मुंबई-पुण्याकडून येणाऱ्या कार्यकर्त्यांचे घर झाले होते.

कुमार अनेक विषयांवर शिबिरे आयोजित करत असे. त्यात पृथ्वीची उत्पत्ती, धर्म, अंधश्रद्धा, कम्युनिस्ट देशातील राज्यपद्धत असे विषय असत. त्याचबरोबर आदिवासी समाजातील अंबरसिंग सुरतवंती, संत गुलाम महाराज यांचीही माहिती दिली जाई. त्याने काही क्रांतिगीतेही शिकवली होती. ती तो स्वत: मधुर आवाजात सर्वांबरोबर गात असे.

कुमार मेकॅनिकल इंजिनीयरिंगचे शिक्षण घेऊन, नोकरीवर लाथ मारून खात्यापित्या घराण्यातील वैष्णव ब्राह्मण कुटुंबाचा त्याग करून आदिवासी समाजासाठी लढत राहिले. कुमार यांची खुबी होती की इतरांचे म्हणणे ते शांतपणे ऐकून घेत आणि शांतपणे तितकेच प्रभावी उत्तर देत. त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन काही तडफदार कार्यकर्ते तयार झाले. कुमारने आदिवासी महिलांमध्ये जागृतीचे काम करून स्त्रीमुक्ती चळवळीला खूप मदत केली. ते शहाद्याला आले, की एखाद्या सफाई कामगाराच्या घरी जेवण्यास जात असत. गावात फिरतानाही एखाद्या गरीबाच्या घरी आवर्जून जेवण्यास जात. त्यांनी ते काम चळवळीतील नियम म्हणून न चुकता केले.

या मार्क्सवाद्याचा प्राण गांधीजयंती रोजी 2 ऑक्टोबर 2022 ला जाणे हाही एक योगायोग होता. त्यांना मरणानंतरही आदिवासींमध्ये स्थान मिळावे असे मनोमन वाटे. शहादा ही त्यांची कर्मभूमी होती. म्हणून त्यांचे अंत्यसंस्कारही आदिवासी रूढ परंपरेसारखे झाले. त्यांचे दहन न होता ‘दफन’विधी केला गेला.

प्रसाद हावले (सीटू कार्यकर्ता) : कुमारचे वाक्य मनावर कोरले गेले आहे, “गरीब दुबळ्या लोकांविषयी दयाबुद्धीतून वाटणारा कळवळा नक्षलवादी दहशतवादाला गोंजारण्यातून अभिव्यक्त करण्यासारखी हिणकस गोष्ट दुसरी कोणतीही असू शकत नाही, या निष्कर्षाला मी केव्हाच आलो आहे.” यातून कुमारची हिंसेबद्दलची नफरत व्यक्त होते. त्याने एका लेखामध्ये म्हटले आहे, “नीतीविषयक संकल्पना धर्माच्या कचाट्यातून मुक्त केली पाहिजे आणि धार्मिकतेऐवजी धर्मांधतेला विरोध केला पाहिजे”. शिवधर्म नावाने स्थापन होत असलेल्या प्रयत्नांबद्दलही त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया होत्या.

कुमारने वर्धा येथील डॉ. अभय बंग यांचे मार्गदर्शन घेऊन एका एकरामध्ये तब्बल पंधरा पिके घेण्याचा यशस्वी प्रयोग केला. एम.के.सी.एल. व एकॉलॉजिकल सोसायटी या संस्थांसोबत पंचवीस तरुणांच्या चमूला जंगलामध्ये जैववैविध्याचा अभ्यास व प्रशिक्षण दिले.

कुमारची दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत आणि दोनशेहून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत. ‘उठ वेड्या तोड बेड्या’ हे ‘मागोवा’ने आणि ‘नवे जग नवी तगमग’ हे ‘मनोविकास’ने प्रकाशित केले.

कुमारचे व्यक्तिमत्त्व असे विविधांगी आहे. त्याचा प्रभाव त्याच्या सहवासात आलेल्या सर्वांवर पडला आहे. माझी त्याची ओळख शहाद्याला, ‘श्रमिक संघटने’च्या ऑफिसात झाली. मी जेव्हा शहाद्याला स्त्रियांची शिबिरे घेण्यासाठी जात असे तेव्हा तेव्हा तो दिसत असे. एकदा मी त्याच्या नेतृत्वाखाली काढल्या गेलेल्या दलित आदिवासी एकता मार्चमध्ये सामील होऊन एक दिवस दहा मैल चालल्याचे आठवत आहे. तसेच, मी 1 मे 1975 रोजी व्हिएतनाम युद्ध थांबल्याचे जाहीर झाले त्या दिवशी ‘व्हिएतनाम लढ्याचा विजय असो’ असा नारा देत शहादे गावातून काढलेल्या मोर्च्यामध्येही कृतज्ञतेने व गहिवरून सामील झाले होते.

माणूसपणाच्या वाटेवरचा प्रवासी
संपादन – डॉ. उमाकांत राठोड
प्रकाशक – आयडिया पब्लिकेशन
किंमत – 250 रूपये

– छाया दातार 9322597997 chhaya.datar1944@gmail.com

About Post Author

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version