Home वैभव गावांच्‍या अंतरंगात मना मनांतील गावगाथा!

मना मनांतील गावगाथा!

0
_Man_manatil_Gavgatha_1.jpg

प्रत्येकाच्या मनात गावाबद्दलच्या आठवणी दाटलेल्या असतात. प्रत्येकाला त्या कोठेतरी मांडाव्यात, कोणीतरी वाचाव्यात आणि मुख्य म्हणजे त्या लिहाव्यात असे वाटत असते. आपल्या गावाविषयी लिहिणे-बोलणे यामागे मायेचा ओलावा दडलेला असतो. त्यामुळे माणूस कितीही मोठा झाला तरी तो त्याच्या गावाला विसरत नाही. त्याची नाळ त्या गावाशी कायमची जोडलेली राहते. त्याची मुले शहरात जन्मली असली तरी त्यांचेही गाव तेच असते. मात्र, बदलत्या परिस्थितीचा वेग पाहता माणसाची गावाशी जोडली गेलेली नाळ तुटत आहे का? अशी शंका मनात येई. ती ‘गावगाथा’साठी आलेले लेख वाचत असताना थोडी दूर झाली. स्पर्धेला प्रतिसाद कसा होता या विचारापेक्षाही लोकांना स्वत:च्या गावाविषयी अथवा गावापासून लांब गेलेल्यांना गावाच्या आठवणी लिहाव्याशा वाटल्या हे आम्हाला अधिक महत्त्वाचे वाटते. मुळात अशा ‘गावगाथा’ लोकांकडून लिहून घ्याव्या ही ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ची कल्पना वेगळी वाटली. कारण गावाबद्दल आपुलकी असलेल्या मनांपर्यंत जाणे आणि त्यांच्याकडून ‘गावगाथा’ लिहून घेणे हेच महत कार्य होय असे आम्हाला वाटले.

गावे हरवत आहेत. त्यांची अंगणे आणि उंबरे शहरांसारखी लहान होत आहेत. अर्थात गावेच नष्ट होत आहेत! कोणी आता गावात राहत नाही. त्यामुळे गावे ओस पडू लागली आहेत. मळ्यात राहण्याच्या संकल्पनेमुळे पूर्वीची गावे, जुनी घरे यांच्या मातीच्या गढ्या होऊ लागल्या आहेत. असे बदल काळानुरूप होणारच, पण मनात अनुभवलेले गाव अजून तसेच गजबजलेले आहे. गाव वाढू लागल्याने त्यांच्यातील वेगळेपण हरवून साचलेपण येऊ लागले आहे. त्यातच राजकारण गावात शिरल्याने माणसा माणसांत पक्षांच्या रंगांप्रमाणे भेद होऊ लागला आहे. मात्र, पूर्वीचे गावपण आणि काळानुरूप होणारे बदल नोंदवणे आणि त्यांना संग्रहित करणे ही गरज ‘गावगाथा’सारख्या उपक्रमांतून साध्य होताना दिसते, ही समाधानाची बाब आहे.

‘गावगाथा’मधील लेखांमधून गावाच्या वर्णनासोबत भूगोल, इतिहास, ग्रामदेवता, गावांच्या परंपरा, पर्यटनस्थळे, ऐतिहासिक वास्तू, तेथील मानवी कर्तबगारी आणि संस्थात्मक कामे या घटकांचा उल्लेख आवश्यक होता. त्याबरोबर बदलत असलेल्या गावांतील स्थित्यंतर नोंदवण्याचे कामही लेखकांनी केलेले दिसते. त्यामुळे लेखकांच्या मना मनांतील गावांविषयीचे प्रेम, आपुलकी त्यांच्या लेखणीतून व्यक्त झालेली दिसते. प्रत्येक गावात प्रत्येक गोष्ट असेलच असे नाही. मात्र लेखकांनी त्यांच्या गावांची शक्तिस्थळे समर्थपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. त्यांतील काही लेखांची अन् लेखकांची नोंद घ्यावीशी वाटली. त्यात प्रत्येक लेखाचा व लेखकाचा समावेश आहेच असे नाही. मात्र सर्वांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. त्यामुळे या प्रत्येकाने त्याच्या गावाबद्दलच्या जुन्या-नव्या माहितीचे अधिकाधिक संकलन करून गावाची छोटीशी, काही पानांची का असेना पुस्तिका तयार करायला हवी अन् दर दहा वर्षांनी त्या नोंदीत भर टाकली जावी. म्हणजे गावांना भूतकाळातील रेघांवर भविष्यातील मार्ग अधिक समृद्ध करता येतील.

