Home संस्था न्‍यूजर्सीचा बुक-क्‍लब

न्‍यूजर्सीचा बुक-क्‍लब

7
carasole

‘बुक-क्लब’ हा प्रकार शिक्षित व विचारवंत (केवळ बुद्धिजीवी नव्हे) समाजात प्रचलित आहे. अशा लोकांचा तो छंद आहे असेही म्हणता येईल. पन्नाशी गाठली म्हणजे करमणुकीचे शारीरिक खेळ-प्रकार (टेनिससारखे) साधारणपणे कमी झेपतात. साठीच्या पुढे गेलेला माणूस निवृत्त होतो व त्याच्या हाती मोकळा वेळ भरपूर असतो. तशा परिस्थितीत कमी श्रमाच्या अशा बुद्धिजन्य करमणुकीची आवश्यकता वाढते. मग काही लोक ब्रिजचे डाव टाकायला बसतात तर काही लायब्ररी गाठतात आणि काही मंडळी ’बुक-क्लब’ कडे वळतात. ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांनी एके ठिकाणी म्हटले आहे, की “माणसाला तीन प्रकारची भूक असते. पैकी पहिली पोटाची भूक व दुसरी लैंगिक भूक. त्यानंतर, जी तिसरी भूक माणसाला अस्वस्थ करते ती मानसिक/वैचारिक समाधानाची.”

आमचा ‘बुक-क्लब’ आम्हाला सदैव भरपूर वैचारिक समाधान देत असतो. जॉन लॉक या सतराव्या शतकातील ब्रिटिश तत्त्वज्ञाने म्हटले आहे, “शिक्षण सर्वसामान्य माणसाला सुसंस्कृत बनवते, तर त्याचा संपूर्ण विकास होण्यासाठी वैविध्यपूर्ण इतर वाचनाची गरज असते. अशा इतर वाचनापासून त्याला भरपूर माहिती प्राप्त होते, तर त्यावर गंभीरपणे विचार केल्याने त्या माहितीचे सखोल ज्ञानात परिवर्तन होते.”

आमच्या ‘बुक-क्लब’ची सुरुवात मात्र जरा वेगळ्या परिस्थितीत झाली. तो १९९५ चा काळ असावा. काही मंडळी तरुण असून ती पूर्ण वेळ नोकरी करत होती व त्यांना अन्य प्रकारच्या करमणुकीची संधीही भरपूर होती; असे असूनसुद्धा एका वेगळ्या बौद्धिक पातळीवर विचारांना चालना मिळावी या हेतूने ती मंडळी एकत्र आली व आमच्या ‘बुक-क्लब’ची सुरुवात झाली. अर्थात त्यात निवृत्त झालेली मंडळी होतीच. आदरणीय डॉ. श्रॉफ, स्व. डॉ. कमलताई श्रॉफ, स्व. लक्ष्मण (बंडू) फडके, सौ. मीना देवधर व सौ. शैला विद्वांस या मंडळींनी जवळ जवळ वीस वर्षांपूर्वी आमच्या ‘बुक-क्लब’ची सुरुवात केली; व २०१३ सालीसुद्धा आमचा ‘बुक-क्लब’ नियमितपणे चालू आहे! सुरुवातीपासून त्यात भाग घेणाऱ्यांपैकी काही सदस्य वेगवेगळ्या कारणांस्तव क्लबमध्ये येऊ शकत नाहीत. पण त्यांनी सुरुवातीच्या काळी आमच्यात ही आवड निर्माण करण्याचे जे काम केले आहे त्याची आम्हा सर्वांना चांगली जाणीव आहे.

