सभोवताली नैराश्येचे वातावरण असताना नेहमीची चाकोरीबद्ध वाट सोडून नवी वाट चोखाळणारे शिस्तबद्ध, प्रामाणिक आणि कामसू अशी प्रतिमा असणारे दुर्गादास परब. दुर्गादास यांना ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’तर्फे 2023 चा स्व. बाळासाहेब घमाजी मेहेर स्मृतिप्रित्यर्थ ‘जीवन प्रतिभा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे…
गोव्याच्या पेडणे तालुक्यातील विर्नोडा गावचे दुर्गादास परब हे समस्यांनी ग्रस्त लोकांसाठी विविध योजना राबवत असतात. त्यामुळे दु:खी लोकांना दिलासा मिळतो आणि आजारी लोकांना त्यांच्या आजारापासून उतारा मिळाल्याचे जाणवते. उदाहरणार्थ त्यांनी कोविड काळात वयोवृद्धांना दोन्ही वेळच्या जेवणाची व्यवस्था केली. ‘टिफीन फॉर एल्डर्स’ असे त्या योजनेचे नाव. ती सेवा त्यानंतरही गेली दोन-अडीच वर्षे चालूच आहे. त्या योजनेखाली विर्नोडा गावच्या सहा वृद्धांच्या जेवणाखाणाची व्यवस्था केली जाते. दर महिन्याला सहा वृद्धांच्या जेवणासाठी जेवढा खर्च असेल तेवढेच पैसे गोळा केले जातात. कधी निधी कमी पडत असेल तर दुर्गादास स्वत: तो भार उचलतात. तेथे खर्चापेक्षा जास्त पैसे गोळा करायचे नाहीत असा अलिखित नियम आहे. गावातील दोन स्त्रिया जेवण बनवतात. त्यांना त्यांच्या सेवेचा मोबदलासुद्धा दिला जातो. चोख हिशोब हे दुर्गादास यांचे जीवनतत्त्व आहे.
दुर्गादास एल.आय.सी.तून अधिकारीपदाची नोकरी करून निवृत्त झाले. जीवनाचा विमा उतरवणे ही वेगळी गोष्ट, पण जीवन आनंदी कसे जगावे हे कोणीही दुर्गादास यांच्याकडून शिकावे. शिस्तबद्ध, प्रामाणिक आणि कामसू अशी दुर्गादास यांची प्रतिमा तयार झाली आहे. मी दुर्गादास यांच्याकडे इन्शुरन्स एजन्सीचे काम करताना बरेच काही शिकलो. त्यांनी नारळांचा व्यवसाय करताना क्षणोक्षणी कळत-नकळत दिलेल्या विद्येचा मला जीवनात उपयोग होतो. त्यांची स्मरणशक्ती चकित करणारी आहे. त्यांना त्यांच्याकडून तीस वर्षांआधी पॉलिसी काढलेल्या माणसाचे नाव, वाढदिवस आणि त्यांची सर्व कुंडली तोंडपाठ असते. त्यांनी त्यांचा ‘बिझनेस’ वाढवण्यासाठी आडमार्ग कधी अवलंबला नाही.
त्यांचे त्यांच्या विर्नोडा गावावर अतूट प्रेम आहे. त्यांनी तेथे वडिलोपार्जित पडिक जमिनीवर सोने पिकवले. माळरानावर सुमारे दोनशे वेगवेगळ्या जातींची आंब्याची कलमे आणि पाचशे काजूंची रोपे लावली. ती झाडे दूरदूरवरून जीप गाडीतून पाणी आणून, शिंपून वाढवली. त्यांनी शेजारपाजारच्या लोकांनाही लागवडीचे महत्त्व समजावून देऊन त्यांना नवीन लागवड करण्यास प्रवृत्त केले. घामाचे पाणी करून लागवड केलेली ती जमीन एक राजकारणी माणूस क्रीडा नगरीचे मायाजाल दाखवून गिळंकृत करण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा दुर्गादास यांनी जिवाच्या आकांताने त्याच्याविरूद्ध कायदेशीर लढत देऊन बागायतीचे रक्षण केले ! त्यांच्या या कडक नियमांच्या जीवनाला गोव्याच्या ग्रामीण भागातील सत्तरीच्या दशकातील शिक्षण घेतल्याची साथ लाभली आहे त्यातील कष्ट आणि संस्कार ! दुर्गादास आणि त्याच्या गावातील पाचवी ते अकरावीपर्यंतचे विद्यार्थी रोज सहा किलोमीटरची पायपीट करून शाळेत येत होते आणि जाताना परत सहा किलोमीटर. रोज बारा किलोमीटर चालणे आणि तेही उन्हापावसाची तमा न बाळगता. पावसाळ्यात तर अनेकजण ओलेचिंब भिजून जात होते.