सगळे लेख छानच आहेत. त्यांतील बरेचसे गावातील देवळे, लोक आणि संस्था यांच्यावर सीमित झाले असे वाटले. काही रम्य आठवणी सांगणारे आहेत.

जे चांगले वाटले त्यातील तीन निवडणे फारच कठीण होते. परंतु सर्वसामान्य लोकांनी त्यांच्या नजरेतून दिसलेले गाव दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये सर्वच जण जिंकले असे वाटते.

आणखी एक निरीक्षण असे आहे, की पुरूषांनी लिहिलेल्या लेखांपेक्षा महिलांनी लिहिलेले लेख जास्त जिवंत आहेत.

‘गावगाथे’साठी सर्वांगांनी लिहिले आहे ते जळगावच्या वैशाली महिपतराव तायडे यांनी. फैजपूर या त्यांच्या गावाविषयी. फैजपूर अनेक अंगांनी ऐतिहासिक आहे. ‘गावगाथा’साठी जे काही म्हणून, म्हणजेच गावाच्या वर्णनासोबत भूगोल, इतिहास, ग्रामदेवता, गावाच्या परंपरा, पर्यटन स्थळे, ऐतिहासिक वास्तू, तेथील मानवी कर्तबगारी आणि संस्थात्मक कामे या घटकांचा उल्लेख आवश्यक वाटतो. तो त्यांच्या लिखाणात मिळतो. गावे बदलत आहेत. त्यांची विस्तारत असलेली आर्थिक केंद्रे आणि त्या झपाट्यात बदलत असलेला माणूस अजूनही गावपण कशा पद्धतीने मनात साठवून आहे, हे त्या आवर्जून दाखवतात. त्या पूर्वीचे गावातील व्यवसाय आणि ते बंद पडून नव्याने सुरू झालेले व्यवसाय हा प्रवासही उलगडतात. त्यांनी मंदिरे, बाजार यांच्यात होत असलेला बदलही टिपला आहे. त्यांनी गावाची ओळख कशी बदलत गेली हे दाखवल्याने गावाचा प्रवास डोळ्यांसमोर उभा राहतो. साहित्यिकांच्या सहवासात फुललेले वैशाली तायडे यांचे फैजपूर नक्कीच पाहायला हवे असे वाटू लागते.

कोकणातील गाव म्हणजे निसर्गाने संपन्न असा स्वर्गच. निसर्गसौंदर्याबरोबरच त्या गावाला ऐतिहासिक पैलू लाभलेले असतील तर मेजवानीच म्हणायची. ती मेजवानी दिली आहे प्रेरणा चौलकर यांनी, त्यांच्या मुरूड-जंजिरा या गावाविषयीच्या लेखनातून. लोकांनी या गावाकडे फक्त किल्ला आणि तेथील इतिहास म्हणून अनेकदा पाहिले असेल. ते त्या गावाचे प्रमुख शक्तिस्थळ आहेच. मात्र, त्या गावातील इतर देवस्थाने, मुरूडकरांचे आतिथ्य, गावातील पायवाटा, पुरातन मंदिरे, तेथील खाद्यसंस्कृती आणि आमसुलांचे क कम सार या सगळ्यांबद्दल सांगताना प्रेरणा चौलकर वाचकाला मुरूड गावात नेऊन आणतात. त्या तेथील प्रथा, परंपरा, सण, उत्सव, गणपती हे तर सांगतातच; शिवाय, त्या त्यांच्या गावी धकाधकीच्या जीवनात चार सुखद क्षणांसाठी येण्याचे आमंत्रणही देतात. त्यामुळे त्यांची ‘गावगाथा’ भावते. बोरिवलीचे कमलाकर जाधव रत्नागिरीतील वेत्त्येवाडाची गोष्ट सांगताना देवीमंदिराचा उत्सव अन् समुद्रकिनारा सुंदर रंगवताना दिसले. त्यांनी गावावर आलेल्या खाऱ्या पाण्याच्या संकटासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन बंधाऱ्यासाठी दिलेल्या जमिनीमागील भावना अन् गावाच्या विकासासाठी सुरू असलेले प्रयत्न रेखाटले आहेत.

