डॉ. शरद भुथाडिया गेली पंचवीस वर्षे कोल्हापुरात बालरोग तज्ज्ञ म्हणून खाजगी प्रॅक्टिस व महानगरपालिकेत काम करत आहेत. बलसाड-गुजरातमधील गुजराथी शिंपी कुटुंबात जन्मलेले भुथाडिया इथे स्थलांतरित होऊन कायम वास्तव्यासाठी आले. त्यांचे शाळा-कॉलेजचे शिक्षण कोल्हापुरात झाले. ते मेडिकल कॉलेजात शिकत असताना त्यांनी सोलापुरातील हौशी नाट्यसंस्थेचे नाट्य आराधनाचे संस्थापक-दिग्दर्शक डॉ. वामन देगावकर यांच्या हाताखाली (1974-82) एकांकिका-नाटकांतून छोट्यामोठया भूमिका सादर केल्या. त्यामुळे त्यांना डॉ. देगावकर हे गुरुस्थानी आहेत. त्यांनी स्पर्धांमधून ‘उध्वस्त धर्मशाळा’ , ‘महापूर’, अशी पाखरे येती’ अशा नाटकांतून अभिनय केला.
कोल्हापुरात आल्यावर 1882 पासून कोल्हापुरातील ‘प्रत्यय’ या संस्थेमध्ये भूमिका व दिग्दर्शन. आणखी एक नाट्यसंस्था न काढता ‘लृ’ सारख्या सामाजिक-साहित्यिक चळवळीचा वारसा घेऊन जन्मलेली पुरोगामी विचारांची ही संघटना. आशयघन सामाजिक जाणिवांची नाटके करणारी संस्था म्हणून तिची ओळख. तिने कोल्हापुरात वेगळ्या नाटकांचा प्रेक्षक घडवण्याचे मोलाचे काम केले.
एका राजकीय कैद्याचा अपघाती मृत्यू (दारिओ फो), घोडा (ज्युलिअस हे), राशोमन (आकिरा कुरुसावा), दुशिंगराव. आणि त्यांचा माणूस (बरल्टॉड ब्रेश्ट) अशा विदेशी नाटककारांची तसेच दि. धों. कुळकर्णी, दत्ता भगत, गो. पु. देशपांडे, विंदा करंदीकर, रुद्रप्रसाद आणि लक्ष्मीनारायण लाल अशा भारतीय व मराठी नाटककारांची वेगळ्या जाणिवांची नाटके डॉ. भुथाडियांनी दिग्दर्शित केली व त्यांत अभिनयही केला. त्यांनी संस्थेतील नव्या कलाकार पिढीला दिशादर्शनाचे व मार्गदर्शनाचे कामही केले. त्यांच्या व ‘प्रत्यय’च्या वेगळ्या प्रयत्नांना महाराष्ट्र राज्य नाटय स्पर्धेत पारितोषिके मिळाली. त्यांना दिल्लीच्या संगीत नाटक महोत्सवात सहभागी होण्याचा मानदेखील अनेकदा मिळाला.
तरीही डॉ. शरद भुथाडिया म्हटल, की त्यांनी समर्थपणे सादर केलेला किंग लिअर डोळयांसमोर येतो. पूर्वीच्या पिढीतील नानासाहेब फाटक, गणपतराव जोशी अशा मान्यवरांच्या पंक्तीत उल्लेख करावा असे अभिनयकौशल्य भुथाडियांनी ती भूमिका साकार करताना दाखवले. राज्य नाट्य स्पर्धेतील त्या नाटकाचे पुढे कोलकात्याच्या नांदीकार महोत्सवात, दिल्लीतील महाराष्ट्र कल्चरल सेंटरमध्ये आणि 2001 साली केरळमध्ये भरलेल्या राष्ट्रीय शेक्सपीयर फेस्टिवलमध्येही प्रयोग झाले. नाट्यपरिषद, नाट्यदर्पण, नाट्यगौरव पुणे, फाय फौंडेशन (इचलकरंजी) अशा नामांकित पुरस्कारांचा लाभ नाटकाला झाला. ज्येष्ठ व श्रेष्ठ नाटककार विजय तेंडुलकरांनी ‘रामप्रहर’ या आपल्या लोकप्रिय सदरात त्यांचा उचित शब्दात गौरव केला – ”शेक्सपीयरचे एक अति बिकट नाटक ‘किंग लिअर’ मराठी रंगमंचावर त्या संध्याकाळी आम्ही स-मूर्त आणि साक्षात पाहिले! ते हौशी मंडळींनी उत्साहाने उभे केलेले मूळ ‘लियर’चे छायारूप नव्हते. ते अव्वल ‘किंग लिअर’च होते. त्याच्या सा-या रौद्र-भीषण व करुण जोशासकट. एक मोठा नट – एक मोठी भूमिका जगवताना पाहिला. मराठी रंगभूमीला मिळालेल्या या नव्या नटश्रेष्ठाचे नाव डॉ. शरद भुथाडिया. मी फार खूष आहे माझ्या मनात नायगराचा धबधबा अजून कोसळतच आहे! ‘लिअर’ नावाचा उधाणलेला समुद्र आपल्या अक्राळविक्राळ लाटांचे तांडव नाचत माझे सारे अस्तित्व अजून क्षणोक्षणी नव्याने हादरवत आहे. ‘लिअर’च्या प्रतिभावंत भाषांतरकाराला आणि हे सगळे वैभव माझ्यापुढे साक्षात मांडणा-या डॉ. शरद भुथाडिया नावाच्या नटश्रेष्ठाला मी सलाम करत आहे”
