Home लक्षणीय बियाण्यांची माता

बियाण्यांची माता

0

राहीबाई पोपेरे राहतात डोंगरमाथ्यावरील कोंभाळणे या, अगदी आडवाटेवरील गावात; मात्र त्यांच्या कार्याचा डंका ‘सीडमदर’ म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर वाजत आहे. राहीबार्इंचा जन्म बांबेळे कुटुंबात नगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील दुर्गम भागात झाला. त्या एकंदर सात बहिणी. वडिलांची तुटपुंजी शेती; आणि तितक्या डोंगराळ भागात पन्नास-साठ वर्षांपूर्वी शाळा पोचलीही नव्हती. त्यांना घरातील आणि वडिलांच्या हाताखाली पडतील ती कामे करावी लागत. राहीबार्इंच्या मनावर त्या कामांचे संस्कार होत होते.

राहीबार्इंचे लग्न पोपेरे कुटुंबात झाले – ती मंडळीदेखील कोंभाळणे गावातच राहत होती. त्यांचीही परिस्थिती तशीच होती. शेती होती, पण पाण्यापावसावर अवलंबून राहवे लागे. सगळेजण वर्षातील चार-सहा महिने मजुरी करण्यासाठी बाहेर पडत. राहीबाई अकोले साखर कारखान्याचे ऊसतोडणीचे काम करत- ऊस तोडायचा, मोळ्या बांधायच्या, ट्रॅक्टर भरायचे ही कामे कष्टाची होती. मुख्य म्हणजे घर सोडून तात्पुरता निवारा तेथेच करून राहवे लागे.

राहीबार्इंना आणखी काहीतरी वेगळे करावे असे वाटे. त्यांना समाजात मिसळून काही घडवण्याचे स्वप्न लहानपणापासून खुणावत होते. ती ऊर्मीच त्यांना इतरांपेक्षा वेगळे असे कार्य करण्यास स्फूर्ती देणारी ठरली.

पुण्याची ‘बायफ’ ही कृषी व सामाजिक क्षेत्रांत काम करणारी संस्था. राहीबाई त्यांच्या संपर्कात आल्या. त्यांना बचतगटाची कल्पना समजली. एकदा, संक्रांतीच्या हळदीकुंकवाचा कार्यक्रम ठरला. वाण म्हणून देण्यासाठी खर्च करून वस्तू आणणे शक्य नव्हते. राहीबार्इंच्या डोक्यात आले, की प्रत्येक बाईला फळझाडाचे रोप द्यावे! त्यांनी तशी रोपे तयार करून वाटली. राहीबाई त्यांच्या आसपास बघत, त्यावेळी त्यांना जाणवे, की कोणाकडे फारशी फळझाडे नाहीत. लोक फळझाडे, आवारात जागा असून लावत नाहीत; त्यांना वाटले, की रोपे दिली तर लोक ती लावतील. राहीबार्इंनी जवळच्या जंगलात जाऊन करवंदे घरी आणली, त्यापासून बी तयार केले. त्यांनी पहिल्याच फटक्यात तब्बल साडेतीन हजार रोपे तयार केली. सगळे कुटुंब त्या कामात त्यांच्या मदतीला आले. त्यांनी रोपे जेव्हा वाटण्यास सुरुवात केली, तेव्हा लोक चकित झाले. राहीबार्इंना मात्र त्यातून त्या काहीतरी करू शकतात असा विश्वास मिळाला. ‘बायफ’ ही संस्था त्यांची ती धडपड समाजोपयोगी आहे, हे जाणून त्यांच्या पाठीशी उभी राहिली.