विदर्भातील आष्टी म्हणजे क्रांतिदिनाची आष्टी. युनियन जॅक जाळणारे पहिले गाव अशी त्यांच्या गावाची ओळख करून दिली आहे अभिजीत पानसे यांनी. विदर्भातील कुंभारी हे गाव अंगाखांद्यावर इतिहास घेऊनच नांदते. तुकाराम बिडकर यांनी तेथील ऐतिहासिक वारसा, विहिरी, ग्रामदेवता, पर्यटनस्थळे, निसर्ग, कला, क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक चळवळींचा आढावा घेतला आहे. गावात जे आहे त्याचा अभिमान आणि विशेष प्रयत्न असतील तर कुंभारीसारखे गाव साकारले जाते. तेथील व्यक्तिरूपके त्या गावाला वेगळेपण मिळवून देताना दिसतात. कुंभारीचे नाट्यचित्रपट कलाकार हे कुंभारीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. लेखक, गीतकार, दिग्दर्शक, कलाकार त्या गावातून घडल्याने आणि त्या कलाकारांमुळे व कुंभारीच्या सिनेरूपामुळे अनेक चित्रपटांचे शूटिंगही त्या गावात झाले आहे. त्यामुळे कुंभारीला अकोला जिल्ह्याची ‘फिल्मसिटी’ असे म्हटले जाते. वेगवेगळ्या क्षेत्रांतील अनेक पुरस्कार त्या गावाला स्वाभाविकच लाभले आहेत. तुकाराम बिडकर यांनी तो लेखाजोखा उत्कृष्टपणे मांडला आहे.

गावागावांतील सण, उत्सव, प्रथा, परंपरा यांची तुलना होऊ शकत नाही. त्यामुळे लेखकांचे त्यांचे गाव इतरांना माहीत व्हावे या ओढीने लिहिण्याबद्दल कौतुकच करायला हवे.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गाव मनाला भावते, ते तेथील ऐतिहासिक वारसा अन् सनर्इचौघड्यांची गेल्या शंभर वर्षांपासूनची अनोखी परंपरा यामुळे. धिंगाणाखोर गाण्यांमुळे सनर्इ सूर कार्यक्रमांमधून हद्दपार होत आहेत. ते आता फक्त एखाद्या विशिष्ट कार्यक्रमातून ऐकू येतात. अशा क्षणी एखाद्या गावाने त्याच्या काळजात सनर्इचे सूर पहाटेपासून रात्रीपर्यंत जोपासले असतील तर ते गाव किती सुंदर असेल, असा प्रश्न वागदरीविषयी आपुलकीने लिहिलेल्या धोंडप्पा मलकप्पा नंदे यांचा लेख वाचताना वाटू लागला.

