आयुष्यभर बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये सैनिकगिरी करणा-या शंकररावांनी निवृत्तीनंतर त्यांच्या छंदासाठी काय काय केले आहे ते पाहिले तर थक्क व्हायला होते. त्यांचे वय आहे केवळ शहात्तर. त्यांचे घर केवळ पुस्तकांनी भरले आहे आणि त्यांच्या चार खोल्यांच्या फ्लॅटमध्ये फक्त एक पलंग त्यांना राहायला पुरतो; बाकी सर्वत्र पुस्तके आणि पुस्तकांविषयी खूप काही आहे. मी ‘ललित’मध्ये प्रश्नामंजुषा सुरू केली आणि दुस-याच महिन्यात बेळगाववरून दोघा-तिघांच्या उत्तरपत्रिका आल्या. त्यांत एक नाव शंकर चाफाडकर हे होते. पुढे दरमहा ती तीन-चार नावे हमखास असत. बेळगाव बक्षिसांच्या यादीत कायमच आघाडीवर असे. लोकमान्य ग्रंथालयाच्या अशोक याळगींचा एकदा फोन आला. सांगत होते, “तुमच्या प्रश्नमंजूषेसाठी आम्ही ‘ललित’ची वाट बघत असतो. अंक आला की आम्ही ग्रंथालयात जमतो आणि मग आमची धमाल शोधयात्रा सुरू होते. त्यात आमचे शंकर चाफाडकर आघाडीवर असतात.” मग चाफाडकरांचाही फोन आला. उत्साहाने भरभरून बोलत होते. पुढे तर एक दिवस अचानक एक भलेमोठे कूरिअर आले. त्यात शंकररावांनी मागच्या शतकाच्या पूर्वार्धात छापलेली काही अतिशय दुर्मीळ पुस्तके मला भेट म्हणून पाठवली होती.
मग मी त्यांच्या घरी गेलो. शंकरराव मात्र विनय, नम्रता आणि अगत्य यांचे टोक आहेत. घरात इकडून तिकडे अचाट उत्साहाने नाचत एकेक पुस्तक कुठून कुठून शोधून आणत, भल्यामोठ्या पुस्तकातील नेमके पान काढून मला एखादा परिच्छेद, एखादी ओळ वाचून दाखवत. सध्या शंकररावांना वेड लागले आहे ते ‘बुक्स ऑन बुक्स’ या प्रकारच्या ग्रंथांचे. त्यांनी त्या विषयावरील अनेक मोठमोठाले इंग्रजी ग्रंथ वेगळ्या विभागात ठेवले आहेत. नुसते ‘पुस्तकचोर’ या विषयावरील कितीतरी ग्रंथ… आणि वर उत्साहाने पुस्तके आणून त्याबद्दल भरभरून बोलत होते. सांगत होते, ‘या चोराने बरं का, अमेरिकेतील जवळजवळ सगळ्या प्रांतातील शेकडो लायब्र-यांमधून पुस्तके चोरून जो मोठा संग्रह केला त्यात 23,900 पुस्तके होती…’ एकदा बोलू लागले, की चाफाडकरांना किती सांगू अन् किती नको असे होते.
त्यांनी तो अचाट संग्रह सौंदर्यपूर्ण रीतीने, निगुतीने सांभाळला आहे. ते प्रत्येक पुस्तकाला, कात्रणाला स्वत: प्लॅस्टिक कव्हर घालतात. त्यासाठी भल्यामोठ्या पॉलिस्टर शीटचे गठ्ठे, पुस्तकांना नीट ठेवण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या वस्तू एका कोप-यात ठेवलेल्या. जिकडे तिकडे कसल्या तरी (आल्यासारख्या दिसणा-या) मुळ्या पसरलेल्या दिसत होत्या. म्हणालो, हा आणखी कसला छंद? त्यावर लगेच एका कपाटातून टिकेकरांचे ‘अक्षरनिष्ठांची मांदियाळी’ हे पुस्तक काढून त्यातील विशिष्ट पान काढून दाखवत मला म्हणाले, टिकेकरांमुळे मला हे कळले. वेखंडाच्या मुळ्या ठेवल्या, की वाळवी, झुरळे इतकेच काय मुंग्यादेखील अजिबात फिरकत नाहीत. तोवर दुसरेच एक मोठे इंग्रजी पुस्तक काढून त्यातील वाळवीचा फोटो आणि वाळवी नेमकी कशी पुस्तके खराब करते याचे शास्त्रीय विवेचन सुरू… त्या माणसाला कशाकशात रस आहे त्याची यादी करणे अशक्य आहे.
माझा बेळगाव भेटीत मुक्काम असल्यामुळे दोन दिवस चाफाडकरांच्या घराला निवांत भेट देता आली. मन तृप्त झाले… बेळगावविषयी प्रेम वाटावे याच्या कारणांची यादी मोठी आहे, आणि ती वाढतच आहे!
शंकर चाफाडकर – 09901101920
– संजय भास्कर जोशी (फेसबुकवरून लेख संक्षिप्त)
फारच छान लेख! एकदम वेगळे
फारच छान लेख! एकदम वेगळे व्यक्तिमत्व..
फारच सुंदर लेख. बेळगावच्या
फारच सुंदर लेख. बेळगावच्या भेटीत मलाही चाफाडकरांचं ग्रंथालय पाहण्याचं भाग्य लाभलं. दोन तास पुस्तकांच्या सहवासात कसे गेले कळले नाही. बेळगावमधील आवर्जून पाहावी अशी जी काही ठिकाणं आहेत त्या पैकी एक म्हणजे चाफाडकरांचं ग्रंथालय.
Comments are closed.