व्यावसायिक नाटके
भुथाडीया यांनी 1993 ते 95 या कालावधीत ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ (ले. अभिराम भडकमकर, दि – चंद्रकांत कुळकर्णी) व ‘राहिले घर दूर माझे’ (ले. शफाअतखान, दि – वामन केंद्रे) भूमिका केल्या. त्याही अनेकांना आवडल्या. त्या दरम्यान ते काही काळ मुंबईत ‘पूर्णवेळ कालाकार’ म्हणून राहिले होते. परंतु पुढे, ते वैद्यकीय व्यवसाय व ‘प्रत्यय’ संस्थेच्या कार्यासाठी कोल्हापुरात परत गेले. ते ‘प्रत्यय’ मध्ये नवनवे उपक्रम करत असतात. कै. प्रकाश संत ह्यांच्या ‘ओझं’ कथेवरील एकांकिकेत सहभाग व त्याचे अनेक ठिकाणी स्पर्धांत प्रयोग झाले, बक्षिसेही मिळाली.
डॉ. भुथाडिया ‘अवंतिका’ सारख्या मालिकांतून तसेच मोजक्या मराठी चित्रपटांतूनही दिसले.
आगामी.
राष्ट्रीय नाटयशाळेच्या एका प्रकल्पांतर्गत भीष्म सहानीलिखित ‘कबीरा खडे बजार मे’ या नाटकाची निर्मिती ‘प्रत्यय’ तर्फे केली जात आहे. त्याचे दिग्दर्शन अनिरुध्द सुरवट करताहेत तसेच आईनस्टाईन वर्ष असल्याने एकपात्री नाट्यप्रयोग करण्याचा डॉ. भुथाडियांचा विचार आहे.
दिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्यांनी पुण्यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्यांनी आकारलेली ‘म.टा.’ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्यांना ‘फीचर रायटिंग’ या संबंधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय (थॉम्सन फाउंडेशन) पाठ्यवृत्ती मिळाली आहे. त्याआधारे त्यांनी देश विदेशात प्रवास केला.
गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्यासारख्या व्यक्तींच्या साथीने ‘ग्रंथाली’ची स्थापना केली. ती पुढे महाराष्ट्रातील वाचक चळवळ म्हणून फोफावली. त्यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी ‘ग्रंथाली’च्या ‘रुची’ मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत ‘ग्रंथाली’ची चारशे पुस्तके त्यांनी संपादित केली. त्यांनी संपादित केलेल्या मासिके-साप्ताहिके यांमध्ये ‘एस.टी. समाचार’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. गांगल ‘ग्रंथाली’प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा’चे संस्थापक सदस्य आहेत.
साहित्य, संस्कृती, समाज आणि माध्यमे हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. त्यांनी त्यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि ‘स्क्रीन इज द वर्ल्ड’ अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना महाराष्ट्र सरकारचा ‘सर्वोत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती’चा पुरस्कार, ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ व ‘मराठा साहित्य परिषद’ यांचे संपादनाचे पुरस्कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल ‘यशवंतराव चव्हाण’ पुरस्कार लाभले आहेत.