दैनिक महाराष्ट्र टाइम्स
तळवलकर आणि त्यांचे शिलेदार
– अरविंद विठ्ठल कुळकर्णी
तळवलकर ,गांगल आणि देवधर
व्यवसायबंधू विश्वनाथ नारायण देवधर ह्यांच्या मुंबई मराठी पत्रकार संघाने योजलेल्या दुखवट्याच्या सभेला जाताना मी स्वत:शी म्हणत होतो, की ह्या माणसाशी आपले नेमके नाते काय, हे आपण निश्चित केले आहे काय ? आपण सभेला उपचार म्हणून की काहीतरी गमावल्यासारखे वाटत आहे म्हणून जात आहोत ? मग हळुहळू लक्षात आले, की आपले नाते आहे आणि ते रक्ताच्या नात्यापेक्षा अधिक दृढ आहे. पत्रकाराविषयी आपल्या ज्या कल्पना आहेत त्यातील काही देवधरांमध्ये अंतर्भूत आहेत. म्हणून ते आपल्या, जवळचे वाटतात. देवधर हिंदुत्वनिष्ठ होते, पण तेवढे एक कारण आपली मैत्री जुळायला पुरेसे ठरले नाही. त्यांच्या चारित्र्यात ध्येयवादावरील निष्ठा, परिश्रमपूर्वक अर्जित केलेली व्यावसायिक निपुणता आणि माणूसपण ह्यांचा त्रिवेणी संगम फार सुंदरपणे प्रतिष्ठित झाला होता. त्यांनी निष्ठेशी तडजोड केली नाही पण निष्ठा त्यांच्या मार्गात कधी अडथळाही ठरली नाही. त्यांना भिन्न भिन्न मतांच्या वेगवेगळ्या अनेकांशी चांगली मैत्री करणे जमले. ते अनेकांना ते हवेसे वाटत. व्यवसाय करताना त्यांनी जी प्रामाणिकता, निपुणता, विश्वसनीयता , सुंदरता आणि अनिवार्य उपयुक्तता दाखवली, त्यामुळे त्यांनी आदरयुक्त भावनेने जे सहकारी होते त्यांच्याकडे बघितले.
गांधीवादात काहीतरी गफलत आहे आणि वृत्तपत्रांनी सावरकरांचे म्हणणे लोकांपर्यंत पोचवण्यात कुचराई केली असे मनात येत असे. आपले स्वातंत्र्य काही खरे नाही आणि जे काही चालले आहे ते बरे नाही असा एक निराशावादी विचार तर दुसरीकडे आपण हे बदलू शकतो हा आशावादी विश्वास अशी मनाची पार्श्वभूमी होती. पहिल्या बाजीरावाप्रमाणे जग जिंकायला बाहेर पडण्याची वेळ झाली आहे असे वाटण्याचे माझे ते वय होते. अशा वेळी ज्याला आपल्यापेक्षा थोडे अधिक कळते आणि जो चुकीचे सांगणार नाही असा एक मित्र सुसंवाद साधण्यासाठी हवा असतो. ती आवश्यकता ‘महाराष्ट्र टाइम्स’ने पूर्ण केली.
हे पत्र जन्माला आले तेव्हा संयुक्त महाराष्ट्र एक नवे राज्य म्हणून स्थापन होऊन दोनएक वर्षाचा काळ लोटला होता. तेव्हाच्या काही प्रतिष्ठित मराठी वृत्तपत्रांनी महाराष्ट्राच्या निर्मितीला नुसता विरोधच केला नव्हता तर लोकांशी प्रतारणा केली होती. आचार्य अत्र्यांचा ‘मराठा’ जवळचा वाटत होता, पण त्याने सगळे अंग झाकत नव्हते. त्याने मन पेटत होते पण डोक्याला काम मिळत नव्हते. मराठी पत्रकारितेचा पिंड लोकमान्य टिळकांच्या अन्नावर पोसला आहे. पण त्या तेजस्वी पत्रकारितेचे एक अंग नरसिंह चिंतामण केळकरांनी एखादी विदुषी माता ज्या सजग मायेने आपली संतती मोठी करील तसे संगोपले आहे हे आवर्जून लक्षात ठेवले पाहिजे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ सुरू झाला आणि काहीसा लुप्त झालेला हा सांधा पुन्हा जोडला गेला. पुढची तीस वर्षे, दोन पिढ्या तरी हे पत्र डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल करण्यात आपला गौरव मानू लागली.
