‘मंत्रा’वेगळा आशुतोष गोवारीकर…

0
32

भारतात काय किंवा जगभरात, कुठेही काय, चित्रपटसृष्टीतले ग्लॅमर बहुधा कलावंतांच्या खात्यावर जमा होते. चित्रपटनिर्मितीचा मुख्य सूत्रधार आणि श्रेय किंवा अपश्रेयांचा धनी हा, खरे तर, दिग्दर्शक असायला हवा. परंतु बहुतांश, सगळे तेज आणि सगळे वलय कलावंत लुटून घेऊन जातात आणि दिग्दर्शकाला मिळते आपण कॅप्टन असल्याचे केवळ मानसिक समाधान! आशुतोष गोवारीकर हा याबाबत सन्माननीय अपवाद ठरला आहे. कोल्हापूरचे चित्रतपस्वी भालजी पेंढारकर आणि व्ही. शांताराम यांच्यामागून दमदारपणे पावले टाकणारा आशुतोष गोवारीकर हा तरुण दिग्दर्शक कोल्हापूरने देशाला दिला. त्याने उमेदवारीच्या काळात सी.आय.डी.मालिकेतून शिवाजी साटम यांच्या साहाय्यकाचे काम केले. अमोल पालेकरच्या ‘कच्ची धूप’ या मालिकेतून आशुतोष अभिनेता म्हणून लोकांना प्रथम दिसला. पुढे तो ‘होली’, ‘गूँज’, ‘कभी हां कभी ना’, ‘सलीम लंगडे पे मत रो’ सारख्या सिनेमांत दिसला. पण त्याला अभिनय-कारकिर्दीत घट्ट मुळे रोवता आली नाहीत. मग दिग्दर्शन क्षेत्रातले पदार्पण असलेला ‘पहला नशा’  हा त्याचा चित्रपट दणकून आपटला. त्याच्या, आमीर खान नायक असलेल्या ‘बाजी’च्या दिग्दर्शनानेही बाजी मारली नाही. त्यामुळे ‘लगान’ हा त्याचा जीवन-मरणाचा प्रश्न बनला होता. आणि ‘लगान’ ने त्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. तो दिग्दर्शक व अभिनेता म्हणून अनेक आव्हानांना खंबीरपणे सामोरा गेला. तो दिग्दर्शन करताना आपण अभिनेता असल्याचे जाणीवपूर्वक विसरतो. आशुतोषला हिंदी सिनेमातील व्ही. शांताराम, गुरुदत्त, राज कपूर आणि मनोजकुमार प्रभृतींनी दिग्दर्शनाबरोबर अभिनय केल्याने त्यांच्याबद्दल आदर आहे.

दरम्यानच्या काळात, आपल्या अपयशाबाबत आत्मपरीक्षण करून ‘तथाकथित व्यावसायिक’ सिनेमांच्या आलेल्या ऑफर्स त्याने नम्रपणे नाकारल्या आणि तो ‘लगान’कडे वळला. आशुतोषने ‘लगान’च्या कथानकावर दोन वर्षे काम केले. ऐतिहासिक चित्रपट असूनही तो नव्या पिढीशी संवाद साधणारा असल्याने जर्मन, इटालियन आणि फ्रेंच रसिकांनीही ‘लगान’ डोक्यावर घेतला. लोकांनी चित्रपट महोत्सवात ‘लगान’ने प्रेक्षक पसंतीचा पुरस्कार पटकावला आहे,  इतका तो हिट-सुपरहिट ठरला. सुरुवातीला, अगदी आमीरनेही त्याच्या हा चित्रपट काढण्याच्या कल्पनेची खिल्लीच उडवली होती!

व्यवस्थापनतज्ञांनी ‘लगान’मध्ये व्यवस्थापनाची दहा मूलभूत तत्त्वे गवसली आहेत. लखनौच्या एका संस्थेने ‘केस स्टडी’ म्हणून ‘लगान’चा अभ्यासक्रमात समावेश केला आहे.

रिस्की, महाखर्चिक (25 कोटी) व महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे नेतृत्व करताना आशुतोषचा ‘लगान’च्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास होता. पहिले दोन्ही चित्रपट फ्लॉप गेले होते, तेव्हा आशुतोषने प्रेक्षकांच्या हमखास यशाची पठडीबाज गणिते मांडून  कथा-पटकथा रचली होती. त्यानंतर मात्र त्याने आपल्या अंतर्मनातील आवाजाचा कौल ग्राह्य मानून पुढील वाटचाल यशस्वी केली.

