मी लहानपणापासूनच 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे दिवस न चुकता साजरे करायचो. पण महाराष्ट्र दिनाचा शोध माझ्या समवयस्क मित्रांप्रमाणे मलाही अगदी अलिकडच्या काळात लागला. मला तो जरा जास्त खोलवर लागला इतकंच आणि तोसुध्दा ग्रंथालयांमुळे. नाही तर सध्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढयाचा टीआरपी एवढा कमी आहे, की त्याच्या दंतकथा (मग त्या महाराष्ट्राच्या निर्मिती अन् संघर्षाच्या का असेनात) ऐकण्यात कुणालाच स्वारस्य नाही. माझे आजोबा स्वातंत्र्य चळवळीत होते असं अभिमानानं सांगताना लोक आढळतील, पण माझे वडील संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत होते असं सांगताना कुणीच दिसत नाही.
महाराष्ट्राचा पूर्वेतिहास माझ्या पिढीला माहीत नाही याचं दु:ख मला नाही. पण माझ्या पिढीवाल्यांचे नवे साहेब म्हणतात तसं, म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, पण काळ सोकावतो, याची बोच माझ्या मनाला लागलीय. जगात सध्या सर्वत्र जागतिकीकरणाचे वारे वेगानं वाहत आहेत. इथला महाराष्ट्रीय समाज त्या लाटेवर स्वार झाला असता, या प्रवासात ठेचकाळला असता, तर मला खेद वाटला नसता. पण आज हा मराठी माणूस हबकला आहे, सैरभैर झाला आहे. निराश होऊन पळवाट शोधतोय, ही गोष्ट मनाला अस्वस्थ करते. एखादा निरूपम किंवा कृपाशंकर मंत्री झाला की याच्या छातीत धडकी भरते. महाराष्ट्रातलं आपलं अस्तित्व संकटात येण्याच्या भीतीनं तो चिंतातूर होतो. मराठी माणूस इतका अगतिक आणि लाचार का झाला? त्याच्या मनातील भीती हे त्याच्या न्यूनगंडाचं प्रतिबिंब आहे की घृणास्पद राजकारणाचं अपत्य आहे, या गोष्टींचा शोध घेणं आवश्यक आहे? मराठीचं अस्तित्व धोक्यात आलं आहे आणि आज त्यासाठी प्रखर चळवळीची आवश्यकता असल्याचं दृश्य निर्माण करून ही गोष्ट त्याला पटवून देण्यात आलीय. त्यानंही ते आंधळेपणानं स्वीकारलंय. पण याच्याआड मूलभूत आणि आवश्यक असलेले प्रश्न झाकोळून जातायत आणि होते ती केवळ इतिहासाची पुनरावृत्ती. या राजकीय तवंगाच्या गाभ्यात असलेल्या बेकारी, भ्रष्टाचार अन् रोजगार या सार्वत्रिक प्रश्नांचा गाळ साफ करण्यास कोणीच सरसावत नाही. त्यामुळे तथाकथित चळवळींच्या उसन्या आवेशात लढा देण्याच्या वल्गना करणारा मराठी माणूस प्रत्यक्षात एका वर्तुळात फिरत राहतोय.
दुसरी एक गोष्ट माझ्या मनाला सतावते. ती म्हणजे महाराष्ट्रातल्या चळवळींचं नाहीसं होणं. आज सेझ आणि विकास प्रकल्पांच्या नावाखाली लाखो लोकांना विस्थापित केलं जातं. माथाडी आणि विविध प्रकारच्या असंघटित कामगारांवर अन्याय केले जाताहेत. शेतकरी तर देशोधडीला लागले. अशा प्रतिकूल परिस्थितीत चळवळींचं अस्तित्व नसणं ही गोष्ट विदारक नाही का?
संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर त्यासाठीची समितीही विलीन झाली. पण मराठी मनातली असंतुष्टता आणि भय कायम राहिलं. त्यातच काळाची पावलं ओळखून आपल्यात बदल घडवून आणण्यात मराठी माणूस कमी पडला. अत्रे यांचं नेतृत्वही प्रभावहीन ठरू लागलं. महाराष्ट्राच्या राजकारणात एकूण पोकळी निर्माण झाली. जी बाळासाहेबांच्या एंट्रीसाठी कारणीभूत ठरली. बाळासाहेबांनी मराठी माणसातील (न्यूनगंडाचा, हताशेचा) अंगार कायम फुलवत ठेवला. त्याचं बिनदिक्कत नेतृत्व आज राज ठाकरे करत आहेत. देशातल्या इतर राज्यांत असलेल्या बेकारी, भ्रष्टाचार, अनीती आणि हिंसा या सर्व समस्यांपासून महाराष्ट्रही अलिप्त नाही. गेल्या काही वर्षांमध्ये तर या गोष्टींचा सुळसुळाट झाला आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे ती अनेक प्रकारच्या भ्रष्टाचाराची गंगोत्री असणं क्रमप्राप्त आहे आणि हे वास्तव आहे. मात्र स्वत:ला मध्यममार्गी आणि प्रामाणिक म्हणवून घेणारा मराठी माणूसही यात आकंठ बुडालेला आहे. व्यापार-उद्योगात मराठी माणूस पूर्वीसारखा पिछाडीवर राहिला असला तरी त्यानं प्रगतीसाठी किर्लोस्कर पॅटर्न धुडकावून अंबानी फार्म्युला स्वीकारला असल्याची खंत वाटते.
बदल हा समाजाचा स्थायिभाव आहे. सध्या समाजात पावलोपावली दिसून येणारी आत्ममग्नता हीदेखील त्या बदलाचं उदाहरण आहे. या आत्ममग्नतेचे दृश्य परिणाम समाजावर होताना दिसताहेत. मात्र नजीकच्या काळात यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागतील आणि त्यानंतर समाज आपोआप एका चळवळीच्या दिशेनं वाटचाल करू लागेल. उदाहरणार्थ, हाती शस्त्र घेतलेला नक्षलवादी हा सामाजिक विषमतेतून निघालेला प्रक्षेप आहे. त्याचं अस्तित्व नष्ट करण्यापेक्षा त्यामागचं मूळ कारण नाहीसं करणं अधिक महत्त्वाचं असेल. आणि यादृष्टीनं केलेले प्रयत्न हीच त्या चळवळीकडील वाटचाल असेल.
प्रज्ञा दया पवार आपल्या एका कवितेत म्हणतात, चंद्र माझ्यापर्यंत येईस्तोर, क्षीण मरतुकडा होत गेला. तशीच काहीशी अवस्था माझ्या पिढीची झाली आहे. महाराष्ट्राची पुरोगामी विचारसरणी, लढाऊ वृत्ती आमच्यापर्यंत पोचण्यापूर्वीच क्षीण होत गेली. आमच्या जुन्या लढयांची आठवण काढून आमच्या मर्दमराठेपणाचा बडेजाव आम्ही मिरवत असलो तरी एखाद्या उद्देशानं एकत्रितपणे लढण्याची उर्मी आम्ही गमावून बसलो आहोत. देशाला चळवळींचं देणं देणारा महाराष्ट्र आत्ममग्नतेमुळे स्वत:च्या वैयक्तिक कोशामध्ये अडकून पडला आहे. पण असं असलं तरीही मला आशेचा किरण दिसतो. कारण मराठी तरूणांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे, यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि रात्रीच्या गर्भातच उद्याचा उष:काल असतो हे मी जाणतो.