ग.ना. जाधव या चित्रकाराच्या इंग्रजी आद्याक्षरांच्या उच्चारात ‘जी एन जे’ असा ताल आहे. त्यांचे शिक्षण झाले फक्त चौथीपर्यंत! परंतु त्यांनी असाधारण अशी व्यक्तिचित्रे रेखाटली. त्यांच्या प्रत्येक रेखाटनात वास्तवता होती आणि त्यांनी केलेले रंगांचे नृत्य (फटकारे) बोलके असे. त्यांच्या वृत्तीत सांस्कृतिक डौल होता. त्यांनी नाट्यकला जोपासताना स्त्रीपात्रांच्या भूमिकाही केल्या.
ग.ना. जाधव रंगलेपनासाठी चाकू वा ब्लेडचा उपयोग असो, जलरंग असो, चारकोल असो अथवा मिक्स मीडिया असो, अशा प्रत्येक पद्धतीत चित्रविषयामधील भाव-विभाव समान ताकदीने अचूक व्यक्त करत. त्यातील बारकावे तर पाहण्यासारखे असत.
ग.ना.जाधव यांच्या सिद्धहस्त चित्रकृतींचे ‘दर्शन’ 2015 मध्ये रसिकांसाठी सादर केले गेले होते. तो नेहरू सेंटरच्या, दरवर्षी एका महान कलावंताला आदरांजली वाहण्याच्या योजनेचा भाग होता. नेहरू सेंटरने त्यावेळी ग.नां.च्या कलेचा छोटेखानी, सत्तर पानी रंगीत कॅटलॉग छापला आहे. त्यात कॅनव्हासवर चितारलेले अब्बांचे तैलचित्र अत्युत्कृष्टच म्हणायला हवे. अब्बांची शरीरयष्टी, सुईत दोरा ओवताना बसण्याची पद्धत आणि विशेषत: एकाग्रतेचे चेहर्याीवर उमटलेले भाव, वयस्कर चेहर्याबतील खडबडीतपणा, उजेड असतानाची चष्म्याची; प्रामुख्याने सुईदोर्याेची व चाफेकळीचे बोट आणि अंगठा यांत पकडलेला थोडासा बाहेर आलेला धागा या सर्वांची नाजूक रंगरेष… सर्व लाजवाब!
शांता शेळके 1968 साली कशा दिसत होत्या, ते त्यांच्या रेखाटनातून पाहवे. शांताबार्इंचे त्यावेळचे सतेज रूप पाहून अचंबित व्हायला होते. त्यांनी 1968 मध्येच आचार्य अत्रे यांचे रेखाटलेले विचारी, धीरगंभीर, एकाग्रतेची चुणूक दर्शवणारे रूप पाहून क्षणभर स्तंभित व्हायला होते आणि हेच का ते बिनधास्त, खट्याळ आचार्य अत्रे यावर विश्वांस ठेवणे कठीण जाते! प्रल्हाद केशवांची दुसरी सत्य बाजू प्रेक्षकाला ग.नां.च्या फटकार्यांवनी समजते!
दत्तो वामन पोतदारांचा कडक शिस्तीचा बाणा आणि त्याचबरोबरची सहृदयता; पंतप्रतिनिधींची संतुष्ट प्रसन्नता; शंतनुराव आणि शंकरराव किर्लोस्करांची डोळ्यांच्या माध्यमातून स्पष्टपणे दृगोचर होणारी स्वप्ने, दूरदृष्टी आणि ध्येयवेडाची ताकद; 1975 च्या ‘स्त्री’ मासिकाच्या, ‘मराठी स्त्रीच्या घडणीत शंकरराव किर्लोस्करांचा वाटा’ या विषयावरील अंकाच्या मुखपृष्ठावरील शं.वा.किं.ची स्त्री शिल्प घडवत असतानाची व शिल्पावर प्रतिबिंबित झालेली भावमुद्रा; रामुअण्णा आणि लक्ष्मणराव ह्या किर्लोस्कर बंधुद्वयांचे 1950 च्या ‘किर्लोस्कर’ मासिकाच्या मुखपृष्ठावर चित्र रेखाटताना, ग.ना. जाधवांनी चितारलेला किर्लोस्कर उद्योगाच्या प्रारंभीचा 1910 चा माईल स्टोन; तसेच, 1950 हे उद्योगधंद्याचे उगवतीचे वर्ष आणि बंधुद्वय- पार्श्वभूमीवर त्यांच्या नावातील राम व लक्ष्मण घेऊन धनुर्धारी राम व लक्ष्मण यांची चितारलेली धूसर पडछाया, या गोष्टी ग.नां.च्या कल्पनाशक्तीच्या विस्ताराचा प्रत्यय देऊन जातात. चित्रकाराच्या सजगतेचा तो गुण!
