Home लक्षणीय पोवार समाजाचे व त्यांच्या पोवारी बोलीचे वास्तव

पोवार समाजाचे व त्यांच्या पोवारी बोलीचे वास्तव

पोवार/पवार समाज मुख्यतः मध्यप्रदेश, महाराष्ट्र (विदर्भ), राजस्थान या भागात वसलेला आहे. तो अल्पसंख्य आहे. पोवार समाज हा महाराष्ट्रात विदर्भ भागातील गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांत मुख्यतः आणि नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांत अंशतः वसलेला आढळून येतो.

पोवार समाजाची स्वत:ची वेगळी बोलीभाषा असून तिला पोवारी/पवारी/पंवारी बोली या नावाने ओळखले जाते. ती बोली अजूनही ध्वनिनिष्ठ/ध्वनिबद्ध आहे. तिला लिपीनिष्ठ/लिपीबद्ध करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पोवारी बोली व्यवहारात मात्र लुप्तप्राय होत असल्याचे आढळून येते. समाज त्याच्या शेती या मूळ व्यवसायातून काहीसा तुटत असून शिक्षण, नोकरी व अन्य व्यवसाय या निमित्ताने शहरवासी होऊ लागला आहे. त्याला नागर समाजात पोवारी बोली बोलण्यास संकोच वाटतो. त्यामुळे पोवारी बोली शहरवासी झालेल्या पोवार समाजातून हद्दपार होत आहे. म्हणजे ती बोली टिकवण्याची मुख्य जबाबदारी ज्यांनी उचलणे आवश्यक होते, तीच शिक्षित कुटुंबे त्या बोलीपासून दूर जात आहेत! मात्र ती बाब लक्षात आल्यावर तिचे संरक्षण व तिचा विकास यांची चिंता काही अभ्यासकांना जाणवू लागली. तशा अभ्यासकांमध्ये जयपालसिंह पटले, डॉ. ज्ञानेश्वर टेंभरे यांसारख्या नागपूरवासी झालेल्या मूळ ग्रामवासींचा समावेश आहे. महाविद्यालयांत शिक्षण घेत असलेल्या पोवार समाजातील तरुण पिढीमध्येदेखील स्वत:चा समाज व स्वत:ची भाषा यांबद्दल जागृती होऊन ती आपापसांत पोवारी बोलीत बोलू लागली आहे. त्या बोलीत साहित्य-निर्मितीसुद्धा होत असून त्या साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी ‘राष्ट्रीय पवारी/पवार साहित्य, कला, संस्कृती मंडळा’ची स्थापना करण्यात आली आहे. पहिले अखिल भारतीय पोवारी/पवारी साहित्य संमेलन 03 फेब्रुवारी 2019 ला तिरोडा (जि.गोंदिया) येथे पार पडले.

पोवार समाजाच्या उत्पत्तीची कथा पुराणाचा हवाला देऊन सांगितली जाते. परशुरामाने काही विशिष्ट कारणांमुळे क्रोधप्रवण होऊन संपूर्ण पृथ्वी निःक्षत्रिय करण्यासाठी एकवीस वेळा तत्कालीन क्षत्रियांची सरसकट कत्तल केली. तेव्हा समाजात राजाअभावी माजलेल्या अनागोंदी, अराजक, भयावह स्थितीने आतंकित, भयकंपित व आशंकित होऊन ऋषी वशिष्ठ यांनी क्षत्रिय-उत्पत्तीसाठी यज्ञ करून त्या यज्ञाग्नीमधून चार क्षत्रिय वीर उत्पन्न/निर्माण (!) केले. यज्ञातून उत्पत्ती झाल्याने त्यांना ‘अग्निवंशी क्षत्रिय’ असे संबोधले गेले. त्या चार वीरांपैकी एक महावीर म्हणजे पोवारांचा सर्वप्रथम पूर्वज. परमार किंवा प्रमार असे त्याचे तत्कालीन सर्वसमावेशक नामाभिधान! त्या परमार/प्रमारचा अपभ्रंश होता होता अखेर पोवार/पंवार/पवार हे नाव काळाच्या अंगणात स्थिर झाले.

डॉ. दशरथ स्वामी यांच्या संशोधनपर लिखाणाचे (अग्निपुराण, पवार वंश) अवलोकन केले असता असे दिसून येते, की सम्राट अशोकाच्या अहिंसात्मक बौद्धधर्म प्रसाराच्या परिणामांमुळे त्याच्या पुत्र-पौत्रांच्या राज्यकालावधीत (इसवी सनपूर्व 232 – 215) युद्धाशिवाय राज्य टिकवणे असंभव झाल्याच्या काळात लढवय्या व योद्धा असलेल्या पोवार समाजाचा उद्गम झाला असावा.