‘लगान’चे यश (15 जून 2000 रोजी प्रदर्शित), त्याला मिळालेले ऑस्कर नामांकन आणि त्यानंतर ‘स्वदेस’ हा संपूर्ण वेगळ्या पठडीतला त्याने दिलेला चित्रपट हा त्याचा प्रवास मराठी मान आणि शान उंचावणारा आहे; तसेच ह्यामुळे त्याला चार टॉपच्या दिग्दर्शकांत योग्य स्थान मिळवून आहे.

‘लगान’च्या पूर्वी अनेक वर्षे भारतातून चित्रपट ऑस्करसाठी जात असत, परंतु सर्वसामान्य भारतीयांपर्यंत ‘ऑस्कर’चे महात्म्य पोचले ते ‘लगान’मुळे. आशुतोष गोवारीकरचे दिग्दर्शक म्हणून पाच चित्रपट आलेले आहेत, त्याने पाचवा ‘जोधा अकबर’ भव्यदिव्य निर्माण केला. त्यात ऋतिक रोशन-ऐश्वर्या राय अशी लोकप्रिय स्टारकास्ट घेतली. हा चित्रपट माफक लोकप्रिय ठरला, परंतु ह्यामुळे आशुतोषचा दबदबा वाढला.

अभिनेता म्हणून त्याची कारकीर्द अधिक मोठी आहे. परंतु लक्षात राहावी, अशी एकही भूमिका त्यात नाही. ‘लगान’मुळे त्याच्या अभिनयाच्या प्रयत्नांना अधिकृत पूर्णविराम मिळाला. दिग्दर्शक म्हणून आशुतोषच्या केवळ चार चित्रपटांच्या कारकिर्दीचेही दोन भाग करावे लागतात. ‘लगान’ पूर्व आणि ‘लगान’ पाश्चात. हिंदी व्यावसायिक चित्रपटांच्या खुराकावर वाढलेला दिग्दर्शक जेव्हा आपला पहिला चित्रपट करतो तेव्हा तो तोवरच्या ‘ट्रेंडस्’चा आंधळा पाठलाग करत असतो. आपली ताकद काय, झेप किती, आपल्या मनाचा कल काय यापेक्षा तो तिकिट खिडकीच्या यशाचा अधिक विचार करत असतो. ‘पहला नशा’ या चित्रपटाच्या बजेटला साजेल असा त्याचा विषय होता. तो दिग्दर्शक म्हणून आशुतोषचा पहिला चित्रपट पडल्यावर पुन्हा कधी ‘कट्’ म्हणण्याची संधी मिळेल, असे त्याला स्वत:लाही वाटले नसावे. परंतु आपली प्रतिमा बदलण्याची आमीरखानची इच्छा आणि  बॉक्स ऑफिसचे गणित मांडण्याची हौस न फिटलेला आशुतोष यांची जोडी जमली. आणि ‘बाजी’ पडद्यावर आला. दिग्दर्शक म्हणून त्याने सलग दुसरा फ्लॉप सिनेमा दिला. या वेळी तर लोकप्रिय स्टार, गॉसिपची मदत आणि हिट गाणे एवढे सगळे मिळूनही चित्रपट अयशस्वी ठरला! हे दोन्ही चित्रपट अयशस्वी ठरले, हे प्रेक्षकांचे नशीबच म्हटले पाहिजे. कारण बॉक्स ऑफिसचे गणित मांडून एखादा चित्रपट यशस्वी झाला की तो दिग्दर्शक पुढे त्या चक्रातून सहसा बाहेर पडू शकत नाही. सगळी व्यावसायिक गणिते मांडूनही चित्रपट जर फ्लॉप होणार असेल तर आपल्या मनाला पटेल आणि रुचेल असा चित्रपट आपण का बनवू नये, असा विचार त्याच्या मनात ‘बाजी’च्या अपयशानंतर आला असावा. त्याने अभिनेता म्हणून प्रादेशिक, हिंदी आणि आंतरराष्ट्रीय अशा तिन्ही प्रकारच्या चित्रपटांत काम केले होते. त्यामुळे त्याच्या वैयक्तिक अभिरुचीला वळण लागलेले होतेच. त्यातूनच त्याने मनात दडलेला ‘लगान’ कागदावर उतरवला. ‘लगान’ ची कथा कल्पना आमीर खानने आधी धुडकावली आणि मग तो स्वत: त्या चित्रपटाचा निर्माता बनला! आमीर हा आशुतोषचा कॉलेजपासूनचा दोस्त होता. आमीरसारखा मित्र मिळणे हे तो त्याचे भाग्य समजतो. क्रिकेटचा सामना, धोतर नेसलेला नायक, ग्रामीण वातावरण, ब्रिटिशकालीन पार्श्र्वभूमी असे ‘बॉक्स ऑफिसच्या’ यशाच्या कसोटीवर झिडकारले जाणारे सर्व घटक असूनही ‘लगान’ धो धो चालला.

