समुद्र शांत आहे. तो कुकरमध्ये तीन भांडी लावतो, हसतो. दोन-तीन दिवसांनी झकास साग्रसंगीत जेवण घेऊया असा बेत मनात आखतो. छान संगीत लावतो. स्वारी आनंदात आहे.
तो मानेमागे हात गुंफून थोडा विसावला. त्याने पायाने ठेका धरला. डोळे मिटले. त्याचा चेहरा असा, की जणू तोच इथला सम्राट!
अरे सांळ! हा निसर्ग भारी खट्याळ आणि खरोखरीच, क्षणार्धात त्याचा मूड बदलला. सोसाट्याचा वारा सुटला. होडी हेलकावू लागली. त्यानं चपळाईनं सगळं आवरलं.
समुद्राचं तांडव सुरू झालं. लाटांची उंची हळुहळू वाढली. होडी क्षणात लाटेवर आरूढ होते. वर जाते आणि क्षणात खोल खाली घसरत जाते. सारं जग नजरेआड होतं. फक्त उंचच्या उंच लाट. भिंतच जणू… पण पुन्हा क्षणार्धात होडी झपकन वर येते.
राजाची गादी गेली! तो पट्टीचा खलाशी झाला.
त्याची धावपळ सुरू झाली. शीड बदलायला हवं. तो कामाला लागतो. त्याला उसंत नाही. त्याचं काम यंत्राच्या वेगानं चाललंय. तोंडात चॉकलेट आहे.
अंधार पडेपर्यंत सारं सुरळीत झालं. पुन्हा शीड बदलावं लागलं. त्यानं गॅसवर कुकर ठेवला. संगीत सुरू झालं. आकाश निरभ्र आहे. तारे दिसतायत. चांदण्या लुकलुकतायत. आजची रात्र सुंदर आहे. पौर्णिमा आहे वाटतं. पूर्ण चंद्र दिसतो. तरी आकाशदर्शन विलोभनीय आहे. तो आकाशाकडे एकटक बघतो. कुकरची शिट्टी वाजली. तो भानावर आला.
दुपारी हुकलेलं जेवण आता मिळालं! छान गारवा आहे. झोपू या. बॅकलॉग भरून काढावा असा विचार करुन तो ऑटो पायलट चालू करून झोपेच्या पिशवीत शिरला.
त्याची झोप सजग असावी. तो ऑटो पायलट बिनचूक काम करतोय ह्याची खात्री प्रत्येक तासाला करत होता. पण थकव्यामुळे, एकदा त्याला दोन तासांनी जाग आली. तेव्हा होडीची दिशा भरकटलेली आढळली! वा-याची दिशा बदलली तर ऑटो पायलट काही करू शकत नाही. तो आपला सरळ नाकासमोर जात राहतो. त्यानं वा-याशी जुळवून घेईल अशा प्रकारे शिडाची दिशा बदलली.
दोंदे यांनी १९ ऑगस्ट २००९ रोजी पृथ्वी प्रदक्षिणेसाठी प्रस्थान ठेवलं आणि ते १८ व १९ मे २०१० च्या मध्यरात्री मुंबईला परतले.
त्यांनी १९८६ मध्ये राष्ट्रीय संरक्षण अकादमीत प्रवेश घेतला. ते १९९१ मध्ये भारतीय नौदलात अधिकारीपदावर रूजू झाले. त्यांना शिडाच्या बोटीतून प्रवास करण्याची हौस. त्यांना कॅनडामध्ये तसं प्रशिक्षण घेण्याची संधीही मिळाली.
सागर परिक्रमा करण्याची मूळ कल्पना नौदलाचे माजी व्हाइस अँडमिरल मनोहर आवटी ह्यांची होती. ती कल्पना बासनात गुंडाळली गेली नाही, हे विशेष.
नौदलानं ह्या मोहिमेसाठी अधिका-यांची संक्षिप्त यादी तयार केली. त्यामध्ये दोंदे यांची निवड झाली. मोहिमेचा अंतिम निर्णय झाल्यावर त्यांनी आईला आणि बहिणीला सांगितलं.