मराठी माणसाला फाजील व्यक्तिमाहात्म्य मान्य नाही. तो माणसाचे मूळ रूप पाहायला उत्सुक असतो. त्याच्यावर ज्ञानेश्वरीचा म्हणजेच अभिजाततेचा संस्कार आहे. रामदास आणि तुकाराम हे त्याच्या घरातले आहेत. म्हणजेच तो रोखठोक आहे. त्याला कमरेत वाकून विनयशीलता दाखवणे जमत नाही. तो चौकस आहे. ब्रिटिशकाळात भारताच्या राजकीय आणि सामाजिक जाणिवा प्रगल्भ करणारी जी अभियाने आणि उपक्रम सुरू झाले त्यामागे बहुतांशी मराठी माणसाची प्रेरणा आणि परिश्रम कारणीभूत आहेत. डोंगराच्या पलीकडे काय आहे हे जाणून घेण्याची मराठी माणसात विशेषत्वाने आढळणारी भूक आहे. ती ‘महाराष्ट्र टाइम्स’ पुरी करील असे लोकांना वाटले आणि म्हणून हे पत्र अल्पावधीत लोकप्रिय आणि प्रतिष्ठाप्राप्त झाले.
आज, मी ‘महाराष्ट्र टाइम्स’चा विचार करतो तेव्हा डोळ्यांसमोर गोविंदराव तळवलकर, दि. वि. तथा बंडोपंत गोखले, मा. पं. शिखरे, रा. के. लेले, शंकर सारडा, दिनकर गांगल, रा. य. ओलतीकर, नरेंद्र बल्लाळ, वि. ना. देवधर, दिनू रणदिवे, वि. वि. तथा बाळ करमरकर, वा. य. गाडगीळ, गोपालकृष्ण भोबे अशी कितीतरी नावे उभी राहतात. ग. वि. केतकर हे एक नाव त्यावेळी मराठी वृत्तपत्रांच्या संपादकांत होते की ज्याची दखल इंग्रजी वृत्तपत्रांना घ्यावी लागे. पण तळवलकर व्यासंगात त्यांच्या फार पुढे गेले. जसा ‘टाइम्स’चा संपादक तशी प्रतिष्ठा तळवलकरांनी मराठी संपादकाला मिळवून दिली. त्यांच्यावर टिळकांच्या लिखाणाची छाप आहे. त्यांना अग्रलेखाचा मथळा अग्रलेख लिहिण्याआधी सुचत असे आणि मग ते मजकूर लिहीत असे सांगतात. त्यावरून त्यांच्या मन:पटलावर अग्रलेख किती आखीवरेखीवपणे उभा राहत असे ते समजते. मारुतीला जशी समोर आलेली वस्तू फोडून त्यात राम आहे की नाही हे पाहण्याची सवय होती तशी सवय संपादक म्हणून तळवलकरांनी स्वत:ला लावून घेतली होती. विषयात तथ्य किती आणि दांभिकता किती हे ते पटकन सांगून मोकळे होत. ते टिळकांच्या आवेशाने प्रतिपक्षावर तुटून पडत. टिळकांच्या प्रमाणे, त्यांच्या मनात बरोबर काय आणि चूक काय ह्याविषयी संदेह नसे. थोडी अतिशयोक्ती करून असे म्हणता येईल, की तळवलकर अग्रलेख लिहायचे थांबले आणि मग राज्यकर्त्यांना धरबंध राहिला नाही. त्यांचा धाक होता. त्यांनी राजकीय पुढारीपणाचा, चाणक्यगिरीचा किंवा समाजसुधारकाचा आव कधी आणला नाही. व्यासंगी,चोखंदळ आणि कुणाचीही भीडमुर्वत न ठेवता स्पष्टपणे थोडक्यात विश्लेषण करणारा संपादक ह्या भूमिकेची मर्यादा त्यांनी ओलांडली नाही. तरी, त्यांच्याविषयी धाक होता आणि आदरही होता.
