दुष्काळ आणि शेतकऱ्यांची आत्महत्या या विषयावर चर्चा-परिसंवाद एवढी वर्षें होऊनही त्यातून काही निष्पन्न झाले नाही. अशा वेळी अशोक देशमाने या तंत्रशिक्षित तरुणाने थेट ‘निष्काम कर्मयोग’ स्वीकारला! अशोकने आयटी क्षेत्रातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून शेतकऱ्यांच्या भावी पिढीला उज्ज्वल भवितव्य देण्याचा ध्यास घेतला आहे. त्याचे मन पुण्यात हडपसर येथे आयटी कंपनीत नोकरी करत असतानाही गावाकडे धाव घेत असे. तो एकदा दिवाळीच्या सुट्टीत परभणी जिल्ह्यातील त्याच्या मंगरूळ गावी गेला असताना तेथील स्थानिक शेतकऱ्याने दुष्काळाला कंटाळून आत्महत्या केल्याची बातमी त्याच्या कानावर पडली. तो त्या बातमीने अंतर्बाह्य हेलावून गेला. त्याचे गाव-गावकरी-शेजारीपाजारी दुःखात असताना शहरात तो सुखात राहत आहे या विचाराने अस्वस्थ झाला. त्याला त्याचा भूतकाळ आठवला. त्याने तशी परिस्थिती अन्य मुलांवर येऊ नये म्हणून शिक्षणयज्ञ सुरू केला.
भीषण दुष्काळामुळे, लोक गाव सोडून शहरांकडे जाऊ लागले होते; पडेल ते काम स्वीकारत होते. दोन वेळचे अन्न मिळवणे कठीण असलेल्या कुटुंबांना मुलांच्या शाळेचा खर्च भागवणे अशक्य होऊ लागले. अशोकला ते चित्र पाहिल्यानंतर सर्वात जास्त वाईट वाटले ते मुलांचे शिक्षण अर्धवट सुटत असल्याबद्दल! अशोकने स्वतः प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते. वडिलांची शेती होती, पण अपेक्षित उत्पन्न नव्हते. अशोकने त्याच्या आईच्या मदतीने शिवणकामही केले आणि कसाबसा घरखर्च भागवला. आईने दोन मुलींची लग्ने लावून दिली. अशोकने त्याचे पुढील शिक्षण शेतीकाम करून पूर्ण केले. त्यामुळे त्याला वेळेची, पैशांची आणि शिक्षणाची किंमत कळली. अशोकने दुष्काळग्रस्त कुटुंबांतील मुलांची आबाळ तशी होऊ नये म्हणून त्यांची जबाबदारी स्वीकारण्याचा निश्चय केला.
अशोकने ‘स्नेहवन’ नावाची संस्था डिसेंबर २०१५ मध्ये रजिस्टर केली. त्याने गावागावात फिरून गरजू , गुणवंत विद्यार्थ्यांचा शोध घेतला, त्यांच्या पालकांची मनधरणी केली, त्या मुलांचा शैक्षणिक भार उचलण्याचे आश्वासन दिले. अनेक पालकांनी ‘स्नेहवन’च्या वास्तूला भेट देऊन आधी खातरजमा करून घेतली. बऱ्याच प्रयत्नांनंतर, अशोकला सतरा विद्यार्थी सापडले. त्यांना शोधण्यात त्याला त्याच्या मित्रपरिवाराची मदत झाली.
अशोकमधील संवेदनशील कवीचे चाहते अनेक आहेत. तेदेखील या कारणासाठी पुढे सरसावले. अनिल कोठे नामक सद्गृहस्थांनी जागेचा मुख्य प्रश्न सोडवला. त्यांनी त्यांचा पुण्यातील भोसरी येथील पाच खोल्यांचा रिकामा बंगला अशोकला ‘स्नेहवन’साठी दिला. रिकामा बंगला मुलांच्या आवाजाने दुमदुमून गेला. मुले सुरुवातीला राहण्यास राजी नव्हती. परंतु अशोकने त्यांचे मन त्यांना समजावून, उमजावून, शिक्षणाचे महत्त्व पटवून वळवले. मुलांची ‘अशोककाकां’शी गट्टी जमली! पण अशोकला नोकरी सांभाळून मुलांना पूर्ण वेळ देता येणे शक्य नव्हते. त्याचे आई-वडीलही त्याची समाजसेवा पाहून, ‘स्नेहवना’त येऊन राहू लागले. एकूण पंचवीस मुले ‘स्नेहवना’ची निवासी झाली आहेत.
अशोकने पाच वर्षें केलेल्या नोकरीतून साठवलेले पैसे ‘स्नेहवना’च्या कामी येत असले, तरी ते अपुरे पडत आहेत. अशोकला नोकरी सांभाळून मुलांसाठी वेळ देताना त्याची ओढाताण होऊ लागली. त्याच्या वरिष्ठांनी त्याला रात्रपाळी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, अशोक जेमतेम दोन तासांची झोप दिवसाकाठी घेऊन, दिवसाचा वेळ मुलांना तर रात्री ऑफिसच्या कामाला देऊ लागला. त्याने तारेवरची अशी कसरत सलग आठ महिने केल्यावर त्याच्या लक्षात आले, की त्याचा ‘राम’ आयटी क्षेत्रात नाही, तर दुसऱ्यांसाठी काही करण्यात त्याला जास्त आनंद आहे. अशोकने मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्यासाठी नोकरी सोडली आणि त्याने त्या कार्याला पूर्णपणे वाहून घेतले.
