चंद्रशेखर सानेकर आणि सदानंद डबीर ह्या दोघांनी त्यांचे विचार मराठी गझल फक्त संख्यात्मक वाढून चालणार नाही, तर ती गुणात्मकही वाढली पाहिजे ह्या सद्भावनेपोटी मांडले आहेत. ते स्वागतार्हही आहेत; मात्र ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ असे तर त्या दोघांकडून नकळतपणे होत नाही ना, असेही मला राहून राहून वाटत आहे.
चंद्रशेखर सानेकर यांनी मराठी गझलेवर घेतलेले आक्षेप मुख्यतः पुढीलप्रमाणे आहेत – १. मराठी गझल नुसती संख्यात्मक अंगाने वाढत चालली आहे. २.तिच्यात सपाटपणा येत चालला आहे. ३. ती वर्णनपर मांडणीत अडकून पडत चालली आहे. ४. ग्रामीण जीवनवर्णनाचा भरणा तिच्यातून होऊ लागला आहे.
सदानंद डबीर यांनी नोंदवल्यापैकी महत्त्वाचे आक्षेप पुढीलप्रमाणे : १.तांत्रिक गोष्टींना महत्त्व देण्याच्या नादात गजलीयत हे गजलेचे व्यवच्छेदक लक्षण आहे, हे विसरले जात आहे. २. सुरेश भट यांनी मराठी गजलचे नियम ठरवताना फारसी किंवा उर्दू लिपीचे नियम देवनागरी लिपीवर लादले. परिणामी काफिया हा स्वरसाम्यतेने सिद्ध होतो, व्यंजनसाम्यतेने नाही, हे महत्त्वाचे सूत्र हरवले गेले. ३. काफियाची ही तथाकथित तंत्रशुद्धता सांभाळताना मराठी गजल कृत्रिम होत गेली आहे. ४. काफियाचे तेच ते संच वापरावे लागल्याने एकसुरी होत गेले आहेत. मराठी गजलेचे मूळ दुखणे हे आहे. ५. तेव्हाच; ‘दिया’, ‘हवा’सारखे स्वरसाम्यतेने सिद्ध होणारे काफिये मान्य केले असते तर आज चित्र वेगळे दिसले असते.
मी माझे दोघांच्या आक्षेपांबाबतचे म्हणणे सूत्ररूपात मांडत आहे, ते असे :
१. मराठीत गझल ही गझलप्रेमी रसिक आणि गझलकार ह्या दोघांच्याही पातळीवर भौगोलिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्याही सर्वदूर पोचली आहे. ती भौगोलिकदृष्ट्या एकेकाळी पुण्या-मुंबईपुरती आणि सामाजिक दृष्ट्या मध्यमवर्गापुरती मर्यादित होती. आता मात्र ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तर पोचली आहेच; शिवाय ती ग्रामीण, दलित, आदिवासी, मुस्लिम अशा एकेकाळच्या अनेक उपेक्षित समाजघटकांपर्यंतही पोचली आहे. शिवाय, त्यात पुरुषांबरोबर स्त्रियांचेही प्रमाण लक्षणीय आहे. मराठी गझलेच्या ह्या सर्व संख्यात्मक वाढीला गुणात्मक वाढीचीही जोड मिळावी, ही सानेकर आणि डबीर यांची अपेक्षा योग्यच आहे. मात्र त्यांनी ती अपेक्षा व्यक्त करताना लावलेला तक्रारीचा, नाराजीचा सूर हा मराठी गझलकारांचा आत्मविश्वास काहीसा डळमळीत करणारा आहे.
२. मुळात हे लक्षात घेतले पाहिजे, की गझलेला कोणताही विषय – मग तो शहरी असो की ग्रामीण – वर्ज्य नाही. मात्र त्या विषयाची हाताळणी, मांडणी करताना गझलियतला हानी पोचता कामा नये. वर्णनपरता, निवेदनपरता, कथनपरता एवढ्यावर गझल थांबू नये; तर तिच्यातून चिंतनपरताही व्यक्त झाली पाहिजे आणि ती चिंतनपरता बाळबोध, सपाट नको; तर नाट्यात्मक असावी किंवा किमान प्रभावी तरी असावी. खरे तर, हे सर्व काही गझलेतून येणे हे अशक्य नसले, तरी अवघड मात्र नक्की आहे. म्हणूनच मराठी गझलेच्या आजपर्यंतच्या एकूण वाटचालीतील प्रत्येक टप्प्यावर गुणात्मक, दर्जेदार गझला कमी आढळतात; तर कच्च्या, फसलेल्या, न जमलेल्या, तंत्रशुद्धतेच्या नादात तंत्रशरणतेला बळी पडलेल्या, आभासी गझला मात्र जास्त आढळतात.
३.डबीर यांनी मराठी गझल कृत्रिम, एकसुरी झाली आहे, असे त्यांचे निरीक्षण नोंदले आहे. मला मात्र तसे वाटत नाही.
४. मी काफियाच्या तंत्रशुद्धतेबाबत सुरेश भट यांनी जो आग्रह धरला, त्याची परिणती पुढील काळात मराठी गझल कृत्रिम, एकसुरी होण्यात झाली, ह्या डबीर यांच्या निरीक्षणाशीही सहमत नाही.
५. भट यांनी ‘दिया’, ‘हवा’सारखे स्वरसाम्यतेने सिद्ध होणारे काफिये मान्य केले असते, तर आज चित्र वेगळे दिसले असते हे डबीर यांचे म्हणणे मला पटत नाही.
६. मराठी गझल कृत्रिम व एकसुरी होत गेलेली आहे असे मला वाटत नाही. घटकाभर गृहीत धरूया, की ती कृत्रिम, एकसुरी होत गेलेली आहे. मात्र त्याला कारणीभूत काफियाच्या तंत्रशुद्धतेचा आग्रह हे मात्र मला मुळीच पटत नाही. ‘आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी’, असे काहीसे तेथे झाले आहे. की काय ह्याचा मात्र शोध घेण्याची गरज मला वाटत आहे. बस्स, इतकेच!
– अविनाश सांगोलेकर sangolekar57@gmail.com