‘बुक-क्लब’ म्हटला, की सर्वसाधारणपणे असे एक चित्र डोळ्यांसमोर येते, की मित्रमंडळींचा एखादा ग्रूप असतो. ती मंडळी एखादे पुस्तक निवडून, प्रत्येक जण ते पुस्तक स्वतंत्रपणे वाचून, नंतर एकत्र येऊन त्या पुस्तकाची चर्चा करतात, त्याचे रसग्रहण करतात, प्रत्येक जण पुस्तकाच्या विविध पैलूंबद्दल स्वतःचे विचार मांडतात; व त्या पुस्तकाची चर्चा संपली की पुढील बैठकीसाठी कोणते पुस्तक निवडायचे ते ठरवून विखुरतात. आमचा क्लब थोडा वेगळा आहे. आम्ही एकंदर पंधरा मित्रमंडळी – त्यात नव्वद वर्षं वयाचे डॉ. आबा गवांदे सुद्धा संपूर्णपणे सहभागी असतात – दर गुरुवारी रात्री ८ ते ९:३० मोहन-शची-आबा गवांदे यांच्या निवासस्थानी भेटतो. तिथे दीड तास पुस्तकाचे वाचन होते. निवडलेले पुस्तक आधी आमच्यापैकी एखाद्याने वाचलेले असते. म्हणून आम्ही तेथेच सामुदायिक पुस्तक वाचन करतो; म्हणजे आमच्यापैकी एक जण वाचतो व बाकी सर्व मंडळी ऐकतात. मध्येच, एखाद्याला (किंवा एखादीला) प्रश्न उद्भणवतो, तो लगेच तो प्रश्न मांडतो व त्यावर चर्चा होते. तेवढा मुद्दा संपला की वाचन पुढे चालते. पण आम्ही सारे इतके चिकित्सक आहोत, की दोन ओळी वाचन व त्यावर पाव तास चर्चा, असा प्रकार अनेक वेळा घडतो!  अर्थात, अशी चर्चा ही केवळ ‘चर्चेसाठी चर्चा’ नसते. “तुझं चुकतंय, खरं काय ते मी सांगतो” अशी धार आमच्यापैकी कोणाच्याही बोलण्याला कधी नसते. “लेखकाच्या सांगण्याचा मला काय अर्थबोध होत आहे” किंवा “माझ्या अनुभवांशी व विचारांशी लेखकाचे म्हणणे कितपत जुळत आहे” अशी स्वतःची बाजू मांडण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. या धडपडीतून एक गोष्ट साध्य होते, ती म्हणजे स्पष्टवक्तेपणा. ‘बुक-क्लब’मध्ये मत-वैविध्य भरपूर असल्याने वाद होणे स्वाभाविक आहे. अशा वेळी इतरांचा मुलाहिजा राखून, मोकळ्या मनाने स्वतःचे प्रामाणिक मत चोखपणे मांडण्याची संधी प्रत्येकाला मिळते आणि तशी सवय होते.

‘बुक-क्लब’ला येणारी काही मंडळी साठीतील किंवा त्याच्या पुढील वयोगटातील आहेत.  सर्व मंडळींनी अनेक वर्षे शिक्षण, संशोधन, व्यापार, आरोग्य, संगणक-तंत्र, समाजकार्य इत्यादी वेगवेगळ्या क्षेत्रांत काम केले आहे. अशी, कार्यानुभवाचा प्रदीर्घ साठा असलेली मंडळी ‘बुक-क्लब’ला लाभलेली आहेत. त्या बहुगुणित अनुभवाचा निष्कर्ष म्हणजे कोणताही मुद्दा, लेखभाग, परिच्छेद, विचार, पुस्तक, किंवा एखादी घटना – यांचे ‘बुक क्लब’मध्ये सर्व दृष्टींनी तोलूनमापून परीक्षण होत असते व सहसा, आम्ही त्या बाबींच्या सत्याचा – अगदी निर्भेळ नाही म्हटले तरी – महतांश गाठतो.

