Home कला पखवाजपटू गार्गी शेजवळ (Pakhwaj Player Gargi Shejwal)

पखवाजपटू गार्गी शेजवळ (Pakhwaj Player Gargi Shejwal)

भारतातील पखवाजवादकांचे पहिलेच पखवाजपर्व भोपाळमध्ये 2013 साली आयोजित करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात पखवाजवादन करणारी गार्गी ही पहिली महिला कलाकार होती. पखवाजपर्व धृपद संस्थान भोपाळ न्यास आणि डीडी भारती यांच्या वतीने भरले होते. गार्गी देवदास शेजवळ ही महाराष्ट्राची. गार्गी मुंबई, पुणे; तसेच, भारतातील विविध ठिकाणी तिच्या गुरूंसोबत पखवाजवादन करत असते. परंतु एवढ्या मोठ्या सार्वजनिक मैफिलीत बहुसंख्येने पुरुष कलाकार असताना तिने रंगमंचावर येणे आणि पखवाज वाजवून श्रोत्यांना जिंकणे हा प्रकार अपूर्वच ! तिचे गुरू म्हणजे तिचे वडील देवदास शेजवळ आणि तिचे काका पंडित प्रकाश शेजवळ.

पखवाज हा मृदुंग वाद्याचाच एक प्रकार आहे. पखवाज म्हणजे ‘पक्षवाद्य‘ (संस्कृत). त्या वाद्याला दोन मुखे आहेत. ते दोन्ही बाजूंनी व दोन्ही हातांनी वाजवले जाते. म्हणून त्या वाद्याचे नाव पखवाज. श्रीगणेशाने शंकराचा क्रोधाग्नी शांत करण्यासाठी सर्वात प्रथम पखवाजवादन केले होतेम्हणून श्रीगणेश हा आद्य पखवाजवादक होय. पण तो पौराणिक भाग झाला. पखवाज हे वाद्य धार्मिक व शास्त्रीय या दोन्ही संगीतात वाजवले जाते.

 

पखवाजवादनाच्या परंपरेत पुरुषवादकांचा त्या वाद्यावर अंमल आहे. काही महिला पखवाजवादन करतात. त्या महिलांमध्ये गार्गीचे नाव अग्रगण्य आहे. गार्गीने पखवाजवादनात प्रथम श्रेणीत एम ए उत्तीर्ण केले. त्यामुळे पखवाजवादनात एम ए करणारी गार्गी ही जगातील पहिली व एकमेव महिला कलाकार ठरली आहे. गार्गीने पखवाजवादनात एम ए करण्यासाठी 2017-18 या शैक्षणिक वर्षात पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात प्रवेश घेतला. तेथे गुरुकुल पद्धतीने तो अभ्यासक्रम शिकवला जातो. अभ्यासक्रम करताना एकमेव मुलगी असण्याचाच त्रास तिला सहन करावा लागला. गार्गीसोबत वर्गात असणाऱ्या काही पुरुष पर्केशनिस्ट कलाकारांनी जणू काही गार्गीवर बहिष्कारच टाकला होता ! गार्गी त्या गटबाजीमुळे एकटी पडली. परंतु गार्गीला कुटुंबीय व मैत्रिणी यांच्याकडून बळ लाभले. तिनेही तिचा अभ्यास व रियाज यावर लक्ष केंद्रित केले. गार्गी 2019-20 या शैक्षणिक वर्षात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. ललित कला केंद्रात गार्गीचे गुरू उमेश मोघेज्ञानेश्वर देशमुख आणि गोविंद भिलारे हे होते. भिलारे आज हयात नाहीत.

शास्त्रीय गायिका श्रुती सडोलीकर-काटकर या सांगतात, की पखवाज हे वाजवण्यास खडतर वाद्य ! बहुतांश पुरुष कलाकार ते वाद्य वाजवतात. परंतु गार्गी त्या परंपरेला छेद देऊन उत्तम रीत्या पखवाजवादन करत आहे. गार्गीने निष्ठेने व मेहनत घेऊन तिची कला जोपासली आहे. त्या कलेला शास्त्राभ्यासाची जोडही दिली आहे.

गार्गीच्या घरात तिच्या पणजोबांपासून संगीताची परंपरा आहेकिंबहुना शेजवळ घराण्याचे पखवाज वादनात फार मोठे योगदान आहे. शेजवळ कुटुंब मुंबईत स्थायिक आहे. पूर्वी हे कुटुंब जुन्नर तालुक्यातील काटेडे गावात वास्तव्यास होतेत्यांचे मूळ गाव आंबेगाव तालुक्यातील फुलावडे. गार्गीचे पणजोबा सावळारामबुवा शेजवळ हे भजन गायचे. सावळारामबुवा यांच्यानंतरच्या तीन पिढ्यांनी संगीताचा वारसा वेगवेगळ्या तऱ्हेने जपला. गार्गीचे आजोबा पंडित अर्जुन शेजवळ व काका प्रकाश शेजवळ ही दोन्ही  पखवाज वादनातील मोठी नावे आहेत. महाराष्ट्रात पखवाजवादनात प्रामुख्याने तीन घराणी दिसतात – 1. मृदुंगाचार्य नानासाहेब पानसे, 2. कुदौसिंह आणि 3. नाथद्वारा. शेजवळ मंडळी ही नानासाहेब पानसे घराण्याची.

