मंद्रूप हे गाव सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण सोलापूर तालुक्यापासून पंचवीस किलोमीटर आणि कर्नाटक सीमेपासून बारा किलोमीटर अंतरावर, सीना-भीमा या दोन नद्यांच्या मध्ये वसले आहे. गाव टुमदार आहे. मंद्रूप गावाला तेथील ग्रामदैवत मळसिद्ध, कपिलसिद्ध मल्लिकार्जुन, प्रति-पंढरपूर विठ्ठल मंदिर आणि शेखसाहब दर्गा यांच्या माध्यमातून महात्म्य लाभले आहे. समजूत अशी आहे, की ही सगळी मंडळी पूर्वी पृथ्वीतलावर मानवाच्या रूपात अस्तित्वात होती. त्यांना विधायक कार्याने देवत्व प्राप्त झाले. ते सगळे शंकराचे उपासक होते. गाव कर्नाटकातील बिदर बादशहाच्या महसुलाचे मुख्य ठिकाण होते. त्यावेळी ज्वारी महसूल म्हणजे लेव्ही म्हणून दिली जात असे.
गावाच्या आजूबाजूला जवळपास चाळीस खेडी आहेत, त्यामध्ये वांगी, निबर्गी, तेलगाव, टाकळी, मनगोळी यांचा समावेश होतो. त्यामुळे मंद्रूप गाव तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण मानले जाते. तेथील ग्राम पंचायतीची स्थापना 1934 साली झाली. गावाची लोकसंख्या सतरा हजार पाचशे इतकी आहे.
मळसिद्ध महाराज मेंढपाळ घेऊन येथे आले अशी आख्यायिका आहे. सिद्ध महाराज व तत्कालीन बिदर संस्थान यांच्यात त्या काळी भीषण युद्ध झाले. त्या सिद्ध पुरुषाने लढाईत घोंगडीमध्ये भंडारा घालून उधळल्यावर बाणांचा मारा सुरू केला. त्यातून बिदर संस्थानाचा पराभव झाला अशी दुसरी आख्यायिका सांगितली जाते. अमोगसिद्ध देवाची यात्रा श्रावणामध्ये निसर्गाच्या बनात भरते. भक्तमंडळी मल्लिकार्जुनाच्या दर्शनासाठी, दरवर्षी पाडव्याला, मंद्रूपहून श्रीशैलम येथे चालत जातात.
‘मलिदाचा नैवैद्य’ हा गरम चपाती हातांनी किंवा मिक्सरमध्ये कुस्करून त्यात गूळ, खोबरे, सुंठ घालून तयार केलेला एक चविष्ट पदार्थ आहे. मुसलमान दैवतांना विशेष करून हा नैवैद्य म्हणून देतात.
शेखसाहेब दर्ग्याला समस्त गावकऱ्यांकडून ‘मलिदा’चा नैवेद्य असतो. मळसिद्ध आणि मलकारसिद्ध देवाचे पुजारी हे ‘डपावरची गाणी’ म्हणतात. पुजाऱ्यांना त्या ठिकाणी ‘महाराया’ म्हणतात. कै. मदू महाराया हे स्वतः कन्नडमध्ये श्रवणीय आणि प्रबोधनात्मक गाणी रचत. ती गाणी महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये प्रसिद्ध आहेत. ‘डप’ हे गळ्यात अडकावून दोन्ही हातांनी वाजवायचे पारंपरिक वाद्य आहे. त्या वाद्याला कन्नडमध्ये ‘ड्योळा’ असे म्हणतात. आता कै. मदू महाराया यांची गादी श्री औदुसिद्ध महाराया चालवत आहेत. ‘डप या वाद्यांसोबत मोठ्या आकाराचे ‘टाळ’ही वाजवले जातात, त्याला कन्नडमध्ये ‘चाळम्मा’ म्हणतात. ‘रविवार’ हा त्या ग्रामदेवतेचा वार आहे, त्या दिवशी गावातील मुस्लिम बंधू-भगिनी मळसिद्ध देवाच्या दर्शनासाठी येतात. शेखसाहेब दर्ग्याचा ‘उरूस’ असतो. मुसलमान बंधू-भगिनींचा तो मोठा सण. त्या दिवशी ‘डोली’ बसतात, ‘पंजे’ उभारले जातात. गावातील जवळपास सर्वांच्या घरातून ‘डोली’साठी मलिदाचा नैवेद्य दिला जातो. इतर समाजातील मुले आनंदाने गळ्यामध्ये, हातामध्ये लाल-पिवळया धाग्याचा दोरा बांधून घेतात, त्याला ‘फकीर’ म्हणतात. मीही माझ्या आईबरोबर जाऊन हा दोरा बांधून घ्यायचो, खूप आनंद व्हायचा. अशा प्रकारे सर्वधर्मसमभावाची शिकवण मंद्रूपच्या गावकऱ्यांकडून जोपासली गेली आहे.
