टेंभुर्णी गावाला इतिहासही संपन्न आहे. ते मध्ययुगातील आदिलशाही, निजाम-मराठे यांच्या राजवटीतील अनेक घटनांचे प्रत्यक्ष साक्षीदार आहे. पंढरपुरच्या आषाढी, कार्तिकी एकादशी वेळी टेंभुर्णीतून जाणाऱ्या हजारो दिंड्यांमुळे गावातील नागरिक विठ्ठलाच्या भक्तीत न्हाऊन निघतात. गावामध्ये बारा ज्योतिर्लिंगांची मंदिरे, विठ्ठल मंदिर, राम मंदिर, भवानी मंदिर, मसादेवी मंदिर अशी प्रमुख मंदिरे आहेत. सर्व लोक ग्रामदेवतेची यात्रा, नवरात्र उत्सव यांसारख्या धार्मिक उत्सवांत मोठ्या उत्साहाने भाग घेतात. टेंभुर्णीमध्ये वीरगळ, सतीगळ, नागदेवतेची शिल्पे कोरलेले अवशेष पाहण्यास मिळतात.
टेंभुर्णीचा मार्ग मराठा कालखंडात दळणवळणासाठी सातत्याने वापरला गेला आहे. मराठवाडा, सोलापूर, कर्नाटक यांकडील मोहिमांवर जाण्यासाठी टेंभुर्णी मार्गाचा वापर केला गेला आहे. शिवरायांच्या मृत्यूनंतर, औरंगजेबाने त्याचे लक्ष दक्षिणेकडे केंद्रित केले. औरंगजेबाला तो मराठी सत्ता हां हां म्हणता जिंकून घेऊ शकेल असा फाजील आत्मविश्वास होता. पण त्या नादात त्याला पुढील सत्तावीस वर्षें दख्खन सोडता आले नाही. त्यातच मराठ्यांच्या शौर्याचा, पराक्रमाचा इतिहास दडला आहे. मराठे त्यांच्या स्वातंत्र्यरक्षणासाठी झगडले तर औरंगजेब साम्राज्यविस्तारासाठी. मराठ्यांची स्वातंत्र्ययुद्धात सरशी झाली. मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धादरम्यान टेंभुर्णीचा संदर्भ अनेक वेळेस येतो. इतिहासातील नोंद सांगते, की शहाजादा आज्जम हा औरंगजेबाचा पुत्र मराठ्यांचा पाठलाग करत असता टेंभुर्णी येथे 2 ऑक्टोबर 1682 रोजी मुक्कामाला थांबला होता.
राजाराम महाराजांनी जिंजीतून सुखरूपपणे स्वराज्यात आल्यानंतर, 1699 मध्ये मोगलांविरुद्ध मोहीम उघडली. त्यांनी स्वत: वऱ्हाड, खानदेश भागांत मोहीम आखली होती. राजाराम महाराज साताऱ्याहून बाहेरही पडले होते. महाराजांनी स्वत:सोबत सात हजार स्वार; शिवाय धनाजी जाधव, रामचंद्र अमात्य, दादो मल्हार हे मातब्बर सरदार घेतले होते. राजाराम महाराजांच्या मोहिमेची माहिती मिळताच बादशहाने शहाजादा आज्जमच्या मुलाला महाराजांच्या पाठलागावर लावले. त्याने परांड्याजवळ महाराजांना अडवल्यावर महाराजांनी टेंभुर्णीजवळ येऊन भीमानदी ओलांडून साताऱ्याकडे प्रवास केला. महाराजांची योजना बादशहाला कळल्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली.