पोवार समाजात प्रारंभी मूर्तिपूजा नव्हती. पोवार समाजाचे मुख्य देव देवघरात पुढील बाजूला अतिलघु चौकोन चिकटलेला थोडासा मोठा मातीचा चौकोनी बोहोला व अंगणात दुसरा तसाच मातीचा चौकोनी बोहोला, एवढेच म्हणता येतील. त्या बोहल्यांवरील काल्पनिक देवांची व लोखंडी वा इतर धातूच्या पणतीची जागा मात्र कुटुंबप्रमुखाद्वारे पूजा करून आलटून पालटून वर्षातून दोनदा बदलली जाते. त्याला ‘देव उतरवणे’ असे म्हटले जाते. ते बोहले म्हणजे शिवाचे प्रतीक मानले जातात. म्हणजेच पोवार समाज शिवपूजक होता/आहे. पोवार समाजातीलबहु-मूर्तिपूजेने तिचे स्थान इतर समाजांच्या संपर्कात आल्यानंतर निश्चित केले आहे.

पोवार समाजात हुंडापद्धत अस्तित्वात नाही. इतर समाजांच्या देखासिखी मुळे काही क्षुल्लक अपवाद आढळून येतात, तेव्हा त्यांनाही त्यांच्यावर सामाजिक दबाव निर्माण आणून त्यापासून परावृत्त केले जाते. त्याउलट, गरीब पोवार कुटुंबात वधुपक्षाला वरपक्षाकडून ‘दक्षिणा’ देण्याची पद्धत चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत होती. पोवार समाजाची ती वैशिष्ट्ये इतर समाजावर सकारात्मक प्रभाव टाकत असत. परंतु सध्याच्या परिस्थितीत सर्वच सामाजिक प्रभाव त्यांचा परिणाम हरवून बसले आहेत! शिवाय, आणखी एक अद्भुत वैशिष्ट्य म्हणजे पोवार समाजात ‘भिकारी’ अजिबात नाहीत.

सम्राट राजा भोज हे पोवार समाजाचे प्रमुख पूर्वज. ते इसवी सन १०१० ते १०५५ या कालावधीदरम्यान होऊन गेले. ते स्वतः संस्कृतादि भाषांचे विद्वान होते, ते उत्कृष्ट व अपराजित शासकच नव्हे; तर, विविध विद्वत्तापूर्ण ग्रंथांचे कर्ते होते. त्यांच्या दरबारात उत्कृष्ट लेखकांची/विद्वानांची हजेरी असायची. त्यांच्या बृहद राज्यपरिसरातील माळवा, धार या भागातील भाषिक व बोलीक संस्कृतीचे संस्कार पोवारी बोलीवर आहेत. म्हणूनच त्या बोलीत इतक्या संक्रमणानंतरही मारवाडी, राजस्थानी, गुजराती, मालवी, निमाडी आदी भाषा/बोलींचे अंश सापडतात.

 पोवार समाजात स्थलांतराची प्रक्रिया मुस्लिमवंशीय आक्रमकांच्या अकराव्या-बाराव्या शतकांतील व त्यानंतरच्या आक्रमणांनंतर; तसेच, नागपूर परिसरातील तत्कालीन परमार (पोवार) राज्यकर्त्यांच्या आगमनानंतर घडून आली. ती दीर्घकाल चालू होती. पोवार समाज त्या ओघात वैनगंगा, वाघ, पांगोली नद्यांच्या सुपीक प्रदेशात स्थायिक झाला. शिवाय, पोवार समाजातील योद्ध्यांचे स्थलांतर राजा जगदेव यांच्या नगरधन (रामटेक) येथील राज्यस्थापनेनंतर विदर्भात झाले. पोवार समाजाने बदलत्या समयानुसार तलवार त्यजून नांगर हाती धरला. गोंडवन भागातील गोंड राजांनी पोवार समाजाला जमीनदारी, मालगुजारी दिली; त्यांना शेतीसाठी जंगल/जमीन उपलब्ध करून दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील माणिकगड किल्ला आणि पोंभुर्णा/गोंडपिपरी येथील संशोधन पोवार समाजाच्या विदर्भातील तत्कालीन अस्तित्वाची साक्ष देतात. शिवाय, पोवार योद्ध्यांनी मराठा/नागपूरकर भोसले यांच्या कालावधीत सध्याच्या गोंदिया जिल्ह्यातील कामठा या परगण्याचे प्रमुख चिमणाजी बहेकार यांच्या नेतृत्वाखाली कटक-युद्धात जबरदस्त कामगिरी बजावली. त्यामुळेही त्या-त्या पोवार योद्ध्यांना मालगुजारी देण्यात आली.