गावाच्या दक्षिणेला ‘वेस’ आहे. मंद्रूप गावामध्ये मोठी बाजारपेठ आहेच. तेथे लहान-मोठे किराणा, कापडाचे व्यापारी, मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्सची अशी लहान-मोठी दुकाने थाटलेली आहेत. कपडे, मसाले, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मिठाई या वस्तूंची तेथे रेलचेल असते. गाव-बाजार दर शुक्रवारी मळसिद्ध देवालयाच्या बाजूस भरतो. शिवारातून आणि आजुबाजूच्या गावांतून व्यापारी त्या ठिकाणी येतात. मळ्यातून आलेला ताजा भाजीपाला, फळभाज्या घेण्यासाठी एकच झुंबड उडते. पाळीव प्राण्यांची बाजारपेठदेखील त्या ठिकाणी भरली जाते.
मंद्रूप गावकऱ्यांची मातृभाषा मराठी असली तरीही बोली भाषा ‘कन्नड’ आहे. कन्नड भाषा बोलणाऱ्या गावकऱ्यांचे शिक्षण मात्र मराठीतून होते. गावातील प्रत्येकाला कन्नड बोलता येते, पण लिहिता आणि वाचता येत नाही. गावकऱ्यांचे प्रेम मराठी आणि कन्नड या दोन्ही भाषांवर आहे.
मंद्रूपमधील वीरांचा सहभाग भारतीय स्वातंत्र्य लढाईत होता. ते महात्मा गांधींच्या ‘चले जाव’ चळवळीत भूमिगत लढ्यात सहभागी होते. त्या स्वातंत्र्यवीरांची आठवण म्हणून मंद्रूप बसस्थानक चौकात हुतात्मा स्तंभ उभारला गेला आहे. शहीद लेफ्टनंट कर्नल दत्ता पुजारी यांचे शिक्षण मंद्रूपमध्ये झाले आहे. दत्ता पुजारी सर हे मला नववीला महात्मा फुले विद्यालय येथे गणित हा विषय शिकवण्यास होते. त्यांचे मूळ गाव होनमुर्गी हे मंद्रूपपासून सहा किलोमीटरवर आहे. ते शिक्षकाची नोकरी सोडून सैन्यात दाखल झाले. ते 16 जुलै 2002 रोजी अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झाले. मंद्रूप गावाने विविध क्षेत्रांत सेवा बजावली आहे.
