अहमदनगरमधील दौला-वडगाव गावाजवळ असलेल्या भातवडी या गावी मेहेकर नदीच्या काठी जुने नरसिंह मंदिर आहे. विस्तृत जागेत असलेल्या त्या मंदिराच्या भोवती दगडी चिरेबंदी भिंत आहे. एका बाजूस ओव-या व नदीच्या बाजूस षट्कोनी आकाराचे दोन बुरूज आहेत. मंदिराच्या कळसावर दशावताराचे शिल्प आहे. ते पाहणा-याचे मन वेधून घेते. भातवडी हे गाव तेथे १६२४ मध्ये घडलेल्या रणसंग्रामामुळे प्रसिद्धीस तर पावलेच, सोबत त्या गावाचे नाव शहाजीराजांच्या पराक्रमाशीही जोडले गेले.
भावडीची लढाई –
शहाजहानच्या दक्षिणेमध्ये स्वा-या झाल्या 1617 ते 1621 या दरम्यान. शहाजहानचे सैन्य तेथे निजामशाही व आदिलशाही राजवटींबरोबर लढत होते. तथापी निजामशाही सरदार मलिक अंबर याने त्याच्या मुत्सद्देगिरीच्या जोरावर कुतुबशहा व आदिलशहा आणि ठिकठिकाणचे मराठे यांना एकत्र केले. तो मोगल सैन्याशी टक्कर देत होता. बर्हामणपूर आणि अहमदनगर या दोन शहरांच्या पलीकडे मोगल सत्ता पूर्ण नाहीशी झाली. मलिक अंबरने ब-हाणपूरलासुद्धा वेढा घातला. ब-हाणपूर वाचवण्यासाठी तेथील मोगल सुभेदार खान यास सहा महिने लागले. जहांगीर बादशहाने शहाजहान यास पुन्हा दक्षिणेत पाठवले. जहांगीर प्रकृतिअस्वास्थ्यामुळे नूरजहानच्या तंत्राने चालला होता. ती शहाजहानच्या विरुद्ध कारस्थाने करत असे. शहाजहानने त्याचा भाऊ खुसरू यास ब-हाणपूरला बोलावून घेतले. मलिक अंबरने मोगल सैन्यास हैराण केले. अहमदनगर शहराला वेढा घातला. पैठणपर्यंत चाल केली. परंतु नंतर मोगलांपुढे इलाज चालेना म्हणून शरणागती पत्करली. पैठणहून शहाजहान परत ब-हाणपूरला गेला व तेथे त्याने त्याचा भाऊ खुसरू याचा काटा काढला. नंतर तो दिल्लीस गेला.
मालोजीराजे व शहाजीराजे हे निजामशहाच्या बाजूने लढत होते. त्याच वेळी शहाजीराजांचे सासरे लखोजी जाधवराव यांचे संबंध बिघडले होते. त्या सुमारास खंडागळे हत्ती प्रकरण झाले. त्यात दत्ताजी जाधव व संभाजी भोसले ठार झाले. शहाजीराजांनाही जखमा झाल्या. शहाजहानबद्दल जहांगीर बादशहाचे मत अतिशय वाईट झाले. नूरजहान तर शहाजहानचा द्वेष करतच होती. तिने शहाजहानला पकडण्याचाही घाट घातला. शहाजहानचा पाठलाग फारच वाढल्यावर त्याने बापाकडे क्षमा मागून त्याची मुले दारा व औरंगजेब यांना ओलीस ठेवले व स्वतः नाशिक येथे मलिक अंबरच्या आश्रयास राहिला.