न्यायमूर्ती रानडे हे तळवलकरांचे दैवत, परंतु विषयाची निवड, ते मांडण्याची पध्दत आणि त्यातून साधायची परिणामकारकता हे पाहता त्यांच्यावर टिळकांच्या शैलीचा पगडा होता असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. परंतु ह्या दोघांनाही सारखीच प्रिय असलेली ज्ञानोपासना हा तळवलकरांचाही गुणविशेष होता. तथापि अग्रलेख बाजूला ठेवले आणि एकंदर ‘महाराष्ट्र टाइम्स’ नि तळवलकर ह्यांचे परस्पर संबंध निश्चित करायचे म्हटले, की मला तात्यासाहेब केळकरांची आठवण येते. मांडीवर मूल असताना आईला जसा पान्हा चोरता येत नाही आणि किती देऊ आणि नको असे होऊन जाते तसे ‘केसरी’साठी लिहायला बसले की केळकरांचे होत असे. हे श्री. म. माट्यांनी म्हटले आहे. ते तळवलकरांच्याही विषयात म्हणता येईल. महत्त्वाच्या विषयावरील इंग्रजी पुस्तकांची जाणकारांकडून करवून घेतलेली परीक्षणे ‘महाराष्ट्र टाइम्स’ने जेवढी लोकांसमोर आणली तेवढी अन्य कोणत्याही मराठी वृत्तपत्राने आणली नाहीत. लोकप्रियतेसाठी तळवलकरांनी आपले पत्र सवंग केले नाही. त्यांचे रागलोभ तीव्र होते. पण समाजजीवनातील बहुतेक सर्व स्पंदनांचे प्रतिसाद सन्मानपूर्वक ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये उमटले. ह्या पत्राची वाचनीयता साधारणपणे उच्च मध्यमवर्गीयांमध्ये राहिली, परंतु तळवलकरांनी ह्या पत्रात आपल्याला जागा नाही अशी तक्रार करायची संधी एकाही घटकाला दिली नाही. इंग्रजीत ज्याला रेनेसांस म्हणतात तसे काहीतरी आपल्या हातून होत आहे असा आविर्भाव ह्या पत्राच्या संपादकीय विभागाचा असे.
ह्या वृत्तपत्राविषयीची माझी मते एका लेखात सांगता येणार नाहीत. म्हणून आणखी एका व्यक्तीविषयी लिहून आवरते घेतो. ह्या पत्राने विभिन्न क्षेत्रातील जे विषय उपस्थित केले आणि त्यावर साधकबाधक चर्चा सादर केली त्याचा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीवर चांगला परिणाम निश्चितच झाला आहे. ह्या संदर्भातील धोरणे तळवलकर, गोखले आणि आणखी काही मंडळी ठरवत असतील परंतु त्याची कार्यवाही महत्त्वाची होती. ते शिलेदार ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये उत्तम जमा झाले होते. या वृत्तपत्राचा आरंभच मराठी पत्रसृष्टीत क्रांतिकारी ठरला. त्यावेळी या क्षेत्रात व्यवस्थापन असे नव्हते, पत्रकारांना पगार धड नव्हते, ती शिस्त ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये आली. ही संघटना मोठी होती, तिला मूळ ब्रिटिश कंपनीकडून आलेली परंपरा होती. या वर्तमानपत्रात आरंभी पद्धतशीर निवड झाली, ती तळवलकर यांची सहसंपादक म्हणून. नंतर संपादकपदी कर्णिक आले.
कर्णिकांनी पत्रात उत्साह आणला, सर्वत्र संचार सुरु केला, मोहरे जमा केले तळवलकर-गोखले यांनी वर्तमान पत्राला वळण लावले. कर्णिक-माधव-गडकरी-शंकर सारडा ह्या कर्तबगार आरंभत्रयींनी सोडलेल्या मोकळ्या जागा भरून काढल्या आणि तळवलकर गोखले यांचे राज्य निर्वेध सुरु झाले, तेव्हा त्यांनी शिलेदारांवरील भिस्त वाढवली, त्यांचे सुभे पक्के केले. त्यामुळे बातमीदारी ( चंद्रकांत ताम्हणे, दिनू रणदिवे, वि.ना.देवधर, अशोक जैन), क्रीडावार्ता ( वि.वि.करमरकर), रविवार पुरवणी (दिनकर गांगल), अग्रलेख व टीपा ( मा.पं.शिखरे, रा.के.लेले), वृत्तसंपादक ( दि. वि. गोखले, पंढरीनाथ रेगे) असे विभाग पक्के होत गेले आणि ते त्या त्या मंडळींनी सुदृढपणे बांधले. आपण शिवाजी महाराजांची महात्मता सांगतो. परंतु बाजी पासलकर, येसाजी कंक, जिवा महाले ह्यांचीही आठवण कृतज्ञतेने काढली पाहिजे. शिवाजीच्या मोठेपणात आणि स्वराज्याच्या निर्मितीत त्यांचा जो वाटा आहे तो कमी महत्वाचा नाही.
–अरविंद विठ्ठल कुळकर्णी
भ्रमणध्वनी : 9196194362