Home लक्षणीय पद्मश्री डॉ. विकास महात्मे (Padmashree Dr. Vikas Mahatme)

पद्मश्री डॉ. विकास महात्मे (Padmashree Dr. Vikas Mahatme)

carasole
लोकसेवा हीच ईशसेवा

पद्मश्री डॉ. विकास महात्मे हे मूळचे अमरावतीचे, मध्यमवर्गीय कुटुंबातील. त्यांनी नेत्रतज्ज्ञ म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवली आहे. त्यांचे वडील सरकारी नोकरीत होते. विकास यांचे शालेय शिक्षण नागपूरच्या न्यू इंग्लिश हायस्कूलमधून झाले. त्यांना घर शेणाने सारवण्यापासून सर्व कामांची लहानपणापासून सवय होती. घरी वीज नसल्यामुळे कंदिलाच्या उजेडात अभ्यास करून त्यांनी एस.एस.सी.ची परीक्षा दिली. लोकसेवा हे उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवूनच त्यांनी बारावीनंतर नागपूरच्या सरकारी वैद्यकीय महविद्यालयात प्रवेश घेतला. त्यांनी नागपूरच्या सरकारी वैद्यकीय महविद्यालयातून ऑप्थॉल्मॉलॉजीमध्ये एम.एस. केले. त्यांनी एम.एस. करत असताना गडचिरोलीसारख्या आदिवासी भागात जाऊन शिबिरे घेणे हा अभ्यासक्रमाचा भाग बनवला होता.

शहरापासून दोनशे-अडीचशे किलोमीटर अंतरावरील लोकांची वाईट परिस्थिती पाहून डॉक्‍टरांचे मन विषण्ण होई. आदिवासी भागातील लोकांना कुपोषण व सूर्यप्रकाशात जास्त वेळ रहिल्यामुळे डोळ्यांचे आजार, विशेषत: मोतिबिंदूसारखे आजार लहान वयातच होतात, हे पाहून विकास यांनी खेडेगावात दवाखाना सुरू केला. त्‍यावेळी, लोकांची पौष्टिक अन्नाची गरज जर भागली तर त्यांना निम्मे आजार होणारच नाहीत हे डॉक्टरांना जाणवले.

त्यांनी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काही काळ काम केले. त्‍यांनी नागपूर शहराबाहेरील त्यांच्या राहत्या घरातील एका खोलीत दवाखाना सुरू केला. तेथील अनुभवातून जन्माला आली नेत्रपेढी! त्यासाठी एस.एम.एम.वेल्फेअर चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना झाली. नेत्रदानाचा कॉल आला, की डॉक्टर स्कूटरवरून जायचे. अशा छोट्या प्रयत्नांमधून आय बँकेच्‍या कामाला सुरुवात झाली. आज ‘महात्मे आय बँक’ मध्यभारतात नेत्रदानाचे सर्वाधिक कार्य करत आहे. डॉक्टर महात्मे यांच्या मते, नेत्रदानाला पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नाही. मृत व्यक्तीने नेत्रदानाची अधिकृत नोंदणी केली नसली तरीही मृत व्यक्तीचे जवळचे नातेवाईक दोन तासांच्या अवधीत जवळच्या नेत्रपेढीशी संपर्क साधून नेत्रदान करू शकतात.

एस.एम.एम. आय वेल्फेअर चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेचे कार्य मुंबई, अमरावती, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, मेळघाट, रामटेक व मध्यप्रदेशमधील मंडला येथील खेडी व आदिवासी दुर्गम भागात विस्तारले आहे. त्या संस्थेद्वारे एक लाख ऐंशी हजाराहून अधिक नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून त्यांपैकी पन्नास टक्क्यांहून अधिक शस्त्रक्रिया मोफत केल्या गेल्या आहेत. ट्रस्टद्वारे खेडोपाडी, आदिवासी दुर्गम क्षेत्रात व झोपडपट्टी परिसरात शिबिरांसाठी समर्पित वाहने व टीम पाठवली जाते. गरजू  नेत्रविकारग्रस्तांना रुग्णालयापर्यंत आणून त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात. रुग्णांचा प्रवास, निवास, भोजन, ऑपरेशनपूर्व तपासण्या, ऑपरेशनचा खर्च व ऑपरेशननंतर तीन महिन्यांचे औषध देऊन त्यांना त्यांच्या गावी परत पोचवण्यापर्यंत संपूर्ण खर्चाची जबाबदारी संस्था उचलते. दुर्गम क्षेत्रातील अनेक रुग्ण रुग्णालयापर्यत पोचू शकत नाहीत. त्यांच्यासाठी संस्था नाविन्यपूर्ण उपक्रम राबवते. नेत्रतपासणीसाठी व चष्मा बनवण्यासाठी सुसज्ज वाहन ‘आँखवाली पम् पम् ‘ रुग्णांपर्यंत जाते. गोंदिया, गडचिरोली येथे दोन व अमरावती-मेळघाट येथे चार आँखवाली पम् पम् सेवा देत आहेत.