‘शेती’ हा तेथील गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय. अर्थात, शेतकरीवर्ग तेथे मोठया प्रमाणावर आहे. तरुणांचा कल विविध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आधुनिक शेती करण्याकडे वाढत आहे. कर्नाटकातील व्यापारी तेथे व्यापाराकरता येतात. ‘ग्रूप मंद्रूप’मधून रोज पाच हजार लिटर दूध संकलन केले जाते. सरपंच काझी यांनी स्वतःची प्रॉपर्टी विकून 1972 च्या दुष्काळामध्ये विहीर बांधली. सिद्धेश्वर म्हेत्रे बंधूंनी त्यांच्या विहिरीचे पाणी पिकांना पाणी न देता पिण्यासाठी राखून ठेवले. गावात शेतीपूरक उद्योग आहेत, पण इतर काही लघुउद्योग यशस्वीपणे चालू आहेत. मंद्रूपकरांनी काळ्या मातीत रमत असतानाच, तांबडया मातीमध्ये शरीर कमावून ‘पहेलवान’ बनण्याची आवड जोपासली आहे. प्रत्येक यात्रेच्या वेळेस कुस्तीचा फड रंगतोच. गावात कुस्ती स्पर्धा घेतल्या जातात. मंद्रूपमध्ये तालीम व व्यायाम शाळा चालवली जाते. मंद्रूप हे कुस्तीप्रेमी गाव म्हणून प्रसिद्ध आहे. गावात म्हेत्रे बंधू, लोभे, मुगळे, टेळे, वाघमोडे, ख्याडे हे प्रसिद्ध कुस्तीगीर होऊन गेले. गावातील पहिली सीए होण्याचा मान – स्वागता विकास देशपांडे (2018) यांना मिळाला आहे.
गावात संगीत भजन मंडळे आहेत. लोककलेतील खडकी वग या गावात गायले जाते. गावाने लोककला जपली आहे.
सोलापूरला सुसज्ज असे ‘सोलापूर हवाई अड्डा’ या नावाचे विमानतळ आहे. मंद्रूप गावापासून तो वीस किलोमीटर अंतरावर आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी प्रवाशी विमान सेवा सुरू होती. परंतु काही कारणाने ती विमानसेवा बंद झाली. ती पुन्हा सुरू होण्याची चर्चा आहे. मंत्र्यांची विमानांची सेवा सुरू आहे. मंद्रूपमधून राष्ट्रीय महामार्ग जातो.
– अरविंद म्हेत्रे
arvind.mhetre@gmail.com
खर्या पद्ध तीने मन्द्रुप च…
खर्या पद्ध तीने मन्द्रुप च वर्णन केलात सर
No Word Uncle Outstanding…
No Word Uncle Outstanding writing
खुप छान
खुप छान
गावचीसंपुर्ण माहीती मिळाली…
गावचीसंपुर्ण माहीती मिळाली ऐकदम चांगल वाटल
सर आपण
खूपच सुंदर माहिती…
सर आपण
खूपच सुंदर माहिती संकलित केलात .अजून थोडी वाढवलाततर बरं होईल .आपल्या मूळ ग्रामदैवत सकळेश्वर आहे तसेच आपल्या गावात खूप प्राचीन परपरा असणारे शिवयोगेश्वर मठ आहे आपले मठाधीश आहेत याचाही उल्लेख केलात तर बरं होईल तसेच हनुमान मदिर खूप म्हणजे ७००-८००वर्षाचे आहे खूप आकर्षक व मोठी मूर्ती आहे याचा आढावा घेतला असता आपल्या कार्यात आणखी नवीनता येईल ही अपेक्षा ,ही विनंती .
सर माहिती खूप छान आहे पण…
सर माहिती खूप छान आहे पण आपल्या गावचा इतिहास अजून सविस्तर जर सांगितला तर अति उत्तम होईल प्रत्येक गावाला काही ना काही जुना इतिहास असतो तसा आपल्या गावाला मौर्य, सातवाहन , यादव ,शिवशाही ‘ व ब्रिटनाशकालीन याचा आढावा घेतला असता आपल्या कार्यात आणखी नवीनता येईल ही अपेक्षा ,ही विनंती .
kharya arthane south solapur…
kharya arthane south solapur chi & mandrup gavachi history kalali
Chan history
Chan history
Nice sir
Nice sir
Comments are closed.