त्या क्षणानंतर प्रकल्प अहवाल तयार करण्यापासून ते प्रदक्षिणा यशस्वी होईपर्यंतची सर्व योजना दोंदे यांनी स्वत: आखली. योजनेला मान्यता मिळाल्यानंतर शिडाच्या होडीची चित्ररचना तयार करण्यापासून सुरूवात झाली. गोव्याचे रत्नाकर दांडेकर ह्यांनी हे आव्हान स्वीकारलं. त्यांनी मग लाकूड आणि फायबर ग्लास यांच्या माध्यमातून शिडाची बोट तयार केली. डच डिझाईन मिळवून त्याबरहुकूम ती स्वदेशी बोट बनवण्यात आली. त्या बोटीचे वजन छप्पन टन इतके आहे. दांडेकर यांच्या कुशलतेनं आणि अनुभवानं आयएनएसव्ही म्हादेई ही होडी आकारास आली.
कमांडर दोंदे यांनी त्या बोटीच्या नावामागचा रंजक इतिहास सांगितला. त म्हणतात, ''गोव्यातील दोन तालुक्यात काही ठिकाणी काळ्या दगडातील शिल्पे आढळतात. ज्यावर शिडाच्या बोटीचे चित्र कोरले आहे. त्या शिडावर देवी उभी आहे. स्थानिक लोक तिला बोट देवी म्हणूनदेखील ओळखतात. या शिल्पांचा संदर्भ कदंब काळापर्यंत म्हणजेच दोन हजार वर्षांमागचा आहे. तर गोव्यातील मांडवी नदीचे स्थानिक नाव म्हादेई. तिचा उगम कर्नाटकचा. त्या नदीला कर्नाटकात म्हादेई म्हणून ओळखले जाते.''
चौसष्ट वर्षांचे रॉबिन जॉनस्टन ह्यांनी दोंदे यांना सहा आठवड्यांचं प्रशिक्षण दिलं. त्यांनी १९६८-६९ मध्ये एकट्यानं पृथ्वी प्रदक्षिणा केली होती. दोंदे आणि दांडेकर ह्यांनी सफर सुरू होण्यापूर्वी ‘म्हादेई’ नौकेतून मॉरिशसपर्यंत प्रवास केला. हे जाणं-येणं अंतर सात हजार मैल आहे.
दोंदे ह्यांनी पश्चिमेकडून पूर्व असा प्रदक्षिणेचा मार्ग निवडला. त्यांनी प्रदक्षिणेत ऑस्ट्रेलियातील फ्रेमांटल, न्यूझीलंडमधील क्राईस्टचर्च, फॉकलंड बेटावरील स्टॅनले आणि दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन ही चार मुख्य ठाणी निवडली होती.
“प्रवास खडतर होताच; शिवाय माणसाच्या कणखर मनोवृत्तीची कसोटी पाहणारा होता. प्रत्येक दिवशी आपल्या व्याख्येप्रमाणे जेवण मिळत नाही. कधीकधी, तीन-चार दिवस बंद डब्यांतील पदार्थांवर आणि चॉकलेटवर दिवस काढावे लागतात. झोपेचं वेळापत्रक अनिश्चित असतं. हवामान बेभरवशी असतं. ह्या सर्व प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत अंतिम रेषा गाठायची असते.” हे मोठं दिव्य आहे.
बेचाळीस वर्षांचे दोंदे २७६ दिवसांच्या सफरीत १५७ दिवस समुद्रात होते. त्यांनी बारा हजार सहाशे नॉटिकल मैलां चा जलप्रवास केला. ह्या प्रदीर्घ प्रवासात एकदा सुकाणू आणि ऑटो-पायलट नादुरूस्त झाले. त्यांना स्वत:च ते सगळं निभावून न्यावं लागलं. केपटाऊन इथं त्यांनी सर्व दुरूस्ती केल्या. ‘एकला चलो रे’ अशी स्थिती असल्यामुळे चुका करायला मोकळे. कोणी ओरडायला नाही’ – हे त्यांचं भाष्य.
संकटांपेक्षा नवीन काय दिसलं आणि त्याचा आनंद किती मिळतो ह्याचा विचार केला तर हा प्रवास सुखावह होईल हे दोंदे यांचं धोरण. त-हत-हेचे लहानमोठे मासे आणि विविध रंगांचे आणि आकारांचे पक्षी ही त्यांपैकी आनंदाची दोन उदाहरणं.