महात्‍मे यांच्या आय हॉस्पिटलची सुरुवातही फक्त एका खोलीत क्लिनिक म्हणून झाली. नागपूर व आसपासच्या प्रदेशातील डोळ्यांचे रुग्ण तपासायला डॉक्टर स्वत:ची साधने घेऊन जात, शस्त्रक्रिया करत. मग त्यांनी निवासाच्या मागील बाजूस बांधकाम करून सहा खाटांचे रुग्णालय सुरू केले. भावंडांनी मदत केली. प्रसंगी रिसेप्शनिस्ट, मदतनीसांची भूमिका पार पाडली. त्यांना रात्री दवाखाना बंद झाल्यावर टॉयलेटपासून सर्व साफसफाई करावी लागत असे.

नागपूर येथील महात्मे आय बँक व आय हॉस्पिटल हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नेत्र रुग्णालय व मान्यताप्राप्त पदव्युत्तर शिक्षण संस्था मानली जाते. एम.बी.बी.एस. नंतरचे DOMS व  DNB हे अभ्यासक्रम तेथे उपलब्ध आहेत. भारत सरकारतर्फे ती संस्था शल्यक्रिया प्रशिक्षण केंद्र म्हणून मान्यताप्राप्त आहे. संशोधन आणि नवीन कल्पना या क्षेत्रातही संस्था अग्रेसर आहे.

मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी फेकोचे नवीन तंत्रज्ञान, वुडकटर्स टेक्निक, शुष्क डोळ्यांचे उपचार, बुबुळाचे गोंदण इत्यादी अनेक शोध लावून संस्थेने नेत्रचिकित्सेच्या कार्यात भर घातली आहे. ते संशोधन संस्थेत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या संयुक्त उपक्रमाने केले जाते. संस्थेद्वारा ऑपथॅल्मिक टेक्निशियन हा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ व नागपूर विद्यापीठ यांच्याद्वारे मान्यताप्राप्त डिप्लोमा अभ्यासक्रमही चालवला जातो.

संस्थेत विदेशातूनही नेत्रतज्ञ प्रशिक्षण घेण्यासाठी येतात. आंतरराष्ट्रीय नेत्ररोग चिकित्सा संघटनेकडून (International Council Of Opthalmology ) हॉस्पिटलला प्रशिक्षण केंद्र व परीक्षा केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे. संस्थेत पाचशेहून अधिक भारतीय व चारशेहून अधिक विदेशी नेत्रतज्ञांना प्रशिक्षित करण्यात आले आहे.

विकास महात्मे यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. डोळ्यांचा शुष्कपणा म्हणजेच औषधांच्या साईड इफेक्टमुळे किंवा अॅलर्जीमुळे डोळ्यांतील पाण्याचा किंवा तेलकटपणाचा अंश कमी होणे या विषयावर महात्मे यांनी लिहिलेल्या शोधनिबंधाला नेत्रचिकित्सेत भारतातील सर्वोत्तम शोधनिबंधास दिला जाणारा कर्नल रंगाचारी राष्ट्रीय पुरस्कार व सुवर्णपदक मिळाले आहे. त्याशिवाय मुलुंड गौरव पुरस्कार, मानवता प्रकाश पारितोषिक, रोटरी स्क्रोल ऑफ ऑनर हे पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. त्यांनी Phacho Tips & Tricks  मोतिबिंदू शस्त्रक्रियावरील पुस्तक लिहिले आहे.

संस्थेद्वारे ‘इन्स्टिट्यूट  ऑफ सायन्स ऑफ हॅपिनेस’ हा नवीन उपक्रम चालवण्यात येतो. त्यामध्ये शारीरिक व मानसिक आरोग्य, विचार व भावनांमधीळ समतोल राखणे यासंबंधी कौशल्ये शिकवली जातात. डॉक्टरांची पत्नी डॉ. सुनिता महात्मे, गायनाकॉलॉजिस्ट असूनही त्यांनी त्यांचा व्यवसाय थांबवून हॉस्पिटलच्या व्यवस्थापनात स्वत:ला झोकून दिले आहे. डॉक्टर म्हणतात, “आपण कुणाच्यातरी उपयोगी पडतोय ही भावना आपल्याला चिरकाल आनंद देणारी असते. माझं कार्यं हेच माझ्यासाठी long term source of happiness आहे. अर्थपूर्ण जीवन जगून आनंदी राहावं हेच माझं ध्येय आहे.” त्यांच्या या उद्गारात त्यांच्या लोकसेवेचे व पद्मश्रीचेही रहस्य आहे.

– प्रियांका मोकाशी

About Post Author

1 COMMENT

  1. आपला ह्या लोकोपयोगी उपक्रमास…
    आपला ह्या लोकोपयोगी उपक्रमास अंनत शुभेच्छा, आपली ही इशसेवा अशीच निरंतर सुरु रहो ही सदिच्छा !

Comments are closed.

Exit mobile version