आमच्या क्लबमधे ललित साहित्य (fiction) हा विषय पूर्णतः बाद आहे. कथा, लघुकथा, कादंबरी, कवितासंग्रह इत्यादी आमच्या वाचनात नसतात. याचे कारण म्हणजे आमच्यापैकी कोणीही ‘साहित्यिक’ नाही. उत्तम साहित्याचे विवेचन व रसग्रहण करणे कदाचित आमच्या क्षमतेपलीकडचे आहे. आम्ही, इंग्रजीत ज्याला Liberal Arts चे विषय म्हणतात अशा विषयांची पुस्तके सहसा वाचतो. इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, सामाजिक-अर्थशास्त्र, कायदा-शास्त्र, विज्ञान हे आमचे आवडीचे विषय. मुख्यत्वे करून आम्ही इंग्रजी भाषेतील पुस्तके वाचतो, कारण ‘बुक-क्लब’मध्ये जरी बहुतांश मराठी भाषी असले तरी दोघे गुजराती, एक तमीळभाषी व एक गृहस्थ पाकिस्तानी असून उर्दू भाषी आहेत. म्हणून ‘बुक-क्लब’ची भाषा इंग्रजी, हे ओघानेच आले. तरीही क्वचित, आम्ही हिंदी व मराठी पुस्तकेसुद्धा वाचली आहेत. वाचनाचे विषय जरी ठरावीक असले तरी सर्व क्षेत्रांत वाढत्या गतीने नवनवीन पुस्तके लिहून प्रकाशित होत असल्याने पुस्तकांची निवड करणे सोपे झाले आहे. किंबहुना, दरवेळी पुस्तक निवडणे हासुद्धा चर्चेचा मोठा विषय असतो!  साधारणपणे हातातील पुस्तक संपण्याच्या एखादा महिना आधीपासून पुढील पुस्तक निवडण्याची ‘प्रक्रिया’ सुरु होते. सहसा, आमचा प्रयत्न आधीच्या पुस्तकाच्या विषयाहून वेगळ्या विषयाचे पुस्तक निवडण्याचा असतो. बहुतेक व्यक्ती स्वतः वाचलेले एखादे पुस्तक सुचवतात. काही वेळा, आमच्यापैकी एकापेक्षा जास्त व्यक्तींनी ते पुस्तक वाचलेले असते. अशा वेळी त्या पुस्तकाच्या निवडीला पाठिंबा मिळतो, तर क्वचित एकाने सुचवलेल्या पुस्तकाला दुसऱ्याची नापसंती असते. मग अर्थातच अधिक चर्चा होते. पण आमचा सर्वांचा हेतू चांगले, माहितीपूर्ण वाचणे हाच असतो. आम्ही पुस्तक निवडताना लेखकाचे प्रयोजन, पुस्तकाची भाषा व लिखाण, सांप्रत परिस्थितीशी विषयाची सुसंगतता, पुस्तकाची पृष्ठसंख्या व ते कधी प्रकाशित झाले तो काळ हे मुद्दे तपासतो. दोनशे पृष्ठसंख्येचे पुस्तक ‘उत्तम’, अडीचशे-तीनशे पानी पुस्तक ‘ठीक’ तर साडेतीनशेपेक्षा अधिक पानांचे पुस्तक ‘अखेर कंटाळवाणे’ असा आमचा अनुभव आहे. पुस्तक सुचवणारा थोडक्यात वरील मुद्यांच्या अनुषंगाने पुस्तकाची मांडणी करतो. लेखकाची प्रस्तावना (Preface), तसेच मागील किंवा आतील पानावर असलेला मजकूर वाचतो. त्या लेखकाची आधी प्रकाशित झालेली पुस्तके काय? कोणत्या विषयाची? व लेखकाचा साधारण अभिगम काय आहे? (म्हणजे त्याचे आर्थिक/सामाजिक विचार समाजवादी आहेत? भांडवलशाहीकडे झुकणारे आहेत? इत्यादी) या सर्व पैलूंचे विवेचन होते. त्याच विषयावर दुसऱ्या लेखकाचे जास्त प्रसिद्धी पावलेले व ताजे प्रकाशित झालेले असे एखादे पुस्तक आहे का? अशा विविध प्रश्नांवर चर्चा होते. आधी वाचलेल्या एखाद्या सम-विषयी पुस्तकाशी प्रस्तुत पुस्तकाची तुलना केली जाते. आम्ही सारेजण ‘बुक-क्लब’च्या व्यतिरिक्त पण वेगवेगळी पुस्तके वाचत असतो, त्यामुळे प्रत्येक विषयावर नवनवीन लिखाण काय होत आहे याकडे बहुतेकांचे लक्ष असतेच. ही माहितीसुद्धा पुस्तकाची निवड करताना उपयोगी पडते. ‘न्यूयॉर्कर’ सारख्या मासिकातून बऱ्याच पुस्तकांची समीक्षा केली जाते, त्याकडेही आमचे लक्ष असते व तसेच, C-SPAN सारख्या दूरदर्शन वाहिनीचे ‘Book-Review’ चे खास सदर बघूनसुद्धा बरीच उपयोगी माहिती मिळते. पुस्तकाची निवड करण्यास या सर्व मुद्यांची आम्हाला मदत होते. हा सारा खटाटोप इतरांनी सुचवलेल्या वेगवेगळ्या पुस्तकांची समीक्षा करतानापण केला जातो. अशा तऱ्हेने बरेच चर्वितचर्वण झाल्यावर कोणते पुस्तक वाचायचे ते सर्वानुमते ठरते.