राहीबार्इंनी त्यांची मुले मोठी झाल्यावर घरातून बाहेर पडून आजुबाजूला असलेल्या धान, फळे, भाज्या यांचे पारंपरिक बियाणे गोळा करणे किंवा तयार करणे हे काम सुरू केले. राहीबार्इंना कळून चुकले की हायब्रिडमध्ये उत्पन्न भरपूर मिळते, पैसाही मिळतो, पण अन्नाचा कस राहत नाही. त्यामुळे त्यांनी झपाटल्याप्रमाणे पारंपरिक वाणे तयार केली. राहीबार्इंनी नेहमीच्या धान्याबरोबर नाचणी, भगर, तांदूळ, वाल, आळशी, डांगर अशा अनेक दाण्यांच्या दुर्मीळ, सुवासिक, चविष्ट, कसदार, पोषक जातींच्या बियाण्यांची निर्मिती गेल्या काही वर्षांत केली आहे. त्यासाठी मातीत राबून, रोपे लावून त्यापासून बियाणे तयार होईपर्यंत बाळ जन्माला घालावे तसे जपावे लागते हे त्यांना अनुभवातून माहीत झाले आहे. त्यांच्याकडे अत्यंत दुर्मीळ अशा पंचावन्न दाण्यांच्या दीड-पावणेदोनशे जातींची ‘बियाणे बँक’ तयार झाली आहे. कोणा शेतकऱ्याने मागितले की त्या त्याला छोटी पुरचुंडीभर बियाणे देतात. फक्त शेतकऱ्याला बजावतात, की यापासून तुझे बियाणे तूच तयार करायचे. त्यामुळे पारंपरिक बियाण्यांचे क्षेत्र वाढत चालले आहे आणि ते अधिकाधिक लोकांकडे हळुहळू उपलब्ध होत आहे. त्यांनी चोपन्न पिकांच्या एकशेसोळा वाणांच्या गावरान बियांचे जतन केले आहे. नाशिक आणि नगर जिल्ह्यातील सुमारे चारशे एकर जमिनीवर त्यांच्या प्रेरणेतून गावरान वाणांची शेती केली जाते. त्यांनी जपलेले बियाणे राज्यातील अनेक जिल्ह्यांत आणि परराज्यांतही पोचले आहे. त्यांनी वांगी, भेंडी, पेरू, आंबा, पालक, मेथी, वाटाणा आदी पिकांच्या जातींची बियाणे निगुतीने जपली. त्या तीन हजार महिलांसमवेत काम करतात.

निरक्षर राहीबाई राहतात झोपडीत, अन्न शिजवतात चुलीवर. बियाणी साठवण्यास त्यांच्याकडे कणग्या आणि लिंपलेले माठ आहेत. त्यात राख असते. त्या सांगतात, की राखेत बियाणे ठेवले तर आईच्या पोटातल्यागत नीट राहते. बियाण्यांची वाणे वाढत चालली आहेत आणि ती सांभाळून राहवीत म्हणून त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे जागा मागितली. राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ती लगेच मंजूर केली आणि ती प्रत्यक्षात आली आहे. राहीबार्इंचा विचार पण निसर्गाच्या सान्निध्यात राहून, झोकून देऊन तेथील मूळ कसदार वाण वाटण्याचा उद्योग आयुष्यभर करण्याचा आहे. त्यांनी गायीच्या देशी वाणासाठी कामाला लागण्याचे ठरवले आहे. निरक्षर, आदिवासी, लहानशा गावातील ती स्त्री केवळ तिच्या कार्याने महान झाली, जगभर प्रसिद्ध होऊन गेली. नाकात घातलेल्या ठसठशीत नथीआडून तिच्या कार्याची श्रीमंती दिमाखदारपणे चमकत आहे !

डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी राहीबार्इंना ‘बियाण्यांची माता’ असे आदराने संबोधले. बार्इंना अनेकविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. ‘बीबीसी’ने जगातील प्रभावशाली शंभर महिलांमधील एक म्हणून राहीबार्इंचा गौरव केला आहे. राहीबाई पोपरे यांचा 2019 सालच्या महिला दिनानिमित्त दिल्लीत राष्ट्रपती भवनात गौरव झाला आणि त्यांना ‘नारीशक्ती’ सन्मान मिळाला. त्यांच्या आजवरच्या कामाची ती मोठी पोचपावती आहे.

त्यांना विविध ठिकाणी व्याख्याने, प्रशिक्षणासाठी सतत निमंत्रणे येतात.

स्मिता गुणे 9850263525 

(झी मराठी दिशा’ वरून उद्धृत, संपादित-संस्कारित, विस्तारित)
 

About Post Author

Exit mobile version