चित्रकलेतील अवघड गोष्ट म्हणून पोट्रेट या माध्यमाकडे पाहिले जाते. मानवी चेहऱ्यावरील सूक्ष्म भाव, बारीकसारीक खुणा इत्यादी गोष्टी चित्रांमध्ये रेखाटणे हे आव्हानात्मक काम असते. ‘पोट्रेट’वरून संबंधित व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व समोर उभे राहणे अपेक्षित असते. त्यामुळे कलाक्षेत्रात फार कमी कलाकार पोट्रेटच्या वाटेला जातात. म्हणूनच, तरुण वयात त्या कलाप्रकारात हातखंडा मिळवणाऱ्या प्रशांत यमपुरेचे कौतुक वाटते. प्रशांत पोट्रेट काढताना फक्त कलर पेन्सिल्सचा वापर करतो! त्याने काढलेली चित्रे पाहिली तर ती फक्त पेन्सिलने रेखाटली आहेत यावर विश्वास बसत नाही!
प्रशांत सोलापूरमध्ये लहानाचा मोठा झाला. त्याला लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. तो शाळेत विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन नेहमी बक्षिसे पटकावायचा. त्याची इतर भावंडे डॉक्टर-इंजिनीयर होण्याच्या मार्गावर असताना प्रशांतला ओढ लागली होती चित्रकार होऊन कलेत कारकीर्द करण्याची. प्रशांतला घरातून फारसे प्रोत्साहन मिळाले नाही. त्यामुळे त्याने सोलापूरमधील दयानंद महाविद्यालयामध्ये बी.एस्सी.ला प्रवेश घेतला. तेथे मात्र त्याच्या कलेला प्रोत्साहन मिळेल अशा गोष्टी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष घडत गेल्या. कॉलेजमध्ये एक विभाग होता. तेथे विद्यार्थी त्यांची चित्रे किंवा इतर कलाकृती मांडत. प्रशांत त्याची चित्रे तेथे लावू लागला आणि त्याच्या चित्रकलेला कॉलेजमधून उस्फूर्त प्रतिसाद मिळू लागला. विद्यार्थी त्याची चित्रे पाहण्यासाठी गर्दी करू लागले. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये त्याचे कौतुक होऊ लागले. प्रशांतचे पुढील चित्र कोणते असणार याबद्दल कॉलेजमध्ये उत्सुकता जाणवू लागली. त्याच्या चित्रांवर चारोळ्या आणि कविताही रचल्या जाऊ लागल्या! कॉलेजमध्ये त्याचा एक फॅन क्लबच तयार झाला. त्याचबरोबर, चित्रकलेमुळे कॉलेजमधील अभ्यासातील त्याचे लक्ष मात्र कमी कमी होत गेले.
तेव्हा, प्रशांतने चित्रकलेचे तांत्रिक शिक्षण घेण्याचे ठरवून बी.एस्सी.ला सरळ रामराम ठोकला. त्याने सोलापुरच्या ‘अप्पासाहेब कादाडी विद्यालया’त ‘फाउंडेशन कोर्स’साठी प्रवेश मिळवला. पुढे पुण्यातील ‘अभिनव कला महाविद्यालयात’ अप्लाइड आर्टसाठी प्रवेश घेतला आणि तेथून त्याच्यातील चित्रकाराची खऱ्या अर्थाने जडणघडण होत गेली.
पोट्रेटची कला तो तेथेच शिकला. प्रशांत सांगतो, ‘अभिनव’मध्ये आमच्याकडून मेहनत करून घेतली जाई. चित्रांतील एक रेष जरी चुकली तरी तेथील प्राध्यापक चित्र परत काढण्यास लावत. मीही कामाच्या बाबतीत अजिबात तडजोड करत नसे. त्यामुळे असे काही झाले, की नवी संधी म्हणून मी त्या चित्रावर अधिक मेहनत करत असे. जास्त सरावातून चेहऱ्यावरील हावभाव, खाणाखुणा, डोळ्यांचे रंग यांत मी परिपूर्ण होत गेलो.’
प्रशांत चित्रकला शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी पार्ट टाइम नोकरी करत असे. तो काही कंपन्यांची कामेही करत असे. त्यामुळे चित्रकलेचे महागडे साहित्य वापरण्याची संधी त्याला मिळू लागली. ‘अभिनव’मध्ये प्रशांतने व्यावसायिक चित्रे काढण्यास 2008 पासून सुरुवात केली. तो ग्रूप शोमध्ये चित्रांचे प्रदर्शन करायचा. त्याने त्याची चित्रे स्वतंत्रपणे 2014 च्या ‘इंडिया आर्ट फेस्टिव्हल’मध्ये प्रदर्शित केली. त्याने त्या प्रदर्शनात मांडलेल्या ‘कलर्स ऑफ इंडिया’ या पोट्रेट मालिकेतील चित्रांना चांगला प्रतिसाद मिळाला.
प्रशांत सांगतो, “‘कलर्स ऑफ इंडिया’मधील माझी पोट्रेट लोकांना खूप आवडली. मी काढलेली पोट्रेट पाहून कलारसिकांनी त्यांचे डोळे पाणावल्याचे सांगितले. माझ्यासाठी ती सर्वात मोठी शाबासकी होती. मी केलेल्या कामाचे, मेहनतीचे चीज झाले होते. अनेकांना ती चित्रे ऑइल किंवा पेस्टल कलर वापरून रेखाटली आहेत असेच वाटत होते. अनेकांनी मला पेन्सिलचा इतका प्रभावी प्रयोग पाहिला नसल्याचे सांगितले. कलाप्रेमींच्या या कौतुकाने मी भारावून गेलो.”
चित्रे काढण्यासाठी पेन्सिल माध्यमाचा
प्रशांत ‘कलर्स ऑफ इंडिया’ ही थीम विषद करताना भरभरून बोलतो. ‘माणसाच्या चेहऱ्याची वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात. पण आपल्या संस्कृतीतून प्रतीत होणारा चेहरा हा नेहमीच हृदयाचा ठाव घेणारा असतो. मी नाटकाचे, सर्कसचे शो चालू असतात तेथे जायचो आणि सर्कशीतील माणसांच्या अर्धवट रंगवलेल्या चेहऱ्यांचे निरीक्षण करायचो. एकाच वेळी माणसाचे दोन चेहरे माझ्यासमोर असायचे. एक खरा आणि दुसरा मुद्दामहून हवा तसा रंगवलेला! त्यातूनच मला ही थीम सुचली आणि मी त्यावर काम सुरू केले.’
मध्यंतरी, प्रशांतने अर्थार्जनासाठी सोलापूरमध्ये अॅनिमेशन शिकवण्याची नोकरीही स्वीकारली होती. त्यातही त्याने त्याचे वेगळेपण सिद्ध केले, पण त्यामुळे चित्रकलेपासून आपण दूर होत चाललोय ही जाणीव झाल्याने, त्याने पुन्हा चित्रे काढण्यास सुरुवात केली. सोलापूरमध्ये त्याचा स्वत:चा स्टुडिओ आहे. अनेक ठिकाणांहून त्याला कामाच्या ऑर्डर्स येतात. सध्या तो ‘शंकराच्या देवळातील नंदी’ या संकल्पनेवर आधारित चित्रांची मालिका तयार करतोय. प्रशांतच्या चेहरे रंगवण्याच्या कामापेक्षा हे जरा वेगळे काम आहे.
प्रशांत यमपुरे
मोबाईल ९८५०३१०१०५
गौरी महाजन
(मूळ लेख – प्रहार, ०३ फेब्रुवारी २०१३)