एकदा पुस्तकाची निवड झाली, की मग वाचण्यास सुरुवात होते. आमची प्रत्येक बैठक दीड तासाची असते व एका बैठकीत साधारण वीस ते पंचवीस पाने वाचून होतात. क्वचित ‘आज फक्त दहा पाने वाचली गेली’ असा प्रकार होतो, तर काही वेळा तीस-पस्तीस पाने पलटली असेही घडते. लेखकाच्या मुद्याला वेगवेगळे पैलू असू शकतात व प्रत्येक जण स्वतःचे विचार एखाद्या पैलूला धरून मांडतो. यात, इंग्रजीत ज्याला Reading Between the Lines म्हणतात तसा प्रकारदेखील असतो. लेखकाने लिहिलेले शब्द जरी तेच असले तरी प्रत्येकाचा मेंदू त्या शब्दांचा वेगवेगळा अर्थ लावत असतो, मग ती व्यक्ती पुढे त्या दृष्टिकोनातून विचार करते व मांडते. समूहवाचनाचा तो मोठा लाभ आम्हाला सहज व सतत मिळत असतो. याच कारणास्तव इतर ‘बुक-क्लब’प्रमाणे घरी प्रत्येकाने सवडीनुसार पुस्तक वाचून मग एकत्र येऊन त्याची चर्चा करणे, यापेक्षा आम्हाला समूहवाचनाचा प्रकार अधिक आवडतो. कोणत्याही दिवशी वाचन किती होते? हे मुख्य दोन गोष्टींवर अवलंबून असते. एक म्हणजे हाती असलेला मजकूर किती वादग्रस्त आहे ती व दुसरी म्हणजे (तुम्हाला गंमत वाटेल) त्या दिवशीची उपस्थिती! उपस्थिती जास्त असली की अर्थातच प्रश्नोत्तरे, वाद-प्रतिवाद जास्त होतात व त्या मानाने वाचन कमी होते. साधारणपणे कोणत्याही समूहात असते तसेच आमच्यापैकी काहींना प्रत्येक विचाराबद्दल स्वतःचे वेगळे मत असते, तर काही निमूटपणे ऐकणारे आहेत. कोण उपस्थित आहे त्या प्रमाणे त्या दिवशीची समूह-प्रेरणा (Group-dynamics) बदलत असते!  समोर असलेल्या मुद्याबद्दल संपूर्णतः वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करण्याची बौद्धिक प्रतिभा आणि तो विचार योग्य व मोजक्या शब्दांत मांडण्यास लागणारे भाषा-कौशल्य, आमच्यापैकी काहींच्या अंगी आहे. ती मंडळी ‘बुक-क्लब’ला सतत वेगळ्या – अधिक उंच – पातळीवर नेत असतात. ‘बुक-क्लब’ आम्हाला हवाहवासा वाटतो तो यांच्या प्रदानाने.  हे वैचारिक साहस व्यक्तीचे नाते समष्टीशी जोडते. समाजाला पुरोगामी विचार पुरवते. माझ्या मते, बौद्धिक माणसाचे असे चाकोरीबाहेरील विचार करू शकण्याचे सामर्थ्य ही प्रत्येक काळाची नितांत गरज असते. समाज प्रगत राहतो तो अशा व्यक्तींच्या योगदानाने. अशी व्यक्ती लेखकाचे विचार केंद्रस्थानी राखून इतरांना चिकित्सकपणे विचार करण्याची प्रेरणा देते. लेखकाच्या विचारांचा इतरांनी लावलेला अर्थ ऐकल्याने स्वतःच्या मताला पुष्टी तरी मिळते किंवा त्यातील चूक सुधारण्याची संधी मिळते.