प्रदक्षिणा संपवून मुंबईला पोचताना गंमतच झाली. १८ मे रोजी दुपारी मुंबईच्या दिशेनं येणारी ‘म्हादेई’ वा-याच्या प्रभावामुळे आफ्रिकेकडे कूच करू लागली. दोंदे यांनी परिश्रमपूर्वक ‘म्हादेई’ला योग्य मार्गाकडे वळवलं.
उपराष्ट्रपती हमीद अन्सारी ह्यांनी २२ मे रोजी म्हादेईच्या स्वागताला यायचं मान्य केलं होतं. तो कार्यक्रम पक्का ठरला होता, पण त्या दिवशी १८ मे रोजी वा-यामुळे झाला तसा घोटाळा झाला तर? अधिकृत स्वागत कार्यक्रमावर पाणी पडेल! या अडचणीवर मात करण्यासाठी नौदल पश्चिम विभागानं समुद्रात तळ ठोकण्याऐवजी एक उपाय शोधला. त्यानुसार दोंदे यांनी नेव्हल डॉकयार्ड मार्गानं मुंबईत प्रवेश केला. त्यांनी नेव्हल डॉकयार्ड मेसमध्ये मुक्काम केला. दोंदे २२ मे रोजी ‘म्हादेई’ होडी घेऊन १८ तारखेच्या जागी समुद्रात गेले आणि ठरलेल्या वेळी नियोजित जागेवर सीमारेषा ओलांडून त्यांनी परिक्रमा पूर्ण केली! ‘आयएनएस दिल्ली’वर उपराष्ट्रपती, नेव्हल स्टाफ मुख्य निर्मलकुमार वर्मा व दोंदे ह्यांचे कुटुंबीय ह्या सर्वांनी दोंदे ह्यांचं स्वागत केलं. दोंदे यांचं जीवनस्वप्न सफल झालं होतं! त्यालाही वर्ष होऊन गेलं!
– आदिनाथ हरवंदे
जहाज भरकटलंय…. – उषा मेहता
( दोंदे यांनी एकट्याने समुद्रमार्गे पृथ्वी प्रदक्षिणा केली. त्यासंबंधी आदिनाथ हरवंदे यांनी हृद्य वृत्तांत लिहिला आहे. तो वाचून मी वाचलेली उषा मेहता यांची कविता आठवली. ती ‘साधने ’च्या गेल्या वर्षीच्या दिवाळी अंकात आली होती; येथे उदधृत करत आहे.- राजेश सावंत, परळ)
जहाज भरकटलंय
लाटा उसळताहेत
किती काळ; जमीन, झाडं, पक्षी
दर्शन नाही
वरती आकाश
खाली उसळणा-या लाटा फक्त
पहाटे दिसला, आभाळभर भयावह रक्तिमा
‘रेड इन द मॉर्निंग, सेलर्स टेक वॉर्निंग’
वादळ अधिकच भडकण्याची
धडकी भरवणारी चिन्हं…
काय होणार…
आणखी किती भरकटणार?
की मधेच जलसमाधी…?
इंधन, चारा, पाणी, सारं
संपुष्टात आलेलं,
नाडीचे ठोके वाढत जाणारे….
रात्रीही क्षयी चंद्राचं अस्पष्टसं दर्शन
आता ती नखाएवढी चंद्रकोरही विलीन होईल
भीषण अमावास्या पसरून राहील
घनघोर अंधार
उद्याम लाटांच्या अखंड गर्जना
भुकेमुळे चवताळलेल्या
हिंस्र श्वापदांसारख्या
आणि… आता…
घनदाट रात्रीवर पसरतोय लालसर प्रकाश
हृदयं उजळून टाकणारा…
पहाट होता होता
दूरवर पक्षांचे उडणारे ठिपके
ओऽहोऽ मजेत… कमानी टाकत
डॉल्फिन उसळ्या घेताहेत!
आली….
जमीन जवळ आली
नारळी-पोफळी बोलावताहेत,
जवळपास, त्या नांगरून पडलेल्या होड्या…
चित्रातल्यासारख्या सुंदर
आता या नव्या भूमीवर
कोणतं ताट वाढून ठेवलं असेल?
– उषा मेहता- फोन : (022) 24461991. भ्रमणध्वनी : 9833084283
(इंग्रजी अवतरण ग्रीक खलाशांच्या अनुभवावरुन)
Last Updated on 24th Jan 2017