रायगडच्या महाडबद्दल काय बोलायचे? ऐतिहासिक, सामाजिक आणि धार्मिक अशा सगळ्या अंगांनी महाड समृद्ध आहे. पर्यटन स्थळ म्हणूनही महाड सुंदर आहे. तेथील व्यक्ती आणि कार्य यांबद्दल वेगळे सांगायला नको. ती अनुभूती महाडच्या ज्योती शेठ त्यांच्या लेखातून करून देतात. शैलेश गावंड यांनी रायगडमधीलच देवशेत हे गाव जिवंत केले आहे. नीता जाधव महाडजवळचे लाडवली हे गावही किती लाडके आहे ते आवर्जून सांगतात. तसाच गोडवा कोकणातील इतरही गावांना आहे. त्यात चौल-रेवदंडा या गावाविषयी लिहिले आहे शरयू गणपत्ये यांनी. मोहन पाटील अलिबागचे काचळी हे गाव डोळ्यांपुढे उभे करतात. मुंबर्इ-गोवा मार्गावरील नाधवडे हेही सुंदर गाव, तर कमलाकांत सावंत नाटळ या गावाविषयी लिहितात. जगदीश नार्वेकर रत्नागिरीतील आंबोळगड प्रतिगोवा कसा आहे हे सांगताना थकत नाहीत. तसेच प्रेम, चंद्रशेखर बुरांडे त्य़ांच्या लातूरवर व्यक्त करतात. त्यांच्या लेखणीतून कोकणी माणूस किती गोड असतो तेही समोर येते.

पुणे तेथे काय उणे? त्यामुळे पुणे जिल्ह्यातील अनेक गावांना पुण्याच्या इतिहासाने स्पर्श केलेला दिसतो. त्याच्या पाऊलखुणा चरोली (चऱ्होली) या गावातून पाहण्यास मिळतात, उस्मानाबादमध्ये राहणाऱ्या दगडू खोसे यांनी तो सुंदर अनुभव घडवला आहे. पुण्यासारखेच नाशिकही वेगळे आहे. तेथील माणसे, स्थळे, शहरे एका वेगळ्या धाटणीत बांधली गेली आहेत. त्यातील मालेगाव हे एक. त्याबद्दल आपुलकीने लिहिले आहे डॉ. विनोद गोरवाडकर यांनी. त्यांच्या मालेगावबद्दलच्या नोंदी ते पक्के मालेगावकर असल्याची साक्ष देतात. तसाच अनुभव येतो सांगली संस्थानातील उगार खुर्द या गावाविषयी कोल्हापूरच्या खुर्शीद लाटकर यांनी लिहिलेल्या लेखातून. साखर कारखाना त्यांच्या गावाची स्थिती कशी बदलवून टाकतो हे लिहिताना त्यासाठी योगदान केलेल्या मंडळींबद्दलही त्या भरभरून लिहितात. मकरंद जोशी यांनी श्रीस्थानक म्हणजेच ठाणे या शहराचा ऐतिहासिक आढावा लेखातून घेतला आहे, तर जनार्दन वारघडे ठाण्यातील वेळूक या गावाविषयी लिहिताना कधीतरी ‘वे ऑफ लूक’ त्यांच्या गावाकडेही टाका असे आवर्जून सांगतात. मुंबर्इकर असलेले उमेश निराळे मुंबर्इच्या गर्दीत अमरावतीची आपुलकी जपून आहेत. ते त्यांचे अमरावती पाहण्यासारखे आहे हे सांगतात. कल्याण डोके खर्ड्याचा इतिहास अन् महती त्यांच्या लेखातून सांगतात. विलेपार्लेच्या नलिनी वेटे यांनी केलेला वेंगुर्ल्याची गाथा उलगडण्याचा प्रयत्न वेगळाच वाटतो, तर ‘माझा गाव काळजाचा ठाव’ असे सांगत रेखा नाबर वेंगुर्ल्याच्या वैशिष्ट्यांचा आढावा घेतात. कांदिवलीच्या सदानंद महाडिक यांनी त्यांना गावाच्या प्रेमापोटी वयानुसार आलेला कोणताही अडथळा क्षुल्लक वाटल्याचा अनुभव सांगितला आहे. त्यांनी दापोलीतील नवानगरविषयी लिहिले आहे. त्यांचे हात लिहिताना कापत असणार. दापोलीच्या वळणावळणाच्या रस्त्याप्रमाणे आणि समुद्राच्या लाटांप्रमाणे त्यांचे गावावरील प्रेम अक्षरलेखनातून पाहण्यास मिळाले. हर्षद तुळपुळे राजापुरातील अणसुरे गावाचे समाजजीवन व मन लेखातून उलगडताना दिसतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काळसे गावाच्या निसर्गसौंदर्याविषयी लिहिले आहे पल्लवी राऊळ यांनी. कांदिवलीचे बजरंग तावडे त्यांच्या सिंधुदुर्गमधील कुंभवडे गावाविषयी सांगताना तेथील धबधबे आणि गावच्या एकजुटीविषयी भरभरून लिहिताना थकत नाहीत. मुंबर्इकर (जोगेश्वरी) असलेले सुदर्शन मोहिते रायगड जिल्ह्यातील त्यांच्या नागाव (गोरेगाव) विषयी लिहिताना तेथील यात्रा, बदलत असलेले गावाचे स्वरूप यांविषयी लिहितात. ते मुंबर्इत कितीही पैसा असला तरी सुख गावातच असल्याचे आवर्जून सांगतात. कर्जत म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत वसलेला तालुका. त्या गावाविषयी आपलेपणाने लिहिले आहे सागर सुर्वे यांनी. तसाच अनुभव अलिबागविषयी लिहिलेल्या लेखातून येतो. तो लेख लिहिला आहे सुजाता टिपणीस यांनी.