अशोकचे शिक्षण, नोकरी पाहता त्याला लग्नासाठी बरीच स्थळे सांगून येत होती, नोकरी सोडल्यानंतरही स्थळांचा ओघ कायम होता. तेथील प्रथेनुसार वधुपक्षाची हुंडा देण्याचीही तयारी होती. परंतु अशोकचा त्या प्रथेलाच विरोध होता. बहुतांश शेतकरी त्यांच्या मुलींच्या लग्नात भरमसाठ हुंडा देण्याच्या धडपडीत कर्जबाजारी होतात आणि ते फिटले नाही की मृत्यूला कवटाळतात. त्याच विचाराने अशोकने हुंडाविरोधी चळवळ सुरू केली. लोकांना त्याच्या कृतीतून आदर्श घालून दिला. त्याने गरीब शेतकऱ्याच्या मुलीशी लग्न साधेपणाने करण्याचे ठरवले. त्याची एकच अट होती, की येणाऱ्या मुलीने आई होऊन ‘स्नेहवना’तील मुलांचा सांभाळ करावा. अशोकची ती इच्छाही अर्चनाच्या रूपात पूर्ण झाली. ती दोघे मिळून ‘स्नेहवना’तील मुलांचा सांभाळ करत आहेत.
अशोकसमोर बाबा आमटे यांच्या समाजकार्याचा आदर्श कॉलेजमध्ये शिकत असल्यापासून होता. तो विविध समाजकार्यात भाग घेत असे, पाड्यावरच्या मुलांना मोफत शिकवत असे, नोकरीत रुजू झाल्यावर पगाराचा दशांश भाग समाजकार्यासाठी देत असे, त्याच्या मनात रुजलेल्या त्या बीजाचा पुढे ‘स्नेहवना’च्या रूपात वटवृक्ष झाला. त्याने मुलांना जवळच्या शाळेत प्रवेश मिळवून दिला. ‘स्नेहवना’तील विद्यार्थ्यांच्या दिनचर्येचा मुलांचा अभ्यास घेणे, त्यांना श्लोक शिकवणे, त्यांचा व्यायाम करवून घेणे, त्यांनी सूर्यनमस्कार घालणे, गाणी शिकणे, त्यांना चित्रकला-तबला-हार्मोनियमचे प्रशिक्षण देणे हे भाग बनून गेले आहेत.
अशोकने त्याच्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली. त्याची आर्थिक गणित जुळवताना तारांबळ उडते. तो सांगतो, ‘भरपूर काम करण्याची इच्छा आणि तयारी असली, तरी जागेचा आणि पैशांचा मुख्य प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. निवासी विद्यार्थ्यांचा एका मुलामागे खर्च साधारण अडीच हजार रुपये येतो. आजारपणाचा खर्च वेगळा असतो, तर जवळच्या पाड्यावरील नंदी समाजातील वीस विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च एका मुलामागे पंधराशे रुपये आहे.’ अशोक अशा एकूण पंचेचाळीस मुलांचा सांभाळ करत आहे.
एका अमेरिकन दांपत्याने ‘स्नेहवना’ला तीन संगणक भेट दिले. त्यांचा वापर करून तिसरीतील विद्यार्थीदेखील सफाईने मराठी टायपिंग करू लागला आहे. अशोकची धडपड तशा अनेक गरजू मुलांना शिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी सुरू आहे. तो सांगतो, ‘माझ्या मार्गात अडथळे अनेक येत असले, तरी ध्येय स्पष्ट दिसत आहे आणि त्या दृष्टीने माझी घौडदौड सुरू आहे.’
अशोकला गावागावांतून, जिल्ह्याजिल्ह्यांतून शेतीशाळा सुरू करण्याची इच्छा आहे. तो सांगतो, ‘भारत कृषिप्रधान देश आहे. तरी भारतीय अभ्यासक्रमात कृषी विषयाचे ज्ञान मुलांना दिले जात नाही. आमचे शेतकरी पारंपरिक शेती करतात, विकसित तंत्रज्ञानाचा अवलंब करत नाहीत, कारण ते त्यांच्यापर्यंत पोचलेले नाही. ते योग्य पद्धतीने पोचावे यासाठी शेतीशाळांची गरज आहे.
अशोकच्या प्रगत विचारांनी काही तरुण भारावले गेले आहेत. त्यांनीही अशोकप्रमाणे लग्न हुंडा न घेता करण्याचा निर्णय घेतला आहे. काही जण ‘स्नेहवना’साठी हातभारही लावत आहेत. काही आजी/आजोबा मुलांचा सांभाळ करण्यासाठी पुढाकार दर्शवत आहेत. हा सकारात्मक बदल अशोकच्या कृतीमुळे घडत आहे!
अशोक देशमाने – 8796400484
संस्थेचा पत्ता : स्नेहवन, हनुमान कॉलनी-२, हनुमान मंदिराजवळ, चक्रपाणी वसाहत, भोसरी, पुणे-११०३९.
snehwan@yahoo. in
संकेतस्थळ : www.snehwan.in
– ज्योत्स्ना गाडगीळ
(मार्मिक २१ मे २०१७ वरून उद्धृत)
अशोक देशमाने आपले कार्यास…
अशोक देशमाने आपले कार्यास सलाम.आपले कार्य असेच चालू राहो ही सदिच्छा
Comments are closed.