उत्तर पेशवेकाळात टेंभुर्णीतील कीर्तनकार सदाशिवराव भाऊ माणकेश्वर यांच्या कर्तृत्वामुळे टेंभुर्णी पुन्हा एकदा मराठ्यांच्या इतिहासात प्रसिद्धीच्या झोतात आली. भाऊ कीर्तनकार असले तरी तत्कालीन राजकारणाची पुरती जाण असणारे आणि संधीचे सोने करून घेणारे मुत्सदी म्हणून ओळखले गेले. सदाशिवराव भाऊ माणकेश्वर हे सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात पुण्यात येऊन ठेपले, ते त्यांच्या अंगी कीर्तनाचे गुण असल्यामुळे. ते पुण्यात लवकरच सवाई माधवराव आणि नाना फडणवीस यांच्या राजकीय प्रवाहात शिरले. सवाई माधवरावांच्या अकाली मृत्यूनंतर मराठेशाहीतील अस्थिर, अनागोंदीच्या राजकीय पार्श्वभूमीवर बाजीराव दुसरे पेशवा बनले. सदाशिव माणकेश्वर हेही दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या कळपात गेले. सत्ताबदलानंतर, भाऊंनी घेतलेला निर्णय योग्य ठरला. त्यांना बाजीरावांवरील निष्ठेमुळे मानाची पदे मिळत गेली. सदाशिवराव भाऊ बाजीरावाचे निकटवर्तीय बनल्याने पेशव्यांनी त्यांना राहण्यासाठी दादा कद्रे यांचा वैभवशाली वाडा दिला. पुढे, सदाशिवराव भाऊंनी स्वत:चा उत्तम वाडा पुण्यातच नाना वाड्याजवळ बांधला. त्याच काळात त्यांच्या हाती प्रत्यक्ष कारभारी म्हणून पेशव्यांचे शिक्के कटारीच आल्या. सदाशिव माणकेश्वर यांना अंबारीचे हत्ती, इजायतीची वस्त्रे 20 मार्च 1801 रोजी झाली. भाऊंनी बाजीरावाने त्यांचा कारभारी म्हणून त्यांची नियुक्ती केल्यानंतर, त्यांनी त्यांना मिळालेल्या अधिकारांचा वापर करत मोठे अर्थार्जनही केले. पुढे, 1814-15 पर्यंत बाजीरावांची भाऊंवर मर्जी राहिली.
बाजीरावांनी सत्तेवर येताच हैदराबादच्या निजामाबरोबर काही नाजूक कामासाठी सदाशिवरावभाऊंना पाठवले; सोबतीला घोडदळ, पायदळ असा मोठा सरंजाम दिला. निजामाबरोबरच्या शिष्टाईत, सदाशिवरावभाऊंनी त्यांचा प्रभाव निजामावर पाडला. त्यामुळे निजामाने टेंभुर्णी हे गाव त्यांना कायमचे इनाम म्हणून दिले. भाऊंनी त्यांच्या अंगच्या हुशारीमुळे त्यांची प्रगती करून घेतली होती. भाऊंच्या प्रगतीसोबत टेंभुर्णीही प्रकाशझोतात राहिली.
भाऊंनी टेंभुर्णीमध्ये दोन वाडे बांधले. तीन मजली वाडा सन 1800 च्या सुमारास बांधला. एक राहता वाडा आणि सैन्य, घोडे यांना राहण्या-उतरण्यासाठी आणखी एक वाडा बांधला. त्याला हवेली असे म्हणत. त्याच्या भोवती सहा दगडी बुरुज होते. ब्रिटिश राजवटीतील बाँबे प्रेसिडेन्सीच्या गॅझेटमध्ये वाडा बांधल्याची नोंद आहे. ती अशी – ‘The growth of Tembhurni dates from its grant in inam to Sadashiv Mankeshwar who built a fort now much out of repair.’ टेंभुर्णीत उभारला गेलेला वाडा हा शनिवारवाड्याप्रमाणे सोयींनी परिपूर्ण होता. वाड्यात पाणीपुरवठा करण्यासाठी आमराईतून सायफन पद्धतीने पाणी आणले गेले होते. वाड्याला तीन भुयारी मार्ग होते. एक मार्ग पूर्व वेशीत, दुसरा मार्ग नरसिंहपूरला तर तिसरा मार्ग आमराईत निघत होता. हवेलीच्या बुरुजाचे अवशेष दिसतात. वाड्याचीही पडझड झाली आहे. संपूर्ण टेंभुर्णेभोवती संरक्षणासाठी तटबंदी उभारली गेली होती. पूर्व-पश्चिम दोन्ही दिशांना भव्य वेशी होत्या. पश्चिम वेस इंदापूर वेस म्हणून ओळखली जाते. शिवाय, तटबंदीला सोळा बुरुज, चार खिंडी आहेत. तटबंदीच्या भिंतीची जाडी सुमारे दहा फुटांपेक्षा जास्त आहे. टेंभुर्णीमध्ये तिचे अस्तित्व दिसते, परंतु तेथे मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.
– प्रा. डॉ. राजेंद्र गायकवाड
the legend
the legend
Nice information
Nice information
टेंभुर्णी शहराचा इतिहास
टेंभुर्णी शहराचा इतिहास वाचुन समाधान वाटले. आणी शहराला इतिहास आसल्याचा अभिमान आहे
Bhari watl Mahiti wachun…
Bhari watl Mahiti wachun aajun Kai Mahiti milel ka
Comments are closed.