Home कला महदंबा हिचे ढवळे (Mahadamba Dhavale)

महदंबा हिचे ढवळे (Mahadamba Dhavale)

-heading

महदंबा ऊर्फ महदाईसा मराठी साहित्यविश्वातील आद्य मराठी कवयित्री होय. या कवयित्रीला आणखी काही नावे होती. ती रूपाईसा या नावानेही ओळखली जात असे. तिने तिचे संपूर्ण आयुष्य महानुभाव पंथाच्या प्रसारार्थ वेचले. ती चतुर, सडेतोड वृत्तीची होती. चक्रधरांचा विश्वास तिच्यावर होता. चक्रधर स्वामी महाराष्ट्रभर फिरत असत. त्या तुलनेत गोविंदप्रभू हे एकाच ठिकाणी असत. त्यामुळे ती चक्रधरांच्या अनुज्ञेनेच गोविंदप्रभू यांच्याजवळ राहिली. तिच्या जन्ममृत्यूबद्दल मात्र माहिती उपलब्ध नाही. तिचे धवळे नावाचे लेखन महानुभाव संप्रदायात प्रसिद्ध आहे. तो वाड्मयीन रचनाप्रकार झाला. धवळे म्हणजे विवाहप्रसंगी गायची वरगाणी अर्थात विवाहविषयक गीत होय. त्याची निर्मिती ‘श्रीगोविंदप्रभूचरित्रा’तील ‘विव्हावो स्विकारू’ या लीळेवरून कळते. गोविंदप्रभू यांना बाशिंग घेऊन जाणाऱ्या तेलिणीस पाहून एकदा विवाह प्रवृत्ती झाली. तेव्हा त्यांनी महदंबेला विवाहविषयक गीते म्हणण्यास सांगितली. त्या गीतांत विवाहाचे आरंभापासून अखेरपर्यंत वर्णन आले आहे. ढवळ्यातील मुख्य विषय रूक्मिणी स्वयंवराचा आहे. ढवळ्याच्या आरंभी रुक्मिणीहरणाचा कथाभाग आला आहे. तर उत्तरार्धात स्वयंवराचे वर्णन आले आहे. उत्तरार्धात पासष्ट कडवी आहेत. ते वाचताना महदंबेचे शीघ्रकवित्व दिसते.
धवल या संस्कृत शब्दावरून ‘धवळा’ व ‘ढवळा’ हा शब्द आलेला आहे. ते विवाहप्रसंगी भक्तांकडून गायले जात असत. प्राचीन काळातील लोकगीतातील ढवळे उपलब्ध नसले तरी महदंबा, एकनाथ, दासोपंत, रामदास इत्यादी कवींनी रचलेले ढवळे उपलब्ध आहेत. महदंबेच्या ढवळ्यांची भाषा साधी, सुबोध व तात्कालिक बोलीभाषेच्या रूपाची आहे.

महदंबेने ढवळ्यांप्रमाणेच ‘मातृकी रुक्मिणीस्वयंवर’ या काव्याची निर्मिती केली आहे. त्याची ओवीसंख्या एकशेनऊ आहे. त्या काव्याचे विशेष असे, की त्यातील कडव्यांत अ, आ, इ, ई पासूनची अक्षरे आणली आहेत. उदाहरणार्थ कासे पितांबरू कंठी कुंदमाळा : कांतु शोभे सावळा : रुक्मिणीचा ||१|| तिचा प्रत्येक ओळीतील आद्याक्षरांचा क्रम साधण्याचा प्रयत्न आहे. तोच प्रकार पंडिती काव्यात नंतरच्या काळात दिसतो. कृष्णवर्णन, पाठवणी, कृष्णदर्शनामुळे रुक्मिणीने सज्जावरून उडी घेणे इत्यादी प्रसंग आले आहेत. ‘गर्भकांड ओव्या’ हे महदंबेने लिहिलेले छोटेसे प्रकरण आध्यात्मिक स्वरूपाचे आहे.  

महदंबेचे महानुभाव संप्रदायात स्थान महत्त्वाचे होते. ती ‘तरी मज वेष द्यावा’ असे म्हणते. तिला पंथाचा वेष दिला जातो. ती मठव्यवस्था बघते, सर्व भक्तांची उठबस करते, चक्रधरांचा पूजावसर संभाळते, संन्यासिनींवर करडी नजर ठेवते- त्यांना फटकारते. त्यावरून तिने महानुभाव संप्रदायाची शिस्त स्वीकारली होती हे दिसून येते. तिच्याविषयी उषा देशमुख या समीक्षक लिहितात, ‘तिच्या मानसिक आणि शारीरिक कोंडमाऱ्याचे चित्र तिच्या कृती-उक्तीतून ‘लीळाचरित्रा’त दिसून येते. संन्यासीपण, निवृत्ती, जीवनभोगापासून दूर राहणे आणि आध्यात्मिक पातळीवर विचारदर्शन घडवणे अशी महदंबेच्या आयुष्याची वाटचाल ठरली. महदंबा ही संवेदनशील सौंदर्यदृष्टी असलेली, नीटनेटकेपणा, चौकसपणा, जिज्ञासूपणा असलेली सुगरण, गाणे गाणारी, रांगोळी सुंदर काढणारी दक्ष कार्यकर्ती होती. नागदेवाचार्यांनी ‘म्हातारी माझी प्रीतीदक्ष: धर्मरक्षक की गा:’ असे तिच्याबाबत म्हटले आहे. ती नागदेवाचार्यांची चुलत बहीण होती. 

– नितेश शिंदे

info@thinkmaharahstra.com 
 

About Post Author

3 COMMENTS

Comments are closed.

Exit mobile version