मलिक अंबरने मोगलांच्या गृहकलहाचा फायदा घेऊन त्याची युद्धनीती आखली. मोगलाईतील सेनापती महाबतखान शहाजहानच्या पाठलागासाठी दक्षिणेत आला. त्याला मलिक अंबर व आदिलशहा यांच्याकडून मदत हवी होती. आदिलशहाने मदत कबूल केली, कारण मलिक अंबर डोईजड होईल असे त्यास वाटले. उत्तरेकडून मोगल सैन्य मागवण्यात आले. आदिलशहाने त्याच्या बाजूस आणखी सरदार जमवले. इकडे, मलिक अंबरनेही गोवळकोंडा-विजापूरपर्यंत स्वारी करून पैसा जमवला आणि त्याने मोगलांना तोंड देण्यासाठी पूर्ण तयारी केली. तो स्वतः भातवडी येथील गढीत जाऊन राहिला. तो भाग थोडा डोंगराळ असल्यामुळे गनिमी काव्यासाठी योग्य होता. तेथून मेहेकर नदी वाहते. जवळच विस्तीर्ण तलाव होता. (इतिहासात तलावाऐवजी नदीच्या वरच्या बाजूस बंधारा असल्याचे उल्लेख सापडतात.) शहाजीराजांच्या सैन्याने तो तलाव फोडूला व ज्या बाजूने मोगली सैन्य येणार होते तिकडील वाटांवर चिखल पसरून दिला. त्यामुळे विजापूरकर आणि मुघलांचे सैन्य अडचणीत आले. ऐन पावसाळा चालू होता. रसद मिळणे अवघड होते. शहाजीराजे आणि मलिक अंबर यांनी बाहेरच्या सगळ्या वाटा बंद केल्यामुळे धान्यपुरवठा बंद झाला. शत्रू सैन्याची उपासमार होऊ लागली. अनेक मोगल सरदार शहाजीराजे-मलिक अंबर गटास येऊन मिळाले. मलिक अंंबरने तशा सरदारांना बक्षिसे दिली. शहाजी राजांनी मोगलांकडील भाडोत्री सैन्यास गनिमी काव्याने हैराण केले. सगळीकडे भीती निर्माण झाली. अशा वेळी मलिक अंबरने मोगली सैन्यावर एकदम हल्ला चढवण्याचे ठरवले आणि मोगली सैन्यास बेसावध अवस्थेत गाठून कापाकापी सुरू केली. काही सरदार मारले गेले. काही सरदार युद्धभूमीवरून पळून गेले. भातवडीच्या त्या संग्रामात शहाजीराजांचा मोठा सहभाग होता. त्या लढाईतील त्यांचे युद्धतंत्र आणि पराक्रम यामुळे त्यांचा दबदबा वाढला.
शिवभारतकार रवींद्र परमानंद यांनी त्या युद्धाचे रसभरीत वर्णन केले आहे. त्यात त्यांनी त्यांच्याबरोबर लढणा-या पंचवीस-तीस सरदारांची नावे दिली आहेत. परमानंद म्हणतात,
“तं पर्यवारयंस्तत्र शाहवर्मादयो नृपाः।
तारकासुरसंगामे महासेनमिवामराः॥”
जसे तारकासुरासोबत झालेल्या युद्धात देव कार्तिकेयाच्या सभोवती जमले होते, त्याप्रमाणे शहाजीप्रभृती राजे मलिक अंबरासभोवती जमले.
परमानंद यांनी केलेल्या युद्धप्रसंगांचे वर्णन वाचताना प्रत्यक्ष रणभूमी आपल्यासमोर उभी राहते. उदा.
“ततश्शाहशरीफाभ्यां खेलेन च महौजसा।
श्यामाननैश्चर यवनैरंबप्रियकारिभिः॥
तथा हम्मीरराजाद्यैर्महावीरैः प्रतापिभिः।
क्षुरप्रचकनिस्त्रिंशकुन्तपटिशपाणिभिः॥
हन्यमानमशेषेण तामाननबलं महत्।
रयात् भयातुरं भेज जिजीविषु दिशो दश॥”
नंतर शहाजी व शरीफजी, महाबलवान खेळोजी, मलिक अंबराचे प्रिय करणारे कृष्णमुखी यवन (सिद्दी), त्याचप्रमाणे हंबीररावप्रभृती इतर पराकमी वीर यांनी हातात बाण, चक्रे, तलवारी, भाले, पट्टे घेऊन मोगलांच्या अफाट सैन्याची खूप कत्तल उडवली. तेव्हा ते भयभीत होऊन जीव वाचवण्यासाठी दाही दिशा पळू लागले.