वसर्इतील गिरीज गावाचे वेगळेपण, हिंदू-ख्रिस्ती समाज अन् इतिहास यांविषयी रामकृष्ण चौधरी माहिती करून देतात. वसर्इतील आगाशी गावाची महती बिपिनचंद्र ढापरे सांगतात. पणजीपासून चाळीस किलोमीटरवर असलेल्या नाहिचीआड गावाचे उत्सव, सण, गणपती अन् मालवणी यांचा गोडवा कसा ग्लोबल झाला आहे हे बोरिवलीचे विश्वनाथ कांबळी सहजपणे सांगतात. नालासोपाऱ्याचे हेमंत मराठे त्यांच्या कोकणातील ओगलेवाडीच्या आठवणींना उजाळा देतात व तेथील उत्सवाच्या रम्य गोष्टी सांगतात. पालघर जिल्ह्यातील नेहरोली या गावाविषयी जयेश जाधव यांनी मोजक्या शब्दांत खूप काही मांडले आहे. मालाडच्या आशीष आजगावकर यांना अजूनही त्यांचे सिंधुदुर्गातील तोंडवळीचे पठार साद घालते. मालवण तालुक्यातील देवबाग सुंदर गाव आहे याबद्दल आनंदराव खराडे ‘देवबाग आपलाच आसा’ हे सांगण्यास विसरत नाहीत. पेण तालुक्यातील दादर हे गाव. तेथील आगरी समाज, तेथील पाण्याची समस्या अन् गुंडगिरीच्या प्रभावातून गाव नव्या दिशेने प्रवेश करत असल्याची अनोखी कथा मांडली आहे कथालेखक एम. एन. म्हात्रे यांनी. रायगड जिल्ह्यातील कोंझर या त्यांच्या गावाविषयी ओंकार कंक मनस्वी लिहितात. वाडी वरावडे या गावातील देवी भराडी, महापुरूषाचा पिंपळ, गोठणीचा वड देवस्थान अन् झुळझुळ वाहणारी नागझरी यांविषयी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हरिदास मेस्त्री यांनी लिहिले आहे.