वीस वर्षांच्या काळात आमची अनेक पुस्तके वाचून झाली आहेत. आमच्या वाचनाच्या विषय-वैविध्याचा अंदाज यावा म्हणून त्यांपैकी काही पुस्तकांची व त्यांच्या लेखकांची नावे देत आहे. या क्रमाला माझी (वि)स्मरणशक्ती सोडून इतर कोणत्याही प्रकारची अग्रता नाही.

1. End of Poverty – Jeffrey Sachs
2. The World is Flat – Tom Freedman
3. Coming Apart – Charles Murray
4. Justice – Michael Sandel
5. The Nine – Jeffrey Toobin
6. Poverty and Famines – Amartya Sen
7. Bottom of Pyramid – C. K. Prahalad
8. Difficulty of Being Good – Gurcharan Das
9. Small is Beautiful – E. F. Schumacher
10. The Worldly Philosophers – Robert L. Heilbroner
11.  युगांतर – राजीव साने
12. संस्कृति के चार अध्याय – रामधारीसिंह चौधरी
13. Monsoon – Robert Kaplan
14. Genome – Matt Ridley
15. What the Internet is Doing to Our Brains? –  Nicholas Carr
16. Mountains Beyond Mountains – Tracy Kidder (Dr. Paul Farmer)

आमचा ‘बुक-क्लब’ हा व्यक्तीश: मला मिळालेला व सतत मिळत असलेला एक अलभ्य लाभ आहे.  भारतीय अध्यात्मशास्त्राचे अभ्यासू म्हणतात, की “समाधी, ईश्वर-साक्षात्कार इत्यादी विषय अवर्णनीय असून, स्वतः अनुभवण्याचे आहेत.”  त्या प्रमाणे मी असे म्हणेन, की ‘बुक-क्लब’चे फायदेसुद्धा वर्णन करणे अवघड असून ती अनुभूती घेण्याची गोष्ट आहे.

अशोक विद्वांस
ईस्ट विंडसर, न्यु जर्सी,
ashok@vidwans.com

Last Updated On – 25th June 2016

About Post Author

7 COMMENTS

  1. It is a very good concept of
    It is a very good concept of book reading by a group. The fact that it has sustained for more than 15 years indicates the interest this activity has generated in the participants. I would suggest if you can include more Marathi books if your group would accept it. This will strengthen the bond with Marathi and Maharashtra. You can emulate your father’s tradition. Anyway, best wishes to the group.

  2. लेख उत्तम झालाय! वैचारिक
    लेख उत्तम झालाय! वैचारिक साहित्य वाचणाऱ्यांचा हा बुक क्लब अनोखाच म्हणायला हवा . श्री अशोक विद्वांस यांचे अभिनंदन!

  3. लेख छान लिहिला आहे. कार्यक्रम
    लेख छान लिहिला आहे. कार्यक्रम स्तुत्य आहे.

  4. I like the whole idea of
    I like the whole idea of sharing and discussing points within the group- but not group reading. It’s me and my liking. But that it works for you all- that’s amazing! ASHOK, I liked your comparison to samadhi, what a good similitude. Keep up!

  5. अशोक जी ; आपण दिलेली माहिती
    अशोक जी ; आपण दिलेली माहिती आणि मांडलेले विचार उत्तेजन देणारे , जे या क्लबात मेम्बर नाहीत त्यांना येण्यास आव्हान करणारे आहेत. आम्ही NJ रहात नाही नाहीतर क्लबात यायला आणि जर तुमच्या नियमात बसत असेल तर member व्हायला जरूर आवडले असते.
    इतकी वर्ष संस्था चालविणे सोपे नाही.
    क्लबच्या पुढील भवितव्यासाठी खूप शुभेच्छा

  6. Liked the concept and efforts
    Liked the concept and efforts made for book club very much.Thank you.

Comments are closed.

Exit mobile version