भातवडीच्या संग्रामात मोगल गोटातील लष्करखान व आदिलशाहीतील महंमद हे दोन सरदार मारले गेले. त्याची नोंद शतकावलीत आढळते.
‘शके 1546 रक्ताक्षी कार्तिक मासी मोगलाचा सुभेदार लष्करखान व येदिलशाही महंमद ऐशी दोन कटके मलिकंबरे बुडविली.’
भातवडीच्या लढाईमुळे मालोजीराजे व शहाजीराजे या पितापुत्रांच्या पराक्रमाचे दर्शन घडले. शहाजीराजांची प्रतिष्ठा, पराक्रम व मुत्सद्दीपणा या गोष्टी सिद्ध झाल्या. गनिमी काव्याची लढाई ही किती उपयुक्त आहे हे भातवडीच्या लढाईने सिद्ध केले. गनिमी काव्याचा तो श्रीगणेशा ठरला व पुढे मराठेशाहीत उपयोगी ठरला.
मलिक अंबरास शहाजीराजांचा द्वेष वाटू लागला. त्यामुळे शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते आदिलशाहीत दाखल झाले. शहाजीराजांनी चार वर्षें शहाजहानशी जो सामना दिला तो फार महत्त्वाचा आहे. म्हणून असे म्हटले जाते, ‘इत शहाजी उत शहाजहान’. गनिमी काव्याने मोगलांशी लढल्यामुळे महाराष्ट्राचा डोंगराळ प्रदेश त्यांना माहीत झाला. शहाजीराजांनी त्यांच्या पाठीशी मावळ्यांची सेना उभी केली. निजामशाही बुडाल्यावर ते आपल्या साधनसंपत्तीसह परत आदिलशाहीत गेले. त्यांच्याएवढा मातब्बर सरदार दक्षिणेत नव्हता.
भातवडी येथील गढी अस्तित्वात नाही. तत्कालीन विस्तीर्ण तलाव मात्र तेथे पाहण्यास मिळतो. मात्र दौला-वडगाव गावातील गढी म्हणजेच भातवडीची गढी की काय? अशी शंका येते.
संदर्भ –
1) श्री. सरदेसाई गो.स. – मराठी रियासत – खंड 1
2) श्री. वाकसकर वि.स. – शिवछत्रपतींची 91 कलमी बखर
3) शिवचरित्रप्रदीप – भा.इ.सं.मं., पुणे
4) श्री. दिवेकर स.म. – शिवभारत
– सदाशिव शिवदे
भातावडी च्या लढाईचे महत्त्व…
भातावडी च्या लढाईचे महत्त्व सुंदरपणे लिहिले गेले आहे
अहमदनगरमधील दौलावडगाव हा…
अहमदनगरमधील दौलावडगाव हा संदर्भ चुकीचा आहे. दौलावडगांव हे बीड मध्ये आहे.
खुप छान इतिहास लिहला आहे…
खुप छान इतिहास लिहला आहे. शरीफजी भोसले
यांचे वंशज कोठे आहेत.या बदल माहीती दयावी
शरिफजी राजे यांना या लढाईत…
शरिफजी राजे यांना या लढाईत विरगती प्राप्त झाली. त्यांची समाधी भातोडी येथे आहे. त्यांचे वारसदार राशीन ता. कर्जत येथे राहतात.
खुप छान माहीती आहे..आम्ही…
खुप छान माहीती आहे..आम्ही भातोडीकर ग्रामस्थ दर वर्षी31आँक्टोबरला शरीफजीराजेंच्या स्मृृतिदिनाचे आयोजन करत असतो..सर्वांनी शौर्य स्थलावर यायला हवे…शिवदे सरांना मानाचा मुजरा
छान माहीती आहे
छान माहीती आहे
खुप छान माहीती आहे..आम्ही…
खुप छान माहीती आहे..आम्ही भातोडीकर ग्रामस्थ दर वर्षी31आँक्टोबरला शरीफजीराजेंच्या स्मृृतिदिनाचे आयोजन करत असतो..सर्वांनी शौर्य स्थलावर यायला हवे…शिवदे सरांना मानाचा मुजरा
Jat shivaray
Jat shivaray
Comments are closed.