दुर्गप्रेमी तरुणांनी स्वयंप्रेरणेने एकत्र येऊन महाराष्ट्रातील गडकोटांच्या प्रेमापोटी स्थापन केलेली संस्था म्हणजे दुर्गसखा. ती मित्रमंडळी सह्याद्रीत अनेक वर्षे भटकत. पायवाटा, कडेकपाऱ्या ‘एकमेकां सहाय्य करून’ पायाखालून घालत. परंतु त्यांनी साहस म्हणून सुरू केलेली भटकंती हळुहळू डोळसपणे घडू लागली.
‘दुर्गसखा’ दोन उपक्रमांमधून काम करू लागले : पर्यटनातून प्रबोधन आणि ‘एक पाऊल मानवतेकडे’
संस्थेतर्फे दरवर्षी ‘दूर्ग अभ्यास भ्रमण’ आयोजित केले जाते. त्या कार्यक्रमादरम्यान गडावर हिंडताना इतिहास अभ्यासक सभासदांना दुर्गांची बलस्थाने व दुर्गांचा इतिहास उलगडून दाखवतात आणि प्रश्नोत्तरादरम्यान शंकांचे निरसन केले जाते. त्या कार्यक्रमाद्वारे आम्ही राजगड, रायगड, पुरंदर, प्रतापगड, शिवनेरी–नाणेघाट, सुधागड अशा दुर्गांचा अभ्यास केला आहे.
पु.ल. देशपांडे त्यांच्या एका भाषणात म्हणतात, “आपण आनंदात असताना दुसऱ्याही कोणाला तरी आनंदाची गरज आहे याची जाणीव असणं म्हणजे माणुसकी.” इतके सुंदर विचार निव्वळ विचारात न राहता ते प्रत्यक्ष आचारात यावेत याकरता ‘दुर्गसखा’ पर्यटनातून प्रबोधनाच्या जोडीने ‘एक पाऊल मानवतेकडे’ही टाकत असते.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने (२०१४) टेंभुर्ली केंद्रातील डिजिटल वर्गाचे आणि पष्टेपाडा येथील डिजिटल शाळेतील नव्या ‘थ्रीडी’ वर्गाचे आणि त्यासाठी ऊर्जा पुरवणाऱ्या सोलार सिस्टिमचे उद्घाटन करण्यात आले. ‘दुर्गसखा’ चॅरिटेबल ट्रस्ट, ठाणे आणि ‘आपुलकी’ पुणे या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. यापुढे पष्टेपाडा शाळेत डिजिटल फळ्यावर शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना विद्युत मंडळाच्या मेहेरबानीवर अवलंबून राहण्याची गरज उरलेली नाही.
मकरंद केतकर,
ई २/६०२, ओव्हलनेस्ट,
आदित्य गार्डन सिटीमागे,
सर्व्हिस रोड, वारजे, पुणे ४११ ०५८
८६९८९५०९०९
makketkar@gmail.com