माझे नवजीवन
– विभाकर सुलाखे
आता, आयुष्यात मागे वळून बघताना खूपच छान वाटते. सुरुवातीची अडथळ्याची शर्यत कशीबशी पार केल्यानंतर आयुष्य मार्गालाच लागले! पदवीपर्यंतचे शिक्षण, मिळालेली व टिकवलेली नोकरी, विवाह, जाणीवपूर्वक केलेला नीटनेटका संसार, आटोपशीर कुटुंब व एकूणच, सुनियोजित मार्गक्रमण! यथावकाश एकुलत्या एका मुलीचा विवाह, राहायचे घर, व्यवसायातील अपूर्व यशस्वीता, आर्थिक सुस्थिती वगैरे आपसुक चालत आले. तरुण वयापासून मिळालेले राष्ट्र सेवा दलाचे संस्कार, साधना साप्ताहिकाच्या वाचनामुळे (मी गेली पन्नास वर्षे साधना वाचतो व नियमित ग्राहकही आहे.) लाभलेले वैचारिक अधिष्ठान, फर्ग्युसन कॉलेजमधील अर्थपूर्ण व लक्षवेधी शिक्षण, यांमुळे आयुष्य सुंस्कारित झालेले! माझ्यासारख्या एका सामान्य दर्जाच्या व्यक्तीला मिळालेले लोभस, सुंदर, लौकिक व व्यवहारी जीवन!
अशातच, 1996 च्या सप्टेंबरमध्ये समाजवादी नेते व विचारवंत पन्नालाल सुराणा यांच्या निमंत्रणावरून मी नळदुर्ग येथे दाखल झालो. नळदुर्ग येथे राष्ट्र सेवा दल संचालित ‘आपले घर’ हा लातूर-किल्लारीच्या भूकंपातील बेघर व विस्थापित झालेल्या अनाथ विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पुनर्वसनासाठी सेवाभावी प्रकल्प, गेली सतरा वर्षे मोठया जिद्दीने चालवला जात आहे. नळदुर्गच्या या प्रकल्पात मी व्यवस्थापन समितीचा सभासद या नात्याने गेली चौदा वर्षे कार्यरत आहे. मी स्वत: ग्रामीण भागातून आलेला असल्यामुळे, मला अज्ञान व गरिबी यांनी गांजलेला, मागासलेला समाज माहीत होता, पण ‘आपले घर’च्या सहवासाने या दुर्लक्षित समाजाचे विलक्षण दर्शन मला जवळून अनुभवायला मिळाले. मी दिवसेंदिवस त्यात समरस होत गेलो. ‘आपले घर’च्या प्रकल्पात धरित्री विद्यालयाच्या मार्फत मुलांना दहावीपर्यंत शिक्षणाची सोय होती. दहावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी पुढे शिक्षणाची कोणतीही संधी स्वबळावर घेऊ शकत नव्हता. भोवतालच्या या अफाट जगात हे विद्यार्थी अर्धशिक्षित म्हणून फेकले जात होते आणि ह्याच विचाराने मला अस्वस्थ केले व त्यांच्या पुढील शिक्षणासाठी काहीतरी भक्कम व निश्चित व्यवस्था करणे जरूरीचे आहे, हे मनोमन पटले.
माझ्या तेथील सर्व सहका-यांशी चर्चा करून मी हा विचार पुढे नेण्याचा निश्चय केला. सर्व सहकारी सुविद्य, सुज्ञ व समाजसेवी भूमिकेचे असल्यामुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. CHARITY BEGINS AT HOME या तत्त्वानुसार, मी स्वत: दोन मुलींच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी व त्यांचे पालकत्व स्वीकारले (इंदू गायकवाड व राजश्री गोसावी). या दोन्ही मुलींनी या निश्चयाला व श्रमाला अर्थपूर्ण प्रतिसाद उत्साहवर्धक पध्दतीने दिला. त्या दहावी उत्तम श्रेणीने पास झाल्या. (इंदू गायकवाड ही तिच्या गावातील दहावी पास झालेली पहिली मुलगी). पुढे ह्या मुली Microbiology विषय घेऊन B.Sc. उत्तम रीतीने पास झाल्या. कहर म्हणजे त्यांनी माझ्या आग्रहाखातर शिक्षणाची कास न सोडता अभ्यास चालू ठेवला व त्या M.Sc. Microbiology मध्ये first class मध्ये पास झाल्या. या दोन्ही मुली पुण्यात उत्तम कंपन्यांमध्ये नोक-या करून आयुष्याची स्वाभिमानी व आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करत आहेत. ज्या मुलींना साधा बटाटावडा विकत घेण्याची क्षमता नव्हती, त्याच दोघीजणी महिना किमान दहा हजार रुपये पगारावर कार्यरत आहेत व स्वत:च्या कुटुंबासाठी अर्थसाहाय्य करून हातभार लावत आहेत.