पोवारी/पवारी/पंवारी बोलीच्या ‘नावा’बद्दल भ्रमसुद्धा आहेत. वस्तुतः महाराष्ट्रात त्या बोलीवर मराठी, झाडीबोली, गोंडीबोली यांच्या संगतीचा परिणाम झाला आहे. त्यामधून भाषा अभिसरण होऊन तिला ‘पोवारी’ असे नाव पडले आहे, तर मध्यप्रदेशात हिंदीच्या संगतीने तिला ‘पवारी/पंवारी’ असे नाव पडले आहे. म्हणजे पोवारी/पवारी/पंवारी ही नावे स्थलभेदामुळे वेगवेगळी वाटत (?) असली तरी ती एकाच बोलीची ‘नावे’ आहेत. काही मोठ्या गावांमध्ये पोवार मालगुजार व पाटील असल्याने त्या-त्या गावात दुसऱ्या समाजातील लोकसुद्धा पोवारी बोलीचा वापर करत असत. तशीच वस्तुस्थिती मध्यप्रदेशातील बालाघाट, शिवनी, छिंदवाडा व बैतूल जिल्ह्यांतही पाहण्यास मिळते. म्हणजेच पोवार-बाहुल्य असलेल्या गावांतून पोवारी बोलीला लोक-बोलीचे रूपही मिळाले आहे.

भारत सरकारच्या एका जुन्या सर्वेक्षणानुसार, पोवारी बोलीचा/भाषेचा उल्लेख भाषासूचीत हिंदीची उपभाषा/पोटभाषा/बोली म्हणून केला गेलेला आहे. त्यानुसार पोवारी बोलणाऱ्या भाषकांचा क्रमांक बेचाळिसावा असून त्यांची लोकसंख्या अडतीस-चाळीस लक्ष असावी. पोवार समाजातील सव्वाचार लाख लोक बोलचालीत पोवारी बोली/भाषेचा वापर करतात असे नमूद आहे (ही आकडेवारी जुनी आहे).
इंग्रजी भाषातज्ज्ञ सर जॉर्ज अब्राहम ग्रियर्सन यांनी पोवारी बोली/भाषेवर सर्वप्रथम संशोधन केले. दुसरे इंग्रजी विद्वान आर.व्ही. रसेल यांनी

त्यांच्या ‘CASTES AND TRIBES OF C.P. AND BERAR’ या ग्रंथात पोवारी बोली/भाषेचा आणखी थोडासा अभ्यास मांडला. नागपूर विद्यापीठातील डॉ. सु.बा. कुलकर्णी यांनी प्रथमच, 1972 मध्ये पोवारी बोली/भाषेचा शास्त्रोक्त अभ्यास करून पीएच डी मिळवली. डॉ. मंजू अवस्थी यांनी 1999 मध्ये बालाघाट जिल्ह्यातील बोलींचा (पोवारी ही मुख्य बोली) अभ्यास सादर करून रायपूर विद्यापीठाची डी लिट पदवी प्राप्त केली. ज्ञानेश्वर टेंभरे यांनी 2011 पासून पोवारी बोली/भाषेचा भाषावैज्ञानिक पद्धतीने अभ्यासाचा विडा उचलला असून त्यांनी ‘पवारी ज्ञानदीप’ हा महत्त्वाचा ग्रंथ सिद्ध केला आहे. नागपूरचेच जयपालसिंह पटले यांनी ‘पवार गाथा’ व अन्य पाच-सहा पुस्तके पोवारी बोली/भाषेत प्रकाशित केली आहेत.