दुर्गादास यांना हिमालयाच्या कुशीत शिरून हिमालयावर प्रेम करण्याचे व्यसन जडले आहे. म्हणूनच त्यांनी कदाचित सतत एकेचाळीस वेळा हिमालय सर केला असेल! त्यांना दोन वर्षांत कोविड काळातील बंधनांमुळे हिमालयात पदभ्रमण करणे शक्य झाले नाही. परंतु वातावरण जरा निवळल्यानंतर, गेल्या वर्षी त्यांनी बेचाळिसावी हिमालय गिर्यारोहण यात्रा सफल करून दाखवली ! त्यांना त्यांच्या ‘ब्रिगेड’ची साथ असतेच. ते ‘इको ट्रेक’ संस्थेच्या कामात महत्त्वाचा सहभाग उचलतात. ‘इको ट्रेक’ ही संस्था 26 ऑक्टोबर 2008 ह्या दिवशी स्थापन झाली. संस्थेने पदभ्रमण व गिर्यारोहण यात्रा एकशेअठ्ठेचाळीस इतक्या काढल्या आहेत. त्यांचे ‘ट्रेक’ गोव्याच्या वेगवेगळ्या भागांतील यात्रांसोबतच रायगड, कुर्ग, मालवण, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग, तपोला, तोरणा, सिंहगड अशा किल्ल्यांवर जातात. ते ट्रेक वर्षभर चाललेले असतात. ‘इको ट्रेक’ची आचारसंहिता आहे व ती ट्रेककऱ्यांना पाळावीच लागते.
दुर्गादास परब यांचा आर्थिक हिशोब चोख असतो, म्हणून त्यांनी कोठलाही समाजोपयोगी उपक्रम हाती घेतल्यावर त्याला दानशूर लोकांचा उस्फूर्त पाठिंबा मिळतो. त्यांनी ‘ऊर्जा फाऊंडेशन’ची स्थापना 2013 मध्ये केली. ग्रामीण भागातील बरेच विद्यार्थी घरच्या गरिबीमुळे शिक्षणापासून वंचित राहतात. ‘ऊर्जा फाऊंडेशन’ने तशा मुलांसाठी दहावीत गेल्यावर तीन हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्याची योजना सुरू केली. सुरुवातीला, ती योजना पेडणे तालुक्यापुरती सुरू केली. आता ती सत्तरी आणि डिचोली तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठीही लागू आहे. त्या शिष्यवृत्तीला पात्र होण्यासाठी त्या विद्यार्थ्याला कमीत कमी पन्नास टक्के मार्क्स मिळवणे गरजेचे असते. ती शिष्यवृत्ती एका शाळेतील तीन मुलांना दिली जाते. साधारणपणे, प्रतिवर्षी एकशेचार शाळांतील तीनशेबारा विद्यार्थ्यांना एकूण नऊ लाख छत्तीस हजार रुपये शिष्यवृत्तीच्या रूपाने दिले गेले आहेत. ती योजना सांगे आणि काणकोण तालुक्यांतील मुलांनाही देण्याचा निर्णय ‘ऊर्जा फाऊंडेशन’ने घेतला आहे. तेथेसुद्धा दुर्गादास यांचा हिशोब अगदी शिष्यवृत्ती देतानाच तयार असतो ! जमलेल्या पैशांतून शिष्यवृत्ती व खर्च वजा जाता बाकी शून्य. बाकी रक्कम पुढे ओढण्याची पद्धत नाही. फंड कमी पडला तर ते स्वत:च्या खिशातील पैसे वापरून हिशोबाची वही बंद करतात. त्यांच्या ह्या ताळेबंदाकडे आकर्षित होऊन दिवसेंदिवस नवीन लोक मदत देण्यास प्रवृत्त होतात. लोकांचा उत्साह आणि उस्फूर्त प्रतिसाद मिळत असल्यामुळे ‘अक्षय उर्जा’ ही नवी योजना सुरू करण्यात आली आहे. त्या योजनेखाली दहावी पास गरीब विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणाची पूर्ण जबाबदारी उचलून तशा विद्यार्थ्यांचे पालकत्व घेणारे दानशूर लोक पुढे आले आहेत. ती योजना सप्टेंबर 2022 पासून सुरू झाली आहे. तिघांनी तीन विद्यार्थ्यांचे पालकत्व घेतले आहे. ती साखळी वाढत जाणार व शिक्षणाची ज्योत पेटत राहणार असा दुर्गादास यांचा विश्वास आहे. दुर्गादास यांच्या पत्नी ज्युली यांचा त्यांना मिळणारा भावनिक आधार फार महत्त्वाचा आहे. त्यांचे चिरंजीव ऋषभ यांचीही त्यांना साथ असतेच.
दुर्गादास परब 9422445444 durgadasgoa@gmail.com
– उदय नरसिंह महांबरे 9420766769 udaymhambro@gmail.com
—————————————————————————————————————————————–