मेधा पाटकर यांचे नर्मदा बचाव आंदोलन हे केवळ धरणग्रस्तांना न्याय मिळवून देणे, या एका मुद्द्यापुरते सीमित नाही. या आंदोलनातील महत्त्वाची फलश्रुती म्हणजे मेधा पाटकर यांच्या व्यापक शिक्षणविषयक दृष्टिकोनातून निर्माण झालेल्या जीवनशाळा. ‘लढाई और पढाई, साथ साथ’ हे ब्रीदवाक्य घेऊन स्थापन झालेल्या जीवनशाळा आंदोलनाचा प्राणवायू आहेत…
सरदार सरोवर प्रकल्पाच्या जलाशयामुळे निर्माण झालेल्या बुडित क्षेत्राचा विस्तार गुजरातमधील एकोणीस गावे, महाराष्ट्रातील तेहतीस गावे आणि मध्य प्रदेशमधील एकशे त्र्याण्णव गावे इतका मोठा आहे. या धरणग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली ‘नर्मदा बचाओ’ आंदोलनाला 1986 च्या आसपास सुरुवात झाली. जलाशयामुळे त्या भागात भील, भिलाला, पावरा, राठवा, तडवी, नायका असे विविध आदिवासी समूह राहतात.
बुडिताला सुरुवात 1993 मध्ये झाली. आदिवासींच्या जल, जंगल, जमीन यांच्यावरील हक्कांची लढाई नंदुरबार जिल्ह्यातील ‘मणीबेली’ येथून सुरू झाली. अनेक गावांमध्ये शाळाच नव्हत्या. गावकऱ्यांच्या मनात मेधा पाटकर यांच्या पुढाकाराने आपणच आपली शाळा काढू असा विचार आला. पहिली ‘जीवनशाळा’ 1991 मध्ये नर्मदेच्या किनारी असलेल्या ‘चिमलखेडी’ व ‘तिमगव्हाण’ येथे सुरू झाली (ती दोन्ही गावे सरदार सरोवराच्या जलाशयात जवळजवळ बुडाली आहेत). पाठोपाठ गावकऱ्यांनी गावागावातून पैसे गोळा करून शाळा बांधल्या. अशा प्रकारे महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यात शहादा येथे व इतर ठिकाणी सहा जीवनशाळा आणि मध्य प्रदेशात भादल येथे बिडवानी जिल्ह्यात दोन शाळा आहेत. त्या शाळांचा खर्च गावकरी व इतर देणगीदार यांच्या मदतीने चालतो. त्यासाठी सरकारी मदत घेतली जात नाही.
सहा ते अकरा वयोगटांतील मुले त्या शाळांतून शिक्षण घेत आहेत. ती संख्या साधारण आठशे-साडेआठशे इतकी आहे. एकूण त्या शाळांमधून सहा हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. शिकलेली मुले वेगवेगळ्या क्षेत्रांत कामे करत आहेत; तसेच, ती मुले क्रीडा क्षेत्रातही चमकत आहेत. काही मुले राज्य पातळीवर खेळली आहेत व त्यामुळे त्यांना सरकारी नोकऱ्याही मिळाल्या आहेत. त्या शाळांतून शिकलेले काही विद्यार्थी पुढे, त्याच शाळांतून शिक्षक झाले आहेत. शिक्षक सुरुवातीला मुलांना त्यांच्या बोलीभाषेतून शिकवतात. उदाहरणार्थ पावरी, भिलारी इत्यादी. त्यामुळे मुलांना चांगले समजते. त्याचबरोबर त्यांना प्रमाण मराठी भाषेतील पर्यायी शब्दही सांगितले जातात. त्या मुलांची अभ्यासात प्रगती चांगली आहे. त्यांचा गाणी, नाटक, नृत्य व इतर सांस्कृतिक कार्यक्रम यांत पुढाकार असतो. त्या शाळांतून त्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो. जीवनशाळांतून राज्य सरकारचा अभ्यासक्रम आहे तोच शिकवला जातो. त्यामुळे लोकांकडून जीवनशाळांची मागणी वाढली आहे, कारण इतर सरकारी शाळा केवळ कागदावर आहेत.
शाळांतील काही विद्यार्थी निवासी आहेत, तर काही जवळ राहणारे स्वत: च्या घरी जातात. निवासी विद्यार्थी लांबून, दुसऱ्या गावांतून आलेले असतात, त्यांच्या राहण्याची व खाण्याची सोय गावातील मंडळींनी दिलेले धान्य व इतर मदत यांवर होते; काही शहरी लोकही पैसे देऊन जीवनशाळांना मदत करतात. गावांतील लोकांनी जीवनशाळेच्या देखरेखीसाठी कमिट्याही स्थापन केल्या आहेत. त्या कमिट्या शाळांची देखभाल करतात. त्या शाळांचे ब्रीदवाक्य आहे, ‘लढाई और पढाई, साथ साथ’.
– सुरेश चव्हाण 9867492406 sureshkchavan@gmail.com
———————————————————————————————-