Home अवांतर छंद नोटा संग्राहक – राजेंद्र पाटकर (Rajendra Patkar)

नोटा संग्राहक – राजेंद्र पाटकर (Rajendra Patkar)

राजेंद्र पाटकर, वय वर्ष चौसष्ट. यांनी पहिली नोकरी लार्सन अँड टुब्रो या इंजिनीयरिंग कंपनीत चार वर्षांची अप्रेंटिशिप म्हणून सुरू केली. कंपनीतील बरेच कामगार लठ्ठ पगारासाठी – दुबई, शारजा, अबुधाबी, मस्कत आणि संयुक्त अरब अमिराती या आखाती देशांमध्ये नोकरीसाठी जात असत, जेव्हा ते भारतात येत तेव्हा त्यांच्याजवळ तेथील नोटा आणत. पाटकर त्या नोटा त्यांच्याकडून मागून घेत. ती मंडळी कधी विकत तर कधी मोफत त्या नोटा देत. पाटकरांच्या संग्रहातील त्या पहिल्या नोटा.

पाटकरांनी त्यानंतर माझगाव डॉकमध्ये नोकरी केली. तेव्हा त्यांची ओळख परदेशी बोटींवरील खलाशांशी झाली. पाटकरांनी नोटा खलाशांकडून मिळवल्या.

पाटकर ‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये नोकरीला 1980 साली लागले. त्यांनी ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठा’ची बी.ए.ची पदवी संपादन केली. पाटकर यांच्या वडिलांनी त्यांना बँकेत रुजू झाल्यावर एक हजार रुपयांची नोट बदलून आणण्यासाठी दिली. ती नोट मोरारजी देसाई पंतप्रधान असताना रद्द झाली होती. ती बदलून मिळाली नाही. पाटकरांनी ती नोट स्वतःच्या संग्रही ठेवली. ती त्यांच्या संग्रहातील पहिली भारतीय नोट. त्यांना बँकेत कॅशियरचे काम करताना नोटा हाताळाव्या लागल्या. पाटकर स्वतःचे पैसे भरून वेगवेगळ्या आकारांच्या, वेगवेगळ्या रंगांच्या, वेगवेगळ्या किंमतींच्या आणि वेगवेगळ्या सह्या असलेल्या नव्या नोटा बदलून घेत असत. पाटकर नोटा जमवतात हे कळल्यावर इतर शाखांतील त्यांचे मित्र त्यांना नोटा पुरवू लागले. पाटकर सांगतात, की एक रुपयांच्या नोटेवर अर्थखात्याच्या सचिवाची सही असते. तसे अठरा सचिव झाले आहेत. रिझर्व बँकेच्या गव्हर्नरची दोन रुपये व त्या पुढील किंमतीच्या नोटांवर सही असते. तसे एकवीस गव्हर्नर होऊन गेले आहेत. उर्जित पटेल बाविसावे. त्या सर्वांच्या सह्या असलेल्या; तसेच, विशिष्ट क्रमांकांच्या नोटा (उदा.999999, 100000, 000786) पाटकरांच्या संग्रही आहेत. चुकीच्या छपाई झालेल्या नोटाही त्यांच्या संग्रहात पाहण्यास मिळतात.

_NotaSangrahk_RajendraPatkar_5.jpgएक व दोन रुपयांच्या नोटांची छपाई 1992 साली बंद होऊन, भरपूर नाणी बाजारात आली. त्यावेळी ग्राहक त्या नोटा भरण्यासाठी बँकेत येत असत. त्यामध्ये फार पूर्वीच्या नोटा पाटकरांना मिळाल्या व त्यांचा संग्रह वाढत गेला. परदेशी गेलेले नातेवाईक, परदेशी राहणारे मित्र, बस कंडक्टर व रद्दीवाल्यांकडूनही पाटकरांनी नोटा मिळवल्या आहेत. पूर्वीच्या पै, पैसा, या जमान्यात मोठे नाणे हे चांदीचे असे. चांदीला संस्कृत भाषेत रौप्य म्हणत. यावरून रुपया हे नाव पडले असावे असे इतिहास सांगतो. त्या नावाचा प्रचार व प्रसार शेरशहा सुरी या बादशहाने केला असे पाटकर सांगतात.

पाटकरांकडे भारतीय नोटा सहाशे आहेत. त्यांची अंदाजे किंमत पंचावन्न हजार रुपये आहे. पाटकरांकडे एकूण दोनशे तेवीस देशांच्या नोटा आहेत. ब्रिटिश, फ्रेंच, पोर्तुगीज, स्पॅनिश, डच इत्यादी लोक दर्यावर्दी होते. त्यांनी वेगवेगळ्या खंडांतील विविध देश पादाक्रांत केले. त्यांची राज्ये स्थापन केली व त्यांच्या नोटा प्रसृत केल्या. त्या नोटांवरून त्या देशातील मूळ निवासी लोक, त्यांची लिपी, तेथील प्राणी, पक्षी, वनस्पती; तसेच, त्या देशांतील महत्त्वाच्या व्यक्ती, इमारती, प्रसिद्ध स्थळे यांविषयी ऐतिहासिक व भौगोलिक माहिती मिळते. त्यांपैकी काही देश अस्तित्वातदेखील नाहीत (उदाहरणार्थ – होडेशिया, बोहेमिया-मोराविया, मलाया). काही देशांचे विघटन होऊन नवीन देश तयार झाले आहेत (उदाहरणार्थ – युगोस्लाविया आणि सोव्हिएत युनियन). सोव्हिएत युनियनचे तुकडे पडून पंधरा नवीन देश तयार झाले आहेत. काही देशांची नावे बदलली आहेत (उदाहरणार्थ – सिलोनचे श्रीलंका, बर्माचे म्यानमार). पाटकर नोटा दाखवताना अशी सर्व माहिती देतात.

