राजाराम दत्तात्रय बोराडे हे बहुढंगी व्यक्तिमत्त्व आहे. भारतीय परंपरेतील अशी परस्पर विरोधी गुणवैशिष्ट्ये त्यांच्यात एकवटली आहेत. ते सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडीचे रहिवासी. आईवडील व सहा भावंडे असा परिवार. त्यांचा परिवार त्यांच्या बालपणी लहानशा जागेत राहत होता. वडिलांचा पगार बेताचा, त्यामुळे हलाखीची परिस्थिती. बोराडे यांचे शिक्षण सातवीपर्यंत झाले. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे असे विचार त्यांच्या मनात घोळत होतेच. त्याच सुमारास गावातील विनायक दीक्षित व मोहनलाल या दोन व्यक्तींनी बोराडे या सातवी पास मुलास पैसा कमावण्याची कल्पना सांगितली. सोलापूरच्या मुलतानी बेकरीतून माल आणायचा व तो कुर्डुवाडीला विकायचा! बोराडे यांना ती कल्पना आवडली. कष्ट करण्याची तयारी होतीच. त्यांनी केवळ पंचेचाळीस रुपये भांडवलावर तो उद्योग चालू केला. सकाळी लवकर उठून, सोलापूरला जाणे व दुपारपर्यंत माल घेऊन येणे, तो विकणे असा दिनक्रम चालू झाला. खर्चवजा जाता महिन्याकाठी तीस रुपये कमाई होई. कुर्डुवाडी एस.टी. स्टँडजवळ ‘न्यू दत्त बॅकरी’ आहे ती त्यांचीच. बोराडे यांची पत्नी व मुलगी मिळून ती बेकरी चालवतात.
बोराडे यांनी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला. आजुबाजूच्या परिसरातील लोक त्यांचा सल्ला मागण्यासाठी येतात. बोराडे लग्न, नोकरी यांसारख्या व इतर अनेक समस्यांवर उपाय सांगतात व त्याचे मूल्य आकारतात. बोराडे यांनी वास्तुशास्त्राचाही अभ्यास चालू केला आहे; त्यांचा स्वत:चा बंगला त्यानुसारच बांधला आहे. ते लोकांना वास्तुशास्त्रविषयक सल्ला मोफत देतात. लोक माढा तालुक्यातून व इतर अनेक ठिकाणांहूनही त्यांच्याकडे सल्ला विचारण्यासाठी येतात.
बाराडे यांच्या बंगल्याच्या आवारात तुळशीची असंख्य झाडे, तजेलदार व माणसाच्या कमरेइतकी उंच वाढलेली पाहिली आणि मी थक्क झाले. त्यानंतर बोराडे यांनी स्वत: तुळशी घातलेला चहा बनवून आम्हाला दिला.
बोराडे यांनी सातवीनंतर शाळा सोडली. त्यांना इंग्रजी येत नव्हते. पण या वयातही ते रोज ABCD लिहितात. ती वही त्यांनी आम्हाला दाखवली. अक्षर सुंदर होते. काळाची गरज म्हणून बोराडे कॉम्प्युटरही शिकले. त्यांचा स्वत:ला अद्यावत ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे.
– पद्मा कऱ्हाडे
Good
Good
बोराडे यांच्या जिद्दीला सलाम
बोराडे यांच्या जिद्दीला सलाम !
Comments are closed.