ग.ना. सदैव विनम्र राहिले. त्यांचा संयमी स्वभाव आणि विचारप्रक्रियेतील शांतता त्यांच्या रेखाटनांमध्ये आपसूक आणि अलगद उतरत गेली. त्यामुळे ओलेतीपणाच्या सौंदर्यात (अंजली, वासंतिक अंक, 1960) बीभत्सता, स्वैरता जाणवली नाही, की वासनेची सीमारेषा ओलांडली गेली नाही. ना.सी. फडके यांच्या ‘अंजली’ मासिकाची मुखपृष्ठे ही ग.नां.च्या आनंदी व खेळकर स्वभावाची व्यक्त रूपे आहेत.
ग.नां.नी डॉ. सरोजिनी बाबर यांच्या समाजशिक्षणमालेसाठी मराठमोळ्या लेखनाला अस्सल ग्रामीण जीवनशैलीतील बोलकी चित्रे पुरवली. ग.नां.च्या अंत:करणातील सामाजिक कृतज्ञता रंगरूपात साकार झाली!
ग.नां.कडून कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराचा 1936 मध्ये जलरंगात साकारला गेलेला एक भाग म्हणजे निव्वळ शांतता आणि शांततेचाच अनुभव आहे. ते कलाकाराच्या पूर्ण प्रगल्भतेमुळे शक्य झाले आहे. बुंदीवाला तर लाजबाबच! बुंदी पाडण्याची प्रक्रिया, त्याची जागा, विस्तवातील धग आणि चित्रातील एकूण कॅनव्हासवरील धुरकटतेची जवळीक साधणारा बॅलन्स पाहता बुंदीक्षण जिवंत होतो.
पठाण, कर्मवीर भाऊराव पाटील, पत्नी इंदिराबाई, मातोश्री तानाबाई, राम कोलारकर, संध्या, रजनी, बालगंधर्व, अप्पा पेंडसे ह्या अशा ख्यातनाम व जवळच्या व्यक्तिमत्त्वांचे परस्परविरोधी धाटणीचे चेहरे आणि त्यांचे कर्तृत्व यांचा ठसा उमटवताना प्रत्येकाच्या डोळ्यांमधील वेगवेगळी भावुकता, त्या प्रत्येकाच्या बुबुळापासूनच्या आणि भोवती असणार्याध त्वचेच्या रंगछटांची ठेवण… त्यातून त्या त्या व्यक्तिमत्त्वातून अभिव्यक्त होणारी भावना नेमक्या व मूलत: असणार्या. वास्तव रंगछटांच्या द्वारे प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याचे कसब ग.नां.च्या बोटांनी लीलया तोलले.
चित्रमहर्षी ग.ना. जाधव यांनी त्यांची कला त्यांच्या जादुई बोटांच्या माध्यमातून, भारतीय चित्रकलेच्या प्रांतात मुक्तहस्ते (रसिक मनावर) उधळली! ग.नां.च्या स्मृतीला जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन.
– प्रदीप गुजर
Aprateem…….I have seen…
Aprateem…….I have seen each painting in the book….hat’s off.
Excellent experience to see…
Excellent experience to see the genuine master strokes of illustrations and portraits by veteran G.N.Jadhav sir. Must watch by all.
Comments are closed.