अर्धा युरोप दुसऱ्या महायुद्धात बेचिराख झाला. तेव्हा काही देशांच्या सरकारांनी त्यांच्या त्यांच्या देशातील लहान गावांना नोटा छापण्यास परवानगी दिली होती. त्यांना ‘नोटगेल्ड’ (Notegeld) म्हणत असत. जपान या देशाने महायुद्धानंतर ब्रिटनची सत्ता कमजोर झाल्यावर ब्रह्मदेश, फिलिपाइन्स, मलाया या देशांवर अतिक्रमण करून काही काळ राज्य केले व स्वत:च्या नोटा छापल्या. या नोटांवर कोणाचीही सही नसे. आर्क्टिक व अंटार्क्टिक ध्रुवांवरील फॅन्सी नोटा त्यांच्या संग्रही आहेत. टाटारस्तान हा रशियाच्या मास्कोतील एक भाग आहे. (जसा भारतातील पाकव्याप्त काश्मीर) तेथील मुस्लिम लोक स्वत:ला स्वतंत्र मानतात. त्यांना युनोने मान्यता दिलेली नाही. पण त्या देशाने स्वत:च्या नोटा छापल्या आहेत. त्या एका बाजूला छापलेल्या (Uniface) आहेत. पाटकरांचा संग्रह पाहताना ज्ञानात भर पडत जाते.

नोटा जमवताना काही विचित्र अनुभवही पाटकरांना आले आहेत. विक्रीकर भवन शाखेत असताना एक वयस्कर गृहस्थ मळलेल्या व जीर्ण नोटा घेऊन बँकेत आले. ते त्या नोटा बदलून मागू लागले. त्यांना नोटा बदलून नवीन नोटा दिल्या गेल्या, तर ते जास्त पैसे मागू लागले. कारण त्यांना कोणीतरी सांगितले, की जुन्या नोटांच्या बदल्यात पाटकर जास्त पैसे देतात. त्यांची समजूत काढताना पाटकरांच्या नाकी नऊ आले.

पाटकर यांनी कुडाळ, सिंधुदुर्ग, मुलुंड कॉलनी, ओव्हरसीज शाखा, आंबेडकर रोड, कांजूरमार्ग, माझगाव व विक्रीकर भवन या शाखांमध्ये काम केले आहे. त्यांना सहाय्यक प्रबंधक 2009 मध्ये व प्रबंधक म्हणून 2013 मध्ये बढती मिळाली. बढतीनंतर त्यांनी डिलाइल रोड व करन्सी चेस्ट (ठाकुरद्वार) येथे काम केले. ते बँकेतून निवृत्त 2014 साली झाले. ते त्यांच्या छंदात निवृत्तीनंतर अधिकच रमले आहेत. ते नोटांच्या प्रदर्शनांना आवर्जून भेट देतात. तसेच, स्वत:च्या नोटांचे प्रदर्शनही भरवतात. त्यांची इच्छा एक आहे, की त्यांच्या नोटांच्या संग्रहांची नोंद लिम्का बुक्स ऑफ रेकॉर्ड्समध्ये व्हावी!

– राजेंद्र पाटकर, 9869420167

– शैलेश दिनकर पाटील

About Post Author

Previous articleवन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्था
Next articleपत्रावळ
शैलेश पाटील हे कल्‍याणचे राहणारे. ते एम.एस.इ.बी.मध्‍ये कार्यरत आहेत. ते उत्‍साही आहेत. हौसेने लेखनही करतात. त्‍यांचा ओढा भवतालच्‍या सांस्‍कृतिक गोष्‍टींकडे आहे. 'थिंक महाराष्‍ट्र'च्‍या 'नाशिक जिल्‍हा संस्‍कृतिवेध' या मोहिमेच्‍या निमित्‍ताने ते 'थिंक महाराष्‍ट्र'च्‍या वर्तुळात आले आणि संस्‍थेचे कार्यकर्ते बनून गेले. सध्‍या ते 'थिंक महाराष्‍ट्र'च्‍या कल्‍याण टिममधून त्‍या परिसराचे माहितीसंकलन करत आहेत. लेखकाचा दूरध्वनी 96735 73148

1 COMMENT

  1. लेख छान आहेत…
    लेख छान आहेत
    कोठून शोधून आणतो अशी माहिती खरच खूप छान आहे.

Comments are closed.

Exit mobile version