मी ‘आपले घर’ प्रकल्पाच्या व्यवस्थापन समितीचा सभासद आहे. या प्रकल्पातील निवासी शाळेमध्ये दोनशे मुले राहून शिक्षण घेत असतात. गेल्या काही वर्षांत दीडशे मुले दहावी पास होऊन बाहेर पडली. त्यामधील सत्तेचाळीस विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उच्च शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांना त्यासाठी सोय करून देणे आणि जरूर तो पैसा उभा करून देणे हे काम मी आनंदाने करतो. असे वर्षाला दोन-चार लाख रुपये मी सहज जमा करत असतो. त्याशिवाय ‘साधने’च्या दिवाळी अंकास मी अडीच-तीन लाख रुपये दरवर्षी मिळवून देतो. मी माझ्या व्यावसायिक आयुष्यात जे पेरले ते आता उगवत आहे. लोकांनाही चांगल्या, विश्वासार्ह कामासाठी पैसे द्यायचेच असतात. आमची एक देणगीदार, लॉस-एंजल्सची नयना आपटे म्हणते, की तुम्ही आम्हाला एका मोठया कामात सहभागी होण्याची संधी दिली! ही भावना प्रातनिधिक आहे. त्याखेरीज, काम दाखवले की विश्वासार्हता वाढते. मी ज्या महात्मा सोसायटीत राहतो तेथील पंचवीस लोकांना घेऊन मी नळदुर्गला गेलो. त्यांनी काम पाहिले आणि त्यांच्याकडून आठ दिवसांत तीन लाख साठ हजार रुपये जमा झाले!
समाजसेवा ही माझी जीवनधारणा आहे. त्यामुळे मी निवृत्तीनंतर तशा कामात गुंतलो गेलो आणि त्यामुळेच, मला म्हातारपण येऊ शकत नाही किंवा कोणताही विकार त्रास देत नाही.
आमच्या या उच्च शिक्षण योजनेतून इतरही गुणी व सक्षम विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षणाची मार्गक्रमणा करत आहेत व आयुष्यात आत्मविश्वासाने उभे राहत आहेत.
मी हा प्रकल्प स्थिरावण्यासाठी आर्थिक बाजू सक्षम करण्याच्या दृष्टीने गेली दहा वर्षे सातत्याने कार्यरत आहे. माझ्या मित्र परिवारातील व जाणत्या नातेसंबंधातील व्यक्तींनी या कामाचे महत्त्व लक्षात येऊन माझ्यासारखेच एका विद्यार्थ्याच्या शिक्षणाचे पालकत्व स्वीकारले आहे. त्यासाठी पालकत्व स्वीकारलेला प्रत्येकजण बारा ते पंधरा हजार रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य करत आहे. हा विचार परदेशातल्या माझ्या मित्रपरिवाराने स्वखुशीने उचलून धरलेला आहे व त्यापोटी ते प्रत्येकी तीनशे डॉलर साहाय्य म्हणून देत असतात. माझी मुलगी (सोनाली केळकर) अमेरिकेतून दरवर्षी यासाठी मला साहाय्य करत आहे. माझ्या पत्नीने दिलेल्या सहकार्यामुळे नळदुर्गच्या मुलींना पुण्यात हक्काचे घर व माहेरवास मिळाला आहे.
हे काम मी स्वत: सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून व माझी भावनिक गरज म्हणून करत आहे. मी याला समाजसेवा म्हणणार नाही. केवळ ‘स्वत:साठी जगलास तर मेलास व दुस-यांसाठी जगलास तरच जगलास’ या विचारापोटी हे काम माझ्या शक्तिमतीप्रमाणे करत आहे. आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या समाजातील गरजू विद्यार्थी उच्च शिक्षणाच्या माध्यमातून स्वबळावर स्थिरावत आहेत, हे पाहण्याचे भाग्य मला निश्चितच मिळत आहे आणि म्हणूनच ‘LIFE IS WORTH LIVING’.
– विभाकर सुलाखे
भ्रमणध्वनी : 9922447492