परभणीतील कोठा या गावाविषयी लिहिताना मल्हारीकांत देशमुख गणपतीसह गावातील शक्तिस्थळे उलगडतात अन् गावाच्या विकासाबाबत गावातून नोकरीसाठी बाहेर पडलेल्या माणसांनाही ओढ असल्याचे आवर्जून सांगतात. सातारा जिल्ह्यातील पाटेघर या सुंदर गावाविषयी माहिती देताना त्या गावाचे ऐतिहासिक अंग व आतापर्यंतचा आढावा जे.जे. शेलार यांनी घेतला आहे. रामवाडी-पेणचे प्रल्हाद धामणकर सातारा जिल्ह्यातील धामणेरविषयी सांगताना धामणेरच्या प्रगतीत वाटा असणाऱ्या मंडळींच्या कामाचा आढावा घेतात. सातारा जिल्ह्यातील कर्नाळा या गावाचा आढावा घेतला आहे भारत बंडगर यांनी, तर निंबाळक गाव उलगडले आहे प्रा. माधवी पवार यांनी. ठाण्याचे उदय आर्यमाने त्यांच्या साताऱ्याविषयी भरभरून लिहितात. ट्रेकिंगची आवडही त्या गावाने लावल्याचे ते सांगतात. माहीमचे दिलीप धायगुडे यांनी सातारा जिल्ह्यातील वाघोशी गावाचा शिवार त्यांच्या सुंदर हस्ताक्षरात उलगडला आहे. राजाचे कुर्ले हे गाव कृष्णात जाधव त्यांच्या लेखातून मांडतात. बोरिवलीचे मनोहर जोगळेकर बेळगाव जिल्ह्यातील खानापूरातील मलप्रभेच्या आठवणी सांगताना हरवून जातात. बदलापूरचे प्र. कृ. रत्नाकर त्यांच्या कोपरगावातील कोऱ्हाळे गावातील चिरेबंदी माड्या, तेथील लोक, संघटना अन् बदल यांविषयी लिहितात. व्यवसायाने फोटोग्राफर असलेले कोपरगावचे हेमचंद्र भवर कोपरगावसह आजूबाजूच्या गावातील मंदिरे व उत्सव यांचा आढावा घेतात. अहमदनगरचे अशोक गुडगल यांनी त्यांच्या वडगाव गुप्ता या गावाविषयी मोकळेपणाने लिहिले आहे. शशिकला बागर्डे ही विद्यार्थिनी अहमदनगर या त्यांच्या गावाच्या शक्तिस्थळांबद्दल माहिती देते. तसेच, पाथर्डी तालुक्यातील मोहटा गावाविषयी अभिजीत दहिफळे लिहितात. सुंदर हस्ताक्षर हे कोणत्याही व्यक्तीला सहज आकर्षित करते. तसेच, अहमदनगरचे शेख मिराबक्ष खुदाबक्ष बागवान यांनी वडाळा महादेव या गावाविषयी वेगवेगळ्या अंगांनी वैशिष्ट्यांची मांडणी केली आहे.