नागपूरकडील प्रदेश मध्यप्रदेशातील धारच्या परमारवंशीय राजांच्या (राजा भोजशी संबंधित) मांडलिकीखाली अकराव्या शतकात होता. भांदक येथील शके 1068 च्या नागनाथ मंदिरातील मराठी शिलालेखात तसा उल्लेख आढळून येतो. शिलालेखात धर्मशील राजा पवार याने मंदिराचा जीर्णोद्धार व नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली असे म्हटले आहे. नागपूरकर भोसल्यांच्या कारकिर्दीत तर अनेक पोवारांनी कटकपर्य॔त स्वाऱ्या करून समशेर गाजवली आणि ते शूर क्षत्रियांचे वंशज आहेत हे सिद्ध केले. समशेरीप्रमाणेच नांगर धरण्यातही पोवारांचा हात कोणी धरणार नाही. त्यांनी तलाव पूर्व विदर्भात व पश्चिम मध्यप्रदेशात गावोगावी बांधून वैनगंगेचे खोरे सुजलाम आणि सुफलाम करून टाकले आहे.
पूर्व वैदर्भीय पोवारांच्या भाषेचा मूळ तोंडवळा त्यांच्या दीर्घकालीन विदर्भ वास्तव्यामुळे बदलून गेला आहे. तिचा घाट जरी माळवी असला तरी थाट मात्र नागपूरी (झाडीबोलीय) आहे. पोवारी बोली/भाषेची स्वरव्यवस्था अधिकांश हिंदी भाषेप्रमाणे आहे. त्या बोलीत ‘ळ’ हा ध्वनी नाही. मराठी शब्दातील ‘ळ’काराचा ‘र’कार करण्याची प्रवृत्ती दिसून येते. त्यामुळे होळीची होरी आणि शेळीची सेरी होते. कधीकधी ‘ळ’चा ‘ड’देखील होतो. उदाहरणार्थ, उथळचे उथड व धर्मशाळाचे धरमसाडा अशी रूपे होतात. शब्दारंभीच्या ‘व’चा ‘ब’ होतो. जसे:- ‘वेळू’चा बेरू, ‘वाळू’चा बारू, ‘विहीर’चा बिहीर इत्यादी.

पोवारांच्या बोली/भाषेत ‘श’ हा ध्वनी नाही. ‘श’काराचा ‘स’कार करण्याची प्रवृत्ती दिसून येते. त्यामुळे शिंगाचे सिंग व शेंगेचे सेंग होते. दन्त्य व तालव्य या स्पर्शसंघर्षी ध्वनींमध्येही व्यवच्छेद आढळत नाही. प्रायः मुक्त-परिवर्तन आढळते. त्यामुळे मराठीतील चांदी, चाळण, चवळी,  जांभई, जावई, जुना, झाकणी यांसारखे शब्द पोवारीत चांदि, चारनि, चवरि, जांबइ, जवाई, जुनो, झाकनि याप्रमाणे उच्चारले जातात. त्या बोली/भाषेत ‘ण’ हा ध्वनी नसल्याने बाणाचा बान बनतो व वेणीची बेनी बनते. शब्दारंभीच्या ए आणि ओ या स्वरांना य आणि व असे आगम होतात. त्यामुळे एकाचा येक व ओठाचा वठ होतो.

पोवारीत हिंदीप्रमाणे पुल्लिंग आणि स्त्रीलिंग अशी लिंगे आहेत. मराठीत नपुसकलिंगी असणारे शब्द तेथे पुल्लिंगी आहेत. उदाहरणार्थ – आंगन, कनिस, घुबड, चमडा, जंगल, जांबुर इत्यादी. तर नाक, पदक, परसाद, सरन, मालिस यांसारखे नपुसकलिंगी शब्द स्त्रीलिंगी होतात. सामान्यतः पुल्लिंगी नामे अकारान्त व स्त्रीलिंगी नामे इकारान्त असतात. विशेष म्हणजे, त्या बोलीभाषेत नामांना वचनविकार होत नाही. यामुळे येक घर, दुय घर, येक टुरा, दुय टुरा असे रूप अविचल राहते. नामांचे सामान्यरूपही होत नाही. षष्ठीचा प्रत्यय ‘को’ तर सप्तमीचा प्रत्यय ‘मा’ असा आहे. जसे:- उनको नवकर, वको भाई, हातमा, बगीचामा…

पोवार समाजाचाच एक समूह वर्धा, नागपूर या महाराष्ट्रातील तर छिंदवाडा, बैतूल या मध्यप्रदेशातील जिल्ह्यांत वसला असून त्यांना भोयर पोवार/पवार असे संबोधले जाते. त्यांची बोलीसुद्धा भोयरी/भोयर पोवारी(पवारी) म्हणून संबोधली जाते. वस्तुतः स्थलभेदामुळे त्या बोलीत अल्पसा फरक दिसत असला तरी पोवारी/पवारी बोली आणि ती भोयरी/भोयर पोवारी(पवारी) बोली थोड्याफार फरकाने सारख्या आहेत.
(बोलक = बोलणारे, बोहोला = मातीचा चौकोनी ओटा)

लखनसिंह कटरे 7066968350/9665041483, lskatre55@gmail.com

 

 

About Post Author

Exit mobile version