मृदुंगाचार्य नानासाहेब पानसे पुण्यतिथी उत्सवात पखवाजवादक

 

पखवाज वादनात नानासाहेब पानसे घराण्याचे वेगळेपण म्हणजे पढन्त. पढन्त म्हणजे पखवाजाचे बोल वा कविता वा रचना वा बंदिश. हे पढन्त लक्षात ठेवून वादन करताना तोंडातून झरझर बाहेर येणे ही अवघड गोष्ट. पण गार्गी  पखवाज वाजवताना पढन्तचे बोल सहजतेने बोलते. गार्गीने पानसे घराण्याचे वैशिष्ट्य असे दो हाथी परणजपले आहे. धुम्यावर एकाच वेळी दोन्ही हातांनी वादन करण्याचे कौशल्य म्हणजेच दो हाथी परण. पखवाजाच्या एका बाजूला कणीक लावलेली असते. त्या बाजूला धुमा असे म्हणतात. हे परण गार्गी सहजतेने व आत्मविश्वासाने वाजवते. चौताल, धमार आणि झपताल हे गार्गीचे आवडते तीन ताल. त्यांपैकी धमार हा वाजवायला तसा कठीण, किचकट… क्लिष्ट बोलांचा! फार कमी वादक धमार वाजवतात. कारण बोल गेला असे वाटता-वाटताच कलाकार पटकन समेवर येतो. त्या दृष्टीने तो ताल फसवा आहे. गार्गीचे मात्र त्या तालावर विशेष प्रेम!

आर्य संगीत प्रसारक मंडळ (पुणे) आणि धृपद संस्थान भोपाळ न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात जगातील महिला पखवाजवादकांचे पहिले पखवाजपर्व 2016 साली आयोजित केले होते. त्या महिलांमध्ये गार्गीचे पखवाजवादन हे अव्वल ठरले. कारण महिलांना त्यांचे वादन सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी साऊंड सिस्टिमचा आधार घ्यावा लागला. पण गार्गीने मात्र आहे त्या साऊंडमध्ये पूर्ण क्षमतेने पखवाजवादन केले व संपूर्ण सभागृह दणाणून टाकले.

गार्गी आठ-नऊ वर्षांची असेल तेव्हाची गोष्ट. गार्गीचे आजोबा निधन पावले. त्यांच्या दशक्रिया विधीच्या दिवशी घरात भजन होते. भजनाचे सगळे साहित्य ओटीवर मांडून ठेवलेले होते. हार्मोनियमटाळतबला नि पखवाजसुद्धा! छोटी गार्गी ही सगळी तयारी कुतूहलाने न्याहाळत होती आणि अचानक तिच्या मनाने उचल खाल्ली आणि ती पखवाजाच्या समोर जाऊन बसली- दोन्ही पंजांनी जोरजोरात पखवाज वाजवू लागली. घरातील सगळी मंडळी व पाहुणेमंडळीही गार्गीभोवती गोळा झाली. त्यातील एकाने दटावणीच्या सुरात गार्गीला सांगितले, “इथून उठ, चल आधी. हे मुलींचं वाद्य नाही. हे पुरुषांचं वाद्य आहे.” गार्गीच्या मनात बहुधा तेथे ठिणगी पडली आणि तिच्या मनात पखवाजवादनाविषयी ओढ निर्माण झाली. मात्र गार्गीने पखवाजवादनाची प्रेरणा घेतली ती तिचे काका व गुरु प्रकाश शेजवळ यांच्याकडून. तिने प्रकाश यांनी पखवाजावर वाजवलेले ‘दोहाती परण‘ हे गीत गुरु पौर्णिमेच्या एका कार्यक्रमात ऐकले. ती भारावून गेली. त्यावेळी ती चौथीत होती. गार्गीने बाबांकडे पखवाज शिकण्याचा हट्ट धरला आणि तिचे पखवाजवादनाचे रीतसर शिक्षण तिच्या घरातच सुरू झाले. गार्गीचे वडील देवदास हे तिचे पहिले गुरू. नंतर प्रकाश यांच्याकडे गार्गीचे पखवाजवादनाचे शिक्षण झाले. पखवाजवादन शिकता-शिकता गार्गीने मराठी साहित्यात बी एही पूर्ण केले. तिला क्रिकेटची आवड आहे. तिने कराटेमध्येही नॅशनल लेव्हलला पाच गोल्ड मेडल्स मिळवली आहेत.

 

       गार्गीने राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक सांगीतिक कार्यक्रमांत सहभाग नोंदवलेला आहे. गार्गीच्या पखवाज वादनात सहजता व आत्मविश्वास दिसून येतो. त्याचे श्रेय ती रियाजातील सातत्य व गुरुंचे मार्गदर्शन यांना देते. दरवर्षी नानासाहेब पानसे यांची पुण्यतिथी केवळ मध्यप्रदेशात व मुंबईत अशा दोन ठिकाणी होते. त्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात गार्गीने तिच्या गुरुंसोबत पखवाजवादन केलेले आहे. गार्गीला काही राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळालेले आहेत.

गार्गी शेजवळ 9324908719 gargi94pakhawaj@gmail.com

 

– अश्विनी शिंदे-भोईर 8830864547 ashwinibhoir23@gmail.com

अश्विनी शिंदे-भोईर यांनी एम ए (मराठी साहित्य व सौंदर्यशास्त्र) पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्या साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे, परिसंवादांचे सूत्र संचालन करतात. त्या विरारच्या विवा महाविद्यालयात लेक्चरर होत्या. त्यांनी विविध वृत्तपत्र व नियतकालिकांतून लेखन केले आहे. त्या संपादन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या विरारला राहतात.

———————————————————————————————-—————————————————–

About Post Author

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version