नाशिकला काही शब्दांत बसवणे अवघडच आहे. मात्र उषा गावडे यांनी तेथील मंदिरे, कुंभमेळा, उत्सव, ऐतिहासिक व्यक्ती आणि उपक्रम यांचा आढावा घेत नाशिक मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील विरगावाविषयी तेथील ग्रामदैवत, प्रथा-परंपरेविषयी लेख वाचनीय आहे. ठाण्यातील सुभाष खैरे यांनी चांदवड तालुक्यातील वाहेगावाविषयी आपलेपणा व्यक्त केला आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील रावणगावाविषयी व तेथील शिर्सुफळ तलावाविषयी सचिन गाढवे यांनी सुंदर माहिती दिली आहे. पाण्याचे महत्त्व गावासाठी किती असते हे त्यांना त्यातून सांगायचे आहे. तर इंदापूरविषयी विलास पंढरी हे ऐतिहासिक व भौगोलिक आढावा घेतात. राजगुरूनगर तालुक्यातील गोरेगावच्या प्रथा-परंपरा यांवर दिलीप चिमटे प्रकाश टाकतात. कोल्हापूरचे धनराज भोसले यांनी नाधवडे गावाची माहिती देत गावातील विविधतेवर प्रकाश टाकला आहे, तर कोल्हापूरच्या पुरेपूर व्यक्तिमत्त्वावर संगीता देवकर प्रकाश टाकतात.
बीडचे हणमंत कऱ्हाडे यांनी अंबाजोगार्इचा मनोहरी इतिहास मांडत भौगोलिक माहात्म्य, मंदिरांचा वारसा; तसेच, व्यक्ती व शैक्षणिक संस्था यांचे माहात्म्यही मांडले आहे. वीणा कुलकर्णी यांनीही अंबेजोगार्इच्या धार्मिक, तीर्थपर्यटन अन् अन्य शक्तिस्थळांवर प्रकाश टाकला आहे. गावाची महती सांगताना ती अध्यायरूपात सांगणे हे अवघडच. कारण छंदकवितेपासून दुरावलेल्या आजच्या पिढीला तशी रचना नामानिराळीच वाटेल. पण धोंडिबा मिरगे यांनी औरंगाबादमधील सिल्लोड तालुक्यातील वरूड गावाविषयी चक्क अध्यायरूपात इतिहास व गाव यांची माहिती दिली आहे. ते त्यांच्या लेखनाचे वेगळेपण भावते. त्यातून गावाविषयीचे प्रेम स्पष्ट होते. तसेच, दहिसरचे गणपत दत्ताराम चव्हाण त्यांच्या ‘चाललो कुठे आपण आज’ या काव्यस्वरूपातील स्वलिखितातून कोल्हापुरातील त्यांच्या गावाविषयी तळमळीने लिहितात. दादरचे अरुण राठोड त्यांच्या औरंगाबादच्या मारसावळी गावाविषयीच्या आठवणी उलगडतात. रहिमाबाद या गावाविषयी एखादा शाहीर किती सुंदर लिहू शकतो त्याचा अनुभव सुमतिनाथ अन्नदाते यांच्या लेखातून घेता येतो. त्यांनी रंगवलेले रहिमाबादचे उत्सव, प्रथा, परंपरा यांनी मन तृप्त होते. तर तेथील लासूर स्टेशनविषयी लिहितात प्रकाश मालवनकर. औरंगाबादच्या स्वाती देशपांडे त्यांच्या औरंगाबादमधील वारसा स्थळांचा आढावा घेत त्यांचे गाव किती ऐतिहासिक आणि वेगळे आहे याची जाणीव करून देतात. बारावीत शिकणारा राहुल तोरणेकरही त्याच्या गावाविषयी भरभरून लिहितो.

उस्मानाबाद येथील अक्षता किरकसे त्यांच्या गावाविषयी लिहिताना उस्मानाबादचे शक्तिस्थळ तुळजाभवानीसह तेथील गुलाबजामचा गोडवा एकदा अनुभवण्यासाठी येण्याचे आमंत्रण देतात. तर श्रद्धा साळुंके त्यांच्या तुळजापूर गावाचा ऐतिहासिक व सांस्कृतिक आढावा लेखातून घेतात. अमरावतीच्या विशाखा पोफळे त्यांच्या अकोला जिल्ह्यातील आकोट या गावाविषयी भरभरून लिहिताना आकोटचा ऐतिहासिक आढावा घेतात. तर त्याच जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील लेणी या गावाचे शिल्पसौंदर्य भाऊराव धर्वे यांनी वर्णन केले आहे. निलेश कवडे त्यांचे अकोल्याच्या मोर्णा नदीविषयी प्रेम व्यक्त करतात, तर विनायक बोराळे अकोल्याची कहाणी मनोहारी शब्दांतून उलगडतात. शशिकला ढगे यवतमाळबद्दल आपुलकीने लिहितात. जालन्याचे पी.जी. तांबेकर यांनी टेंभुर्णीची कहाणी व तेथील संस्था-संघटना यांचा आढावा, वारसा रेखाटला आहे. जळगावचा विजय सूर्यवंशी त्यांच्या जामनेर या गावाविषयी भरभरून लिहितो अन् गावावर कविताही करतो. बुलडाण्याचे चिंतामण जाधव यांनी त्यांचे गाव वेगळ्या शैलीत उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. सोलापुरातील वाळूज (देगाव) या गावाचे सांस्कृतिक संचित मांडण्याचा प्रयत्न अरविंद मोटे यांनी केला आहे.