सिनेमासृष्टीच्या इतिहासात ‘लगान’च्या निमित्ताने प्रथमच एका पटकथेच्या निर्मितीसाठी एका फिल्म कंपनीचा जन्म झाला. एरवी कंपनी  बनवली जाते, त्यानंतर पटकथा निवडली जाते. कलाकृतीचा खरा जन्मदाता आणि सूत्रधार चाळीशीचा मराठी तरुण आहे हे वास्तव महाराष्ट्राला विशेष सुखावून गेले. फिनलँड,स्वीडन, ब्राझीलमध्ये जिथे हिंदी सिनेमा नाही आणि क्रिकेटही नाही तिथे ‘लगान’ या मनोरंजनपर चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. राजकर्त्यांविरुध्दचा लढा ही थीम त्यांच्या मनाला भिडली. त्याने या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना तिथे 1893 सालात नेले. तिथे अधिकृतरीत्या प्रदर्शित होणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला.

आशुतोषने त्याच्या चित्रपटासाठी ‘लगान’ चे कौतुक पचवून पुढला विषय निवडला तोही बॉक्स ऑफिसचे गणित आणि चौकट मोडणारा. प्रबोधनात्मक, समाज सुधारणाविषयक, वैचारिक असे काही देण्याचा प्रयत्न करतानाच ‘स्वदेस’मध्ये त्याने पुन्हा एकदा नायकाच्या लोकप्रिय प्रतिमेला छेद देण्याचा प्रयोग केला. ‘स्वदेस’ मधील त्याचा प्रयोग काहींना स्फूर्तिदायक वाटला, काहींना धाडसाचा वाटला तर काहींना भाबडा वाटला. परंतु एका गोष्टीचे कौतुक करण्याबाबत दुमत होणार नाही;  ते म्हणजे ‘लगान’चा हँगओव्हर ‘स्वदेस’ मध्ये कुठेच दिसला नाही. विषय, शैली, दृष्टिकोन या सर्व बाबतींत त्याने त्यात वेगळेपण आणले होते. विशेष म्हणजे,  त्याने प्रथमच आशुतोष गोवारीकर प्रॉडक्शनची स्थापना करून निर्मात्यांचीही जबाबदारी स्वीकारली आहे. त्याच्या मते, निर्माता हा चित्रपटाचा पिता असतो,  तर दिग्दर्शक हा आई. प्रत्यक्ष ‘नासा’ मध्ये चित्रीकरण केल्याने तो वास्तववादी झाला आहे. असा हा पहिलाच चित्रपट आहे. विज्ञानाधारित असलेला हा चित्रपट केवळ तांत्रिक आणि विज्ञानपट न वाटता मानवी भावभावनांचे चित्रण आणि विचारांना चालना देणारा ठरला. या चित्रपटामुळे केवळ रोमॅण्टिक भूमिका साकारणा-या शाहरुखचे वेगळे रूप प्रेक्षकांना दिसले.

‘मुगल-ए-आझम’ मध्ये अकबर आणि जोधाबाई यांची उत्तर आयुष्ये दिसतात. त्यांची तारुण्यातील प्रेमकथा सांगणारा जोधा-अकबर चित्रपट आहे.

बॉलिवूडच्या यशाचा एक मंत्र आहे, असे म्हटले जाते. या मंत्रापासून वेगळे राहूनही व्यावसायिक यश आणि कलात्मक कौतुक मिळवणारे दिग्दर्शक फार थोडे आहेत. त्यामुळे आशुतोषला ‘मंत्रा’वेगळा म्हणणे अगदीच चपखल वाटावे. त्याने बरेच संशोधन करुन ‘जोधा अकबर’ची पटकथा लिहिली आहे. या चित्रपटाबाबतची उत्सुकता ही आशुतोषच्या यशाची पावती आहे. कारण अशी उत्सुकता वाट्याला यावी म्हणून प्रत्येक दिग्दर्शक धडपडत असतो.

– श्रीकांत बोजेवार

About Post Author

Previous articleमतिमंदांची कलासाधना
Next articleदोन विनोदवीरांची जुगलबंदी!
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.