गुंडाने पोलिस कर्मचा-यावर गोळी झाडावी, तेवढा हा प्रकार गंभीर आहे. फेरीवाल्यांमुळे मुंबईची कोंडी झालेली आहे आणि रस्त्यांना बकालपणा आलेला आहे. ही बाब फेरीवाल्यांच्या पोटापाण्याशी निगडित असल्याने, त्यांनी या प्रकारे आक्रमक होणे स्वाभाविक होते. एक ना एक दिवस हे घडणारच होते. मला इथे भविष्यात घडणा-या फेरीवाले विरुद्ध शासन यंत्रणा अशा संघर्षाची बीजे दिसतात. फेरीवाल्यांविरुद्ध तयार करण्यात आलेल्या नियमांची अंमलबजावाणी योग्य पद्धतीने केली जात नाही. पालिकेच्या गाड्या येण्यापूर्वीच हितसंबंध गुंतलेल्या अधिका-यांकडून फेरीवाल्यांना पूर्वसूचना दिली जाते. मग सगळे फेरीवाले गायब होतात आणि गाडी गेल्यानंतर काही वेळातच परिस्थिती ‘जैसे थे’ असते. इथे कुंपणच शेत खाते. त्यामुळे फेरीवाल्यांवर वचक असा कधीच बसला नाही आणि तो बसण्याची शक्यताही कमी आहे. त्यामुळे फेरीवाल्यांना नियमांची भीड नसणे हे ओघाने आले. कायदा वाकवता येतो हे एकदा समजले की त्याची जरब बसणे शक्य नाही.
दोष केवळ त्या अधिका-यांचा नसतो. स्टेशनवर उतरले की घरी जाताना भाजी वगैरे विकत घेणे फेरीवाल्यांमुळे सहज शक्य होते. त्यामुळे फूटपाथ अडवल्यावरून लोकांनी त्यांच्या नावाने कितीही खडे फोडले तरी आपलेही हितसंबंध कुठेतरी गुंतलेले असतात, हे नाकारता येत नाही.
– किरण क्षीरसागर
thinkm2010@gmail.com
{jcomments on}