‘गावगाथा’साठी लेख पाठवणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या समाधानकारक होती. त्यांना त्यांच्या गावाची आठवण का यावी? खरे तर हा प्रश्न विचारायला नकोच. त्यांच्यासाठी ते गाव म्हणजे फक्त गाव नाही. त्यांना गावातील अनेक नातीगोती, मैत्रिणी आणि प्रत्येक पाऊलवाट माहेराची आठवण करून देते. त्यामुळे ‘गावगाथा’साठी महिलांकडून लेख अधिक येणे आम्हाला अधिक भावले. त्यांचा एका गावातून दुसऱ्या गावात झालेला प्रवास अन् या गावाविषयी किती लिहू ही त्यांच्या मनातील धांदल त्यांना दोन्ही गावांशी किती एकरूप करते हे दाखवूनही देते. माहेरच्या आठवणीत दंग झालेले काही लेख मनस्वीपणे गावगोष्टी सांगतात. कांदिवलीच्या रजनी वैद्य या आजीबार्इ त्यांचे माहेर कणकवली या गावाच्या आठवणीत दंग होऊन जातात. अलिबागच्या सुंदर आठवणी सांगताना वर्षा चांदणे हरवून जातात. उस्मानाबादच्या अश्विनी ढगे त्यांच्या आष्टा कासार या माहेरच्या गावाविषयी लिहिताना कवितेतून हळव्या होतात. पुण्याच्या वारज्यातील वृषाली पंढरी यांनी पारोळा या गावाविषयी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच, सोलापूरच्या मंदाकिनी डोळस यांनी ‘माहेर माझे पंढरी’ म्हणत कोळगावच्या आठवणी मांडल्या आहेत. पुण्यातील पूजा सामंत यांनी कोल्हापुरातील उत्तूर गावातील त्यांच्या माहेराविषयी मनमोकळे केले आहे. सध्या नाशिकला राहणाऱ्या हेमलता झंवर त्यांच्या संगमनेरविषयी भरभरून लिहितात. तसेच, पुण्यातील संजीवनी केळकर त्यांच्या सांगोलेपर्यंतच्या प्रवासाबरोबर सांगोले येथील माणसे अन् तेथील इतिहास शब्दबद्ध करताना दिसतात.

गाव हे त्याच्या प्रत्येकाच्या आठवणीतील एक हळवा कोपरा जसा असतो; तसेच, त्या गावच्या स्थित्यंतराचे काही दु:खही असते. त्यावरच मार्मिक बोट ठेवण्याचा प्रयत्न साताऱ्यातील महाळुंगे (वज्रेश्वरी) गावच्या स्मिता भोसले यांनी हळुवारपणे केला आहे. त्यांनी त्या पुनर्वसनाची कथा अन् व्यथा मांडताना आधीच्या गावचा सुखद कोपराही उलगडला आहे आणि त्या आठवणींच्या जोरावर नव्या गावाचे नवेपण अडचणींच्या दऱ्याखोऱ्यातून कसे साकारले जात आहे हे, त्या उलगडून सांगतात. खरे तर, ‘गावगाथे’चा हा भाग नव्हे; मात्र, त्या लेखाची दखल घेतल्याशिवाय राहवत नाही. कारण सुखदु:खाच्या क्षणांतूनच गाव साकारते, ते मनात वसते आणि आपलेसे होते. त्यातून गावगाथा साकारते. एक गाव नष्ट होते तर दुसरे त्या आठवणींवर उभे राहते. गावगाथेत सहभागी झालेल्यांनी केलेली पेरणी भविष्यात कसदार पीक देईल अन् त्या समृद्धीची ती पायवाट ठरेल यात शंका नाही.

– रमेश पडवळ/ मनीष राजनकर/ नितेश शिंदे, rameshpadwal@gmail.com

About Post Author

Exit mobile version